Tuesday, 15 February 2011

एका संपादकीय पानाचा मृत्यू


डीएनए पेपर मला आवडतो. परवडतो. मुंबईत तो लॉन्च झाल्यापासून ब-यापैकी नियमित वाचतोय. टाइम्सला त्याने दिलेली टक्कर मानायलाच हवी. त्याचा टवटवीतपणा ही सगळ्यात आवडीची गोष्ट. हा ताजेपणा त्यातल्या प्रयोगांमुळे. त्यांचा नवीन प्रयोग आहे, एडिट पेज- संपादकीय पान गायब करण्याचा. एका मोठ्या पेपराचं संपादकीय पान संपलं, पण त्यावर काही प्रतिक्रिया निदान मला दिसल्या नाहीत. आवडो न आवडो, त्यावर चर्चा घडायला हवी. म्हणून आठवड्याच्या कॉलमात त्यावर लिहिलंय. नवशक्तित छापून आल्यावर त्याला चांगल्या प्रतिक्रियाही आल्या.

पण डीएनएच्या या प्रयोगाचं स्वागत करायचं की विरोध, मला अजुनही कळलेलं नाहीय. तरीही लिहिलं. जे वाटलं ते लिहिलं. जबाबदार माणसांनी यावर अधिक चांगलं लिहायला हवंय. पण का शांत बसतात ही मोठी माणसं, नाही माहीत. आजूबाजूला एवढी स्थित्यंतर घडत असताना डोळे का बंद करून घ्यायचे, कळत नाही.
 
गेल्या शनिवारी छापून आलेला लेख नेहमीसारखा कटपेस्ट.

डीएनए या आता मुंबईत स्थिरस्थावरलेल्या वृत्तपत्रानं परवा एक फेब्रुवारीला एक बॉम्ब टाकला. डीएनएने पहिल्याच पानावर पहिल्याच बातमीत संपादकीय पान बंद करत असल्याची घोषणा केली. डीएनएचे नवे मुख्य संपादक आदित्य सिन्हा यांच्या नावाने ही घोषणा झालीय. पत्रकार जमातीसाठी आणि त्याहीपुढे जाऊन एकूणच बुद्धिजीवी म्हणवणा-यांसाठी हा धक्काच होता. आजही आपण सर्वसाधारण मराठी माणसं उरलीसुरली वैचारिक भूक भागवण्यासाठी वर्तमानपत्रांच्या संपादकीय पानावरच ब-यापैकी अवलंबून आहोत. वर्तमानपत्रांतील आजवरचा अनुभव घेता, उद्या हेच वारं आपल्यापर्यंत पोहोचलं, तर मराठी वृत्तपत्रांतही हेच झालं तर काय, अशी भीती वाटणं स्वाभाविक म्हणायला हवं.

डीएनएचं म्हणणं असंय की त्यांनी संपादकीय पान बंद केलेलं असलं, तरी विश्लेषण थांबवलेलं नाही. ते विश्लेषणपर लेख विषयानुसार त्या त्या पानावर देतच राहणार आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय विषयांवरचे लेख आंतरराष्ट्रीय पानावर, मुंबईच्या समस्यांवरचे लेख स्थानिक पानावर, खेळावरचे खेळाच्या तर अर्थविषयक अर्थच्या पानावर छापले जाणार आहेत. खूप महत्त्वाची बातमी असेल, तर पहिल्या पानावर विशेष संपादकीयही छापणार आहेत. वाचकांची पत्रंही पान दोनवर छापली जाणार आहेत. पण वेगळं संपादकीय पान मात्र असणार नाही. जगभर वेगवेगळ्या धर्मियांनी विशेषतः ज्यूंनी फक्त आपापली घरं एकाच ठिकाणी बांधून एकाच धर्माची वस्ती म्हणजे घेट्टो तयार केले होते. डीएनए म्हणतंय की संपादकीय पान हे एडिटोरियल घेट्टोच आहेत. त्यामुळे ते हे घेट्टो तोडण्याचं काम करणार आहेत म्हणे.

