Saturday 19 February 2011

हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप, नक्की ना?

सचिन आज लवकर आऊट झाला. पण आता चिंता नाही. आठव्या नंबरपर्यंत आपली बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. अशावेळेस पाकिस्तानविरोद्धची टेस्ट आठवते. समोर एकामागून एक विकेट पडत होत्या. सचिन एकटा उभा होता. त्याने सेंच्युरीही केली. पण तो आऊट झाला. आणि जिंकण्यासाठी हवे असलेले वीस पंचवीस रनही पुढचे बॅट्समन करू शकले नव्हते.

आपल्या टीममधे किलर इन्स्टिंक्ट का नाही, असं तेव्हा आपण विचारायचो. कारण तो एकटाच टिच्चून खेळायचा. पण आता त्याचा खेळ बघत वाढलेली पिढी जन्माला आलीय. ती त्याच्यासोबत खेळतेय. म्हणून आज टीम इंडिया जे काही आहे, त्यात सचिनचा वाटा मोठा आहे.

फक्त त्याच्या टीममेंबरच कशाला सगळा भारत त्याच्यासोबत मोठा झालाय. तीनेक पिढ्यांनी तरी त्याला आपल्या घरातलाच एक मानलाय. त्याच्या आनंदात सगळा भारत खुष असतो. त्याच्या दुःखात सगळा भारत सुतकात असतो. इतकं प्रेम मिळेल असं कर्तृत्व बाकी कुणाचं आहे का? नाही आठवत नाव. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळो अथवा नाही, आपल्याला फारसं काही घेणंदेणं नाही. तो या सगळ्याच्या खूप पुढे पोहोचलाय. आणि त्याच्याबरोबर आपल्यासारखे त्याचे चाहतेही.

सचिनवर एकदा लिहिलं होतं. मी काही क्रिकेटवर लिहिणारा माणूस नाही. पण वर्ल्डकप फिवरमुळे या शनिवारचा कॉलम वर्ल्डकपवर लिहिणार होतो. नवशक्ति त्यावरच संपादकीय लिहिणार होती. म्हणून विषय थोडा बदलला. पुन्हा सचिनवर लिहिलं. सचिनवर लिहिताना खरं सांगू खूप आनंद मिळतो. एक आतपर्यंत मुरणारं समाधान.

आता तिकडे इंग्लंडात फूटबॉलचा मोसम ऐन मध्यावर आलेला आहे. इकडे क्रिकेट वर्ल्डकप भरात येईल आणि तिथे फूटबॉलचा उत्तररंग रंगू लागेल. क्रिकेटची जन्मभूमी इंग्लंड. क्रिकेटची काशी आणि मक्का मानली गेलेली मैदानंही तिथेच. पण तरीही क्रिकेटचा आजवरचा सर्वात मोठा कुंभमेळा भरलेला असताना आज तिथे मात्र फूटब़ॉलचाच फिवर सुरू असेल. कारण क्रिकेटचा भूगोल आता बदलला आहे. क्रिकेटच्या दुनियेची विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त, तिन्ही भारतीय उपखंडातूनच जाऊ लागली आहेत.

परवा बांगलादेशात वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा पार पडला. गरिबातला गरीब देश म्हणून ओळखल्या जाणा-या बांगलादेशाने आपली सांस्कृतिक श्रीमंती मोठ्या अभिमानाने सादर केली. बागलादेश क्रिकेटमधे आजवर फारसं कर्तृत्व करून दाखवू शकलेला नाही. पण त्यांच्या क्रिकेटपटूंनी केलं नाही ते तिथल्या क्रिकेटरसिकांनी करून दाखवलंय. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या रंगीत तालमीलाही ढाकाकर क्रिकेटरसिकांनी तिकिटं काढून स्टेडियम हाऊसफुल्ल केलं. या मोठ्या मार्केटमुळेच बांगलादेशाला क्रिकेटमधे मोठा मान मिळू लागलाय.

उद्घाटनापासूनच या वर्ल्डकपने आपले वेगळे रंग दाखवायला सुरुवात केलीय. भारतीय उपखंडातल्या देशांना सोयीचं जावं असंच सामन्यांचं वेळापत्रक तयार करण्यात आलंय. वर्ल्डकप जिंकण्याचा सर्वाधिक मोठा दावेदार भारतच असल्याचं जगभरातल्या बहुतांश क्रिकेटतज्ज्ञांनी सांगितलंय. हे पहिल्यांदाच घडतंय. ८३ नंतर कायमच भारत वर्ल्डकपमधला एक दावेदार मानला गेला होता. पण सर्वात मोठा दावेदार नाही. आज आणखी एका कारणासाठी हा वर्ल्ड कप आधीच्या सगळ्या वर्ल्डकपांपेक्षा खूप खूप वेगळा आहे. कारण हा आपल्या सचिन तेंडुलकरचा शेवटचा वर्ल्डकप मानला जातोय.

पण खरंच हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप आहे का?

