Thursday, 5 May 2011

मी शिवाजीराव गायकवाड बोलतोय

रजनीकांत हगायला बसला... मी एसेमेस वाचायला लागलो. खाली खाली स्क्रोल केलं. बराच वेळानंतर शब्द दिसले... आता त्याला आणखी किती छळणार, सुखाने हगू तरी द्या!

रोबोट हीट झाला तेव्हापासून रजनीकांतच्या नावाने असे ज्योकवर ज्योक सुरूच आहेत. पडद्यावर सुपरहीरो पण प्रत्यक्षात टक्कल आणि दाढीचे पांढरे खुंट त्याने कधी लपवले नाहीत. रोबोट रिलिज झाला, त्या काळातच तो मुंबईत आला होता. बाळासाहेब ठाकरेंना भेटलाही होता. तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं.

आता रजनीकांत आजारी आहे. हॉस्पिटलमधे दाखल आहे. आपलं कुणी आजारी झालं की त्याला भेटायला जावसं वाटतं. तसंच वाटलं. म्हणून त्याच्यावरचा हा लेख टाकतोय. सध्या ब्लॉगवर मराठी अस्मितेची चर्चा सुरू आहे. तीदेखील यानिमित्ताने सुरू राहू शकेल.


परवा शिवाजी गायकवाड खास मुंबईत आला. आणि मराठीतून बोलला. आता गायकवाड आडनावाचा माणूस मराठीतून बोलला तर काय कवतिक. पण तरीही त्याच्या मराठीचं खूप म्हणजे खूप कौतूक झालो. तो अपेक्षेपेक्षा बरंच बरं मराठी बोलतो म्हणून हे कौतूक. इतके दिवस मद्रासी बनून राहिला तरीही अजून मराठी विसरलेला नाही, याचं कौतूक. शिवाय मराठी बाण्याची ओळख बनलेल्या बाळासाहेबांना खास येऊन भेटला. त्यांना देव वगैरे म्हणाला याचं फार फार कौतूक.

सध्या रजनीकांतचे कौतुकाचेच दिवस आहेत. त्याच्या रोबोट या सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेत. शिवाजी गायकवाड त्याचं मूळ नाव. गाव सोलापूर. मोठया पडद्यावर जाताना तो रजनीकांत बनला. रजनीकांत म्हणजे चंद्र. पण तो चंद्रासारखा सोजिरा आणि शांत नव्हताच कधी. उलट शिवाजी गायकवाड या खास मराठी नावातलं रांगडेपण होतं. त्याच्या दिसण्यात आणि जगण्यातही. पडद्यावरही हे ओबडधोबड रांगडेपण त्याने कधी लपवलं नाही. त्याचा हीरो सर्वसामान्यांना आपला वाटत राहिला. त्या आपलेपणामुळेच त्याचे कुणीही विश्वास ठेवू शकणार नाहीत, असे त्याचे स्टंट आणि स्टायली ख-या वाटत राहिल्या.

रजनीकांतपेक्षा लोकप्रिय आणि दर्जेदार कलाकार आजवर अनेक झालेत. त्याच्यापेक्षाही स्टायलिश अभिनेते आज आहेतच. बहुआयामी किंवा वर्सटाइल म्हणाव्या अशा प्रतिभेसाठी तो कधी ओळखलाही गेला नाही.  असं असलं तरी तो रजनीकांत आहे. त्याने कधीच कोणाला कॉपी केलं नाही. त्यानं अभिनयाचे नियम पाळले नाहीत. त्याला हवं तसं काम तो करत राहिला. त्याचा प्रेक्षक त्याच्या डोळयासमोरून कधीच दूर झाला नाही. त्यामुळे तो जमिनीवर राहिला. रसिकांच्या हृदयात राहिला. त्याचा स्वत:चा असा वेगळा करिष्मा बनला. त्याच्या सुदैवाने हीरोवर जीव ओवाळून टाकणारे दाक्षिणात्य प्रेक्षक त्याला लाभले. अमिताभ असो किंवा राजेश खन्ना, हे हिंदी सिनेमातल्या लोकप्रियतेचे मापदंड. पण रजनीकांत त्यांच्या शेकडो मैल पुढे गेला.