आजच्या टीवी, मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात अधिकाधिक बातम्यांची आणि त्याच्या विश्लेषणाची गरज असताना वेगळ्या संपादकीय पानाची गरज नसल्याचं डीएनएचे संपादक म्हणतात. या पानाची उपयुक्तता संपलीय असं आपल्यापेकी अनेकांना वाटत होतं. ते खूप कमी वाचलं जातं आणि ते बोअरिंग असतं. त्यात तज्ज्ञांच्या मतांपेक्षा फुकाचं पांडित्यच अधिक असतं, अशी कारणं त्यांनी दिली आहेत. वृत्तपत्रात बदल होतच राहतात. जर ते वाढलं नाही तर ते बदलत्या काळाशी विसंगत बनत जातं. त्यामुळे काळाच्या पुढे जात पत्रकारितेला आधुनिक करण्यासाठी आमच्या पाठिशी राहा, असं आवाहन त्यांनी वाचकांना केलंय.

सर्वसामान्य मराठी वाचकाला हे लगेच पचणारं नाही. कारण मराठी वृत्तपत्रांची परंपरा थोडी वेगळी आहे. लोकांस शहाणे करून सोडावे, म्हणून मराठीतले आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणची सुरुवात केली. दर्पण हे काही आतासारखं वृत्तपत्र म्हणजे बातम्या देणारं पत्र नव्हतं. ते मतपत्रच. जगभरातलं ज्ञान मराठीत आणण्याची दर्पणकारांची इच्छा होती. त्याच्या आसपासची सगळीच वृत्तपत्रं मतपत्रंच होती. ती सगळी लोकांस शहाणे करण्यासाठीच होती. वेगवेगळी लेखक मंडळीही आपापल्या मतांची मांडणी करणारे लेख लिहायचे. त्यात बातम्यांना फारशी जागा नव्हतीच. यात मतांची दिशा ठरवून नेतृत्व करायचा तो संपादकाने लिहिलेला अग्रलेख. त्याला इंग्रजीत लीडर म्हणत. त्याचं आपण अग्रलेख असं भाषांतर केलं.

भारताचा स्वातंत्र्यसंग्राम हे संपादकांनीच चालवलेलं आंदोलन होतं. लोकमान्यांपासून महात्माजींपर्यंत आणि राजा राममोहन रायांपासून राजगोपालाचारींपर्यंत सगळे संपादक होते. त्यांच्या पत्रांत लेख आणि अग्रलेखच असायचे. विचार देण्यासाठी, क्रांती घडवण्यासाठी ते लिहायचे. आपल्या देशबांधवांमधे जागृती व्हावी म्हणून ते पत्र चालवायचे. ते त्यांच्यासाठी मिशन होतं आणि त्यातला साधा मजकूरही वाचकांच्या लेखी धर्मग्रंथांइतकं पावित्र्य धारण करायचा. स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळंच बदलंत गेलं. दैनिकांची संख्या वाढली. दैनिकांत लेखांची जागा बातम्यांनी घेतली. पण लेखांसाठी संपादकीय आणि त्यासमोरचं ओपेड पान होतंच. शिवाय मासिकांत वैचारिक लेखांना हक्काची जागा होती. तरीही विचार, वाद आणि पक्षांची बांधलकी थोडीफार कायम होती आणि त्याबरोबर थोडंफार पावित्र्यही.