सचिनच्या नावावर आज जगभरातले शेकडो विक्रम जमा आहेत. पण तो असलेल्या टीमने आजवर कधी वर्ल्डकप जिंकलेला नाही. सर्वाधिक वेळा वर्ल्डकप खेळल्याच्या विक्रमाची बरोबरी केलीय. वर्ल्डकपमधे सर्वाधिक धावा त्याने केल्यात. आणखीही बरंच काही. पण त्याने वर्ल्डकप जिंकलेला नाही. आताचा वर्ल्डकप शेवटचा आहे, असं मानून तो आता सगळी ताकद पणाला लावणार, असं म्हटलं, सांगितलं आणि लिहिलं जातंय. विराट कोहलीपासून महेंद्रसिंह धोनीपर्यंत सगळेजण आम्ही यंदा सचिनसाठी वर्ल्डकप जिंकणार, असं सांगत आहेत. सचिनच्या नावाने जिकंण्याच्या आणाभाका घेत आहेत.

कर्णधार धोनीने तर घोषणाही करून टाकलीय, की हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप असेल. पण सचिन असं कधीही बोललेला नाही. चार वर्षांपूर्वीही असंच म्हटलं जायचं. त्याचा टेनिस एल्बो की काय तो दुखावलेला होता. सौरव, द्रविड, कुंबळे यांच्याबरोबरच हा सचिनचाही शेवटचा वर्ल्डकप मानला जात होता. त्यावर पानंच्या पानं भरून लेख लिहून येत होते. नंतर सगळ्या दिग्गजांच्या गैरहजेरीत ढोणीच्या यंग ब्रिगेडने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तर आता सचिनयुग संपल्याची द्वाही फिरवण्यात आली. पण झालं उलटंच. त्याच्या जोडीचे त्याच्या वयाचे सगळे आज वनडेमधून गायब झालेत. पण सचिन आजही रुबाबात खेळतो आहे.

चार वर्षांपेक्षाही आजचा सचिन वनडेसाठी जास्त उपयुक्त झालाय. त्याचा खेळ अधिक जोमदार आणि तरुण झालाय. टी ट्वेंटी हा तरुणांचा खेळ म्हणून सचिनच्या नावानं नाकं मुरडली जात होती. पण तिस-या आयपीएलमधे त्याने टी ट्वेंटी कसं खेळायचं याचा धडाच घालून दिला. भली भली यंग ब्रिगेड दाताने नखं चावत राहिली आणि सचिनची बॅट गरागरा फिरत राहिली. सचिनने पहिली मॅच खेळली असेल तेव्हा जन्मही न झालेले त्याच्यापेक्षा म्हातारे ठरत आहेत. सचिनसाठी वय जणू गोठून गेलंय.

युवराजने त्याला ग्रँडफादर म्हटलं होतं. त्याला आता दीडेक वर्षं झालं. सचिन त्यावर काही बोलला नाही. त्याने जवळपास सदतिसाव्या वर्षी वनडेमधे डबल सेंच्युरी फटकावून नवल घडवलं. ती खेळी अफलातून होती. हा विक्रम कुणा लिंबूटिंबू संघासमोर नव्हता. तर जगातल्या त्याघडीच्या एका सर्वात चांगल्या मा-यासमोर होता. दक्षिण आफ्रिका समोर खेळत होती. स्टेनसारखा खतरनाक बॉलर समोर होता. पण त्याची फिकिर कोणाला होती. आणि युवराज! ग्रँडफादर म्हणणा-या युवीची मैदानातली चपळता हरवलीय. त्याचा फॉर्म ढासळलाय. पबमधे जाऊन मारामारी केल्याचं बालंट त्याच्यावर येऊन गेलंय. रोहित शर्मा सतत काही सिरीज अपयशी ठरला म्हणून नाहीतर तो आज वर्ल्डकपच्या संघातही नसता. धोनी मैत्रीला जागतोय म्हणून त्याला आता चांगलं खेळेपर्यंत संधी मिळणार आहे. दुसरीकडे सचिन फक्त स्वतःच्या बॅटच्या जोरावर जग जिंकतोय. तो ग्रँडफादर नाही, तर युवराजसारख्यांच्या बापाचा बाप बनलाय.

युवराजसारखी गरीब बिचारी माणसं काळासमोर हतबल होत असतात. तेव्हा सचिन काळाच्या छाताडावर पाय ठेवून उभा असतो. खोटं वाटतं, तर टाईम मॅगझिनला विचारा. यावर्षीच टाईम मॅगझिननेही म्हटलंय, आपली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी सचिन जेव्हा पाकिस्तानात पोहोचला तेव्हा त्याला जगातल्या आतापर्यंतच्या एका सर्वोत्तम मा-याचा सामना करायचा होता. तेव्हा मायकल शूमाकर एफ वन रेसमधे प्रवेशही केलेला नव्हता. लान्स आर्मस्ट्राँग टूर द फ्रान्सला कधीही गेला नव्हता. दिएगो मॅरेदोना आता जगज्जेतेपद इतिहासजमा झालेल्या तेव्हाच्या जगज्जेत्या अर्जेंटिनाचा कॅप्टन होता. पीट सॅम्प्रसने एकही ग्रँड स्लॅम मॅच जिंकलेली नव्हती. सचिन जेव्हा यशाची शिखरं गाठत होता. तेव्हा रॉजर फेडररचं नाव कुणीही ऐकलेलं नव्हतं. लिओनेल मेस्सी तर पाळण्यात होता. बोल्ट जमैकाच्या गल्ल्यांमधे फिरत होता. बर्लिनची भिंत अभंग होती. डॉ. मनमोहन सिंगांनी भारताची नेहरूकालीन अर्थव्यवस्था अद्याप खुली केलेली नव्हती. काळाने प्रत्येकावर आघात केलेत. पण सचिनसमोर काळही थिजून उभा आहे. आपल्यात अनेक महापुरूष होऊन गेले आणि होतीलही. पण दुसरा सचिन होणे नाही. तो क्रिकेटच्या जगताचा जिताजागता देव आहे!’

