आज कार्तिकी एकादशी. आजच बकरी ईद. आज आम्ही मी मराठीवर एक स्पेशल केलंय, खुदा पंढरीचा. मुस्लिम मराठी संतकवींची परंपरा टीवीवर दाखवण्याचा एक प्रयत्न केला. थोडं वेगळं डॉक्यमेंटेशन झालंय ते, आजवर न झालेलं. कबीर, श्रीगोंद्याचे शेख महंमद, जैतुनबी, राजूबाबा शेख अशांवर पॅकेज आहेत त्यात. काम करताना मजा आली. एकादशी आणि उपवास साजरा झाला म्हणायचा. आणि ईदही.
यावेळी अनेक नव्या गोष्टी कळल्या. बीड जिल्ह्यातल्या राजूबाबा शेखांविषयी तपशिलात कळलं. परातीच्या काठावर उभं राहून कीर्तन करण्याचं त्यांचं कसब आज दुर्मीळ आहे. आज ही लोककला येणारे ते एकमेव आहेत. आमच्चा बीडच्या स्ट्रिंजरने सध्या नोकरी सोडलीय. म्हणून उस्मानाबादवाल्याचं दामटवलं. त्याने चांगला इंटरव्यू केलाय. पण त्याचं अधिक चांगलं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. त्यांना भेटायला पायजे.
दुसरं कळलं ते कबिरांविषयी. यावेळी पंढरपूरला गेलो होतो तेव्हा कबीरपंथींचा मठ पुन्हा दिसला. पातळ विटांचा हा पडका मठ दत्तघाटावर आहे. दिंडिरवनात लखुबाईला नमस्कार करून प्रदक्षिणा मार्गाकडे येताना वाटेत हा मठ तसा शांतपणे उभा असलेला दिसतो. तिथे आमचे पंढरपूरचे स्ट्रिंजर संतोष कुलकर्णी गेले होते. तिथल्या मठप्रमुखांशी बोलले. ती मुलाखत बघून धक्काच बसला मला. कारण कबिरांचा लाडका मुलगा कमाल यांची समाधी या मठात आहे. कबीर पंढरपुरात आले होते. आणि कबिरांच्या मृत्यूनंतर कमाल वीस वर्षं इथे राहिले. काशीहून त्यांची दिंडीही वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत पंढरपुरात येत असे. असे संदर्भ कळत गेले. कबीर आणि वारक-यांविषयी माहीत होतं. पण हे नवं सुखावणारं होतं. कबिरांवर प्रभाव टाकणारे नामदेव महाराज तेवीस वर्षं पंजाबात राहतात आणि कमाल वीस वर्षं इथे राहतात. ही देवाणघेवाण सातशे वर्षं जुनी आहे. हे सगळं मोहवून टाकणारं नाही का?
जालना जिल्ह्यातल्या शहा मुनींवरही असंच काहीतरी करायचं होतं. पण ते राहून गेलं. शहामुनींचा दर्गा औरंगाबाद बीड हायवेवर आहे. शहा मुनी तर मोठाच अवलिया होता. तो धर्माने मुसलमान. पण गुरुपरंपरेनं आणि पंथाने महानुभाव होता. खरं तर महानुभावांचं वारक-यांशी फारसं पटत नाही. पण हा वारकरीही बनला. विठ्ठलाच्या भक्तीत ओतप्रोत पडून डुंबला. आजही त्याचे वंशज कृष्णाची पूजा करतात. शाकाहारी आहेत आणि महानुभाव गुरूकडून मारग म्हणजे दीक्षा घेतात.
ही सगळी माहिती मिळाली ती रा. चिं. ढेरेंच्या मुस्लिम मराठी संतकवी या पुस्तकातून. जबराट पुस्तक आहे. मी काही ढेरेंना पाहिलेलं नाही. पण पूर्वी ऋषिमुनी असावेत, यावर त्यांचं वाचून विश्वास बसतो. त्यांच्यावर वेबसाईटही आहे. पण इंग्रजीत. अशांची पुस्तकं धन्याचा हा माल म्हणत पीडीएफ करून वेबसाईटवर टाकून द्यायला हवीत. हे पुस्तक मी अनेक दिवस शोधत होतो. पद्मगंधा प्रकाशनच्या जाखडेंनी श्री विठ्ठल एक महासमन्वयची नवी आवृत्ती काढली, हे कळताच आयडियल बुक डेपोला गेलो. पुस्तक बघून गदगद झालं. असं वाटलं होतं की हे आपल्या संग्रही कधीच नसेल. आयडियलचा मालक मंदारशेट नेरुरकर आपला दोस्त. त्याने सांगितलं, असं वाटतंय तर जाखडेंशी बोलून घे. त्यानेच फोन लावून दिला. बोललो. मुस्लिम मराठी संतकवीही काढा, अशी विनंती केली होती तेव्हा. ढेरेंचे तर आहेतच, पण जाखडेंचे खूप उपकार आहेत आपल्यावर. ते ढेरेंची नवी पुस्तकं तर काढत आहेतच. पण जुनीही नव्याने काढताहेत.
