’हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं’ हा लेख ब्लॉगवर टाकला. त्याला तुम्ही नेहमीसारखं उचलून धरलंत. थँक्स. याच विषयावरचा आणखी एक लेख आठवला. विंदा गेले तेव्हा नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला. एखादा कवी लेखक गेला की आतून गलबलायला क्वचितच होतं. विंदा गेले तेव्हा झालं तसं. इतका मोठा, डोंगरापेक्षा मोठा माणूस. पण आपला वाटायचा साला. बालकवितांपासून अमृतानुभवाच्या मराठी भाषांतरापर्यंत त्याचं वाचलेलं सगळंच नितळ होतं. त्यांना मी ऐकलंही होतं दोनचारदा.
हे असे कार्यकर्तेच समाज घडवत असतात. क्रांती निर्माण करत असतात. खरी संस्कृती तेच उभी करत असतात. पण त्यांची कुणीच कधीच दखल घेत नाही. निदान हा महाराष्ट्र तरी नाही. महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं गांधीजी म्हणायचे. पण या महाराष्ट्राने कार्यकर्त्यांना सन्मान दिलेला नाही. इथे पालखी उचलली गेली ती स्वतःला विद्वान आणि विचारवंत मानणा-यांचीच. वैचारिक टेंभ्यांसमोर कार्यकर्ते कःपदार्थ मानले गेले.
कार्यकर्त्यांनी विचारधारेशी बांधून घेणं केव्हाही चांगलंच. पण अशा निष्ठावंतांची आरती ओवाळणारे बरेच असतात. त्या त्या विचारधारेतले किंवा त्या त्या जाती धर्माचे पुढारी आणि अनुयायी त्यांची नोंद ठेवतात. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या होतात. त्यांच्यावर पुस्तकं लिहिली जातात. रस्त्यांना चौकांना त्यांची नावं दिली जातात. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं त्याच्या स्वतःशिवाय कोणीच नसतं. त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांचं महत्त्व कळत नाही. इतरांचं जाऊच दे.
सगळ्यात आधी ९६ साली. कॉलेजात असताना आज दिनांकमधे लिहायचो. सावंतवाडीला कोकण मराठी साहित्य संमेलन होतं. अंबरीषजी मिश्रंनी आवर्जून पाठवलं होतं तिथं. वय होतं एकोणीस. आजही आहे असं नाही पण तेव्हा फारशी अक्कल नव्हती. फारसं काही आठवत नाही. पण विंदांचा कविता म्हणताना आकाश भारून उरणारा आवाज आठवतोय फक्त. तेव्हा त्यांनी ‘हे श्रेय तुझेच आहे’ ही कविता ऐकली होती.
संयुक्त महाराष्ट्रातल्या एका हुतात्म्याच्या मयताला जाऊन आल्यानंतर त्यांनी ही कविता लिहिली होती. ते म्हणाले होते, ही माती तुला कधीच विसरणार नाही. आज आपल्याकडे या विषयावरचं चांगलं डॉक्युमेंटेशनही नाही. हुतात्म्यांनो सॉरी, आम्ही तुम्हाला कधीचेच विसरलोत. सगळे अभिनिवेष बाजुला ठेवून साध्या माणसांचं मोठं आंदोलन म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाकडे बघायला हवं. सबाल्टर्न स्टडीजच्या अंगाने महाराष्ट्राच्या इतिहासाची नव्याने मांडणी करता येऊ शकते. ते मांडायचा या लेखात प्रयत्न होता.
ब्लॉगसाठी कविता पुन्हा एकदा वाचली. त्यातल्या या ओळी एकदम नव्या वाटल्या.
‘पहा उगवतीला ‘फटफट’ले आहे,
आणि उद्याची ताजी बातमी शाई पिऊन झिंगली आहे.’
बाकी लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलाय, जशाच्या तसा.
पुण्यातलं साहित्य संमेलन जवळ आलंय. विंदा त्याला जाणार होते. तिथे त्यांची आवडती कविता म्हणणार होते, ‘यंत्रावतार’.त्यांच्या कवितांनी अनेक संमेलनं गाजवली. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष कधीच होऊ शकले नाहीत. यात विंदाचं काहीच बिघडलं नाही. त्यांच्या मोठेपणात कुठेच उणेपणा आला नाही. उलट दरवर्षी संमेलनाध्यक्षपदाचे वाद आणि निवडणुकांचा सावळागोंधळ होताना विंदाचीच आठवण होते आणि होतच राहणार.
पण विंदा एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. ९६ साली सावंतवाडीच्या कोकण मराठी साहित्य संमेलानाचे. या संमेलनाचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे विंदांच्या पत्नी सुमाताईंनी केलेलं भाषण. या भाषणामुळेच त्यांनी आपल्या आठवणींचं पुस्तक लिहिलं, ‘रास’. एक अत्यंत अकृत्रिम शैलीतलं असं हे अप्रतिम पुस्तक. या संमेलनात अध्यक्ष म्हणून विंदांनी भाषण केलं नाही. तर पाच कविता वाचून दाखवल्या. त्यात ‘पण श्रेय तुझेच आहे’ होती. सगळा सभामंडप स्तब्ध झाला. ते अनेकदा ही कविता म्हणत. प्रत्येक ठिकाणी सगळे असेच स्तब्ध होत. अगदी झीच्या ‘नक्षत्रांचे देणे’मधेही ही कविता त्यांनी म्हटली होती. त्यातच त्यांनी या कवितेविषयी म्हटलं होतं, ‘किती मूर्ख होतो मी ही कविता लिहिताना’. एक महाकवी जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपण आश्चर्यचकीत होतो. त्यासाठी आधी ती कविता एकदा बघायला हवी...
अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास.
... ह्याची मांडी मोडू नका,
हा माणूस शेवटपर्यंत उभा होता, बुडणा-या गलबताच्या डोलकाठीसारखा.
ह्याच्या हाताच्या मुळी वळा,
भिऊ नका, त्याच्या हातातील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत.
त्याचे उघडे तोंड हे असे आवळू नका,
पैशाच्या पिशवीसारखे,
मेला असला तरी मवाली आहे... पटकन शिवी घालील!...
आणि असे उपचारासाठी
कवटी फुटेपर्यंत थांबूही नका, ती अगोदरच फुटलेली आहे...
पहा उगवतीला ‘फटफट’ले आहे,
आणि उद्याची ताजी बातमी शाई पिऊन झिंगली आहे.
अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास, ती माती तुला विसरणार नाही.
अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे,
ह्या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन एक बुरुज अजून दात विचकीत राहील.
तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे.
अंधार आणि अधिक अंधार यांच्यामधील रित्या रेताडात डावा पाय रोवून
मी अजून उभा आहे...
पण हे श्रेय तुझेच आहे.
मुंबईतच १८ जून ५६ ला लिहिलेली ही अवघ्या दोन कडव्यांची कविता. थोडं साहित्यिक भाषेत सांगायचं तर हे मुक्त सुनीत. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन तेव्हा जोरात होतं. तेव्हाच्या फ्लोरा फाऊंटनवर महाराष्ट्रवाद्यांच्या मोर्चावर काँग्रेस सरकारने गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एका हुतात्म्याच्या अंत्ययात्रेत विंदा होते. ज्याचा मृत्यू झाला तो शाहीर गवाणकरांचा मित्र. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत असताना निर्माण झालेल्या भावना विंदांनी इथे मांडल्यात. मांडी मोडणं, मुठी आवळणं, तोंड मिटणं आणि कवटी फुटेपर्यंत थांबणं, हे नेहमीचे अंत्यविधी इथे नवा आकार उकार घेऊन येतात. अस्वस्थ करून जातात.
आणि दुस-या कडव्याचं पहिलं वाक्य. इथे विंदा नेहमी थबकायचे. आणि आपण मूर्ख होतो असं सांगायचे. ते वाक्य होतं, ‘ती माती तुला कधीच विसरणार नाही.’ बेळगावचा सीमाप्रश्न तसाच राहिलाय. त्याच्याबद्दल कुणालाही काहीच वाटत नाही. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना महाराष्ट्र कधीच विसरून गेलाय, याची व्यथा ते गाभा-यात घुमणा-या आवाजात व्यक्त करायचे. आणि त्यातली कारुण्याची किनार मन व्यथित करून टाकायची.
या कवितेचा हीरो एक साधा कार्यकर्ता आहे. कोणत्याच इझमचा झेंडा खांद्यावर नसलेला साधा माणूस. तो लौकिकार्थाने सामान्य होता. पण शेठजींच्या थैल्या त्याला विकत घेऊ शकल्या नाहीत. कोणतीही दडपशाही त्याचा मराठी कणा वाकवू शकली नाही. त्याला जे योग्य वाटत होतं, त्यासाठी त्याने आपलं सर्वस्व अर्पण केलं. खरंच सर्वस्व. भाषा, संस्कृती, अस्मिता वाचवण्याची जबाबदारी असणारा कुणी लेखक, प्राध्यापक, विचारवंत किंवा पुढारी नव्हता तो. ज्याच्या हातांवर त्याच्याच मालकीचे घट्टे पडलेत तो कामगार होता. पांढरपेशांच्या नजरेतून मवालीच. या अज्ञानालाच अन्यायाची चीड होती. त्याने मागचा पुढचा विचार न करता स्वतःला महाराष्ट्रावर समर्पित करून टाकलं.
हे असे कार्यकर्तेच समाज घडवत असतात. क्रांती निर्माण करत असतात. खरी संस्कृती तेच उभी करत असतात. पण त्यांची कुणीच कधीच दखल घेत नाही. निदान हा महाराष्ट्र तरी नाही. महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं गांधीजी म्हणायचे. पण या महाराष्ट्राने कार्यकर्त्यांना सन्मान दिलेला नाही. इथे पालखी उचलली गेली ती स्वतःला विद्वान आणि विचारवंत मानणा-यांचीच. वैचारिक टेंभ्यांसमोर कार्यकर्ते कःपदार्थ मानले गेले.