पण नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या धबडग्यात या सगळ्याच पावित्र्याचा हळूहळू धंदा बनत गेला. वृत्तपत्रं चालवणं हा फार आधीच धंदा बनला होता. पण पत्रकारिता हा धंदा बनला नव्हता. त्यातली सीमारेषा एकमेकांनी मान्य केली होती. ही रेषा कधी पुसली गेली कळलंच नाही कुणाला. पैसा हाच नव्या युगाचा मंत्र बनला. पुस्तकातला भांडवलवाद प्रत्येक माणसाच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोचवण्यासाठी धावाधाव सुरू होती. सगळं जगच स्वतःला विकण्यासाठी तोंड रंगवून बसलं होतं. तर वृत्तपत्र आणि पत्रकारांचा अपवाद कसा उरणार होता. पत्रकारितेची प्रगती पेड न्यूज पर्यंत झाली. वृत्तपत्र चालवणा-यांचं म्हणजे आर्थिक गणिताचं बातम्यांवर अतिक्रमण होऊ लागलं. त्यातून संपादक या संस्थेचं अवमूल्यन होऊ लागलं. कारण संपादक म्हणजे वैचारिक भूमिका असा अर्थ होता. नव्या जमान्यात वैचारिक भूमिकेला फारसा अर्थ उरला नव्हता. आता साबण विकून जसा पैसा मिळवायचा, तसा आता पेपर विकून जास्तीत जास्त पैसा मिळवायचा होता. त्यासाठी खप वाढावा आणि जाहिराती मिळाव्यात या अंगाने मजकुराची मांडणी करणं ही गरज झाली होती. त्यात पत्रकारितेची जुनी तत्वं आणि मूल्यं झुकवली की त्याचं कौतूक होऊ लागलं.
   
याचा अर्थ सगळी चूक वृत्तपत्रांच्या मालकांची आणि मॅनेजमेंटचीच होती असं नाही. टाळी वाजवणारा एक हात पत्रकारांचाही होता. भूमिका घेण्यासाठी आधी वैचारिक भूमिका नीट माहीत असायला हव्या होत्या. त्यावर स्वतःचं चिंतन हवं. अभ्यास हवा. ते विचार स्वतःच्या आचरणात आणण्यासाठी केलेलं तप हवं. त्यातून आलेली प्रगल्भता हवी. मुळात त्याग करण्याची तयारी हवी. अनेक सन्माननीय अपवाद वगळता पत्रकारांचंही चुकत होतं. सत्ताकेंद्रांच्या जवळ असल्यामुळे पिंजरे घेऊन अडकवण्यासाठी शिकारी बसलेले होतेच. उपभोगाची नवनवी साधनं दिसत होती. बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या तुलनेत पगार नव्हता. जमीन निसरडी होतीच. पाय घसरलेले होते. सुक्याबरोबर ओलंही जळलं. प्रामाणिकपणाचा आणि बांधिलकीचा आवाज काढण्याइतपत नैतिक अधिष्ठान उरलं नव्हतं.

अशावेळेस मग गरुडांची गिधाडं बनत गेली. विचारांचे पक्के असणारे स्वतःशी आणि पत्रकारितेशी प्रामाणिक राहिले. पण ते भांबावले होते. विचारांशी बांधून राहताना ते जागीच थबकले. जग बदलत होतं. त्यासाठी विचारांची मांडणी नव्याने करावी लागणार होती. नव्या पिढ्यांना समजेल अशी भाषा बदलावी लागणार होती. लोकांची अभिरूची बदलत होती. नवं तंत्रज्ञान येत होतं. या सगळ्याला सामावून घ्यावं लागणार होतं. त्यासाठी तयारी करावी लागणार होती. पण ध्येयवादी पत्रकारांची त्यासाठी तयारी नव्हती. त्यामुळे ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि सामाजिक बांधिलकीविषयी कोणालाही शंका नव्हती, असा पत्रकारांचा एक नवा वर्ग कोषात गेला. समाजाशी त्याचा संबंध राहिला नाही आणि वर्तमानपत्रांच्या जडणघडणीत त्याला स्थान उरलं नाही. हे पत्रकारितेचं नुकसान होतंच. पण समाजाचंही नुकसान होतं. ज्यांना हे सारं कळत होतं, अशा ध्येयवादी असूनही बदलण्याची तयारी असणा-यांची संख्या दुर्देवाने खूप कमी होती. तोच वांदा होता आणि आहे.