वारकरी परंपरेवर, विठुरायावर लिहिताना, काम करताना कायम आपली नाळ जाऊन जुळतेय असं वाटत राहतं. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या विषयावर काही न काही लिहित राहिलोय. आषाढीच्या वेळी जैतुनबी गेल्या. तेव्हा लिहिलेला हा लेख. नवशक्तिमधे समकालीन सदरात छापून आला होता. नेहमीप्रमाणे कॉपीपेस्ट केलाय.
वारी. आळंदी, देहू किंवा अशाच गावांहून पंढरपूरच्या दिशेने जाणारी लाखो लोकांची ही निव्वळ पदयात्रा नाही. हा विठुनामात तल्लीन झालेला जनांच्या प्रवाहाचा निव्वळ भक्तीसोहळाही नाही. वारी ही उभ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा आहे. आज आपल्या महाराष्ट्रात जे काही चांगलं आहे, त्याचं बहुतांश श्रेय या वारीलाच आहे. संतांच्या विचारांना गावागावापर्यंत आणि घराघरापर्यंत नेण्याचं आणि फक्त नेण्याचंच नाही तर विचारांचं शिपंण करण्याचं काम ही वारी गेली शेकडो वर्षं करतेय.
वारी बहुरंगी, बहुढंगी आहे. तेच तिचं वैशिष्ट्य आहे. वारकरी तसा एकजिनसी संप्रदायही नाही. तो हिंदुधर्मासारखाच मोकळाढाकळा आहे. इथे जाती, धर्म, भाषा, प्रांत याचं प्रचंड मोठं वैविध्य आहे. इथे ना इतर संप्रदायांसारखं गुरू घ्यावा लागतो, ना कोणता मंत्र. आपण स्वतःला वारकरी मानली की वारकरी होता येतं. तुम्ही कोणत्या देवाला पुजता हेही कुणी विचारत नाही. म्हणूनच तर दत्तात्रेयांपासून महालक्ष्मीपर्यंत विविध देवस्थानांच्या दिंडी वारीत विठ्ठलभक्तांच्या मांदियाळीत सामावून जातात. पण हेच कशाला, यात अनेक नास्तिकही सामील होतात. इथे प्रत्येकाचा त-हा निरनिराळी. फक्त भजनकीर्तनाची पद्धत वेगळी. तर विचारांची मांडणीही वेगळी. ज्ञानेश्वरीच्या एकाच ओवीचे किंवा गाथेतल्या एखाद्या अभंगाचं निरुपणही वेगवेगळं. माळ आणि एकादशी हे त्यातल्यात्यात एक साधर्म्य शोधलं तर माळ नसलेले लाखो लोक स्वतःला वारकरी मानतात. आणि कितीतरी एकादशीही करत नाहीत, तरीही कुणाची हरकत नसते.
खरं तर मराठी संस्कृतीच्या मातीत राहणारा प्रत्येकजण वारकरी असतोच. इथल्या मातीतल्या संताच्या संस्काराचा प्रभाव कळत नकळत प्रत्येकावर पडत असतो. इथे प्रत्येकजण वारकरी बनतच राहतो. त्यामुळे ज्येष्ठ कीर्तनकार जैतुनबी यांच्यासारखे चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत घडतात. होय जैतुनबींचं आयुष्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. आज त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर अनेक लेख लिहून येत आहेत. आज त्यांच्या कामाचं मोठेपण लोकांपर्यंत पोहोचतंय. पण ना सरकारनं ना महाराष्ट्रातल्या कोणा मोठ्या संस्थेनं जैतुनबींचा सत्कार कधी केला नाही. जैतुनबींना ना कधी पद्मश्री मिळालं, ना महाराष्ट्ररत्न. ना कधी कुणी अशा पुरस्कारांसाठी त्यांचा विचार केला. पण असे पुरस्कार मिळवणा-यांपेक्षा महाराष्ट्राच्या मातीची अधिक मशागत जैतुनबींनी केली होती.
बारामतीच्या माळेगावच्या मकबूल गवंड्याची ही मुलगी. त्याच्या सोबतचा गण्या गवंडी हा वारकरी बुवा. भिंत बांधतानही रामकृष्णहरीचा जयघोष करणारा. नेहमी विठ्ठलाच्या प्रेमात दंग राहणारा, नम्र, कुणाला न दुखावणारा, प्रेमळ. त्याची साधना एवढी मोठी की तोच गण्या हनुमानदास महाराज बनतो. लहानगी जैतुनही गण्याकाकाच्या भक्तीने भारावते. ती हनुमानदास महाराजांची शिष्याच बनते. विठ्ठलभक्तीत, संतविचारांत तल्लीन होते. शुद्ध वाणी, स्पष्ट विचार आणि गोड गळा कमावते. गावोगाव कीर्तन करते. सद्विचारांचं सिंचन महाराष्ट्रभर करते. देशाची सेवा म्हणजेच देवाची सेवा, असं म्हणत बेचाळीसच्या लढ्यातही उतरते. कधी भाई माधवराव बागलांच्या सोबत कधी क्रांतिसिंह नाना पाटलांसोबत पोवाडे गात पत्रिसरकारचा बाणा गावोगाव पोहोचवते. गांधीजीही तिच्या पाठीवर शाबासकी देतात. ती वारीत येते ती गांधीबाबाचा फोटो खांद्यावर लटकावूनच.
