Thursday 17 February 2011

वी फॉर वजायना


काल अचानक दादर स्टेशनावर वंदना खरे भेटल्या. त्यांच्या योनीच्या मनीच्या गुजगोष्टीचा ७५ वा प्रयोग होतोय. एकूण नव्या मराठी संस्कृतीसाठी हा एक मोठा ठेपा मानायला हवा. वजायना मोनोलॉगसारख्या अनेक दृष्टीने क्रांतिकारक नाटकाचा मराठीत प्रयोग यशस्वी होतोय. हे मराठी माणूस बदलतोय याचंच द्योतक मानायला हवं. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीच्या प्रवासात माझाही एक छोटासा वाटा आहे. खारीपेक्षाही लहान.

मुंबई टाइम्समधे असताना वॅलंटाइन डे च्या दिवशी काहितरी वेगळं करावं, असं डोक्यात होतं. आठवलं. १४ फेब्रुवारीलाच जगभर वी डे साजरा होतो. इथे वी म्हणजे वॅलेटाइन नाही तर वजायना. वजायना म्हणजे योनी. वजायना मोनोलॉगवर लिहायचं ठरवलं. वीकेण्ड पुरवणीची कवरस्टोरी करायचं ठरवलं. नेटवर सर्च केला. वी डे डॉट ऑर्ग नावाची वेबसाईटच मिळाली. त्यावर सविस्तर माहिती मिळाली. शिवाय यंदाच्या वी डे निमित्त जगभर कोणते कार्यक्रम होणार याची यादीही. त्यात मुंबईत वंदना खरे या नाटकाचा मराठी प्रयोग करणार असल्याची नोंद होती.


वंदना खरेंनी पुकार संस्थेच्या प्रमुख म्हणून केलेलं काम वाचून होतो. डॉक्युमेंटेशन हा आवडता विषय असल्याने त्याबद्दल कधीकाळी थोडंफार जाणूनही घेतलं होतं. भेटलो. त्या नाटकाविषयी खूप बोलल्या. त्यांनीच नवा माणूसच्या दिवाळी अंकात याच विषयावर लिहिलेला लेख वाचला असल्याचंही आठवलं. त्यांचं या विषयावर बरेच दिवस काम सुरू होतं. त्यांनी नाटकाचा अनुवाद केला होता. पण त्याच्या प्रयोगाचं जुळून येत नाहीय, असं चर्चेतून कळलं.

मी येऊन लेख लिहिला. दिनेश पांचाळने तो एवढासा मजकूर पानभर खूप छान मांडला होता. व्ही फ़ॉर व्हजायनाअसं मोठ्या अक्षरात छापून आलं. मटासारख्या पेपरात पुरवणीच्या पहिल्या पानावर व्हजायना असा शब्द भलामोठ्ठा छापून आलं. ते धक्कादायक होतं. पण त्याकाळात अनेक प्रयोग केले होते, त्यात हाही होता. मजा आली. खरं तर व्हजायनाच्या जागी योनी असाच शब्द वापरायला पायजे होता. पण तो तसा डाऊन मार्केट शब्दच!

लेख खूप जणांना आवडला. त्याहीपेक्षा त्यातून योनीच्या मनीच्या गुजगोष्टीला आकार येण्यास थोडी मदत झाली, हे महत्त्वाचं. या लेखासोबत एका चौकटीत वंदना खरेंच्या फोटोसोबत त्यांच्या मराठी अनुवादाचा खास उल्लेख केला होता. आणि लवकरच त्याचा प्रयोग होत असल्याची घोषणाही केली होती. लेखाचा इण्ट्रो असा होता, १४ फेब्रुवारी. वॅलण्टाइन डे. हाच दिवस जगभर ' वी डे' म्हणूनही साजरा होतो. यातला वी स्टॅण्ड्स फॉर वजायना. वजायना म्हणजे योनी. ' वजायना मोनोलॉग्ज' या क्रांतिकारक नाटकाचा संदर्भ आहे त्याला. हा 'वी डे' आपल्याला सेक्शुअॅलिटीकडे पॉझिटिवली बघायला लावतो . प्रेमाच्या बाजारूपणाला एक विरोध असाही.

वजायना मोनोलॉग्जचं भाषांतर मी योनीचे संवाद असं केलं होतं. ते प्रतिमाताई जोशींनी दुरुस्त केलं. त्यानुसार आता ते योनीची स्वगतं असं केलंय. बाकी लेख जशाच्या तशा कटपेस्ट केलाय.

