Friday 20 May 2011

दशावतारी

माझ्या आधीच्या आणि माझ्या पिढीच्या पोरांमधे कमल हासनबद्दल एक वेगळा कोपरा आहेच. सन्नीपासून अमीरपर्यंत आणि हृतिकपासून सलमानपर्यंत कुणाचेही फॅन असले तरी कमल हासनची गोष्ट वेगळी आहे. मुंबई टाइम्समधे असताना मी थोडंफार सिनेमावर लिहिलं. तेव्हा कमलचा 'दशावतार' हिंदीत डब होऊन मुंबईत रिलीज झाला होता. त्याच्या हासनच्या यात दहा भूमिका होत्या. मुखवट्यांच्या या खेळात तो 'अप्पू राजा'पासून रमलाय. त्यात त्याचा खरा चेहराच हरवलाय का, असा माझा प्रश्न होता. त्याचा सिनेमा कितीही बकवास असला तरी कुठूनतरी आपल्याला समृद्ध करून जातो, असा माझा अनुभव आहे. 


गेल्या वर्षी जूनमधे 'दशावतार' मूळ तमिळमधे रिलीज झाला, तेव्हा त्याची मोठी चर्चा होती. बॉलीवूडवाल्यांचेही डोळे पांढरे होतील एवढा खर्च. हॉलिवूडच्या तोडीस तोड तंत्र. मल्लिका शेरावत आणि असीनसारख्या हिरोइनी. आणि कमल हासनच्या दहा भू्मिका.

हे संजीव कुमारच्या 'नया दिन नयी रात'च्या पुढचं पाऊल. पण ते तंत्राच्या बाबतीत शेकडो योजनं पुढे. हा आपला कमल हासन आहे,  हे ओळखता येणार नाही,  अशी मेकअपची अद्ययावत कारागिरी. बाराव्या शतकातल्या वैष्णव भक्तापासून अमेरिकेतल्या सीआयएचा अधिकारी... नेहमीप्रमाणे लिलया पेललेल्या भूमिका. दहा मुखवटे आणि ते बदलण्याचं अफलातून कसब. सारंच निव्वळ थक्कं करणारं.

असे मुखवटे तो अनेक वर्ष घालतोय. 'अप्पू राजा' आल्याला बरोबर वीस वर्षं झाली. त्यातल्या त्याच्या दोन फुल एक हाफ भूमिका. आपण चक्रावलो. पाठोपाठ 'मेयर साब'.  मोठं पोट आणि पुढे दात असलेल्या म्हाता-याचा डबल रोल रंगवणं त्याला हाताचा मळ होता. 'मायकेल मदन काम राजू'  तिकडे साऊथलाच आला. इकडे त्याच्या वीडियो वीएचएस कॅसेट आल्या होत्या. एकट्या कमलच्या त्यात चार भूमिका होत्या. टोपीतून कबुतरं काढणाऱ्या जादूगाराचा खेळ हा अभिनयाचा जादूगार करत होता.

तशीच तिच ती जादुगिरी 'इंडियन'मधेही दिसली. या सिनेमाकडून केवढ्या अपेक्षा होत्या. भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि त्याचा भ्रष्ट मुलगा यांच्यातल्या संघर्ष,  ही कथा. पण त्यातून लक्षात राहिला,  तो पांढरा केसांचा मेकअप आणि 'टेलिफोन धून में हसनेवाली' हे गाण्याचे बोल. मात्र 'चाची ४२०' अफलातून होता. त्यातल्या मुखवट्याचं कारण पटण्याजोगं होतं. 'मिसेस डाऊटफायर'ला त्याने नेसवलेली नऊवारी ग्रेटच.

'हे राम' आठवतोय?  कमलला इतिहास नेहमीच आवडतो. महात्मा गांधींच्या हत्येची तयारी करणारा मारेकरी. तोपर्यंतचा त्याचा प्रवास आणि गांधीजींना भेटताना होणारं मतपरिवर्तन. हा प्लॉट केवढ्या ताकदीचा होता. पण तिथेही तेच. तंत्राच्या सजावटीत सिनेमाने राम म्हटलं. वैष्णवी टिळा लावलेला त्याचा उग्र चेहरा आणि राणी मुखर्जीरोबरचा लव्हसीन वगळता त्यात काही उरलं नाही. अगदी शाहरूखही. 'अभय' आणि 'मुंबई एक्प्रेस' ही असेच पार फसलेले प्रयोग.

