Thursday 4 November 2010

सचिन मला भेटला

जवळपास वर्षभरापूर्वी लिहिलेला हा लेख. सचिनवरचा. सचिन, आपला सचिन तेंडुलकर.आज कदाचित त्याची टेस्टमधली पन्नास शतकं पूर्ण होतील.  माझ्या अनेक मित्र खटपटी लटपटी करून सचिनला भेटलेत. पण मला नाही वाटलं कधी त्याला भेटावंसं. थोडा प्रयत्न केला असता तर अशक्य नव्हतंच. पण नाही तसं करावंसं वाटलं. 


कारण, माहीत नाय. कदाचित जेव्हा त्याला खेळताना टीवीवर बघितलं की त्याला भेटल्यासारखंच वाटतं. खरंच. त्याच्याविषयी बोलताना. गप्पा मारताना तो भेटत असतो. आतून भेटत असतो. सचिनचे रेकॉर्ड झाले. त्याला पुरस्कार मिळाला की एकमेकांना काँग्रॅट्स करणारी माझी पिढी त्याला स्वतःपेक्षा वेगळं मानतंच नाही. काहीतरी गेल्याजन्माची पुण्याई म्हणूनच सचिन खेळत असताना मी जिवंत आहे, असं वाटणारे माझ्यासारखे कितीतरी. मी नेहमी राजकारणावर लिहिणारा. त्यामुळे सचिनवर लिहिण्याचा फारसा प्रसंग आला नाही. पण एकदा आयपीएल टू मधे मुंबई इंडियन्स हरली तेव्हा सडकून मुंबई टाइम्सची लीड लिहिली होती. पण आयपीएल थ्री मधे त्याने नेहमीप्रमाणे असं लिहिणा-यांचे दात तोडले. आपले दात तुटले याचं खूप बरं वाटलं होतं. कारण आपला सचिननेच तोडले होते ते.  



अनेक वर्षं माझ्या डेस्कटॉपवर सचिनचा एक वॉलपेपर होता, 'स्टोन्स वेअर थ्रोन अॅट मी, आय टर्न देम इन्टू माइलस्टोन्स'. मटामधली नोकरी सोडली होती आणि नोटिस पिरियडमधे असताना हा लेख लिहिला होता. ऑफिसमधे एका दोस्तानं विचारलंही, नक्की सचिन तेंडुलकरविषयीच लिहिलंयस ना, की परबविषयी. 


मी तर सचिन तेंडुलकरविषयीच लिहिलं होतं. हा लेख लिहिताना तो मला भेटला होता. अगदी कडकडून. लेखाचं नाव होतं ग्रँडफादर. हेडिंग दिलं होतं सुनील घुमेनं आणि मस्त ले आऊट केला होता उमेश सुर्वेनं.  


तिकडे अमेरिकेत वादळांना माणसांची नावं देतात. पण परवा गुरुवारी हैदराबादेतही ते घडलं. सचिन रमेश तेंडुलकर नावाचं वादळ होतं ते. वादळाशिवाय त्या खेळीला दुसरं काहीच म्हणता येणार नाही. तो पाठीवर वादळ घेऊन आला होता. अद्भूत चमत्कार घडताना पाहावं, तसं अख्खं क्रिकेटचं जग तोंड आ वासून पाहत होतं. 

अजय जडेजा मध्यंतरी हिंदी न्यूज चॅनल्सवर नेहमी दिसायचा. त्यातल्याच एका चचेर्तलं त्याचं वाक्य डोक्यात फिट्ट बसणारं आहे. सचिन कसा खेळायचा, हे आमची नातवंडं आम्हाला विचारणार नाहीत. ती सांगतील, आम्हाला सचिनबरोबर खेळायचंय. आज सचिनने पहिल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यानंतर जन्मलेली कितीतरी जणं त्याच्यासोबत क्रिकेट खेळत आहेत. त्याचा खेळ बघून बॅट हातात धरलेलेही त्यातले अनेक. म्हणूनच गेल्या आठवड्यात युवराजने सांगितलं की आम्ही सचिनला आजोबा म्हणतो तेव्हा थोडं विचित्र वाटलं, पण धक्का नाही बसला. 