जुन्या मूल्यांचं नव्या जमान्याशी सांगड घालण्याचं सामर्थ्य असणारे संपादक चारदोन अपवाद वगळता उरलेच नाहीत. त्यांना त्यांचा रस्ता स्वतःच शोधायचा होता. कारण किमान मराठीत तरी त्यांच्यासमोर फार काही आदर्श नव्हते. ज्यांना आजवर आदर्श संपादक म्हणून ओळखले जातात, त्यातले अनेकजण आपला पेपर धड दहा वर्षंही चालवूही शकलेले नाहीत. त्यांचे लेख आजही महत्त्वाचे आहेत. पण त्यांच्या छापखान्यातल्या कामगारांची कुटुंबं अचानक रस्त्यावर आल्याचे दाखले आजही मिळतात. कुणी महान संपादक दारू पिऊन संपलाय, तर कुणी थोर पत्रकार स्वतःच्या मुलांना शिकवू शकला नाही म्हणून निराश होऊन संपलाय. अशा आदर्शांमुळे सगळे रस्तेच भांबावलेले होते.

फक्त मराठीतच हे नसावं. देशभर हेच घडलं असावं. कुणा एकाला दोष देऊन काय उपयोग. संपादक या संस्थेचा प्रभाव कमी करण्यात जशी भांडवलवादी मॅनेजमेंट जबाबदार होती. तशीच पत्रकारांच्या डोक्यात शिरलेला भांडवलवादही जबाबदार होता. काही अपवाद वगळता देशभरातली संपादक ही संस्थाच प्रभावहीन झालेली आहे. त्यामुळे संपादकाचं हक्काचं पान संपलं तर त्यात काय आश्चर्य. आज देशातला एक महत्त्वाचा पेपर संपादकाचं हक्काचं पान संपवतोय. त्यामुळे आता जाहिरात नाहीत, असं एकही पान पेपरात उरणार नाही. याचा आनंद साजरा करावा की दुःख, हे ज्याचं त्यानं ठरवावं. किमान त्यासाठी तरी या स्थित्यंतराची दखल घ्यायला हवीय.  

5 comments:

  1. एका मोठ्या पेपराचं संपादकीय पान संपलं. देशातला एक महत्त्वाचा पेपर संपादकाचं हक्काचं पान संपवतो .माणसांनी यावर अधिक चांगलं लिहायला हवंय.

    ReplyDelete
  2. संपादकीय पान त्या वृत्तपत्राचा विचार, आत्मा समजला जातो. आता जर संपादकीय पानच नसेल तर तो पेपर कोणता विचार देणार आहे. प्रत्येक बातमीचं तुम्ही विश्लेषण करणार असाल इतपर्यंत ठीक आहे. पण म्हणून संपादकीयपानाची गरजच वाटूनये, हे गंभीर आहे. आता संपादक हे पेपरच्या कार्यालयात ताटातील लोंच्या प्रमाणे उरले आहेत. आणि आता हे लोंचेच जर ताटातून काढून घेतले आहे तर जेवण बेचव होणार हे नक्की.

    ReplyDelete
  3. डीएनए ने संपादकीय्‍ा पान बंद करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच खूप धाडसी आहे.अग्रलेख वगळता संपादकीय पानावरचा इतर सर्व मजकूर कुठेतरी सामावून घेतला आहे.अग्रलेख वाचकांची आजची संख्या लक्षात घेता हे कधीतरी घडणारच होते.संपादकाच्या वृत्तपत्रातील अवलूल्यनासाठी घातला गेलेला हा अखेरचा घाव आहे. सपादकीय पानाचा हा मृत्यू नाही तर खून आहे.या घटनेचा निषेधच व्हायला हवा.

