चंद्रकांत वानखडेंच्या दोन्ही पुस्तकांवर परीक्षणं मी लिहिलित. त्याचा मला अभिमान आणि त्यापेक्षाही जास्त आनंद आहे. आपुला चि वाद आपणासी चं परीक्षण गेल्या आठवड्यात लोकप्रभेत छापून आलं होतं. पण खरं तर ही परीक्षणं किंवा समीक्षा नाही. ही या पुस्तकांची मला भावलेली ओळख आहे. कारण असं स्वतःपासून अलिप्त ठेवून मी ही दोन्ही पुस्तकं नाही वाचू शकलो. आपुलाचिने तर खूपच अस्वस्थ झालो होतो. अमरजींकडे सांगितलेली माझी पहिली प्रतिक्रिया होती, हे पुस्तक वाचण्याचीही आपली लायकी नाही.
सोमवारी चंदूभाऊंची प्रकट मुलाखत होतेय. प्रतिमाताईंसारखं तोलामोलाचं व्यक्तिमत्त्व ही मुलाखत घेतंय. रवी बापट बोलणार आहेत. हा कार्यक्रम जबरदस्त होईलसं वाटतंय. चंदूभाऊना ऐकणं हा मुंबईकरांसाठीचा दुर्मीळ योग आहे. आपण सगळ्यांनी साधायलाच हवा तो.
कुठेः रवींद्र नाट्यमंदिराचं मिनी थिएटर, प्रभादेवी.
कधीः २८ फेब्रुवारी २०११, संध्याकाळी ६.३० वाजता
लोकप्रभेतला लेख नेहमीसारखा कटपेस्ट केलाय.
आणीबाणीच्या काळात एस. एम. जोशी राज्यभर सरकारविरोधात फिरत होते. ते रेल्वेच्या थर्ड क्लासनेच प्रवास करत. एसेम यांच्या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलाने त्यांना फर्स्ट क्लासने प्रवास करायला सांगितलं. कार्यकर्ते निधी उभारतात, त्यामुळे त्यातून चैन आणि उधळपट्टी करता येणार नाही, असं एसेमनी स्पष्ट केलं. मात्र तू खर्च करणार असशील तर मी फर्स्ट क्लासने प्रवास करेन, असंही मुलाला सांगितलं. त्यावर मुलाने काहीच उत्तर दिलं नाही आणि एसेमचा थर्ड क्लासनेच प्रवास सुरू राहिला.
आणीबाणीत एसेमसारखीच ना. ग. गोरे यांनाही अटक झाली नव्हती. अमरावतीतल्या धडपडणाऱ्या तरुणांनी त्यांना व्याख्यानाला बोलावलं होतं. आणीबाणीमुळे गाडी मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे सभास्थानी नेण्यासाठी सायकलरिक्षा आणली होती. नानासाहेबांच्या कपाळावर आठ्या आल्या. कार्यकर्त्यांकडे पैसे नव्हते म्हणून त्यांची फर्स्ट क्लासऐवजी स्लिपर कोचमध्ये व्यवस्था केली होती. अरे, तुम्ही म्हाता-याला मारायला तर निघाले नाही ना? असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना खजील केलं. पोरांना फर्स्ट क्लासचं तिकीट काढता येत नाही, तर सभा ठेवलीच कशाला, अशा प्रतिक्रिया पुण्यात परतल्यावर दिल्या.