सचिनचा खेळ बघत लहानाच्या मोठ्या झालेल्या पिढीला सचिनची पस्तिशी पार झालीय, हे माहीत असलं, तरी लक्षात राहात नाही. त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलेल्या पिढीसाठी तर सचिन अजून लहानच आहे. त्याच्या चेह-यात, डोळ्यांत, आवाजात प्रचंड निरागसता आहे. निरागसतेच्या जोडीला त्याची नम्रता. त्यामुळे तो जून थोराड झालाय असं कधी वाटत नाही. छत्तीसाव्या वाढदिवशी सचिन म्हणालाही होता की मला मी अजून सोळा वर्षांचा असल्यासारखाच वाटतो. त्यामुळे सचिन मस्करीत का होईना पण आजोबा म्हणण्याइतका वयस्कर झालाय, हे लक्षात ठेवावं लागतं. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सचिनचा पहिला दौरा पाकिस्तानचा. त्यात त्याने अब्दुल कादिरला सांगून सिक्स मारली होती. म्हणून लक्षात राहिलेला. अगदी कोवळा असतानाही दुखापत झालेली असतानाही क्रिझवर ठाम उभा राहिला होता, त्यासाठी लक्षात आहे. तेव्हा कपिल देव त्याला म्हणाला होता, आणखी दहा वर्षं खेळलास तर तू यशस्वी झालास असं समज. सचिन गेली वीस वर्षं खेळतोय. दणक्यात खेळतोय. तो पुढचा वर्ल्ड कप खेळेल यात आतातरी कुणाला शंका उरलेली नाही. वनडेत वीस हजार, कसोटीत पंधरा हजार अशी लक्ष्यं त्याच्या नावावर सांगितली गेली. त्याचा त्याने इन्कार केला. पण ते अशक्य कोटीतलं नाही. पॉंटिंग वगळता कुणी विक्रमांच्या बाबतीत त्याच्या आसपास फिरकतानाही दिसत नाही. तो तरी किती पाठलाग करणार? वादळाचा पाठलाग करायचा तरी कसा? 

क्रिकेटपुरतं बोलायचं तर हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. पण हा दैवी चमत्कार नाही. एका देढफुट्या शरीरातल्या खंबीर मनाचा आणि स्वप्नाळू डोळ्यांनी घडवलाय हा चमत्कार. सचिनमध्ये असामान्य टॅलेण्ट आहेच. नो डाउट! पण असंच असामान्य टॅलेण्ट असणारे इतरही अनेक आहेत. विनोद कांबळीपासून युसूफ पठाणपर्यंत अनेकांत. पण सचिनकडे आणखी काहीतरी प्लस आहे. ते शोधायला हवं. ते अस्सल मराठी मातीतलं आहे. मुंबईच्या मैदानांतून फुलून आलेलं आहे. सचिनच्या एका फॅनने एक वेबसाइट तयार केलीय. त्याचं नाव आहे सचिनिझम डॉट कॉम. साइट यथातथाच आहे. पण हा सचिनिझम काय आहे, ते धुंडाळून बघायला हवं. 

पाकिस्तानातलाच एक किस्सा. नव्वदचं दशक. सचिन नेहमीसारखाच खेळत होता. वसीम अक्रम, वकार युनूस आणि बहुतेक अकिब जावेद जीव तोडून बॉलिंग करत होते. पण सचिनसाठी त्यांच्याकडे तोड नव्हती. अकिबचा एक बॉल त्याने सीमापार तडकावला. अकिबने नेहमीच्या पद्धतीने सचिनकडे खुन्नस देत वाईट शिवी हासडली. भज्जीसारखा कोणी असता तर कानाखालीच वाजवली असती. पण सचिन शांतपणे बावीस यार्ड चालत समोरच्या स्टम्पपर्यंत गेला. अकिबला विचारलं, शिवी देऊन काय मिळालं तुला? अकिबने त्यानंतर मैदानात कधीच शिवी दिली नाही. 

