Wednesday, 10 September 2014

अमर हबीबः साधेपणाची साधना

आमच्या गावच्या घरी काढलेला अमरजींचा फोटो
आज खरं तर अंबाजोगाईत असायला हवं होतं. जायचं ठरलं होतं. बऱ्याच महिन्यांपूर्वी अमरजींना तसं सांगितलंही होतं. एकतर माझ्यासारखा आळशी माणूस उद्याचंही काही ठरवत नाही. ठरवलं की असं होतं. आजारी पडलो. अंबाजोगाईला जाणं शक्यच नाही. अमरजींचा आज साठावा वाढदिवस. तो त्यांच्या फक्त सोबत राहून साजरा करायचा होता. त्यांच्यासोबत राहायचं म्हणजे समृद्ध होणं असतं. तसं अधिक श्रीमंत व्हायचं होतं. आता झालं नाही तरी त्याचं चक्रवाढ पद्धतीनं उट्ट काढावंच लागणार.

अमरजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच हा अनुभव आहे. प्रत्येक भेटीत त्यांनी समृद्ध केलंय. मी २००२ वगैरे साली दिल्लीत होतो. ईटीव्हीचा दिल्ली प्रतिनिधी. मराठी पत्रकार एकमेकांना भेटायचे. त्यात एक विचित्र नाव कानावर यायचं, अमर हबीब. फोनवर एकदोनचा बोलणं झालं पण भेट झाली नव्हती. अशीच कधीतरी भेट झाली. बहुतेक प्रमोदसोबत. मग आम्ही अमरजींच्या मागे लोकचुंबकासारखे आपोआप चिटकलो. अमर हबीब, प्रमोद चुंचूवार आणि मी. किती रात्री आणि किती दिवस आम्ही चर्चा केल्या असतील, गणतीच नाही. त्या अनोळखी शहरात ते आमचे पालकच होते. पण कधी पालक असल्याचं त्यांनी जाणवू दिलं नाही. ते आम्हाला घडवत होते, पण त्याचा वासही आला नाही. त्यांचे दोस्त म्हणवून घ्यायला आम्ही खूपच लहान आहोत. पण तरीही ते आमचे दोस्त होते आणि आहेत.

आज मी संपादक वगैरे आहे. लोक कौतुक वगैरे करतात. त्यातलं खूप काही अमरजींनी दिलेलं आहे. त्यांनी माझ्यासारख्या पोरांना नव्याने विचार करायला शिकवलं. नव्याने प्रश्न विचारायला शिकवलं. आम्हाला जगायला शिकवलं. गोष्टींच्या मूळात शिरायला शिकवलं. त्यांच्यामुळे जगण्यातली मजा वाढली. त्यांच्यामुळे जगण्यात श्रीमंत झालो. जगजीतने गायलेली एक गझल आहे, मुझ में जो कुछ अच्छा हैं सब उसका हैं, मेरा जितना चर्चा हैं सब उसका हैं. उसका मेरा रिश्ता बडा पुराना हैं, मैंने जो कुछ सोचा हैं सब उसका हैं. असंच काहीसं तरी. असं असणारा मी एकटा नाही. खूपजण आहेत. आता तर सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या घडवण्याचा परिघ आणखी वाढलाय. ते सगळीकडे पसरलेत.

काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या आम्ही सारे फाऊंडेशनने त्यांना कार्यकर्ता पुरस्कार दिला. कार्यक्रम घरचा होता. जाऊ शकलो नाही. आता अमरजींचा वाढदिवस आहे. ठरवूनही जाऊ शकलो नाही. अविनाश दुधेच्या आग्रहामुळे तेव्हा अमरजींवर एक लेख लिहिला होता. प्रयत्न करूनही कितीतरी वेळ लिहिता येत नव्हतं. तरीही लिहिलं. लेख कसा झालाय माहीत नाही. पण त्यात अतिशयोक्ती एका पैशाचीही नाही. लेख नेहमीसारखा कटपेस्ट

