Thursday 5 May 2011

मराठी बाण्याचा असाही इतिहास

मी पेपरात लिहायला सुरुवात केली ती बॉलीवूडच्या रिपोर्टिंगनेच. सांस्कृतिक वगैरेच करायची इच्छा होती. राजकारण समाजकारणावर लिहिन असं कधी वाटलं नव्हतं तेव्हा. आता राजकारण समाजकारणावर नेहमी लिहिताना क्वचित कधीतरी फॉर अ चेंज नाटक सिनेमावर लिहिलंय अधूनमधून.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोयरिलिज झाला तेव्हा हा लेख लिहिलाय. मला तो सिनेमा बिलकूल आवडला नाही. क्वचित काही डायलॉग सोडले तर त्यात काही घेण्यासारखं नव्हतं. त्यातल्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कळलेच नव्हते. त्यातले चमत्कार करणारे, झिंगलेल्या डोळ्यांचे शिवराय बघणं म्हणजे शिवरायांचा अपमानच होता. तरीही हा सिनेमा धो धो चालला. कारण एकच त्याने मराठी माणसाच्या दुख-या नसेवर बोट ठेवलं होतं. ही नस ज्याला सापडली तो जिंकला. राजकारणातल्या राड्यांमधेही आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे.

मुंबई टाइम्सची कव्हर स्टोरी म्हणून मी मराठी बाण्याचा एक वेगळा इतिहास मांडायचा प्रयत्न केला होता. नाटक सिनेमातून मराठी बाणा कसाकसा व्यक्त झालाय, त्यावर हा लेख होता. त्याचा इण्ट्रो असा होता, मराठी माणूस खरं तर जगभर विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. पण मुंबईत होणा-या ख-या खोट्या कुचंबणेने तो असुरक्षिततेच्या कोषातही अडकलाय. त्याचा हा विविधरंगी मराठी बाणा सिनेमा नाटकांतून अनेकदा व्यक्त झालाय. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा त्याचा लेटेस्ट अविष्कार. पण शिवाजीराजेनेही मराठी बाण्याचा ट्रेण्ड काही उभा राहिला नाही.


लेख नेहमीसारखा कटपेस्ट केलाय.  

'मराठी माणसा जागा हो',  असं 'हेराफेरी'तला बाबूराव आपटे झालेला परेश रावल बोलतो,  तेव्हा आपण हसतो. त्याचा अवतार आणि अवसान पोट धरून हसवणारंच असतं. आपल्या अस्मितेबद्दल खूपच जागरूक, पण हिंदी सिनेमामधे कामवाली आणि हवालदाराच्या पुढे न जाणा-या मराठी माणसाचं ते व्यंगचित्रंच होतं. तो डायलॉग सहज येणारा, पण थोडं अस्वस्थ करणाराच होता.

कारण मराठी माणसाला जागं होण्याचं आवाहन राजकीय सभांमधून,  सेमिनार परिषदांमधून किंवा पेपर पुस्तकांतून होतं,  तेव्हा सर्वसामान्य मराठी माणूस ते खूपच सिरिअसली घेतो. त्याच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा तो एक अविभाज्य वाटणारा भाग बनलाय. त्याचे पडसाद नाटक सिनेमांतही उमटल्यावाचून राहिलेले नाहीत.

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'  आलाय. चर्चेचा विषय बनलाय. वेगळी थीम, खर्चिक पब्लिसिटी, महेश मांजरेकरसारख्या दमदार सिनेमावाल्याचं नाव या सगळ्यामुळे ही चर्चा आहेच. पण मराठी माणसाच्या वतीने 'असेल हिंमत तर अडवा' असं दणदणीत चॅलेन्ज या चर्चेच्या मुळात आहे. यासारखी मराठी बाण्याचं थेट स्टेटमेन्ट करणारे सिनेमे आणि नाटकं दोन हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच आली. पण ती कायम चर्चेत राहिली. ब-याचदा वादाच्या घे-यात अडकली.

