परवा एक मेच्या दिवशी आम्ही ‘मी मराठी’वर विशेष बुलेटिन केलं होतं. ‘शाहिरांच्या देशा’ नावाचं. आमचे मित्र श्रीरंग गायकवाड यांनी आमच्या सगळ्या सहका-यांच्या मदतीने हे जमवून आणलं होतं. त्यात अमरशेख, अण्णाभाऊ, गवाणकर, चंदू भरडकर, आत्माराम पाटील, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, लीलाधर हेगडे असे दिग्गज शाहीर दिसले. काहीजणांचा आवाजही ऐकता आला. विशेष म्हणजे लीलाधर हेगडे, आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणीताई, मधुकर नेराळे, संभाजी भगत, सुबल सरकार, सोलापूरचे अजिज नदाफ, सांगलीचे आदिनाथ विभूते, नंदेश उमप, अमर शेखांच्या थोरल्या कन्या प्रेरणा बर्वे, धाकटे जावई नामदेव ढसाळ, जीएल आणि तारा रेड्डींचे सुपुत्र प्रकाश रेड्डी, प्रकाश खांडगे इतक्या जणांना शाहिरांविषयी बोलतं केलं होतं. इतकं डॉक्युमेंटेशन टीव्हीवर कुठे एकत्र आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. तांत्रिकदृष्ट्या आमच्या काही मर्यादा नक्कीच आहेत. पण निदान आम्ही सगळ्यांची कृतज्ञतेने आठवण काढली. बरं वाटलं.
त्यात बेळगावचे एक वयस्कर शाहीर होते, गणपती तंगणकर. हाफपँट, सदरा आणि डोक्यावर फेटा अशा साध्या वेशातले हे शाहीर थकलेल्या आवाजात पोवाडा गाताना दिसले. त्यांच्या आवाजातली आणि नजरेतली खंत आताही डोळ्यासमोरून जात नाही. सीमाभागाचा मुद्दा हृदय कुरतडणाराच आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून पूर्ण झालेला नाही, अशीच यातल्या कार्यकर्त्यांची - नेत्यांची भूमिका होती. कारण बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार महाराष्ट्रात आलेला नाहीय. संयुक्त महाराष्ट्राची लढाई जितकी मुंबईत लढली गेली. तितक्याच त्वेषाने बेळगावातही लढली गेली. मुंबई मिळाल्यावर महाराष्ट्राने ढेकर दिला. पण बेळगाव दूरच राहिला, त्याचं फक्त वाईट वाटून घेतलं. मुंबईसारखं प्राणापणाने लढणारे सीमाभागासाठी तोंडदेखली आंदोलनं करत राहिले. मुंबई हातची गेली असती तर महाराष्ट्राच्या खिशावर आघात झाला असता. बेळगावात मन अडकलं होतं. मनाला काय किंमत द्यायची गरज नसते.
पण आता पन्नास वर्षं झाली त्याला. आता आणखी किती वर्षं सीमाभागातल्या लोकांच्या भावनांशी खेळत राहायचं? यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा आता. सीमाप्रश्नावर लिहिलेला माझा एक लेख सोबत कट पेस्ट करतोय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा लेख लिहिला होता. तेव्हा सीमावाद उफाळून आला होताच. पण तिकडे चंद्राबाबू नायडू बाभळी धरणातल्या पाण्यासाठी महाराष्ट्रात घुसले होते आणि त्यांना एका शाळेत अटकेत ठेवलं होतं.
आज पंढरपुरात काल्याचा दिवस आहे. आषाढी एकादशीची यात्रा आज ख-या अर्थाने संपते म्हणतात. पंढरपुरालाच लागून असलेल्या गोपाळपुरात सारे वारकरी जमा होतात. पालखीचे पंधरा दिवस चालल्यानंतर आलेला सारा शिणवटा फुगडया घालून, खेळ खेळून, लाह्या दह्याचा काला करून साजरा होतो. वारीच्या सोहळयाचं या उत्सवाने उद्यापनच होतं जणू.