जैतुन हरिनामात रंगली म्हणून मुसलमान तिला त्रास देतात. पण तिचे पाच वेळचा नमाज आणि रोजे काही सुटत नाहीत. कीर्तन आणि नमाज, रोजे आणि एकादशी हे तिच्यासाठी अद्वैतच असतं. गावोगाव कीर्तन करताना ती वारक-यांची लाडकी आक्का बनते. जैतुनची आता जैतुनबी बनते. पाचवी शिकलेल्या जैतुनबींची तत्त्वज्ञानावरची पकड इतकी जोरदार असते की रोजच्या जगण्यातली ‘अप्लाइड फिलॉसॉफी’ त्या खूप सुंदर समजावून सांगू शकते. म्हणूनच तर वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी त्यांच्या नेतृत्वात एक दिंडी बनते. बावीसाव्या वर्षी आयआयटीत प्राध्यापक बनणा-या तथागत अवतार तुलसीची सध्या चर्चा सुरू आहे. तितकं कठीण काम असतं ते. हा चमत्कार नाही तर आणखी काय?
न चुकता बासष्ट वर्षं वारी केली. पण त्या कुणी सेलिब्रेटी बनल्या नाहीत. आपल्या दिंडीतल्या वारक-यांसाठी जेवण बनवण्यासाठीही त्या धडपडत असत. शेवटपर्यंत एका संतांचं आयुष्य त्या जगल्या. वारी सुरू असताना देवासाठी चालत असताना मृत्यू येण्याचं ख-या वैष्णवाचं स्वप्न त्यांच्याबाबतीत पूर्ण झालं. त्यांना हवं होतं तसं मरण आलं, यातच त्यांचा अध्यात्मिक अधिकार दिसून येतो.
जैतुनबी वारकरी परंपरेच्या व्यापक, सर्वसमावेशक प्रतीक बनल्या होत्या. हे वारकरी संप्रदायाचं सर्वसमावेशक रुप ही त्याची ताकद आहे. इस्लाम धर्मालाही त्याने आपलं म्हटलं. आजही अनेक दिंड्यांमधे मुस्लिम वारकरी आपल्याला भेटू शकतात. त्यांचं प्रमाण वेगाने कमी होतंय, हेही खरंच. पण आजही धर्माने मुस्लिम असूनही पिढ्यानपिढ्या वारी करणारी अनेक कुटुंब महाराष्ट्रात आहेत. यामागे संतांच्या विचारांची पुण्याईच आहे. त्यात अनेक मुस्लिम मराठी संतकवींचंही योगदान आहे. शेख महंमद श्रीगोंदेकरांना तर वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्यासारखं पहिल्या फळीतलं मानलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या नावावर असलेल्या अभंगातही शेख महंमदांचा उल्लेख आहे. समर्थ रामदासांनीही त्यांची आरती लिहिलीय.
शेख महंमदांचे गुरू चांद बोधले हे तर एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामींचे गुरू. ते संस्कारांनी हिंदू तर गुरुपरंपरेने सुफी होते. चातुर्मासात आवर्जून वाचला जाणा-या सिद्धांतबोध हा शहा मुनी नावाच्या मुस्लिम संतकवीने लिहिलाय हे फार कमीजणांना ठाऊक असेल. तर बहमनी बादशाही सोडून संत झालेले शहा मुंतोजी ब्रह्मणी म्हणजेच कल्याणीचे मृत्युंजयस्वामी, गीतेवर सोप्या मराठीत अप्रतिम टीका लिहिणारे अंबर हुसेनी, वडवाळसिद्ध नागनाथांचे शिष्य अलमखान, दासपंचायतनातील केशवस्वामींचे शिष्य बाजीद पठाण, शहाबेग आणि शकरगंज, तसेच जंगली फकीर सय्यद हुसेन, मंगळवेढ्याचे लतीफ शाह असे अनेक मुस्लिम संतकवी महाराष्ट्रात होऊन गेलेत. त्यांनी मराठीत काव्यरचना केलीय. ती रचना हिंदू संतकवींच्याच तोडीची आहे.
हे का घडतं, याचं वेगळं विश्लेषण व्हायला हवं. तिथे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधे बसून फोटोग्राफी आणि पुष्पवृष्टी करत आहेत. ते त्यांचा छंद पूर्ण करत असतील, आनंद आहे. पण खाली उतरून वारक-यांबरोबर चार पावलं चालून महाराष्ट्राची माती त्यांनी जाणून घेण्याची जास्त गरज आहे. पण राजकारण्यांना हे सांगणार कोण ?
तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.
No comments:
Post a Comment