त्यातल्या त्यात 'थेवर मगन'ने थोडा दिलासा दिला तेवढाच. थेवर मगन म्हणजे हिंदीतला 'विरासत'.  चांगलं काम करूनही अनिल कपूर कमलच्या पासंगालाही पोचू शकला नाही. तसंच याआधीही झालं होतं विनोद खन्नांचं 'दयावान'मधे आणि अनिलच्याच 'ईश्वर'मधे. कमलच्या सतत पाहाव्या लागणा-या तांत्रिक धबडग्यात 'थेवर...'ने जुन्या कमलची आठवण करून दिली होती. सगळ्या प्रकारचं हिंदी बोलून दाखवणारा 'एक दुजे के लिए'चा कमल. श्रीदेवीची ट्रेन निघून जाताना तिला लहान मुलांसारखं करून दाखवणारा 'सदमा'मधला कमल. 'ओ मारिया' म्हणत नाचता नाचता डिंपलचा रुमाल उचलताण्यासाठी नाचणा-याच्या पायाखाली हात घालणारा सागरमधला कमल. 'सागर संगम' मधला ऑटिस्टिक म्हातारा नर्तक बनलेला कमल. अख्ख्या 'पुष्पक 'मधे शब्दांचीही गरज नसलेला कमल. जबरदस्त. तो कमल कुठेय? त्याचा ड्रिम प्रोजेक्ट 'मरुधानयाग' अपूर्ण राहिला. त्याचं स्वप्न भंगलं. त्यानंतर तो बदलला की काय? कारण त्यानंतर तो क्वचितच भेटला. तुकड्या तुकड्यात. तरीही फॉर्म्युल्याच्या शोधात अडकून फसलेल्या अमिताभ,  मिथुन आणि गोविंदापेक्षा तो कितीतरी मोठा होता. कारण तो कित्येकदा अपयशी ठरूनही त्याला हवे ते प्रयोग करत राहिला. त्यातून त्याने दक्षिणेतला इण्डस्ट्रीला किमान तंत्रात तरी खूप पुढे नेलं. वेगळ्या प्लॉटची सवय लावली. ते करू शकणारा सुपरस्टार हिंदीत आला नाही.

अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी कमल हसनची एक आठवण लिहिलीय, 'हे राम'च्या शुटिंगच्या वेळची. कमलची मुलगी श्रुती त्याला एका घोड्याचं नाव विचारत होती. कमलने सांगितलं,  नावात काय ठेवलंय. तुला हवं त्या नावानं हाक मार,  तो ऐकेल. तिनं वेगवेगळ्या नावाने हाका मारल्या. पण घोडा ढिम्म. मग कमलनी हाक मारली,  चंद्रमोहन. घोड्याने मागे वळून पाहिलं. तुम्हाला नाव माहित होतं,  मग का नाही सांगितलं?, श्रुती वैतागली. मलाही त्याचं नाव नव्हतं माहीत. त्याने माझे शब्द नाही,  त्यामागची भावना ऐकली,  कमल म्हणाला.

आता श्रुती मोठी झालीय. सिनेमात आलीय. तिने कमलला या गोष्टीची आठवण करून द्यायला हवीय. तो बहुतेक विसरला असेल

3 comments:

  1. Chachi cha ullekh karayla hava hota..._ pranjal mat

    ReplyDelete
  2. @ सिद्धेश, तिस-या पॅऱातच चाचीचा उल्लेख आहे. तो कसा टाळता येईल.

    ReplyDelete
  3. to para choutha hota...haha..srry nyways..afalatun ganeet...vachlya nantr dokyat chachicha ullekh kelelyach janvalch navahat..:(

    ReplyDelete