आज त्याचं वय साठ. त्याच्या डोक्यावर टक्कल आहे. पण तो आपल्या सचिन पिळगावकरसारखा विग घालून महागुरू बनत नाही. तरी तो महागुरूंचाही महागुरू आहे. चेह-यावर सुरकुत्या दिसू नयेत म्हणून अमिताभसारखं ऑपरेशनही करत नाही. तरीही तो सुपरस्टारचा बाप आहे. तो कॅमेरासमोर नसताना साधा मेकअपही करत नाही. अनेकदा तर तो केसांना कलपही लावत नाही. तरीही त्याचं काही बिघडत नाही. त्याच्या मागील पाच पैकी चार सिनेमांनी लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक मोडलेत.. वास्तवात वागण्या बोलण्यात मृदू असणारा हा म्हातारा आजही अर्ध्या भारतासाठी ऍंग्री यंग मॅन आहे. त्याची स्टाईल आणि अदांवर फिदा होणा-यात धन्यता मानणा-या काही पिढया आहेत.

रजनीकांत म्हणतोय, त्याची मराठी सिनेमात काम करायची तयारी आहे. पण ते काही फारसं शक्य वाटत नाही. एकतर गेली काही वर्षं सरासरी दीड वर्षाला एखादा सिनेमा करतो. त्यामुळे दक्षिणेतले अनेक दिग्गज निर्माते त्याच्यासाठी रेड कार्पेट घालून उभे आहेत. त्यांचे गडगंड प्रोजेक्ट पाहून मराठी निर्मात्यांचे डोळे कायमचे पांढरे होऊन जातील. त्याचे नखरे नसले तरी त्याच्या आजवरच्या कारकीर्दीला साजेसा खर्च करणं मराठी सिनेमाला जमण्यासारखं दिसत नाही. मराठी सिनेमे कितीही आशयघन वगैरे असले तरी ते सिनेमे रजनीकांतसाठी सूट होणारे नाहीत. म्हणजे रजनी श्वासमधला आजोबा बनलाय किंवा वळूमधला फॉरेस्ट ऑफिसर, हे काही पचत नाही. आजच्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीला हिंदीतलाही एखादा ब-यापैकी स्टार परवडू शकत नाही. तर रजनीकांत तर दूरच. त्यामुळे आपण तशी स्वप्नं पाहू नयेत, हे बरं. फारतर त्याचा एखादा मूळ तामिळ सिनेमा हिंदी किंवा तेलुगूच्या बरोबरीने मराठीत डब होऊन लागला, तर आपण धन्यता मानायला हवी.

रजनीकांतने मराठीसाठी अडजस्ट करावं, असं मायबोलीच्या नावाने जोगवा मागणारे मराठी सिनेमावाले म्हणतीलही. पण त्याने ते का करावंआजवर मराठी सिनेमा इंडस्ट्रीने किंवा मराठी माणसानं रजनीकांतच्या यशात असा काय हातभार लावलाय, की त्याची परतफेड करण्यासाठी त्याने स्वस्तात काम करावंमुळात तो मराठी आहे, हेच बहुसंख्य मराठी माणसांना ठावूक कुठेय? आजवर तो जो काही मोठा झालाय, तो स्वत:च्या कामामुळे आणि स्वभावामुळे. त्याच्यावर उपकार आहेत, त्याच्या मायबाप मद्राशी प्रेक्षकांचे. त्यात मराठी आलेच कुठे ? आजवर कुणा मराठी कलाकारांनी त्याच्याशी संवाद साधल्याचं ऐकिवात नाही. तो मराठी म्हणून मराठी प्रेक्षकांनी त्याच्या तामिळ सिनेमांसाठी गर्दी केल्याचंही कुठे घडलं नाही. तामिळ जाऊ दे, निदान त्याचे हिंदी सिनेमे महाराष्ट्रात हिट झाल्याचेही दाखले नाहीत. एकदा महाराष्ट्र सरकारने दिलेला जीवनगौरव पुरस्कार वगळता महाराष्ट्राने त्याची फारशी कधी दखलही घेतलेली नाही. विशेष म्हणजे रजनीकांतने यावं, असं आपलेपण या सरकारी रखरखीत पुरस्कारात नव्हतंच. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्याचा मोठा भाऊ आला होता, तो नाही. ख-या अर्थाने लोकांशी एकरूप झालेल्या या अस्सल कलावंताला त्याला शोभेल असा सन्मानही महाराष्ट्रात मिळालेला नाही, हे अधोरेखित करायला हवं.