Friday, 14 February 2014

मला भेटलेले लोकनाथ

दिल्लीत असताना प्रमोद चुंचूवारच्या पुस्तकांच्या कपाटात पहिल्यांदा लोकनाथ यशवंत भेटले. त्या कवितेनं हादरवून टाकलं. तेव्हापासून लोकनाथ मनाचा एक भाग झालेत. पुढे आम्ही भेटलो. मित्र झालो. वर्षभरापूर्वी मी त्यांच्यावरचा हा लेख लिहिला. त्यांच्या कवितांवरच्या समीक्षालेखांचा संग्रह आला. `लोकनाथच्या यशवंत कविता` नावाचा. त्यासाठी हा लेख लिहिला होता. मला भेटलेले लोकनाथ असं या लेखाचं स्वरूप होतं. लोकनाथजींना लेख आवडला. बरं वाटलं. मूळ लेखाचं नाव एकदम कडक असं होतं. तो लेख ब्लॉगवर टाकतोय.

Wednesday, 12 February 2014

आपल्या जननायकांसाठीचं युद्ध

क्रांतिवीर दीपाजी राणेंचं हे रेखाचित्र 
गोव्यात येऊन आता मला दहा महिने होऊन गेलेत. मी बराच गोंयकार झालोय. फिरतोय, लोकांना भेटतोय, वाचतोय. जमेल तेवढा गोवा समजून घेतोय. मजा येतेय. सगळ्यात आधी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचला. त्यात सत्तरीच्या राण्यांचं बंड सापडलं. गोव्यात गेल्यावर सगळ्यात आधी साखळीच्या विठ्ठलमंदिरात गेलो होतो. राणे घराण्याचा कुणीतरी पूर्वज याच पांडुरंगाला घेऊन गोव्यात स्थायिक झाला होता. त्या विठ्ठलानं सत्तरीतल्या वाळवंटी नदीच्या पाण्यात चंद्रभागेतल्या `पाईकां`चे जीन्स मिसळले असावेत बहुदा.
पोर्तुगिजांनी सत्तरी तालुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून म्हणजे अठराव्या शतकाच्या मध्यापासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत राणे अखंड त्यांच्याशी लढत होते. त्यातले क्रांतिवीर दीपाजी राणे आणि खूप नंतरचं दादा राणेंचं स्वातंत्र्यसंगर सर्वात आकर्षक आहे. दीपाजींच्या स्मृती जागवण्यासाठी २६ जानेवारीला नाणूसच्या किल्ल्यावर तरुण एकत्र झाले होते. दीपाजींचं कर्तृत्व मोठं असूनही त्यांच्या नावानं कुठेच काही नाही. शाळेत धडे नाहीत, फार चांगली पुस्तकं नाहीत, स्मारक वगैरेही नाही.त्यांच्याविषयी चांगलं बोलायला आजही काही लोकांची तयारी नाही, हे फेसबुकावरच्या चर्चेत दिसतंय. त्यावर गोवा पुढारीचे कार्यकारी संपादक प्रभाकर ढगेंनी दीपाजींवर पुस्तक लिहायचा संकल्प फेसबुकावर सोडलाय. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
मी लागोपाठच्या गेल्या दोन शनिवारी दोन लेख लिहिले. पहिला लेख दीपाजींच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्यात एकूणच लोकनायकांचं कर्तृत्व लोकांसमोर आणण्यासाठी कसे प्रयत्न सुरू असतात, त्यावर लिहिलंय. दोन्ही लेख इथेच पाठोपाठ टाकलेत.

Friday, 31 January 2014

सूर्यबाप !

