Thursday, 5 May 2011

छोट्या शहरातला मोठा पोरगा


गेल्या शुक्रवारी नवशक्तित माझा कॉलम छापून आला. लेखाचा विषय महेंद्रसिंग धोनी आहे. आज त्याला पेप्सीच्या नव्या गटक गटक ऍडमधे पाहिलं. तो आला तेव्हाच काहीतरी वेगळं रसायन होतं हे कळलं होतं. आता तर त्याने आपली छाप कायमस्वरूपी सोडली आहे. आता तो जगातल्या शंभर सर्वात प्रभावशाली माणसांपैकी एक आहे. ओसामाला मारणारे ओबामाही त्याच्याइतके प्रभावी नाहीत, असं टाईम मॅगझिन म्हणतंय.

लेख कटपेस्ट केलाय.

टाईम मॅगझिन जगभरातल्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीची यादी प्रकाशित करत असते. परवा ती यादी आली. ही यादी खूप इंटरेस्टिंग आहे. फेसबुकवरच्या एका स्टेटसमुळे इजिप्तमधे क्रांती घडवणारा गुगलमधे काम करणारा साधा नोकरदार वेल घोनीम या यादीत पहिल्या नंबरवर आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग सातव्या नंबरवर आहे. तर विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांगी नवव्या स्थानावर आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक शेवटच्या रांगेत म्हणजे ८६ व्या स्थानावर आहेत.


आपल्याकडे कोण कुठल्या पदांवर आहे हे पाहून त्याची ताकद ठरवली जाते. आणि इथे महासत्तेचा प्रमुख कसाबसा या यादीतलं स्थान पटकावून आहे. म्हणूनच अनेक दशकं टाईम मॅगझिनच्या या यादीचं महत्त्व शाबूत आहे. जगभरातल्या मीडियात म्हणूनच या यादीच्या हेडलाइन बनत आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात भारतातही याची हेडलाईन बनली कारण यात महेद्रसिंग धोनीचं नाव आलं. पण तो यात एकटा भारतीय नाही. त्याच्यासोबत चारजण आहेत. बावन्नाव्या नंबरवरचा धोनी सर्वात आघाडीवर आहे.

79 क्रमांकावरचे वी. एस. म्हणजे विलयनूर सुब्रमण्यम रामचंद्रन हे नाव आपल्यासारख्यांना माहीत असल्याचं खरंच काही कारण नाही. पण न्यूरोसायन्स या  मानवी मेंदूचा आणि मनाचा अभ्यास करणा-या क्षेत्रात या मूळ मद्राशी आणि आता अमेरिकी वैज्ञानिकाचा खूप बोलबाला आहे. त्यांनी या क्षेत्रातलं खूप मोलाचं संशोधन केलंय. राजस्थानातल्या माहितीच्या अधिकारासाठी झगडणा-या 89 क्रमांकावरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय तशा अधूनमधून चर्चेत असतात. आपल्याला महाराष्ट्रात माहितीची अधिकार माहीतही नव्हता तेव्हा त्यांनी राजस्थानात माहितीच्या अधिकार हे सामान्य माणसाचं आंदोलन बनवलं होतं. आता त्याचा देशभर वणवा पेटला आहे. 61 नंबवरच्या मुकेश अंबानींचं नाव स्वाभाविक आहेच. पण 88 नंबरवरच्या अझीम प्रेमजींचं वैशिष्ट्य हे की त्यांच्यावर बिल गेट्सनी लिहिलंय. एक उद्योजक म्हणून नाही तर एक दाता म्हणून प्रेमजींची ओळख त्यांनी करून दिलीय.

पण आपल्या दृष्टीने या यादीचा खरा हीरो हा धोनीच आहे. तो या यादीत नसला तरी तो आजचा हीरोच आहे. दोन एप्रिलला धोनीने कुलशेखरचा बॉल सीमारेषेबाहेर फेकला आणि त्या ऐतिहासिक क्षणी धोनी सगळ्या देशाचा हीरो बनला. आता जोपर्यंत क्रिकेट खेळलं जाणार आहे. तोपर्यंत धोनी तेरा नाम रहेगा. तो नव्या भारताचा नवा नायक आहे. नव्या भारताचा चेहरा आहे. नव्या भारताच्या विजिगिषेचं प्रतीक बनला आहे.