टाईमने जरी सचिनला देव म्हटलं की अनेकांच्या डोक्याला आठ्या येतात. पण असं कुणा हाडामासाच्या माणसाला देव म्हणून देवाचा अपमान होत नसतो. तो देवासारखा कर्तुम अकर्तुम अन्यथाकर्तुम नाही हेही त्याला देव म्हणणा-यांना माहितेय. तरीही तो देवच आहे. तो जे काही करतोय, खेळतोय ते अपेक्षेच्या आणि सर्वसामान्य क्षमतेच्या पलीकडचं आहे. म्हणून मग आपल्यासारखी साधीभोळी माणसं त्याच्यात आनंद शोधतात. त्याने विक्रम केला की फटाके फोडतात, मिठाया वाटतात. बापाने स्वामी समर्थांचा फोटो लावलेला असतो. त्याशेजारी पोरगा सचिनचं पोस्टर आणून लावतो. बापालाही त्यात काही खटकत नाही. गेल्या दोन तीन पिढ्या त्याला आपलं म्हणत लहानाच्या मोठ्या झाल्यात. सुखादुःखात त्यांना सचिनच्या अस्तित्वाने साथ दिलीय. लहानपणापासून मोठे होईपर्यंतच्या आठवणींना समांतर जाणा-या सचिनच्या विक्रमाच्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्यात. त्यात सचिन मराठी म्हणून आपल्याला त्याचं आणखी कौतूक. मराठीच्या प्राध्यापकाचा हा मुलगा आजही मराठी बोलतो. मराठी वागतो. मराठी मातीत त्याचे पाय आजही कायम आहेत. त्यामुळे मराठी माणूस सुखावतो. पण खरं सांगायचं तर तो आज मराठी, भारतीय या सगळ्याच्या पलीकडे गेलाय.

मग कुणी त्या चंद्रावरचे डाग शोधतं. सचिन म्हणे स्वतःसाठी खेळतो. टीमला हवं असतं तेव्हा खेळत नाही वगैरे. नुकतंच आयसीसीने एक आकडेवारी घोषित केलीय. करो वा मरो परिस्थिती असताना म्हणजे सामना हरलात की स्पर्धेबाहेर पडावं लागेल अशा मॅचेसची आकडेवारी आहे ही. १९७५ च्या वर्ल्डकपनंतरच्या अशा ७१ सामन्यांचा विचार यात केलाय. त्यात स्वच्छपणे दिसतंय की अशा मॅचेसमधे सर्वाधिक रन करणा-यांमधे सचिनचा नंबर पाँटिंग आणि सौरवच्या नंतर तिसरा लागतो. गिलख्रिस्ट, कॅलिस या सगळ्यांचे नंबर त्याच्यानंतर लागतात. एवढंच नाही तर अशा मॅचमधे त्याच्या फिरकीची जादूही जोरात चाललीय. बॉलरच्या रांगेत तो पाचव्या नंबरवर आहे. आता एवढं असताना त्याने कितीदा स्वतःला सिद्ध करायचं?

वयाच्या अडतिसाव्या वर्षी सचिन एकदम टकाटक आहे. याआधी खेळलेल्या वनडे मॅचमधे त्याने डबल सेंचुरी करून जग हादरवलंय. अशा वेळेस तो आणखी चार वर्षं खेळणारच नाही कशावरून? वर्ल्ड कप जिंकला तर आनंदच. पण जर नाही जिंकला तर मग नक्कीच! कारण भारताला वर्ल्ड कप जिंकून देईपर्यंत तो शांत बसेल, असं वाटत नाही.

तेव्हा सचिन मैदानात टपाटप खेळत असेल. आणि सचिनच्या निवृत्तीची घोषणा करणारा ढोणी कदाचित कॉमेण्ट्री रूममधे आपले शब्द आठवत बोलत बसलेला दिसेल. 

1 comment:

  1. ज्या लोंकाचा देवी चमत्कारावर विश्वास नसेल ना अश्या लोंकानी सचिनची कारर्कीद जरा जवलुन पाहुन समजण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा देवी चमत्कारावर विश्वास नक्कीच बसेल

    ReplyDelete