नामदेव ढसाळांची तब्येत ढासळल्याचं व्हॉट्सॅपवरून कळत होतं. आता ती बरी होण्याच्या पलीकडे असल्याचंही कळत होतं. त्या रात्री उशिरापर्यंत मित्रांशी संपर्कात होतो. सकाळी उठलो आणि एसेमेस बघितला. सगळं अपेक्षित होतं तरीही आपण एकदम रिकामे झालो आहोत, असं वाटलं.
कॉलेजात असताना `आज दिनांक`मधे असायचो. तेव्हा नामदेव पहिल्यांदा भेटले. मी आज दिनांकमधे सिनेमा टीव्हीवर लिहायचो. ते तुकडे नामदेव सत्यतामधे घ्यायचे. माझ्या लेखांत काहीही संबंध नसताना डेबोनेअरमधले फोटो स्कॅन करून टाकलेले मी बघितले. मी उडालो. बाकीच्या पानांत नामदेवांचं लिखाण असायचं. ते काहीतरी वेगळंच होतं. कपिल पाटलांनी त्याच काळात नामदेवांचं या सत्तेत जीव रमत नाही काढलं होतं. मी वाचून पुन्हा उडालो. हादरलो. मी त्यांचं मिळवून वाचत राहिलो. बरचसं वाचलं. मी वाचत राहिलो. बदलत राहिलो. आपल्याकडे बघायचे नवे डोळे देणारा तो अनुभव होता.

Friday, 10 January 2014

आपल्या ब्लॉगचं पुस्तक आलंय

गेलं वर्षभर मी माझ्या ब्लॉगला विसरूनच गेलो होतो. माझा ब्लॉग मला सतत हाका मारत होता. जिवाच्या आकांताने बोलावत होता. शर्टाचा कोपरा खेचत आपल्याकडे ओढत होता. पण मी कृतघ्न. त्याने मला इतकं दिलं आतापर्यंत. तरीही मी त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हतो. आता तर त्याने मला आणखी एक गोष्ट दिलीय. नवं पुस्तक. ब्लॉगचं नवं पुस्तक आलंय. त्याचंही नावही हेच माझं आभाळ. आता आणखी कृतघ्नपणा नको.
`मी मराठी`त होतो तोवर ब्लॉगवर खूप लिहिलं. त्यानंतर नवशक्तिला गेलो. तिथे थोडंफार लिहिलं. त्यानंतर बऱ्याच उलथापालथी झाल्या. इथेतिथे बरंच लिहिलं. पण लिहिणं प्रामुख्यानं होत होतं ते श्रीलिपीतून. त्याचं युनिकोडात चांगलं कन्वर्ट होत नव्हतं. कंटाळ्याला नवं कारण मिळालं होतं. पण आता सगळा आळस झटकून ब्लॉगवर नव्या वर्षाची पहिली पोस्ट टाकतो आहे.

Friday, 14 September 2012

प्रबोधनकारांवरील व्याख्यानाचं आग्रहाचं निमंत्रण

१७ सप्टेंबर २०१०. बरोबर दोन वर्षांपूर्वी प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटची सुरुवात झाली. ती प्रबोधनकारांची सव्वाशेवी जयंती होती. संकल्पना माझीच होती. संशोधन, संपादन वगैरेही माझंच. माझा कॉलेजचा मित्र आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष राहुल शेवाळेने आर्थिक भार उचलला. काम करताना खूप मजा आली. खूप फिरावं लागलं. खूप शोधाशोध झाली. उद्धव ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्याहस्ते एका जंगी कार्यक्रमात वेबसाईटचं लॉन्चिंग झालं.

गेल्या दोन वर्षांत चार लाखांहून अधिक जणांपर्यंत, थोडं टेक्निकल भाषेत सांगायचं तर युनिक विझिटर्सपर्यंत, प्रबोधनकार घेऊन जाण्यात ही वेबसाईट यशस्वी झाली. पण साईटमधे खूपच त्रुटी राहिल्या होत्या. विशेषतः अपलोड करताना अनेक पुस्तकं अर्धवटच पडली होती. आता मला पुन्हा जाग आलीय. गेले दोन तीन महिने धावपळ सुरू आहे. सोमवारी १७ तारखेला साईटचं रिलॉन्चिंग आहे. काम जोरात सुरू आहे.