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन तर लोकांचंच आंदोलन होतं. इथे लोकांच्या रेट्यातून नेते उभे राहिले. त्याच्याच पुढे मागे गोवा मुक्तीचं असेल किंवा मराठवाडा मुक्तिसंग्राम असेल, मराठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ही आंदोलनं यशस्वी करून दाखवली. दलित अस्मितेची चळवळ, सहकार चळवळ, शेतकरी संघटना, मराठवाडा विकासाचं आंदोलन, आणीबाणीच्या विरोधातलं आंदोलन यात कार्यकर्त्यांनी नेते घडवले. नेत्यांना आपापल्या विचारधारांच्या पोथ्या खुंटीवर ठेवायला भाग पाडलं. आणि या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांनीच नव्या विचारधारा घडवल्या. तरीही या कार्यकर्त्यांसाठी कुठेच एकही चिरा उभा केला गेला नाही, कुठेच एक पणतीही लागली नाही.
इतिहासात मागे जायचंच तर करो वा मरो म्हणत इंग्रजी सत्तेला धुडकावणा-या तुकडोजी महाराजांच्या भक्त शिपायांशी यांचा सांधा जोडावा लागेल. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्रिसरकारच्या बाशिंद्यांशी आणि महात्या फुल्यांच्या सत्यशोधकांशी या कार्यकर्त्यांना जोडून बघावं लागेल. छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर कुठलंही नेतृत्व नसताना महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला पराभूत करणा-या मावळ्यांना याच जातकुळीतलं मानावं लागेल. आणि शांतपणे क्रांती करणा-या वारक-यांना विसरून कसं चालेल. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मांदियाळीनेच महाराष्ट्राच्या मातीची मशागत केलीय. पण ही माती त्याला नेहमीच विसरत आलीय. त्याच्या हौतात्म्याला सन्मान नाही मिळाला कधी.
कार्यकर्त्यांनी विचारधारेशी बांधून घेणं केव्हाही चांगलंच. पण अशा निष्ठावंतांची आरती ओवाळणारे बरेच असतात. त्या त्या विचारधारेतले किंवा त्या त्या जाती धर्माचे पुढारी आणि अनुयायी त्यांची नोंद ठेवतात. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या होतात. त्यांच्यावर पुस्तकं लिहिली जातात. रस्त्यांना चौकांना त्यांची नावं दिली जातात. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं त्याच्या स्वतःशिवाय कोणीच नसतं. त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांचं महत्त्व कळत नाही. इतरांचं जाऊच दे.
संयुक्त महाराष्ट्राचं एवढं मोठं आंदोलन, पण त्याची आज कुणाला आठवण नाही. विदर्भवाद्यांना बागुलबुवा दाखवण्याखेरीज त्यांचा वापरही केला जात नाही. कार्यकर्ते जाऊ दे, त्यांच्या नेत्यांनाही कधीच मान्यता मिळाली नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुखांचंच उदाहरण पुरेसं आहे. त्यांनी नेहरूंविरुद्ध बंड केलं नसतं तर त्यांच्या नावाने किमान पाच सात सरकारी संस्था देशभर असत्याच. पद्मविभूषण तरी कुठेच गेलेलं नव्हतं. पण इतिहासाच्या पुस्तकांत नेत्यांपैकी कुणाविषयीही काही नाही. य. दि. फडक्यांनंतर त्याची विगतवार नोंदही कुणी ठेवली नाही.
सध्या ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम त्याच्या डॉक्युमेंटेशनचं महत्त्वाचं काम करत आहेत. पण असे चारदोनच प्रयत्न. नगरसेवक राहुल शेवाळेंनी मध्यंतरी हुतात्म्यांच्या वारसांना शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना १०६ पैकी तीसेकजणच मिळाले होते. मोठमोठ्या अभ्यासकांनीही त्यांना सांगितलं की आंदोलनात लुटालूट करायचा चोरचिलटे जमा झाले होते, ते मारले गेले. कार्यकर्त्यांचं कर्तृत्व नेहमी असंच दुर्लक्षिलं जातं. त्याकडे दुर्लक्ष करणं सोपंही असतं. पण असं झालं की मग मातीची मशागत होत नाही. आणि अशी माती कुणाला ध्यानात ठेवण्याइतकी कसदार उरत नाही.
अशा मातीत डावा पाय रोवून विंदा तुम्ही आजपर्यंत उभे तरी होतात. आता तुम्हीही नाही. या हुतात्म्यांनी आता कुणाकडे बघावं. आता आपले म्हणजे विंदांना मूर्ख बनवणा-यांचे दिवस आहेत.
vindanni bhavnela vichar dila aani aapan ujala dila tya baddal thanks.. karan junya goshtina visarane hi navya modern jagachi fashion hot challiye........
ReplyDeleteSachin,
ReplyDeleteDurdaiva maharashtrache va tya talagalatil karykartyanche (Shetkaryanpasun, pratek kastkari Kamgaranche )...... dusare kay mhanayache......... yethe vikala jato dikhau pana.. khote pana.. khotyalach khar mannyachi savai zaliy.......lihav tari kay .....shabdahi vikale jatat... tethe mansanchi kimmat aahe kuthe....