आज सगळा भारत टोकाला पोहोचलेल्या भ्रष्टाचाराची चर्चा करतोय. वाढत्या महागाईची चर्चा करतोय. वाढलेल्या लोकसंख्येच्या ओझ्याची चर्चा करतोय. एकमेकांचे कपडे फाडणा-या राजकारणाची चर्चा करतोय. अशा वेळेस या अंधारात एक आशेचा किरण सापडतो. सगळ्या देशाने एकत्र येऊन साजरी करावी अशी एकमेव गोष्ट अनेक दिवसांनी घडते. ती म्हणजे आपण वर्ल्डकप जिंकलेला असतो. सगळा देश उत्साहाने तिरंगे फडकावत रस्त्यावर उतरतो.

आता या सगळ्याची तुसडेपणाने उपेक्षाही करता येईल. या सेलिब्रेशनमधे आपण सगळं वास्तव विसरलो म्हणून त्यावर टीकाही करता येईल. ती ज्यांना करायचीय त्यांनी करावी बापडी. पण सगळ्या देशातल्या बहुसंख्य साध्या माणसांच्या या कारव्यात चालण्याची मजा काही औरच आहे. त्या सेलिब्रेशनचा एकच नाद पूर्ण भारतभर ऐकू येत होता. त्यात नादावून जाण्याची संधी क्वचितच मिळत असते. त्यानंतर दोन दिवसांनी ही माणसं भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वतःहून रस्त्यावर उतरली होती. तो निव्वळ योगायोग नव्हता. या गर्दीचा खरा नायक होता महेंद्रसिंग धोनी.

म्हणूनच धोनी आज जगातल्या शंभर प्रभावशाली माणसांच्या यादीत पोहोचलाय. खरं तर सचिन तेंडुलकर नावाचा क्रिकेटचा देव समोर असताना असा इतर कुणी नजरेत भरणं शक्यच नसतं. कारण सगळं आकाशच त्या सूर्याच्या प्रभेने भरून गेलेलं असतं. टीम इंडियाला समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायला शिकवणारा सौरव गांगुली असो किंवा आपल्या गंगौघासारख्या सातत्यपूर्ण खेळाने भिंतीसारखा अभेद्य राहुल द्रविड असो किंवा एका इनिंगमधे दहा विकेट घेणारा जादूगार अनिल कुंबळे. हे सगळे निव्वळ ग्रेट होते. दिग्गज या विशेषणात बसवावी अशी ही माणसं. पण त्यांची कामगिरी नेहमीच सचिनसमोर झाकोळलेली असायची. पण आता सचिन ऐन भरात असताना, जगाच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असताना दुसराच एक येऊन नायक बनतो, हे अभूतपूर्व आहे. हे सोपं नाही. त्यासाठी प्रचंड टॅलेंट तर हवंच. पण त्याहीपेक्षा काहीतरी प्लस हवं. ते धोनीनं करून दाखवलंय.

सचिन, सौरव, द्रविड किंवा कुंबळे ही सगळी महानगरांमधली माणसं. हा खेळच तसा महानगरांचा. एखादा कपिल देव त्याला अपवाद. पण चंदिगढ हे काही छोटं शहर निश्चितच नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाची नगररचना असलेलं हे शहर श्रीमंत पंजाबांचं आणि जाटांचं होतं. ते महानगर नसेलही पण देशातलं एक महत्त्वाचं शहर नेहमीच होतं. धोनी या सगळ्यांपेक्षा वेगळा. रांची नावाच्या एका खरोखरच्या छोट्याशा शहरातून आलेला. आजवर या शहरातून कुणीही आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळलेलं नाही. त्याच्या झारखंड राज्यातूनही कुणी भारताकडून खेळलेलं नाही. तरीही तो आज खेळतो आहे. फक्त खेळतो आहे एवढंच नाही तर देशाचं नेतृत्व करतोय. पार्श्वभूमी असताना एखादी गोष्ट करणं आणि नसताना करणं यात खूप अंतर असतं. अशावेळेस स्वतःच स्वतःचा रस्ता बनवावा लागतो. अनेकदा खड्ड्यात पडावं लागतं. अनेकदा रस्ता संपलेला दिसतो. तरीही न थांबता, नाराज न होता धावावं लागतं. ते धोनीनं करून दाखवलंय.