त्यानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. विषय आहे, 'आजही प्रबोधनकार महत्त्वाचे का?' लोकमान्य ते महात्मा या महाग्रंथात मोरे सरांनी प्रबोधनकारांची जशी दखल घेतली आहे, तशी या काळाचा इतिहास लिहिताना कोणीच घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सरांकडून प्रबोधनकार ऐकताना मजा येणार आहे. दिग्विजय सिंग यांनी प्रबोधनकारांनी लिहिलेलं मागचापुढचा संदर्भ नसलेलं एक पान समोर आणून गदारोळ उडवून दिला होता. असं एखादं पान काय समजून घ्यायचं? प्रबोधनकार सगळाच समजून घ्यायला हवा. त्याची सुरुवात या व्याख्यानापासून होऊ शकते.

याचबरोबर प्रबोधनकारांवर पहिला संदर्भग्रंथ लिहिणारे धर्मपाल कांबळे यांचा सत्कारही आयोजित केला आहे. ते पुण्यात पोस्टमन आहेत. अण्णा भाऊ साठेंवरही त्यांचं काम महत्त्वाचं आहे. कार्यक्रमात मजा येईल. तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण...

कधीः सोमवार १७ सप्टेंबर २०१२, संध्याकाळी ५ वाजता 
कुठेः ब्राह्मण सेवा मंडळ, दुसरा मजला, भवानीशंकर रोड, कबुतरखान्याजवळ, दादर पश्चिम. 

 तुम्हाला यायचंच आहे. आम्ही वाट बघतो आहोत.

Thursday, 6 September 2012

ठाकरेंचं मूळ कुठलं? प्रबोधनकार नेमकं काय सांगतात?


बुधवारी दिवसभर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचे ट्विट गाजत होते. त्यात ते म्हणतात, प्रबोधनकार ठाकरे (राज ठाकरेंचे आजोबा) समग्र वाङ्मय पाचव्या खंडाचे ४५ वे पान पाहा. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारनेच हे प्रसिद्ध केले आहे. त्यात ठाकरे घराण्याचा प्रवास इतिहास बिहारमधील मगधपासून भोपाळ ते चित्तोडगड ते मांडवगड ते पुणे असा शोधता येतो.

महाराष्ट्राला आत्मभान देणा-या या महान विचारवंताचं डॉक्युमेंटेशन असणा-या prabodhankar.com  या वेबसाईटचं संपादन, संशोधन मी केलं होतं. दोन वर्षांपूर्वी ही साईट आली होती. त्यामुळे अनेक पत्रकार मित्रांनी फोन करून माहिती विचारली. तीन टीवी चॅनलांनी इंटरव्यूही केले. त्यावेळी प्रबोधनकारांच्या झालेल्या थोड्याफार अभ्यासातून या ट्विटकडे बघताना समोर येणारे हे काही मुद्दे इथे मांडतो आहे. राजकारण बाजूला ठेवून निदान आपण तरी याकडे बघायला हवं.

Friday, 29 June 2012

रिंगणचा पहिला कार्यक्रम

रिंगण ने आणखी एक कार्यक्रम आयोजित केलाय. डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत. त्याचं हे निमंत्रण. 
 
थोडी अधिक माहिती 

डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत 

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या वयाची साठ वर्षं नुकतीच २५ जून २०१२ रोजी पूर्ण केली. त्यांच्या या साठीनिमित्त मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी संयुक्तपणे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार १ जुलै रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित केला आहे. 

सर्वजनवादासारखी नवी विचारधारा मांडणारे विचारवंत, तुकाराम दर्शन साठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, लोकमान्य ते महात्मा मधून इतिहासाची बहुविद्याशाखीय माडणी करणारे समतोल इतिहाससंशोधक, पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, श्रीकृष्णाच्या जीवनावर पीएचडी करणारे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, कवी, नाटककार, वक्ते, कीर्तनकार आणि प्रवचनकार डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी विविध अंगांनी आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी मोरे सरांच्या साठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!