खरं तर एक मराठी माणूस मराठी बोलतो, ही बातमी नसायला हवी. पण रजनीकांत मराठी बोलला ही बातमी झाली. यातच आपल्या आजच्या मराठी समाजाचं खुजेपण सामावलेलं आहे. थोडंफार यश मिळवलेला मराठी माणूस मराठी बोलायला लाजतो. आज मराठीतले हीरो हीरोईन दोन हिंदी सिनेमात चमकले की मराठी बोलायला लाजतात. सई ताम्हनकरसारख्या काही हीरोईनी तर मराठीतच दिसतात. पण एकतर इंग्रजीतच, नाहीतर अमेरिकन अक्सेंटचं मराठी बोलतात. असं असताना भारतीय सिनेमाचा सुपरहीरो हिंदी वगैरे टाळून मराठीत बोलतो, याचं कौतूक वाटतं.कुणी अमराठी मराठी बोललं की आपल्याला भरून येतं. अक्षय कुमारला मराठी येतं, जीतेंद्र मराठी बोलतो यामुळे आपण धन्य होतो. इंदिरा गांधींपासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत आणि मायावतींपासून सोनिया गांधींपर्यंत झाडून सगळे अमराठी नेते मुंबईत भाषणाला जेव्हा जेव्हा आले, तेव्हा त्यांनी दोन वाक्यं मराठीत बोलून मतं मिळवली.