'... आणि माझ्या लाज-या लैंगिक अवयवाचं रूपांतर हृदयात झालं.' ती बाळाला जन्म देते आणि आपला अनुभव असा व्यक्त करते, आपल्याला सवयीच्या नसलेल्या शब्दांत आणि संदर्भात. पण किती छान. निव्वळ अप्रतिम! नाटक संपतं. इंग्रजी नाटकाचं नाव 'वजायना मोनोलॉग्ज'. मराठीत शब्दाला शब्द जोडून भाषांतर 'योनीची स्वगतं

नाटकाची सुरुवातही अशीच. नाटक सुरू व्हायचं असतं. एक अभिनेत्री येते, विचारते...

' तुमच्यापैकी किती जणांनी वजायना शब्द उच्चारलाय?'

बघायला आलेले बहुसंख्य पुरुष असतात, हा अनुभव. त्यांच्यासाठी हा धक्का असतो. आठ-दहा हात वर होतात. ती सगळ्यांना वजायना असा शब्द उच्चारायला सांगते. काही जण पुटपुटतात.

' माझ्यासोबत जोरात म्हणा, वजायना.. वजायना', ती सांगते.

आवाज घुमतो.
.. .. ..

१४ फेब्रुवारी १९९८ ला हे नाटक पहिल्यांदा सादर झालं. इव एन्सलर या लेखिकेचं हे नाटक. आजवर याचे अनेक देशांमधे आणि भाषांमधे असंख्य प्रयोग झालेत. विकिपिडियावर साधा सर्च दिला, तरी त्याची लांबलचक यादी मिळते. हे नाटक अनेक अर्थांनी क्रांतिकारक ठरलं. बाईने बाईच्या शब्दात मांडलेलं, बाईचं म्हणून असलेलं सुख, दु:ख,  प्रेम,  द्वेष सगळंच त्यात आलंय. ज्याविषयी आपण बोलतही नाही, त्याविषयी अनेक अंगांनी केलेली थेट मांडणी. कुठलेही आढेवेढे नसलेली. त्याने अनेक संदर्भ बदलवले. अनेकांच्या संवेदना, धारणा उलट्यापालट्या करून टाकल्या.

या नाटकांत ब-याचदा चार-पाच किंवा काही ठिकाणी तर तीस-चाळीस बायका स्टेजवर येतात. बसून किंवा उभं राहून. ब-याचदा तर स्क्रिप्ट हातात घेऊनही संवाद मांडतात. असे अठरा संवाद. दरवर्षी हे नाटक बदलत राहतं. जुने संवाद जाऊन नवे संवाद येतात. कुठे बोस्नियातली बलात्कारित स्त्री बोलते. कुठे प्रणयाचा परमोच्च आनंद व्यक्त होतो. सेक्स, प्रेम,  जन्म,  बलात्कार,  हस्तमैथून अशा वजायनाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचे जोरकस, पण कुठेही अश्लील नसणारे हे संवाद... गमतीशीर पण गंभीर.

एरवी वजायनाचा उल्लेख होतो तो एकतर आरोग्यविषयक रूक्ष भाषेत, अश्लील गप्पांमधे नाहीतर आयाबहिणींवरून शिव्या द्यायला. त्यामुळे बाईच्या देहाकडे पॉझिटिवली बघणं, हे नव्याने शिकायला लागतं, पुरुषाला आणि बाईलाही. हे बघणं म्हणजे, बाईसाठी सगळी बंधनं झुगारून घेतलेली नवी झेप असते. नवा लखलखीत दृष्टिकोन.
....................

हे नाटक लिहिण्यासाठी इव एन्सलर जगभर फिरत होती. ती दोनशे बायकांशी या विषयावर बोलली. त्यांचे अनुभव,  लेखिकेला आलेले अनुभव यातून हे नाटक उभं राहिलं. मुळात स्त्रीत्वाचा गौरव करण्यासाठी हे नाटक आलं. पण,  पुढे त्याचा फोकस अधिक व्यापक झाला. हे नाटक म्हणजे महिलांवर होणा-या अत्याचाराविरुद्धची चळवळ बनली. त्यासाठी 'वी डे' नावाची संस्था उभी राहिली. 'वी डे'मधला वी म्हणजे वॅलण्टाइन आहेच, पण यातला 'वी' फॉर विक्टरी आणि वजायनाही.

दरवर्षी, १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दरम्यान नाटकाच्या होणा-या प्रयोगातलं उत्पन्न महिलांच्या संस्थांना दिलं जातं. असं ५० लाख पौंडांहून अधिक उत्पन्न संस्थांना देण्यात आलंय. समाजातूनच उभं राहिलेलं नाटक समाजापर्यंत येऊन मिळतं, ते असं. एक वर्तुळ इथे पूर्ण होतं.

