Saturday 26 February 2011

चंदूभाऊंच्या एका साध्या सत्यासाठी!


मुंबईत रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमधे चंदूभाऊंची मुलाखत आहे. प्रतिमाताई जोशी मुलाखत घेणार आहेत. डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत. २८ फेब्रुवारी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आहे. चंदूभाऊंना ऐकणं ही खरंच पर्वणी आहे. तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचं माझ्याकडून निमंत्रण. या, आम्ही आपली वाट बघतोय.


अमर हबीबांची भेट बरीच जुनी. सहा सात वर्षं झाली. मी ईटीवीसाठी दिल्लीत असताना ते भेटले. ते केसरीचे आणि साप्ताहिक महाराष्ट्रचे दिल्ली प्रतिनिधी होते. खूप मोठा माणूस असूनही ते माझ्यासारख्या आणखी काही चिल्लर पोरांचे दोस्त बनले. अमरजी, प्रमोद चुंचूवार आणि मी अशा एकेका विषयावर दिवस दिवस रात्र रात्र चाललेल्या चर्चा खूप समृद्ध करणा-या होत्या. ते अंबाजोगाईला गेले. मी मुंबईला परतलो. प्रमोद बराच काळ दिल्लीत राहिला. पण एकमेकांना लागलेला लळा संपला नाही. त्यांच्या नातेची प्रस्तावना त्यांनी माझ्याकडून लिहून घेतली. तो माझ्यासाठी खूपच अभिमानाच क्षण. पण या सगळ्यापेक्षा त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट आम्हाला दिली. ते म्हणजे त्यांची दोस्तमंडळी.

मधमाशी मध गोळा करते, तसे अमरजींचे देशभर पसरलेले दोस्त. लोकनाथ यशवंतांच्या कवितांचा किरण मेश्रामांनी हिंदीत अनुवाद केला, ऐलान त्याचं नाव. त्याच्या प्रकाशनाला अमरजी आणि मी नागपुरात गेलो होतो. तिथे अमरजींना कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडायला एक माणूस छोट्याशा गाडीतून आला. खण्णं वाजणारा दमदार आवाज आणि भालजी पेंढारकरांच्या सिनेमातल्या शायिस्तेखानासारखी कोरलेली दाढी. अमरजींनी ओळख करून दिली, चंद्रकांत वानखडे.

चंदूभाऊ. त्यांच्याविषयी अमरजींकडून खूप ऐकलेलं. वाचलेलंही. एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल आदर होताच. पण संपादक म्हणून त्यापेक्षाही खूप आदर. ते तेव्हा सकाळच्या विदर्भ एडिशनचे संपादक होते. शेतक-यांच्या आत्महत्या ही एक समस्या आहे. हे आपल्यासारख्यांना कळलं त्यात चंदूभाऊंचा मोठा हात.

भेटल्यावर वाटलं खूप जुनी ओळख आहे. पुढे खूप क्वचित भेट. क्वचित फोनवर बोलणं. अधूनमधून ख्यालीखुशाली कळायची. चंदूभाऊंचे शेतकरी प्रश्नावरचे लेख अमरजी छापताहेत असं कळलं. अमरजींनी नेहमीप्रमाणे पुस्तक घरी पाठवलं. पुस्तकाचं नाव, एका साध्या सत्यासाठी. वाचलं. अस्वस्थ झालो. लिहिलं. मटात परीक्षण छापून आलं.

ते परीक्षण वाचलं मनोविकास प्रकाशनाच्या अरविंद घनःश्याम पाटकरांनी. ते आताआतापर्यंत असंच संपूर्ण नाव छापायचे. पाटकर प्रकाशक खरे, पण आधी हाडाचे कार्यकर्तेच. त्यांनी चंदूभाऊंच्या मागे लागून एक पुस्तक लिहून घेतलं. ऑक्टोबरच्या अखेरीस तेही पुस्तक आलं. आपुला चि वाद आपणासी. तीन महिन्यांत पहिली आवृत्ती संपली. आजच पुण्यात दुस-या आवृत्तीचं प्रकाशन होतंय.

दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने मुंबईत रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमधे चंदूभाऊंची मुलाखत आहे. प्रतिमाताई जोशी मुलाखत घेणार आहेत. डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत. २८ फेब्रुवारी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आहे. चंदूभाऊंना ऐकणं ही खरंच पर्वणी आहे. तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचं माझ्याकडून निमंत्रण. या, आम्ही आपली वाट बघतोय.

