पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या माणसाचं ब्राम्हणांबद्दलचं एक अत्यंत विकृत लेखन सध्या सगळीकडे इंटरनेटवर फिरतंय. हे अशापद्धतीचं नीच आणि घाणेरडं डोकं असलेला हा माणूस परिवर्तनवादी आणि बहुजनवादी संघटनांच्या गोष्टी वर्षानुवर्षं करत होता, हे धक्कादायक आहे. मराठा संघटना अशाच प्रकराचं खालच्या पातळीवरच्या गोष्टी करणार असतील, तर मराठेतरांमधे त्याचे प्रतिसाद उमटणारच आहेत. मला वाटत त्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती भीमशक्ती महत्त्वाची आहे. पण त्यासाठी या राजकीय समीकरणाकडे सामाजिक अंगाने पाहिलं जातंय. पण राजकीय पक्षांकडून तशा फारशा अपेक्षा नाही करता येत.
त्याहीपेक्षा आजघडीला महत्त्वाचा मुद्दा हा की यातून राजकीय फायदा फारसा नाही. फार तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या मोठ्या शहरांमधे शिवसेनेला थोडाफार फायदा होईल. कारण आजवर दलित मतं सेनेला हरवण्यासाठी एकत्र यायची, ते थांबू शकेल. त्यातली किती मतं युतीला मिळतील, हे आता सांगणं कुणालाच शक्य नाही. पण विरोधातलं ध्रुवीकरण जरी थांबवलं तरी सेना भाजपच्या पदरात मुंबई ठाणे महापालिकेसाठी खूप काही पडणार आहे. तरीही याचा राजकीय अंगाने विचार करता कामा नये, ते राजकीय दृष्टीनेही फारसं फायद्याचं ठरणारं नाही.
दहा बारा दिवसांआधी उद्धव, मुंडे आणि आठवले यांच्या पत्रकार परिषदेत गेले होतो. तिथे त्यांचा सगळा अजेंडा राजकीयच असल्याचं दिसलं. काँग्रेसविरोध हा काही शिवशक्ती भीमशक्तीचं वैचारिक अधिष्ठान असू शकत नाही. ते यशस्वीही होऊ शकत नाही. उलट याकडे सामाजिक अंगाने पाहिल्यावर एक पक्ष म्हणून शिवसेनेचं स्वीकारमूल्य वाढणार आहे. हे बेरजेचं राजकारण यातून फायदा होणारच पण लांबवर. तोवर वाट बघण्याची यांची तयारी आहे का, हे मात्र माहीत नाही. या विषयावर नवं लिहिण्यासारखं काही नाही. त्यामुळे लेख कटपेस्ट करतोय.
अजुनही घोषणा झालेली नाही. तरीही एकाच आठवड्यात लागोपाठ दोन दिवस शिवशक्ती भीमशक्तीच्या पत्रकार परिषदा झाल्या. आधी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बोलले आणि नंतर उद्वव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले अशी शिवशक्ती भीमशक्तीची त्रिमुर्तीच अवतरली. एकत्र येणार. आंदोलनं करणार. ९ जूनला मोर्चा काढणार. तरीही अधिकृत घोषणेसाठी आणखी पाच महिने थांबणार. खरं तर ही सगळी नेतेमंडळी आर पार गोष्टींसाठी प्रसिद्ध पण आता ही युती तळ्यात आहे आणि मळ्यातही. आणि तसं पाहिल्यास तळ्यातही नाही आणि मळ्यातही.
आता रामदास आठवले आपल्या सगळ्या ताकदीसह आणि झाडून सगळ्या नेत्यांसह शिवसेना भाजपच्या व्यासपीठावर येऊन पोहोचलेले दिसतात. त्यांच्या सतत एकत्र बैठकाही होत आहेत. एवढेच नाही तर स्थानिक पातळीवर एकत्र मेळावेही सुरू झालेले दिसतात. स्वतः आठवले आपल्या कार्यकर्त्यांमधे जाऊन उघडपणे या विषयावर बोलत आहेत. पत्रकार परिषदांमधे या नव्या समीकरणाची सविस्तर माहिती दिली जातेय. काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढणारी, जाहिर सभांमधून नकला करून हिणवणारी ही मंडळी आता एकमेकांच्या गळेत गळे घालत आहेत. शिव्यांची जागा शेरोशायरीने घेतलीय. हे सगळं होत असलं तरी शिवशक्ती भीमशक्तीची अधिकृत घोषणा होण्यासाठी मात्र थेट ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे. ही घोषणा ऑक्टोबरमधली घोषणा ही निवडणुका एकत्र लढवण्यासंबंधीची घोषणा असेल, असं दिसतंय.