वर्तुळ... विचार करायला लावणारं.

5 comments:

  1. Thank you Sachin!
    परवा आपली भेट झाल्यानंतर खरंच खूप छान वाटलं!त्या निमित्ताने नंतरच्या माझ्या एक तासाच्या ट्रेनच्या प्रवासात गेल्या दोन वर्षातले अनेक चढ-उतार आठवून गेले. माझ्या बाबतीत हे वर्तुळच नाही तर हे एक upaward moving spiral आहे.मी सुरुवातीच्या रुपांतरात अनेक फरक करीत करीत ते पुष्कळच बदलून टाकलं ;त्यात असंख्य भारतीय संदर्भ जोडले - लोकांनी हे बदल खूप मनापासून स्वीकारले;त्यांचं कौतुक केलं...भारतीय परंपरेतले अनेक संदर्भ मला अनेकांनी पुरवले...त्याचसोबत याचविषयाबद्दलच्या माझ्या नव्या प्रकल्पाला बळ मिळत गेलं. लैंगिकता या विषयावर मोकळेपणाने बोलायला एक अवकाश उपलब्ध व्हावा म्हणून मी वर्शभारापासून "ब्रेकिंग सायलेन्स" नावाचा प्रकल्प चालवते आहे. वैविध्यपूर्ण सामाजिक पार्श्वभूमीच्या व्यक्ती आपले अनुभव या माध्यमातून मांडत आहेत आणि त्यातून नव्या प्रकारचं आणखी एक नाटक उभं राहू पाहात आहे...या सगळ्या प्रक्रियेसाठी मी महाराश्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते.-वंदना खरे

    ReplyDelete
  2. सचिन, ही खरोखरीच क्रांतीकारक संकल्पना आहे. व्हजायना मोनोब्लॉग हे केवळ महिलांच्या अंतरीचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ नाही तर मला वाटते तो समाजाचा आरसा आहे आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही. मला वाटतं हा शो पाहण्यासाठी येणाऱ्या पुरूषांना आपले प्रतिबिंब आरशात दिसल्यावर कदाचित ते शहाणे होतील. महिलांपेक्षा पुरूषांनाच हा शो पाहण्याची जास्त गरज आहे.

    ReplyDelete
  3. खरं आहे गिरीश! माझ्या नाटकाच्या प्रेक्षकांमध्ये अनेकदा ८०% पुरुष असतात. येताना त्यांचे उद्देश काय असतील त्यांनाच माहित!पण प्रयोग संपल्यावर अनेकजण आवर्जून सांगन जातात की,या नाटकामुळे आम्ही स्त्रीयांच्याच नव्हे तर स्वत:च्याही लैंगिकतेकडे गांभिर्याने पाहू लागलो आहोत. असे एखादे नाटक पुरुषांच्या लैंगिकते बद्दल मी लिहावे असेही अनेकजण सुचवतात.-वंदना खरे

    ReplyDelete
  4. सचिनजी,
    भारतीय जनमानसात ‘वी फॉर वजायना’ ही संकल्पना लगेच काही स्वीकारली जाणार नाही. वजायना हा शब्द उच्चारला तरी ‘शिव शिव काय बोलतोस अभद्र आणि अमंगळ’ असं म्हणणार्‍या समाजाला थोडंसं व्यापक आणि उदार व्हायला वेळ आहे अजून. लैंगिक भेदांकडे माणूस जितक्या सकारात्मकतेने बघेल तितक्या प्रभावीरीत्या आजच्या तथाकथित प्रेमातील व्यभिचारी वृत्ती किंवा आकर्षणाचे गिधाड दूर सारता येणे शक्य आहे. आज या विषयावर तुम्हीही इतके मोकळेपणाने लिहिले त्याबद्दल थोडसं अप्रुपही वाटतं आणि कौतुकही. बाकी हा विषय गंभीर आहे, असे म्हणून दूर सारणेही योग्य होणार नाही. त्यापेक्षा त्यावर थोडासा ‘खुलके संवाद’ व्हायला हवा; जेणेकरून आपली मनं व्यापक होतील, स्त्रीकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघणार्‍यांच्या डोळ्यावरील झापडं तरी त्यानिमित्ताने दूर होतील.
    सचिन गुंजाळ

    ReplyDelete
  5. समजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवू पहाणारा हा लेख आणि वंदना खरे ह्यांची धडपड - सलाम तुम्हाला

    ReplyDelete