एका साध्या सत्यासाठीचं मी लिहिलेलं परीक्षण पुढे कटपेस्ट करतोय. पण त्याआधी चंदूभाऊंनी एका साध्या सत्यासाठी हे नाव ज्या कवितेवरून घेतलंय, ती म. म. देशपांडेंची कविताही सर्च करून कटपेस्ट केलीय. कवितेचं नाव तहान. तीही अस्वस्थ करणारीच आहे.

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।


केंद सरकारचं बजेट आलं. छोट्या शेतक-यांना कर्जमाफी घोषित झाली. आता नोक-या सोडा नांगर हाती घ्याअसं बजेटचं 'मोरालसांगणारे कुत्सित कॉर्पोरेटी एसेमेस आणि मेल फॉरवर्ड होऊ लागले. बाकी आता आत्महत्या होणार नाहीतअशी आपली खात्री झाली. पुढा-यांनी श्रेय लाटण्यासाठी सभा मेळावे घेतले. सगळं झालं. पण तिकडे काळ्या आईच्या कुशीत राबणारे अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळतच राहिले. त्याचे आकडे दोनतीन दिवस ठसठशीत छापले गेले. कर्जमाफीचं हे 'मोरालअस्वस्थ करणारं होतं.

निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. त्यामुळे सभासोहळे होत राहतील. आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. पॅकेजचे मोठमोठे आकडे सत्य लपवत राहतील. कर्जमाफीच्या आणखीही घोषणा होतील. गोरगरीब रयतेवर आपणच कसे उपकार केलेयाचे बाइट 'जाणते राजे देतील. तरीही अनेक शेतकरी जिवंत राहण्याची साधी इच्छाही टिक ट्वेंटीत बुडवतीलफाशीला टांगवतील. हे असं का घडतंयशोधायला नको काशोधायचं असेल तर 'एका साध्या सत्यासाठीवाचावंच लागेल.

एका साध्या सत्यासाठीहा एक छोटा शंभर सव्वाशे पानांचा लेखसंग्रह आहे. लेखक आहेत विदर्भातले ज्येष्ठ पत्रकार चंदकांत वानखेडे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध पेपरांत गेल्या वर्ष दीड वर्षांत लिहिलेले लेख यात आहेत. ब-याचदा त्या त्या वेळी चचेर्तल्या मुद्दयांवर लिहिलेले. दुस-या दिवशी रद्दी गणलं जाणारं वर्तमानपत्रासारखं माध्यम. लेखक हा पत्रकार. लेखनाचं स्वरूप तात्कालिक स्वरूपाचं. तरीही हे पुस्तक मोठ्या ताकदीचं. धारणांना धक्का देणारं.आपल्या शेती आणि अर्थव्यवस्थेवर मूलगामी चिंतन मांडणारं आहेहे याचं मोठं यश आहे.

कांदा महाग झाला म्हणून बोंबाबोंब शहरी मध्यमवर्गीय नजरेतून गैर नसेलही. पण अशा आग्रहांमुळेच शेतकरी एक व्यावसायिक म्हणून मोकळेपणाने बाजारात उतरू शकत नाही. शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीहेदेखील तेवढंच सत्य आहे. शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या फारशी घटलेली नाहीपण त्यातली सरकारी गुंतवणूक मात्र लक्षणीय कमी झाली आहे. आपला शहरी मध्यमवर्गाचा आणि त्या मध्यमवर्गाचाच एक भाग असलेल्या सरकारी नोकरदारांचा शेतकरी आत्महत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणते-अजाणतेपणी निष्क्रीय आणि निर्दय आहे. हे आणि असेच धक्कादायक निष्कर्ष काढणारे लेख  'एका साध्या सत्यासाठी'मधे आहेत.

लेखक हे नुसते पत्रकार नाहीत तर मूळचे शेतक-यांच्या प्रश्नावर लढणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आक्रमक कार्यकर्ता आणि आग्रही पत्रकार अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली सरमिसळ कोणतेही गंड न ठेवता त्यांच्या लेखनात उतरते. त्यामुळे आवेश आणि साक्षेप याचा क्वचित दिसणारा समन्वय या पुस्तकात आढळतो. लेखक पॅकेजवर लिहितो ते आज कर्जमाफीविषयीही तसंच्या तसं लागू पडतं. एसईझेड लोडशेडिंग शेतकी विद्यापीठं शेती या विषयावर लिहिलेली पुस्तकं अशा विविध अंगांनी चिंतन यात आलं आहे.