हे दोन टोकाचे दोन अनुभव. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि पत्रकार चंद्रकांत वानखडे यांचं पुस्तक ‘आपुलाचि वाद आपणांसी’ चार महिन्यांपूर्वी आलंय. त्यात हे फर्स्ट हँड अनुभव आरपार उतरलेत. जे वाटलं ते वानखडे सरळसोट मांडतात. पुस्तकाच्या पानापानावर असेच एकामागून एक अनुभव येत राहतात. आपण आतून हलतो. अस्वस्थ होतो. आपल्या धारणांना धक्का बसतो. सिंहांची कातडी ओढलेले ससे दिसतात. आपण ज्यांना ससे म्हणून दुर्लक्ष केलं त्यांच्यामधले सिंह भेटत राहतात. कारण हा दृष्टिकोन नवा असतो. अभिनिवेषाशिवायचा हा दृष्टिकोन आपल्याला नव्याने विचार करायला लावतो. हे दोनशे पानांच्या छोटय़ाशा पुस्तकाचं हे मोठंच यश मानायला हवं.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटाला या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. चार महिन्यांत दुसरी आवृत्ती येतेय. अगदी कोणाच्याही मनाला हे पुस्तक जाऊन भिडतं. आज आपलं सगळं जगणंच हिशेबाच्या रिंगणात बसलंय. यातून किती कमाई होणार, हे गणित प्रत्येक शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचावं यासाठी सगळं जग धडपडतंय. स्वतःच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटची नीट तजवीज करून तरुणांना चेतवणारी चारदोन भाषणं करणाऱ्यालाही आपण ध्येयवादी म्हणू लागलोय. गरीब मुलांच्या कुपोषणाची चर्चा करणारे सेमिनार फाइव्ह स्टार हॉटेलांमध्येच होतातच, हे आपण गृहित धरलंय. अशा वेळेस सगळी समीकरणं आणि हिशेब लाथाडून समाज बदलण्याच्या मस्तीत आयुष्य पणाला लावणारे चंद्रकांत वानखडे आपल्याला या पुस्तकातून भेटतात आणि आपण हादरून जातो.
हे तसं वानखेडेंचं आत्मचरित्र नाही. कारण यात बालपण, तरुणपण आणि आतापर्यंतचा सरळ रेषेतला आलेख येत नाही. याला आठवणींच्या नोंदी म्हणायला हवं. रिटायर्ड झाल्यावर अशा आठवणी किंवा आत्मचरित्र लिहिण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण ‘आपुलाचि’ मधल्या नोंदी या सरळसोट आत्मचरित्रांपेक्षा एकशे ऐंशी अंशांत वेगळ्या आहेत. कारण हे आयुष्यच वेगळं आहे. समोरच्या ताऱ्याच्या दिशेने बेधुंद धावताना पायाखाली स्वखुशीने घेतलेल्या अंगारांची ही कहाणी आहे. आजच्या राखेच्या धुळवडीत हे अंगार कधीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून हे आत्मकथन वेगळं आहे.
अमरावतीतला एक तरुण मॉर्निंग वॉक व्हावा म्हणून सर्वोदयी कार्यकर्ते एकनाथ हिरुळकरांबरोबर रोज सकाळी फिरायला जातो. एका आवडलेल्या मुलीला भेटायला मिळेल म्हणून नागपुरातल्या शिबिरात जातो. जयप्रकाश नारायणांनी सुरू केलेल्या तरुण शांती सेनेचं हे शिबिर असतं. सोन्यासारखं करियर समोर असूनही ते समाजसेवेसाठी झुरळासारखं उडवणारे आपल्याच वयाचे तरुण तरुणी त्याला भेटतात आणि आतापर्यंत एका मध्यमवर्गीय रेषेत जगलेल्या आयुष्याला अख्खी कलाटणी मिळते.
आणीबाणीच्या विरोधातला लढा. त्यातला तुरुंगवास. एसेम यांच्या प्रचार दौऱ्यांत सोबती म्हणून मिळालेला सहवास. छात्र युवा संघर्ष वाहिनीचं काम. नामांतर आंदोलन. पुन्हा तुरुंगवास. देश समजून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या मेटिखेडा या छोटय़ाशा गावात सहकुटुंब राहणं. तिथल्या शेतमजुरांचं संघटन. पुढे शेतकरी संघटना. आंदोलनं आणि लोकसभेची निवडणूक लढवणंही. पुढे शेतकरी संघटनेत केलेली बंडखोरी असा हा जवळपास तीस वर्षांचा प्रवास यात आहे.
परिवर्तनाच्या लढाईत एकाच ठिकाणी निबर आणि डबक्यासारखं थांबणं नाकारण आहे या प्रवासात. ही वाहती नदी आहे. त्यात बरीवाईट वळणं आहेत. कोणत्याही एकाच विचारात अडकवून घेणं कायम नाकारलेलं आहे. जात, धर्म, विचारधारा, संघटना या सगळ्याच्या पलीकडे पाहणं आहे. समाजकारणात येताना अॅण्टि एस्टॅब्लिशमेंटचं बाळकडू पिऊन स्वतला एस्टॅब्लिश होऊ न देण्यासाठीही इमान पाळणं आहे. आणि मुख्य म्हणजे सगळं नितळपणे मांडलेलं आहे. जगण्यातला प्रामाणिकपणा जेव्हा लेखनात येतो, तेव्हा ते लिखाण वेगळ्याच उंचीवर जातं. ते इथे घडलंय.