मी परवाच काही मित्रांना पाठवलेला मेल इथे देतोय,

मित्रांनो, दिवाळी अंक निघतात, तसा आषाढीचाही अंक असावा, अशी कल्पना गेली काही वर्षं डोक्यात होती. यावर्षी ती प्रत्यक्षात येतेय. रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार ३० जून रोजी पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय. देशभर फिरून केलेले रिपोर्ताज, मान्यवर अभ्यासकांचं नामदेवांविषयीचं चिंतन आणि भास्कर हांडे या आंतरराष्ट्रीय चित्रकाराने मुखपृष्ठावर साकारलेले अभ्यासपू्र्ण नामदेव, अशी या अंकाची काही वैशिष्ट्य.

सोबत सविस्तर प्रेस नोट, कव्हर आणि लोगो अटॅच केले आहेत. शक्य होत असेल तर कृपया आपल्या वर्तमानपत्रात, टीव्हीत, रेडियोत किंवा वेबसाईटमधे प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती. जेणेकरून अंक लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि आषाढी अंकांची दिवाळी अंकांसारखीच परंपरा निर्माण होईल.

येत्या काही दिवसांतच www.ringan.in या नावाने याची वेबसाईटही येत आहे.

धन्यवाद,
आमच्या या धडपडीत तुम्ही आमच्यासोबत आहातच, या खात्रीसह,

आपला नम्र,

सचिन परब
९९८७०३६८०५

Thursday, 14 June 2012

तुझा माझा तुका


काल सोलापूरहून एक मेल आला होता. राकेश कदम या पत्रकाराचा. बरेच दिवस ब्लॉग नाही. लिहा अशी मागणी होती. तसे मेल किंवा कमेंट गेले काही महिने सुरूच आहेत. बरेच दिवस ब्लॉग लिहिला नाही, अशी आठवण बरेच जण भेटल्यावरही करून देतात. मी ओशाळतो. पण आळस झटकत नाही. लेख लिहिलेलेही असतात ते अपलोड करायचं राहून जातं. आज आळस झटकलाय. तुकाराम सिनेमावरचा लेख अपलोड करतोय.

मला माहीत असलेला तुकोबा दिसायला वेगळाच होता. अंगापिंडानं थोराड. आडदांड. सावळा. गदागदा हसणारा. आडवा तिडवा मनमोकळा. राजा रविवर्मांच्या चित्रात आहे तसा पिळदार मिशांचा. आपला जीतू जोशी अंगापिंडानं वेगळाच. आपला आवडता नट. पण तुकाराम म्हणून नाही पटणारा. विशेषतः गुटखा तोंडात असल्यासारखे गाल आणि हनुवटी. तरीही तुकाराम बघताना जीतू हळूहळू हरवत गेला. तुकाराम म्हणून भेटत गेला. ही ताकद सिनेमाची होती. सिनेमावर लिहिणं हे मला येत नाही. मला ते काही कळतही नाही. आपल्याला काय साला एक डाव धोबीपछाडही आवडतो. तो कुठल्यातरी इंग्रजी आणि मग हिंदी सिनेमाची कॉपी आहे, हे माहीत असूनही आवडतो. त्यामुळे आपण सिनेमावर न लिहिलेलंच बरं. म्हणून सिनेमावर नाही लिहिलंय. सिनेमातून भेटणा-या तुकोबांवर लिहिलंय. तो विषय आणखी कठीण. मला त्यातलंही काही कळत नाही. तरीही लिहिलंय. अगाऊपणा आहेच अंगात. लेख कटपेस्ट करतोय. रविवारी पुरवणीत छापून आला होता. त्यावर दिवसभर फोन खणखणत राहिला.