पण आपण खरंच रजनीकांतला मराठी मानतो का? हा प्रश्न आपण प्रामाणिकपणे आपल्यालाच विचारला तर उत्तर येतं, नाही. तो सोलापुरातला आहे. मराठी आहे. मराठी नावाचा आहे. असं सगळं माहीत असूनही रजनीकांत आपल्यासाठी मद्रासीच असतो. मराठी माणसानं स्वत:ला आणि मराठी बाण्याला संकुचित बनवल्याचं हे लक्षण आहे. जगभर पसरलेले मराठी आता आपल्यासाठी कधीचेच परके बनले आहेत. सीमोल्लंघन ही मराठी माणसानं आपल्या पराक्रमाची प्रेरणा बनवली होती. हजारो वर्षं मराठी माणूस सीमोल्लंघन करतोय. जगभर फिरतोय. जग जिंकतोय. जिथे जातो तिथे मराठी ध्वजा त्याने अभिमानाने उभी करतोय. गेल्या दोन तीन शतकांत तंजावरपासून काशीपर्यंत आणि बडोद्यापासून गोवाहाटीपर्यंत रुजलेले मराठी याची साक्ष देत आहेत. अशी देशांतरं ही आपल्या प्रगतीची लक्षणं होती. खडी बोलीतून वीरगीतं लिहिणारे तात्या टोपे, हिंदी पत्रकारितेचे जनक बाबूराव पराडकर, उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत अशी कितीतरी उदाहरणं. मराठी माणसाचं महाराष्ट्र हे वेगळं राज्य बनेपर्यंत हे सांस्कृतिक बंध जपले गेले होते. महाराष्ट्र बनल्यानंतर हे बंध अधिक मजबूत होतील असं वाटलं होतं. पण झालं उलटंच.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने निर्माण केलेली कटुता असेल किंवा त्यानंतरच्या मराठी अस्मितेच्या राजकीय आंदोलनांची परिणती असेल, पण आज महाराष्ट्राबाहेरचा हा महाराष्ट्र आपल्याला आता आपला वाटत नाही. झांशीची राणी लक्ष्मीबाई मराठी असल्याचं आज किती मराठी माणसांना माहीत असेल? परप्रांतीयांच्या लोंढयांना शिव्या घालताना मराठी माणसांच्या परप्रांतांतील कतृत्वाला आपण कमी लेखू लागलो की काय? सीमोल्लंघनाची महती गाताना आपली अडचण होऊ लागली काय? काय झालं ते कळलंच नाही. पण आपण मराठी बाण्याचा कथा सांगताना संकुचित झालो आहोत बहुदा. म्हणून जगभर पसरलेला मराठी आपल्या कवेत घेण्यासाठी आपले हात थिटे पडत आहेत. आणि महाराष्ट्रात आलेला परप्रातीय कितीही मोठा झाला, इथे मिसळला तरी त्यालाही शेवटी आपला बनवू शकलो नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जबरीनं धर्मांतर करणा-यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचं काम केलं होतं. त्यांनी नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांना त्यांनी पुन्हा केलं. एवढंच नाही तर तर लांडया बजाजीला जावईही करून घेतला. पण त्यानंतर पन्नास साठ वर्षांतच चक्र पुन्हा मागे फिरली. थोरले बाजीराव पेशवेंना महाराणी मस्तानींपासून झालेल्या समशेर बहाद्दर या आपल्या पुत्राला हिंदू बनवता आलं नव्हतं. शिवकालीन महाराष्ट्राच्या व्यापक मनोभूमिकेने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक तेजस्वी पर्वाला जन्म दिला आणि कालांतराने आलेल्या संकुचितपणाने ते पर्व काळवंडून टाकलं. आज आपण शिवाजी महाराजांचा जयघोष करतो. पण वारसा चालवतो तो त्यांच्या व्यापक सर्वसमावेशक विचारधारेचा नाही, तर संकुचितपणाचाच.

मध्यंतरी आलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बघून आपण मराठी माणसं खूष झालो होतो. पण त्यातला चमत्कार करणारा, घोडयावरून डुगूडुगू धावणारा, डोळे आत गेलेला आणि बोबडं बोलणारा शिवाजी आपल्या काही कामाचा नाहीय. त्यातल्या कचकडयाच्या शिवाजीपेक्षा आपला शिवाजी गायकवाड खरा हीरो आहे. महाराष्ट्राच्या छोटया शहरातून परप्रांतात जाऊन जग जिंकणारा हा आपला हीरो असायला हवा. शिवाजीराव गायकवाडने दाखवलेल्या मार्गावरून चालणं परप्रातीयांना शिव्या देण्यापेक्षा खूप कठीण आहे.  

6 comments:

  1. मराठी माणसाच्या मुस्काडात मारून त्याला झोपेतून उठविणारा लेख... मराठी अस्मितेची बेगडी सोंगं घेणाऱ्यांची मुस्काडं अशीच फोडली पाहिजेत.

    ReplyDelete
  2. सचिनराव लय भारी... याची एक कॉपी मनसेच्या राजगडावर पाठवा शक्य झालं तर... मराठी मराठी म्हणून बोंबलतात आणि मराठी बोली (त्यातही बारा कोसांवर बदल)व देवनागरी लिपी यातला फरक यांना कळत नाही. असो... मुळात मु्ददा मराठी, गुजराती, कानडी, तेलुगूचा नाहीच.