या सगळ्या गोष्टींमुळेच छोट्या शहरांमधली मुलं खूप वेगळी ठरतात. ती ठरलेल्या रुढ मळलेल्या वाटांवरून चालत नाहीत. त्याना पडायची भीती नसते फारशी. कोण काय म्हणेल याची ती फारशी चिंता नाही करत. काऱण आजवर खूप काही ऐकलेलं असतं. रिस्क घेणं त्यांना फारसं जोखमीचं वाटत नाही. ते सहज करून जातात, ते चौकटीबाहेरचं ठरतं. म्हणून ते ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकपमधली शेवटची ओव्हर जोंगिंदर सिंगला देऊ शकतात. सगळं जग युवराजची हुर्यो उडवत असताना त्याच्या पाठिशी उभा राहू शकतो. वर्ल्डकपच्या फायनलला श्रीसंतला खेळवू शकतो आणि पूर्ण टुर्नामेंटमधे फॉर्म नसतानाही सेहवाग, सचिन आऊट झाल्यावर मोठ्या हिमतीने चौथ्या नंबरवर मैदानात उतरू शकतो.

विशेष म्हणजे आज हे करणारा धोनी एकटा नाही. छोट्या शहरांतून आलेले लाखो भारतीय तरुण आपापल्या क्षेत्रात जगभर आपला ठसा उमटवत आहेत. त्यांच्याही आईबापांनी कधी आपल्या शहराचा उंबरठा ओलांडलेला नसतो. जगाची भाषा त्यांनाही नवी असते. तरीही ते या नव्या जगावर आपल्या धडका मारत असतात. काही कोलमडून पडतात. पण हरत नाहीत. त्यांची धडपड सुरू राहते. नवं ज्ञान आणि नवे दृष्टिकोन ते शिकत राहतात. आजचा घडणारा भारत या छोट्या शहरांमधल्या मोठ्या पोरांचा आहे. ते भारताचं फक्त भविष्यच नाही तर वर्तमानही आहेत.

मुंबईसारख्या महानगरांत लोकलमधून किंवा बसमधून फिरताना कितीतरी अशी धडपडणारी छोट्या शहरातली मुलं सहज दिसतात. त्यांची डोळ्यांत फार मोठी स्वप्नं असतात आणि मनात जग जिंकायची जिगर असते. त्याना कोणीच थांबवू शकत नाही. आज जिथे महानगरांमधली मुलं कुढत बसताहेत. टॅक्स्या फोडताहेत. त्यांना धोनीकडून शिकावं लागणार आहे. कारण छोट्या शहरांतल्या स्वप्नांचा नायक असलेला धोनी आज सगळ्या भारताचा नायक बनलेला आहे. छोटी शहरं आणि मोठी शहर हातात हात घालून चालली तरच भारत जग जिंकू शकणार आहे. सचिन आणि धोनी एकत्र आले तरच चमत्कार घडणार आहे. एक वर्ल्डकप आपण जिंकलाय. आता जग जिंकायचंय.      

4 comments:

  1. तुम्ही भारावून गेलेला दिसताय..

    ReplyDelete
  2. भारावून जाणं मला आवडतं.

    ReplyDelete
  3. फक्त फलंदाजी चांगली असलेल्या संघाचा विश्वचषकविजेता कर्णधार धोनी आहे. आपल्या गोलंदाजांना विश्वचषकात सगळ्यांनी बदडून काढलेय तरीही हा संघ विश्वचषक जिंकू शकतो, हे चांगल्या कर्णधारामुळेच शक्य झाले.

    सचिनभक्ताचा हा लेख मला खुप आवडला.

    ReplyDelete
  4. nice article

    ReplyDelete