    ReplyDelete
  4. संपादकीय पान हवेच. अमेरिकेत आज वृत्तपत्राची जी अवस्था आहे. तीच अवस्था आपल्याकडे येणार की काय असे वाटते.(आपल्याकडे वृत्तपत्राचा खप कमी होत नसला तरी आज इंटरनेट आवृत्त्याची संख्या वाढत आहे) पत्रकार(आणि त्यांच्या संघटना) आणि वाचकांनी यावर चर्चा केली पाहिजे तीच होत नाही. पत्रकारांवर हल्ला झाला किंवा एखाद्या राजकीय नेत्याने माध्यामांवर टीका केली की लगेच सर्व संघटना एकत्र येतात. आणि बहिष्कार वैगरेच्या गोष्टी सुरु होतात. पण प्रत्यक्षात वृत्तपत्रात होणारे हे बदल(चुकीचे) रोखण्यासाठी काहीच केले जात नाही.

    उद्या प्रयोग म्हणून कोणी तरी मराठीत असा प्रयत्न करेल...खर तर अशा अनेक गोष्टीची सुरुवात याआधीच इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रामध्ये सुरु झाली आहे. उदा.संपादक म्हणून मालकाचे नाव छापणे, उपसंपादकांकडून अंकाची विक्री करणे(कोल्हापुर सकाळ) अशावेळी ना कोणत्या पत्रकाराने विरोध केला ना वाचकांनी. आता ही तेच सुरु आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी वृत्तपत्र,आर्थिक विषयासाठीचे वृत्तपत्र निघतात, कदाचीत उद्या केवळ संपादकीय वाचण्यासाठी एक विशेष वृत्तपत्र निघेल किंवा आज ज्यांनी हे पान बंद केले तेच उद्या संपादकीयसाठी एक वृत्तपत्र काढतील..वाचा विश्लेषण हवे तेवढे...

    ReplyDelete
  5. मी कालपर्यंत असं ऐकत आलोय, की कदाचित बातमी संपेल, त्याऐवजी विश्‍लेशनात्मक दृष्टीने लिहिलेल्या बातम्या वाचल्या जातील. पण डी.एन.ए ने नेमकं याच्या उलटं केलय. ही खरेतर घोडचूकच आहे. वाचकाच्या वाचनाचा हक्क हिरावून आपण नेमकं काय साध्य करणार आहोत? एखादा देश तसे करतो म्हणूण आपणही तसे आचरण करणे हे पुढारलेपणाचे लक्षण आहे का? इतकीही अनुकरणाची वृत्ती कामाची नाही. सर्वात वाईट याचे वाटते की डी.एन.ए. चा वाचक शांत बसला. पहिल्याच दिवशी याचा निषेध केला गेला असता तर कदाचित या अंग्लाळलेल्या वर्तमानपत्राला आपला मुर्खपणा लक्षात आला असता.
    दुसरं या पाठिमागे एक गमतीशीर कारणही दडलं असावं, आजकाल संपादकांना संपादकीय कचेरीपेक्षा इतरच कामे फार असतात. उदा. सर्क्युलेशन बघने, जाहिराती गोळा करणे, आदी, पानं लावता लावता या मंडळींनी संपादकीय मुल्याना केव्हाच पाने पुसलेली असतात. मग केवळ त्यांच्या नावाने पानाचा फार्स का म्हणूण जपायचा. डी.एन.ए मध्ये कदाचित असच काहीतरी चाललेलं असावं, मला तर लवकरच डी.एन.ए समाजात घडणार्‍या घटनांचा मागोवा घेणार्‍या संपादकीय पानाऐवजी जाहिरातदारांच्या प्रॉडक्टची विश्‍लेशनात्म दृष्टीने ओळख करून देणारे ‘जाहिरातीय‘ नावाचे पान बहुदा सुरू करणार असे वाटते...

    ReplyDelete