पण म्हणून आता याचा अर्थ आता शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची घटना निवडणुकांशी संबंधित नाही, असं बिल्कूल नाही. ही युती काँग्रेस राष्ट्रवादी या सत्ताधा-यांचा माज उतरवण्यासाठी आहे, असं उद्धव ठाकरेंनी घोषित केलंय. भ्रष्टाचार, महागाई, दलितांवरील अत्याचार, सत्ताधा-याचे अत्याचार याला आळा घालण्यासाठी हे नवे समीकरण असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधा-यांना धडा शिकवायचाय असं आठवले सांगताहेत, तर काँग्रेसला राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ही युती असल्याचं मुंडे सांगत आहेत. त्यासाठी ते सगळे मिळून आंदोलनं करणार आहेत. शिवशक्ती भीमशक्तीमुळे बंगाल तामिळनाडूसारखं सत्तापरिवर्तन होईल अशी अपेक्षा बाळासाहेबांनीच व्यक्त केलीय. याचा अर्थ स्पष्ट आहे की ही धडपड सत्तेचं राजकारण आहे आणि राजकारणासाठीच आहे. राजकीय पक्षांच्या समीकरणामधे राजकारण असणार, हे उघडच आहेत. पण शिवशक्ती आणि भीमशक्ती या फक्त राजकीय शक्ती नाहीत. या शक्तींच्या मागे विशेषतः समाजकारणाची एक मोठी परंपरा आहे. या समाजकारणाकडे दुर्लक्ष केल्यास याचं राजकारण फिसकटण्याची शक्यता आहे.
राजकारणात एक अधिक एक बरोबर दोन असतं, तर या समीकरणाने क्रांती घडवली असती. शिवसेना भाजपच्या आजच्या ताकदीत रिपब्लिकन पक्षाची मतं मिळवली तर निश्चितच मोठं परिवर्तन घडू शकतं. आधीच एकमेकांशी भांडणा-या काँग्रेस राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी हे समीकरण आजही पुरेसं आहे. अगदी मनसे सोबत नसतानाही ही ताकद सत्तेची चक्र फिरवण्याची क्षमता बाळगते. विशेषतः पुढच्या वर्षी येणा-या महापालिका निवडणुकाच्या निकालावर याचा प्रभाव पडू शकतो. कारण मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर या सगळ्या शहरांमधे शिवशक्तीची आणि भीमशक्तीचीही स्वतःचे टापू आहेत. कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर जिल्हापरिषदांमधली नेहमीची समीकरणं बदलवण्याची ताकदही यांच्याकडे आहे. पण अर्थातच एक आणि एक बरोबर दोन झालं तरच.
रिपब्लिकन पक्षाच्या अन्य गटांच्या तुलनेत आठवलेंकडे अधिक मतं आणि कार्यकर्ते आहेत. आठवले गट म्हणजे सगळी भीमशक्ती नाही, हे तर उघडच आहे. प्रकाश आंबेडकर आणि राजेंद्र गवई तर एकीकृत रिपब्लिकन पक्षातही आले नाहीत. ते रिडालोससोबत जाण्यासही तयार झाले नाहीत. त्यामुळे ते शिवशक्तीसोबत येण्याची शक्यता दूर दूरवर नाही. रिपब्लिकन पक्षाची एकी झाली असली तरी सगळे गट आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कवाडे, कुंभारे यांनी आठवलेंवर टीका केलेली आहेच. पण आठवलेंच्याच गटाचे आजवर अनेक गट पडलेत. ते सगळेही त्यांच्यासोबत असलेले दिसत नाहीत. अशावेळेस या नव्या समीकरणाची भूरळ सगळ्या भीमशक्तीला पडेल आणि आणि बासरीवाल्याच्या गोष्टीतल्या उंदरांसारखे आंबेडकरी मतदार आठवलेंपाठोपाठ जातील, अशा भ्रमात स्वतः आठवलेही नसतीलच.
नेत्यांच्या धरसोडीच्या आणि स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळून रिपब्लिकन जनता रिपब्लिकन नेत्यांना आधीच कंटाळलेली आहे. ती पूर्वीसारखी नेत्यांच्या पाठिशी आंधळेपणाने जात नाही. परिस्थिती आणि निवडणुकीतलं वारं पाहून ती दरवेळेला आपला वेगळा निर्णय घेते. असं आपलं स्वतःचं वेगळं डोकं लावणारे हे जागृत मतदार आठवलेंना थारा देतीलच याची खात्री कुणालाच नाही. कालपर्यंत काँग्रेसची सुभेदारी मिळाल्यावर हेच आठवले शिवसेना भाजपला जातीयवादी म्हणत होते. तेच आता परिवर्तनाचे साथीदार कसे बनले याचा पटेल असा तर्कही त्यांना आजवर देता आलेला नाही. तसंच आंबेडकरी चळवळीतला एक मोठा वर्ग आधीच काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांत जाऊन पोहोचलेला आहे. सत्तेचा फायदा त्यांना कमी अधिक प्रमाणात मिळतोच आहे. अशावेळेस ते सगळं सोडून येण्याची शक्यताही नाही.