सिनेमांपेक्षा नाटकांनीच मराठी बाण्याचा ट्रेण्ड नेटाने राबवला. खरंतर मराठी रंगभूमी ही राजकीय,  सामाजिक दृष्टीने कायम सजग होती. मराठी माणूस हा परफॉर्मर आहे. त्यामुळे त्याचं व्यक्त होणं,  नाटकांतून उमटल्यास आश्चर्य नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळात हे स्पष्टपणे दिसलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात लोकनाट्याने,  शाहिरी मेळ्यांनी आणि जलशांनी हा वसा पुढे चालू ठेवला. मराठी बाण्यातलं पहिलं ठळक नाटक याच परंपरेतलं आहे. शाहीर साबळेंचं 'आंधळं दळतंय'.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला. पण मुंबईतलं मराठी माणसाचं स्थान पूर्वीसाररखंच गावकुसाबाहेरचं राहिलं. ती व्यथा राजकारण समाजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून व्यक्त झाली. तर 'आंधळं दळतंय' हा त्याच व्यथेचा रंगभूमीवरचा अविष्कार होता. हे लोकनाट्यच. हुतात्मा चौकाचं चित्र हेच त्याचं नेपथ्य. त्याच्या खाली पाटी घेऊन मराठी फेरीवाला बसतो. आणि अन्यभाषक पुढे प्रगती करत राहतात. शिवसेनेच्या पाठिशी उभं राहिलेल्या मराठी माणसाने या नाटकालाही जबरदस्त पाठिंबा दिला. 'हटाव लुंगी बजाव पुंगी'च्या दक्षिण भारतीयांविरोधातील शिवसेनेच्या आंदोलनातलं हे एक मार्मिक शस्त्रं बनलं.

याच लोकनाट्यातल्या परंपरेतून आलेल्या दादा कोंडकेंना मराठी बाण्याचा सेन्स प्रचंड होता. त्यांच्या भाषणांनी शिवसेना गावागावांत नेली. त्यांच्या सिनेमांत मराठी माणसाची व्यथा दिसली, पण मराठी बाणा दिसला नाही. कारण त्यांचा टार्गेट ऑडियन्स गावांत होता. तिथे हा बाणा चालणार नव्हता.

मात्र लोकनाट्याच्याच मुशीतून आलेल्या मच्छिद्र कांबळींचा टार्गेट ऑडियन्स मात्र मुंबईतला मध्यमवर्गीय होता. मालवणीसारख्या बोलीला स्वतंत्र अस्मिता मिळवून देणा-या या हरहुन्नरी माणसाला प्रादेशिकतेचं महत्त्व नीट ठाऊक होतं. 'घास रे रामा', 'पांडगो इलो रे' सारख्या त्यांच्या नाटकातून मुंबईतल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठी माणसाची व्यथा स्पष्टपणे व्यक्त होत होती. पण 'येवा कोकण आपलाच असा'ने मराठी बाणा स्पष्ट केला. आश्चर्य म्हणजे कोकणातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढवलेले कांबळी आपल्या नाटकातून 'भैय्या हातपाय पसरी' सारखं नाटक करत राहिले. आणि त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत राहिला. 'आयत्यावर कोयता' त्यांचं नसलं केलं तरी त्यांच्याच पठडीतलं होतं.

'मिस्टर नामदेव म्हणे'ची पठडी मात्र वेगळी होती. कांबळींची नाटकं गिरणगावातली मानली तर 'नामदेव'ची पठडी शिवाजी पार्कातली होता. या नाटकाची मूळ कन्सेप्ट राज ठाकरेंची होती म्हणे. असं थेट स्टेटमेन्ट करणारं हे पहिलंच नाटक. म्हणून याला मान द्यायला हवा.

'डोंबिवली फास्ट' सारख्या सिनेमातून किंवा 'लोच्या झाला रे' सारख्या नाटकांतून यातले काही प्रतिसाद उमटत राहिले. पुढे राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर राडा केला,  तेव्हा 'आयत्यावर कोयता' या नाटकाने त्यातून फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. असाच प्रयत्न 'मुंबई आमचीच'सारख्या सिनेमाने आधीच केला होता, पण त्याचंही तेच झालं. त्याचवेळेस अशोक हांडेंचं 'मराठी बाणा', विठ्ठल उमपांचं 'मी मराठी' हे लोकनृत्य मांडणारे ऑर्केस्ट्रावजा कार्यक्रम यशस्वी होत होते, हे लक्षात ठेवायला हवं.