पंढरपुरची ही यात्रा महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. पण इथे आलेले सगळे वारकरी मराठी बोलणारे नसतात. नाही म्हणता पंढरीच्या रस्त्यावरचा प्रत्येक चौथा माणूस हा अमराठी असतो. तो असतो कन्नड नाहीतर तेलुगू बोलणारा. बाजारात, प्रदक्षिणा मार्गावर, देवळाच्या बारीत, चंद्रभागेच्या वाळवंटावर, एसटी डेपो आणि रेल्वे स्टेशनात मराठी बरोबरच आपल्याला न कळणा-या यंडूगुंडू भाषाही कानावर पडतात. हॉटलं, दुकानांवर मराठीबरोबरच कन्नड, तेलुगू अक्षरं आवर्जून दिसतात. आणि ही आजुबाजुच्या मराठी माणसासारखीच दिसणारी. तशीच गांधीटोपी नाहीतर गुलाबी रंगाचा फेटा घालणारी, नऊवारी नेसणारी. त्यांना वेगळं ओळखणं कठीण असतं. त्यांच्यातल्या एखाद्याला मराठी येत असतं. बाकीचे बोललेलं काही कळत नाही. असं असलं तरी ही इतर मराठी वारक-यांएवढीच वारकरी असतात.
आता विश्वाचे आर्त ऐकणा-या पंढरीच्या विठुरायाला भाषा कळते एकच. भक्तीची, प्रेमाची. कोणत्याही सोवळया आवळयाची चिंता नसणा-या विठाईच्या पावलावर थेट डोकं ठेवायला राज्यांच्या सीमा अडवतही नाहीत. फक्त आंध्रप्रदेश आणि कर्नाटकच नाही तर मध्यप्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड आणि गुजरातच्या भाविकांची संख्याही कमी नसते. इथे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री आषाढीच्या महापुजेला येत नाही. पण मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग सत्तेत असोत, अथवा नसोत दरवर्षी आषाढीला विठ्ठलाच्या महापुजेला येतच आहेत. गेली अठरा वर्षं त्यांचा हा नेम चुकलेला नाही. पंढरीत अशी भक्तीची एकी दिसत असताना अन्य राज्यांशी आपली बेकी उफाळून आली आहे.
बेळगाव सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राचं कर्नाटकाशी भांडण सुरू आहे. तिथे बाभळी बंधा-यावरून आंध्रप्रदेशशी वादंग सुरू आहे. आधीच मराठी विरुध्द भय्ये राडयामुळे सगळया उत्तर भारतात महाराष्ट्राच्या इमेजची वाट लागलीय. आता दक्षिण भारताशीही तेच सुरू आहे. खरं तर महाराष्ट्राने आपल्या संतपरेतून भारतीय प्रबोधनयुगाला सुरुवात करून दिली. नानक असो कबीर असो, तुलसी किंवा नरसी मेहता भारतीय संतांवरचा वारकरी परंपरेचा प्रभाव थेट आहे. म्हणून तर नामदेवांची जवळपास साठ पदं गुरू ग्रंथसाहेबात आहेत. तामिळनाडूतून आजही पंढरीच्या दिशेने दिंडी दरवर्षी चालत येते. भारतरत्न सुब्बालक्ष्मी म्हणूनच आपल्या प्रत्येक मैफिलीची सुरुवात तुकारामांच्या अभंगाने करत. बंगालच्या बरोबरीने महाराष्ट्राने समाजसुधारणेचा वसा हाती घेतला होता. हिंदी पत्रकारितेचे भीष्मपितामह म्हणून बाबूराव विष्णू पराडकर या मराठी माणसाकडेच मान जातो. अगदी स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीपर्यंत अनेक मराठी मंडळी देशभर विविध ठिकाणी आमदार म्हणून निवडून आली होती. पण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून सगळंच रूपरंग बदलत गेलं. त्यानंतर असं काही घडत गेलं की महाराष्ट्राला आधी गुजरातशी भांडावं लागलं. नंतर कर्नाटकशी भांडणं सुरू आहे. बाभळीवरून आंध्र प्रदेशाशीही वैर घ्यावं लागतंय. सर्व देशभरात महाराष्ट्र हळूहळू वेगळा पडत गेलाय. महाराष्ट्राच्या नेत्यांवर सातत्याने विश्वासघाताचे आणि आक्रस्ताळेपणाचे आरोप लागत आले आहेत.
कर्नाटक सीमावादाचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. सगळया महाराष्ट्राच्या भावनांशी आणि विवेकाशी जोडला गेलेला असा हा मुद्दा आहे. सीमाभागातल्या मराठी भाषकांच्या वेदनेमुळे ज्याला वेदना होत नसतील, त्याला खरंतर मराठीच म्हणू नये. आणि आता पुन्हा एकदा कर्नाटकातील भाषक कट्टरवाद्यांची भूमिका आपल्याला दुखावणारीच आहे. तिथे बाभळी धरणाचा प्रश्नही तसाच आहे. आपल्या हक्काच्या पाण्यावर तेलुगू भाषेचे भावनिक राजकारण करणारे दावा सांगू लागले आहेत. अशावेळेस वाद उद्भवणं सहाजिकच आहे. इथे सीमाभाग जळतो आहे. तिथे बाभळीचं पाणी पेटलं आहे. त्यामुळे आपल्याच शेजारच्या राज्यांशी आपले संबंध द्वेषाचे बनत चालले आहेत.