शेतकरी आत्महत्यांसाठी इथली व्यवस्थासरकारी धोरणं आणि शेतकरीविरोधी वैचारिक मांडणी कारणीभूत आहे. पण सरकार आणि अनेक विचारवंत ही कारणं न मानता शेतकरीच जबाबदार असल्याचा दावा करतात. त्याचे लेखकाला दु:ख आहेनिवेदनात तो म्हणतो, 'मरणारा माणूस तो कसाही असो त्याबद्दल वाईट बोलले जात नाहीही आपली संस्कृती आहे. दुर्दैवाने शेतक-यांच्या मृत्यूनंतरही वाईट बोलले जातेते किमान कमी व्हावे. शेतकऱ्याची माती खराब करण्याचा जो उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेतो थांबावा. किमान कमी तरी व्हावा. एव्हढेच या पुस्तकाचे प्रयोजन.'

मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांनी केलेली पुस्तकाची पाठराखण महत्त्वाची आहे. ते म्हणतात, 'विदर्भातील शेतीसंकट ऐरणीवर आणणा-या मोजक्या लेखक संपादकांपैकी चंदकांत वानखडे एक आहेत. वर्षानुवर्षांचा अनुभवज्ञानस्पष्टता आणि आत्यंतिक तळमळ यांच्या सहाय्याने त्यांनी हे प्रश्न समर्थपणे हाताळले आहेत. असा हा लेखक माझ्या परिचयाचा आहेयाचा मला अभिमान वाटतो. हे पुस्तक वाचाम्हणजे तुम्हाला कळेल का ते.साहित्य अकादमी विजेते लेखक 'बारोमास'कार सदानंद देशमुखांची प्रस्तावना म्हणते, 'समग्र बदलत्या वास्तवाचा वृत्तपत्रीय शैलीत वेध घेणारे हे लेखन अपूर्वच म्हणावे लागेल. त्याची जातकुळी महात्मा फुले यांच्या लिखाणाशी जुळणारी आहे. एकाच वेळी महात्मा फुले यांची बंडखोरचिंतनशील लेखनवृत्ती आणि साने गुरुजी यांच्या लेखनातील सामाजिक कळवळा याचा प्रत्यय या लेखातून येतो.हे दोन अभिप्राय पुस्तकाचं मोठेपण सिद्ध करण्यास पुरेसे आहेत.

वानखेडेंच्या लिखाणावर शरद जोशींच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट आहे. पण त्यांनी या विचारांची बदलत्या परिस्थितीनुसार आणि नव्या मुद्द्यांना धरून मांडणी केली आहे. त्यात तर्काला उगाच कुठेही वळसे घातलेले नाहीत. शिवाय त्यातला कळवळा त्याला वाचनीय बनवतो. मुळात ही मांडणी कोरडी नाही. भाषा जिवंत रसरशीत आहे. त्याला वैदभीर्य बाज आहे. पुण्या-मुंबईच्या वृत्तपत्रीय लेखनात न दिसणारी वेगळी शब्दकळा यात अधूनमधून आढळते. ती छान आहे. विशेषत: पुस्तकाच्या शेवटी असलेल्या भाषणात रसरशीतपणा अप्रतिम उमटला आहे. पण मुद्द्यांची मोठ्या प्रमाणात होणारी पुनरावृत्तीहा या पुस्तकाचा मोठा दोष आहे.

पुस्तकात लेखक प्रकाशक प्रस्तावनाकार या सगळ्यांनी आपल्या नावाखाली रितीप्रमाणे पत्ता न देताफक्त मोबाइल नंबर दिले आहेत. त्यावरून महाराष्ट्रातल्या बदलत्या समाजवास्तवाची झलक दिसते. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडणा-या या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पहिल्या काही महिन्यांतच त्याची आवृत्ती संपत आली आहे. आता वेळ आहे शहरी मध्यमवर्गाने ही व्यथा समजून घेण्याची. कारण किमान आपली मॉल आणि आयटीच्या आधारे होणारी प्रगती टिकून राहावी यासाठी तरी शेतकरी आनंदाने जिवंत राहायला हवाय.

लेखक : चंदकांत वानखेडे
प्रकाशक : परिसर प्रकाशन अंबाजोगाई ( ०९४२२९३१९८६)
पाने : १२०किंमत : १०० रुपये.

No comments:

Post a Comment