परिवर्तनाच्या लढाईत अनेक मोठय़ा लोकांच्या सोबत वेगवेगळे अनुभव आलेत. समोरच्याच्या मोठेपणासमोर दिपून किंवा दबून जाण्याचा वानखेडेंचा स्वभाव नाही. सारं रोखठोक आहे, जसं आहे तसं. काही ठिकाणी लोकांची नावं बदललीत किंवा टाळलीत. पण एखाददुसरा अपवाद वगळता कुणालाही सोडलेलं नाही. त्यामुळे मोठमोठय़ा लोकांचे वेगळेच चेहरे आपल्यासमोर येतात. विनोबा भावे, ना. ग. गोरे, नरहर कुरुंदकर, बाबा आमटे, राम शेवाळकर अशा दिग्गजांच्या मोठेपणात लपलेल्या काही गोष्टी इकडे मोकळेपणाने समोर येतात. वर त्यात त्यांच्यावर टीका करायची नसते. फक्त आलेले अनुभव नोंदवायचे असतात. त्यामुळे हे निर्विष असतं. शेतकरी संघटनेत तर वानखेडेंनी शरद जोशींच्या नेतृत्वात अख्खी उमेद घालवली. त्यांच्याशी झालेले मतभेद आणि त्यांचं केलेलं पोस्ट मॉर्टेम यात आहे. शरद जोशींच्या पंच्याहत्तरीनिमित्त अशी चर्चा होणं गरजेचं आहे. पण या सगळ्यापेक्षाही वानखडेंबरोबर राहणाऱ्या देवकुमार बाचिकवारची कहाणी तर एक ताकदीचा सिनेमा बनू शकेल इतकी हादरवणारी आहे. शिवाय वानखडेंच्या पत्नी मायाताईंविषयी तर मुळात वाचायलाच हवं.
या गोष्टी सगळ्यांनाच पटतील असं नाही. त्यावर वादही होऊ शकतील. त्या कोणीतरी नोंदवणं गरजेचं होतं. विशेषत: वानखेडेंसारख्या जाणकारानं मांडणं महत्त्वाचं होतं. लोकांमधे राहून जगण्याचे सगळे फण्डे स्पष्ट असलेलं हे व्यक्तिमत्त्व. म्हणून या आत्मकथनातल्या साध्या सोप्या घटनांनाही दस्तऐवजाचं मोल आलंय. एक उदाहरण लहानपणीचं. त्यांचे आजोबा कीर्तनकार. आजोबांचे एक ब्राम्हण मित्र. त्यांचा मुलगा आणि वानखेडेंचे मामा सोबत शिकणारे. कीर्तन सुरू असताना मामा अभ्यास करत असले की आजोबांचे मित्र विचारायचे भक्तीपेक्षा अभ्यास महत्त्वाचा आहे का? आणि त्यांचा मुलगा किर्तनात बसलेला असताना त्याला अभ्यास करायला पिटाळायचे. असे प्रसंग एरव्ही कदाचित जातीय अभिनिवेषाने मांडले गेले असते. पण इथे इतर अनेक घटनांसारखे मांडून वानखडे पुढे जातात, म्हणून हे महत्त्वाचं.
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न देशाच्या मुख्य अजेंडय़ावर आणण्याचं श्रेय असणारे चंद्रकांत वानखडे एक. नव्या शतकातला त्यांची ओळख प्रामुख्याने पत्रकार आणि संपादक म्हणून. हा नवा प्रवास या पुस्तकात नाही. हा प्रवासही त्यांनी लिहायला हवाय. एका साध्या सत्यासाठी या शेतकरी आत्महत्यांवरील पुस्तकाने वानखेडेंची वैचारिक उंची आपल्यासमोर आणली होती. आता त्यांच्यातल्या कार्यकर्त्यांला आणि लेखकाला आपल्यासमोर आणलंय.
एक पुस्तक म्हणून आजच्या महाराष्ट्रासाठी आणि एकूणच मराठी भाषेसाठीही याचं मोल खूप मोठं आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे की आत्मकथनात आपल्यासारख्यांना विचार करायला लावायची आणि बदलण्याची मोठी ताकद आहे.
No comments:
Post a Comment