जे भीमसैनिकांचं तेच शिवसेना भाजपच्या केडरचंही आहे. या दोन्ही पक्षांचं आजवरच राजकारण कुणाला तरी शत्रू म्हणून दाखवण्याचं होतं. मुस्लिमांनतर असं शत्रू बनवलं ते दलितांनाच. वरळीच्या बीडीटी चाळीच्या दंगली, रिडल्स आणि रमाबाई नगर असा मुंबईतला द्वेषाचा इतिहास आहे. पण त्याहीपेक्षा भयानक स्थिती मराठवाड्यात आहे. शिवसेनेचं आजवरचं तिथलं सगळं राजकारणचं मुळात मुस्लिमद्वेषासोबतच दलितद्वेषावर आधारलेलं आहे. शिवसेनेने बाबासाहेबांचं नाव मराठवाडा युनिवर्सिटीला देण्याचा विरोध केला. दंगलींमधे अत्याचार केलेल्यांना पाठिशी घातलं. अट्रोसिटीच्या नावाने दलित आणि सवर्णांमधला रागलोभ कसा पेटत राहील, याचीच काळजी घेतली. अशावेळेस दलितांच्या हातात हात घालून इथला सेना भाजपचा सवर्ण पाठिराखा कसा तयार होईल हेदेखील पाहायला हवा. शरद पवारांनी नामांतराला समर्थन दिलं आणि काँग्रेसमधे प्रवेश केला तेव्हा मराठवाड्यातला मराठा झटकन सेनेकडे वळला होता. आता शिवसेना आपले रूळ बदलतेय. दलितांसोबत जातेय. तिथे राष्ट्रवादीचे नेते मात्रे उघडपणे मराठा राजकारण करताना दिसत आहेत. अशावेळेस पुन्हा इथला मराठा अजितदादांशी एकच वादा तर करणार नाही ना?
पण या समीकरणापेक्षाही कडवट असणा-या हिंदू आणि बौद्ध दलितांचं काय? मागास आणि अतिमागासांमधल्या या लढाईला खूप कंगोरे आहेत. ‘जय भीम’ आणि ‘राम राम’ म्हणत हे गट एकमेकांविरोधातलं राजकारण समाजकारण करत आलेत. हा द्वेष खूप आतवर झिरपलाय. बौद्धेतर दलित हे सेना भाजपचे परंपरागत मतदार बनलेत. आता नेमका त्याचा विरोधक याच पक्षांच्या सोबत आल्यामुळे हा मतदार काय करतो तेही बघायला हवं. त्यामुळे निवडणुकांच्या राजकारणात शिवशक्ती भीमशक्तीचं एक अधिक एक बरोबर दोन होण्याची शक्यता नाही. मनसे गेल्यामुळे झालेली दरी रिपब्लिकन भरून काढतील, अशी अपेक्षा शिवसेना भाजपचे काही नाही नेते व्यक्त करत आहेत. पण हेही तितकंसं शक्य नाही. उलट या नव्या समीकरणांमुळे दुखावलेल्यांसाठी मनसेचे दरवाजे उघडेच असणार आहेत.
आजवर ज्यांच्याविषयी द्वेष पसरवला त्यांचीच गळाभेट घेण्यासाठी आता नेते सांगत आहेत. पण नेत्यांचा आदेश आला म्हणून एका फटक्यात शत्रूचा मित्र होतो, असं थोडंच आहे. त्यामुळे आजवर ज्यांच्याशी दंगली केल्या त्यांनाच जवळ करण्याइतपत फायदा त्यांना दिसायला हवाय. निवडणुकीत तर ही गणितं स्थानिक पातळीवर त्रासाचीच होणार आहेत. नव्या युती म्हणजे नवी बंडखोरी हा अनुभव आजवर सगळ्याच पक्षांनी घेतलाय. शिवशक्ती भीमशक्ती याला अपवाद कसा ठरेल?
त्यामुळे आता हा सारा मामला राजकीयदृष्ट्या लगेच फायद्याचा नाहीच नाही. तरीही ही युती खूप महत्त्वाची आहे. कारण यातून एक सामाजिक एकोपा उभा राहतोय. नव्या सलोख्याची ही सुरुवात आहे. एकमेकांना ठरवून पाडणारे हे समाजगट एकमेकांजवळ आले तर त्यातल्या गैरसमज दूर होणार आहेत. महाराष्ट्राच्या उद्यासाठी हे सारं चांगलं आहे. त्यासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. यामुळे सत्ता परिवर्तन होईल की नाही हे माहीत नाही. पण महाराष्ट्राचं परिवर्तन करण्याची ताकद या समीकरणांत नक्कीच आहे. त्यामुळे राजकारणाच्या पुढे जाऊन समाजकरणासाठी ही युती हवीय. आता फक्त राजकारणाचा विचार केला. तर लगेच काहीच हातात लागणार नाहीय. तेल आणि तुप तर जाईलच पण धुपाटणंही हातात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा विचार खूप पुढचा आहे. नवा समाज घडवणारा हा विचार आहे. त्यातून नवा समाज घडणार आहे. तो स्वतःचं नवं राजकारण उभं करणार आहे. ते राजकारण नक्की यशस्वी होणारं आहे. राजकारणाच्या पलीकडे पाहिल्यावरच हे दिसणार आहे. तो दृष्टिकोण विकसित करण्यासाठी थांबायची तयारी हवीय. सत्तापरिवर्तनासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून शिवशक्ती भीमशक्ती यशस्वी होण्याची सूतराम शक्यता नाही.
aawdle
ReplyDelete