उगाचच काही लोकांमुळे दोन्ही राज्यांतली लोकं परस्परांना घाऊकपणे दूषणं देत आहेत. आपण काही शत्रुराष्ट्र नाहीत. पण आपलं सगळं वागणं शत्रुराष्ट्रांपेक्षा फार वेगळं नाही. असंच चालू राहिलं तर यात कुणाचंही भलं नाही. सगळं दु:खदायक असलं तरी यातून मार्ग काढायला हवाच. कुणाला तरी आपली पोळी भाजायची असली तर त्याने खुशाल यावं आणि असे प्रश्न उकरून काढावेत. हे सारं थांबवायला हवं. या समस्या सोडवायला हव्यात. कितीही किचकट असल तरी प्रत्येक समस्येला उत्तर असतंच. चर्चेने काश्मिरचा प्रश्न सुटू शकेल, असा विश्वास आपण सगळेच व्यक्त करतो. बर्लिनची भिंतही पडू शकते, तर हे वाद त्यासमोर काहीच नाहीत. बर्लिनच्या भिंतीसारखे सगळया भिंती पाडण्यासाठीच असतात.
कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांशी असलेला आपला संबंध तर सहोदर भावंडांसारखा आहे. ‘महाराष्ट्र कर्नाटक सांस्कृतिक अनुबंध’ या ग्रंथांत दुर्गाबाई भागवतांचा अप्रतिम लेख आहे. त्यात त्या म्हणतात, ‘गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तीन नद्यांमुळे दक्षिणेच्या पठारावर मराठी, कन्नड आणि तेलगू या भाषा निर्माण झाल्या; भाषा भिन्न असल्या तरी त्यांची संस्कृती एकच होय’. ही तिन्ही राज्य एकमेकांशी आतून जोडेलेली आहेत. जिथे पुरणपोळी बनते तो महाराष्ट्र, ही पुलंनी गमतीत केलेली व्याख्या असेल तर जिथून वारकरी पंढरीच्या वारीला येतात तो महाराष्ट्र, ही ज्येष्ठ मानववंशसंशोधक इरावती कर्वेंनी केलेली सांस्कृतिक व्याख्या असो, महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या दोघांसह एकाच सांस्कृतिक आधारावर उभा असलेला दिसतो.
मराठीची या कन्नड आणि तेलुगू भाषांशी असलेली देवाणघेवाण मोठी आहेच. मराठी भाषेचा सर्वात जुना उल्लेख मिळतो तो कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळच्या शिलालेखातच. ज्ञानेश्वरीववरच्या कन्नड प्रभावावर तर अनेकांनी संशोधनं केलीत. मराठी ही पहिल्यांदा राजभाषा बनली ते विजापूरही आजच्या कर्नाटकातच. तिन्ही राज्यातल्या अनेक गावांची नावं एकमेकाच्या भाषांत आहेत. इतकंच नाही तर अनेक आडनावंही तिन्ही राज्यांत एकसारखीच असतात. कन्नडचे महाकवी बेंद्रेंचं मूळ गाव आजच्या महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचे सर्वात लाडके लेखक पुलंचं मूळ गाव कारवारात म्हणजे आजच्या कर्नाटकात. इतके हे संबंध एकमेकांशी जोडलेले.
असं असलं तरी आपण एकमेकांशी भांडतो आहोत. गोदावरीच्या पाण्यासाठी, जी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातला खरं तर सांस्कृतिक दुवा बनायला हवी होती. त्या बेळगावासाठी, जे महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या एकत्रित संस्कृतीचं प्रतीक बनायला हवं होतं. आपल्यातल्या राजकीय सीमा तर आता पन्नास वर्षांपूर्वीच्या आहेत. त्याआधी शेकडो वर्षं आपण एकमेकांना जोडलेले आहोत. आपण खरंच भांडतोय की कुणी दिल्लीश्वर आपल्या कोंबडझुंजी लावताहेत, हेही आपल्याला माहीत नाहीय. मुळात हे समजून घेणारं प्रगल्भ नेतृत्व आपल्याकडे नाही. राजकीय नेतृत्व तर नाहीच नाही. पण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातली नेतृत्व तर त्याहून ठेंगणी आहेत. त्यामुळेच ही परवड सुरू आहे.
No comments:
Post a Comment