    ReplyDelete
  3. शिवाजीराव गायकवाड उर्फ रजणीकांत ग्रेट होता आणि आहे याबद्दल मलाच काय पण कोणत्याही कलाप्रेमी, महाराष्ट्रीयन व्यक्तिला शंका असण्याचे कारण नाही, मात्र सचिनराव तुम्ही जी मतं व्यक्तं केलीत त्यांच्याशी मी अजिबातही सहमत नाही.

    (१- रजनीकांत म्हणतोय, त्याची मराठी सिनेमात काम करायची तयारी आहे. पण ते काही फारसं शक्य वाटत नाही. एकतर गेली काही वर्षं सरासरी दीड वर्षाला एखादा सिनेमा करतो. त्यामुळे दक्षिणेतले अनेक दिग्गज निर्माते त्याच्यासाठी रेड कार्पेट घालून उभे आहेत. त्यांचे गडगंड प्रोजेक्ट पाहून मराठी निर्मात्यांचे डोळे कायमचे पांढरे होऊन जातील. त्याचे नखरे नसले तरी त्याच्या आजवरच्या कारकीर्दीला साजेसा खर्च करणं मराठी सिनेमाला जमण्यासारखं दिसत नाही. मराठी सिनेमे कितीही आशयघन वगैरे असले तरी ते सिनेमे रजनीकांतसाठी सूट होणारे नाहीत. म्हणजे रजनी ङ्गश्वासफमधला आजोबा बनलाय किंवा वळूमधला फॉरेस्ट ऑफिसर, हे काही पचत नाही. आजच्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीला हिंदीतलाही एखादा ब-यापैकी स्टार परवडू शकत नाही. तर रजनीकांत तर दूरच. त्यामुळे आपण तशी स्वप्नं पाहू नयेत, हे बरं. फारतर त्याचा एखादा मूळ तामिळ सिनेमा हिंदी किंवा तेलुगूच्या बरोबरीने मराठीत डब होऊन लागला, तर आपण धन्यता मानायला हवी.)
    -मराठी सिनेमा प्रगल्भ झालाय, त्याचं कौतूक करायचं सोडून खिल्ली काय उडवतोयस...


    (२ - मुळात तो मराठी आहे, हेच बहुसंख्य मराठी माणसांना ठावूक कुठेय? आजवर तो जो काही मोठा झालाय, तो स्वत:च्या कामामुळे आणि स्वभावामुळे. त्याच्यावर उपकार आहेत, त्याच्या मायबाप मद्राशी प्रेक्षकांचे. त्यात मराठी आलेच कुठे ?)

    -सचिनराव तुमचं मत म्हणजे महाराष्ट्राचं मत या निखिल वागळे स्टाईलमध्ये लिहू नका... प्रत्येक मराठी माणसाला रजणीकांतचा अभिमान आहे, भले तो मराठीत काम करो अथवा न करो... त्याच्या मद्राशी किंवा मराठीपनबद्दल अम्हाला प्रश्‍नच पडलेला नाही, तुझ्यासारख्या बुद्धीवादी लोकांमुळे अम्हाला या वादात अडकावं लागतय... मराठी मानसाचं मन साफ आहेच तुझं कधी साफ करतोयस ते बोल...

    (3- पण आपण खरंच रजनीकांतला मराठी मानतो का? हा प्रश्न आपण प्रामाणिकपणे आपल्यालाच विचारला तर उत्तर येतं, नाही. तो सोलापुरातला आहे. मराठी आहे. मराठी नावाचा आहे. असं सगळं माहीत असूनही रजनीकांत आपल्यासाठी मद्रासीच असतो. मराठी माणसानं स्वत:ला आणि मराठी बाण्याला संकुचित बनवल्याचं हे लक्षण आहे.)
    -हे म्हणजे अतीच झालं... जरा विषय रंगविण्यासाठी किंवा रकाने भरन्यासाठी तुमच्यासारखे (बुद्धीवादी) पत्रकार शब्दांचा, मतांचा किस करतात हेच खरे