एका मराठी घराचे हे संस्कार आहेत. रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक आणि समीक्षक. कुटुंबाला धरून असावं. निरपेक्ष प्रेम करावं. इतरांचं वाईट करू नये, चिंतूही नये. पुढे जाण्यासाठी इतरांच्या डोक्यावर पाय ठेवू नये. मोठी स्वप्नं बघावीत. प्रामाणिक प्रयत्न असतील तर अशक्य काही नसतं. असेच हे संस्कार आहेत. या वर्षीच आलेलं 'कॉलनी' हे अप्रतिम पुस्तक वाचलं की सचिन कोणत्या वातावरणात वाढला ते सहज कळू शकतं. यातली मोठी स्वप्नं बघायची हिंमत मुंबईच्या हवेने दिलेली. पण मोठी स्वप्नं बघताना पायाखालची जमीन निसटू द्यायची नाही, हीदेखील इथलीच शिकवण. खूप मोठं यश मिळवलं, आणि आपल्यासारखं कुणीच नाही, असं थोडं वाटू लागलं की इथे मुंबईत दुस-याच दिवशी आपल्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं भेटत राहतात. डोक्यातली हवा जाऊन पाय जमिनीला लागतात, नक्की. 

कोणतंही यश मिळवल्यावर तो आकाशात बघतो. तो आस्तिक आहे. सिद्धिविनायकापासून नागपूरच्या टेकडी गणेशापर्यंत तो आवर्जून जातो. पण तो देवभोळा नाही. कारण प्रयत्नांत त्याने कधी कसूर केलेली दिसत नाही. कितीही थकलेला असो, प्रॅक्टिसला कधीही त्याने मागेपुढे पाहिलेलं नाही. त्याच्या इतर कोणत्याही गोष्टीविषयी मतभेद असू शकतात, पण त्याच्या क्रिकेटविषयीच्या समर्पणाविषयी कधीच कुणीही म्हणू शकत नाही. म्हणून मॅचफिक्सिंगचं बालंट कधी त्याच्यावर येऊ शकलं नाही. मॅचफिक्सिंगने क्रिकेटच्या मुळावर घाव घातला. तरीही सर्वसामान्य प्रेक्षक भक्तीभावाने क्रिकेट बघू शकले, त्याला सचिनसारख्यांची क्रिकेटवरची निष्ठा कारण होती. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतातच. बॅड पॅच सचिनलाही होते. पण सचिन त्या सगळ्यांना पुरून उरला. अनेक लोक त्याच्याशी दुष्टाव्याने वागले. त्याची डबल सेंचुरी होत असताना डाव गुंडाळला गेला. अगदी जोशात असताना त्याला खोटं आऊट दिलं गेलं. पण तो हताश झाला नाही. त्याने मार्ग बदलला नाही. कपिलपासून संजय मांजरेकरपर्यंत सगळ्यांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. त्याने त्याच्या बॅटने सगळ्याला उत्तरं दिली. 'स्टोन्स वेअर थ्रोन अॅट मी, आय टर्न देम इन्टू माइलस्टोन्स', हे त्याचं वाक्य शाळाशाळांमध्ये सुविचार म्हणून लिहावं इतक्या मोलाचं. 

संकट आली. तरीही तो धावत राहिला. अस्सल मुंबईकरासारखा. तो जिंकण्यासाठी धावत होता. पण म्हणून प्रत्येक वेळेस तो जिंकला असंच नाही. त्यामुळेच कुणी म्हटलं तो महत्त्वाच्या मॅचमध्ये कच खातो. तो टीमला विजयापर्यंत खेचून नेऊ शकत नाही. तो विक्रमांसाठी खेळतो, टीमसाठी नाही. तो चांगला कॅप्टन असू शकत नाही. ते खरंही असेल. पण त्याचा प्रत्येक लढा हाच त्याचा विजय होता. तो क्रिकेटवर प्रेम करतोय. मनापासून. वय, शरीर कसलाही विचार न करता. प्रत्यक्षात प्रेम करतानाही तो असाच वागला. वयाने मोठ्या असलेल्या गुजराती मुलीवर त्याने प्रेम केलं. लग्न केलं. मुंबईकर वयाचा नाही विचार करत. कारण तो कायम तरुण असतो. 


तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

No comments:

Post a Comment