आता 'शिवाजीराजे...' आलाय. तो यशस्वी होईल अशी चिन्हं आहेत. पण आता तरी यातून ट्रेण्ड उभा राहतो का,  हे पाहणं मनोरंजक ठरेल.

मराठीच्या नावानं

आंधळं दळतंय (१९६८)

शाहीर साबळे आणि कंपनीचं हे लोकनाट्य. मराठी माणसावरचा अन्याय हा याचा विषय. मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाणारे परप्रातीय हा विषय. शिवसेना स्थापन झाली त्याच काळात हे लोकनाट्य आलं. त्यामुळे 'हटाव लुंगी बजाव पुंगी' म्हणत सेनेने अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग केले.

येवा कोकण आपलाच असा (१९९५)

कोकण रेल्वेमुळे झालेला विकास भूमिपुत्रांपर्यंत पोहोचलाच नाही. उलट, त्याने स्थानिकच हद्दपार झाले. ही कोकणची व्यथा मांडणारं प्रवीण शांताराम यांचं नाटक. मच्छिंद कांबळींनी यातली व्यथा नेहमीप्रमाणे खूप ठळक आणि ठामपणे मांडली.

लोच्या झाला रे (२००४)

मराठी अस्मिता हा या नाटकाचा विषय नाही. केदार शिंदे यांची ही स्टाइल फॅण्टसीच. पण त्यात मराठी अस्मितेचा विषय येतो. बिल्डरला वाडा विकायला निघालेल्या हीरोला त्याचे पूर्वज मराठी बाणा शिकवतात.

मिस्टर नामदेव म्हणे (२००४)

हे मराठी बाण्यावरचं थेट नाटक. थेट मांडणी आणि टाळीबाज संवादांमुळे नाटक गाजलं. ऐन निवडणुकीच्या आसपास आल्यामुळे नाटकाची विशेष चर्चा झाली. मराठी माणसाच्या दुखत्या नसेवर बोट ठेवणारं हे महत्त्वाचं नाटक. लेखक प्र. ल. मयेकर, दिग्दर्शक अजित भुरे आणि अभिनेता अतुल परचुरे यांनी नाटकात जीव ओतला होता.

डोंबिवली फास्ट (२००५)

हा मराठी अस्मितेचा सिनेमा नाही. पण त्यात मध्यमवर्गीय मराठी माणसाची गळचेपी खूप प्रभावी व्यक्त झाली. त्यात काही संवाद आणि प्रसंग अमराठींच्या स्वभावावर टिप्पणी करणारे आणि त्यामुळे मराठीवादी होते.

मुंबई आमचीच (२००६)

हा मराठीतला 'देशद्रोही'. मराठी माणसाची व्यथा व्यक्त करण्याची ताकद यात नव्हती. सेन्सॉरने नाकारल्यामुळे हा सिनेमा फक्त बातम्यांपुरताच मर्यादित राहिला. या सिनेमाचे सबकुछ असलेले शरद बनसोडे सध्या सोलापुरातून भाजपचे उमेदवार आहेत.

भय्या हातपाय पसरी (२००७)

उत्तर भारतीयांचं आक्रमण या विषयावरचं हे नाटक नावापासूनच भय्यांना नावं ठेवणारं होतं. गुरू ठाकुरांनी लिहिलेल्या या नाटकात मच्छिंद्र कांबळी आक्रमक होते. वाक्यावाक्याला मिळणा-या टाळ्यांना 'राज राड्या'ची पार्श्वभूमी होती.

आयत्यावर कोयता (२००७)

'येवा कोकण आपलाच असा'चा हा रिमेक. मच्छिंद कांबळींच्या जागी यात संजीवनी जाधव आहेत. राज ठाकरेंसारखा वेष असणारं पात्र आणि कॉमेडीचा नको तितका हव्यास यातून हे नाटक पार फसलं. लोकांनीही त्याची फारशी दखल घेतली नाही.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९)

'लगे रहो मुन्नाभाई'वर याची कथा बेतलेली. बापूंच्या जागी शिवाजी महाराज आहेत आणि मुन्नाच्या जागी सर्वसामान्य मराठी माणसाचा प्रतिनिधी. मराठी माणसाच्या अस्मितेला आवाहन करणा-या जाहिराती आणि प्रोमोंनी मराठी माणसाचं लक्ष वेधून घेतलंय.

No comments:

Post a Comment