    (4 - मध्यंतरी आलेला ङ्गमी शिवाजीराजे भोसले बोलतोयफ बघून आपण मराठी माणसं खूष झालो होतो. पण त्यातला चमत्कार करणारा, घोडयावरून डुगूडुगू धावणारा, डोळे आत गेलेला आणि बोबडं बोलणारा शिवाजी आपल्या काही कामाचा नाहीय. त्यातल्या कचकडयाच्या शिवाजीपेक्षा आपला शिवाजी गायकवाड खरा हीरो आहे. महाराष्ट्राच्या छोटया शहरातून परप्रांतात जाऊन जग जिंकणारा हा आपला हीरो असायला हवा. शिवाजीराव गायकवाडने दाखवलेल्या मार्गावरून चालणं परप्रातीयांना शिव्या देण्यापेक्षा खूप कठीण आहे.)
    -ओके... मात्र आम्हाला त्या बारीक मिचमिच्या डोळ्याच्या महेश मांजरेकरपेक्षा त्याने रंगवलेला शिवाजी महत्त्वाचा वाटतो.. त्याची वृत्ती, विचार आदर्श म्हणूण बाळगायला हरकत नाही..

    बाकी आजचा लेख म्हणजे बौद्धीक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणारा आहे हे नक्की....

    ReplyDelete
  4. काही अपवाद वगळता मराठी कलाकारांना थोडी प्रसिद्धी मिळाली की, ते लगेच हवेत उडू लागतात. काही दिवसांपूर्वीचा पुण्यातील प्रकार म्हणजे याचं उत्तम उदाहरण. मात्र वयाच्या साठीत ख-या - खु-या अवतारात सर्वत्र वावरणारा...यशाची सर्व शिखरे पार करूनही आपले पाय जमिनीवर टिकवून ठेवणारा... जन्मजात राज्याबरोबर ज्या राज्यानं मोठं केलं त्याला न विसरणारा...तसेच दाक्षिणात्य राज्यात मराठीचा झेंडा फडकवणारा हा मराठी माणूस (रजनीकांत) काहीसा वेगळाच आहे. असा हा रजनीकांत पुन्हा न होणे

    ReplyDelete
  5. इथे अनामिक प्रतिक्रिया देऊन असहमती दर्शविणा-यांना आपले नाव टाकण्याची भिती वाटते का? काय चुकीचे आहे या लेखात. मराठी माणूस सगळे मुंबईचे मराठीकरण व्हावे अशी स्वप्न बघतोय त्यासाठी बदलावी लागणारी मानसिकता बदलण्याची कुणाची तयारी नाही. भैय्यांना विरोध करणारे मनसेवाले उध्दव ठाकरेंवर टिका करताना आपला मराठी बाणा कुठे जपतात?? हिच अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आपण आपला वेळ प्रगतीपेक्षा इतरांवर टिका करण्यात घालवतो.

    ReplyDelete
  6. सचिनभाऊ,

    रजनीकांत आम्हाला मराठी वाटतो का यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुम्हाला सयाजी शिंदे माहित आहे का हो? हा प्रश्न खरंतर मला माझ्या एका तमिळ मित्राने विचारला होता. मी म्हंटलं की नाव ऐकलंय, पण तुला कसा माहीत तो? तर माझा मित्र म्हणतो की आख्खं तामिळनाडू त्याच्याविषयी पराकोटीची कृतज्ञता बाळगून आहे. कारणकी, त्याने तमिळ चित्रपटात सुब्रह्मण्यम भारतीची भूमिका केलीये. सुब्रह्मण्यम भारती हा तामिळनाडूतील (इंग्रजांच्या वेळच्या मद्रास इलाख्यातील) एक अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय स्वातंत्र्यसैनिक होता हे सांगणे नलगे.

    असो.

    रजनीकांतला मराठी मानण्याने वा न मानण्याने फारसा फरक पडणार नाहीये. पण सयाजी शिंदे यांना दुर्लीक्षिणे नक्कीच करंटेपणाचं आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete