Monday, 29 November 2010

बंड पस्तिशीचं, जगन रेड्डीचंही !

आज जगन रेड्डीनं बंड केलं. त्याची एकूण स्टाईल बघितली की आपल्याला राज ठाकरेंच्या बंडाची आठवण होते. पण जगनचं बंड खूप मोठं आहे. वीस ते पंचवीस खासदार आजच त्याच्या खिशात आहे, असं म्हणतात. राज एकही खासदार निवडून आणू शकलेले नाहीत. पण त्यांच्यात एक महत्त्वाचं साम्य आहे, ते दोघांचंही वय ३८ आहे. फक्त हे दोघेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अगदी महात्मा गांधीही... यांच्यात हाच एक समान दुवा आहे. पस्तिशीचा. ही यादी यशवंतरावांपासून कांशीरामांपर्यंत कितीही लांब खेचता येईल. या प्रत्येकाच्या बंडाची जातकुळी निराळी. त्यांच्यातला समान दुवा त्यांनी ज्या वयात बंड केलं त्याचाही आहे. ३५ ते ४० हे वय बंडखोरीचं, स्थित्यंतराचं. किमान भारतीय राजकारणात तरी ते वारंवार सिद्ध झालंय. राजच्या बंडाच्या वेळेस म्हणजे डिसेंबर २००५ ला मी लिहिलेला हा लेख. बंड पस्तिशीचं.


' मी आजपासून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे'. टाळ्यांचा कडकडाट. पाठोपाठ सहा ते सात हजार हात वर होतात. जोरदार घोषणा, 'जब तक आखरी सास है, हम तुम्हारे साथ है.' घोषणा देणाऱ्यांचं वय कसंबसं विशी-तिशीचं. त्यांचा स्टेजवरचा बंडखोर नेता ३८ वर्षांचा. राज ठाकरे. 

***

पोटभर पगार आणि कलेच्या आनंदात रमायचं सोडून एक कार्टूनिस्ट 'मार्मिक' काढतो. मराठी व्यथांना तोंड फोडतो. शिवाजी पार्कवर सभा होते. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी भांडणारी सेना उभी ठाकते. मुंबईतल्या प्रस्थापित सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेविरुद्ध ते बंड असतं. सेनापतीचं वय ३९ वर्षं. बाळ ठाकरे. 

***

महाराष्ट्र राज्य झाल्यानंतरचं ते सर्वात मोठं राजकीय बंड होतं. साल 1978. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. सगळ्यांचीच राजकीय कोंडी. 'हे राज्य बुडालेच पाहिजे, ही श्रींची इच्छा',  हा मानसपित्याचा आदेश समजून बंड होतं. सरकार बुडतं. समांतर काँग्रेस, पुलोद सरकार. ज्येष्ठांच्या मंत्रिमंडळाचा तरुण मुख्यमंत्री. वय ३८. शरद पवार. 

***

निव्वळ ज्ञानाची आस बाळगणारा तो तपस्वी होता. केवळ या तपस्येसाठी इतिहासात त्याची नोंद सुवर्णाक्षराने झाली असती. पण हजारो वर्षांचं दास्य त्याला झुगारून द्यायचं होतं. महाडच्या चवदार तळ्याच्या आगीत ते दास्य जळायला सुरुवात झाली. पाण्यात क्रांतीची आग लावणाऱ्याचं वय होतं ३८ वर्षं. डॉ. भीमराव आंबेडकर. 

***

अन्याय सहन करून आपण आत्म्याशी गद्दारी करतोय, याची जाणीव कुणालाच नव्हती. फर्स्ट क्लासच्या बाहेर हाकलणं, हे फक्त निमित्त होतं. लढा तर सत्यासाठी होता. दक्षिण आफ्रिकेत एका बनियाचा महात्मा बनत होता. सत्याग्रहाचं हत्यार गवसलं, तेव्हा त्याचं वय अवघं ३५ होतं. मोहनदास करमचंद गांधी. 

***

राज ठाकरेंचं बंड कितीही यशस्वी ठरलं,  तरी त्या बंडाला गांधीजी-आंबेडकरांच्या लढ्याच्या पायपोसालाही उभं करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. इथे या बंडांच्या तुलनेचा मुद्दा नाहीच मुळी. इथे घेणं आहे, ते फक्त बंड करणाऱ्यांच्या वयाशी. 'पस्तिशी'शी. सोळावं वरीस धोक्याचं, टीनेज, गद्धेपंचविशी, चाळीशी, साठी यांचं आजवर पोटभर कौतुक झालं. पण पस्तिशीचं काय? ३५ ते ४० हे वय बंडखोरीचं, स्थित्यंतराचं. किमान भारतीय राजकारणात तरी ते वारंवार सिद्ध झालंय. 

पूर्ण स्वराज्याची बाजू घेणारी जवाहरलाल ३९ वर्षांचे होते. पक्षसंघटनेत वजन वाढवत इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष बनण्याच्या वाटेवर होत्या, तेव्हा पस्तिशीतच होत्या. राजीव गांधी पहिल्यांदा खासदार झाले, तेव्हा ३८ वर्षांचे होते. पंतप्रधानपदाचा नवा दावेदार राहुल गांधी, त्याने नुकताच पस्तिशीत प्रवेश केलाय. 

लोकदलाच्या उत्तर प्रदेशातील सर्व चाव्या हाती घेऊन मुलायम सिंग सहकारमंत्री बनले तेव्हा ३८ वर्षांचे होते. पस्तिशीतच काशीरामदेखील 'बामसेफ'च्या बांधणीत गुंतले होते. कर्पूरी ठाकूरांच्या निधनामुळे बिहारमधल्या पिछड्यांचं नेतृत्व वयाच्या ३९ व्या वर्षी लालूप्रसाद यादव यांच्याकडे आलं होतं. युनोतली अर्थतज्ज्ञाची नोकरी सोडून शेती करण्यासाठी शरद जोशी ऐन पस्तिशीतच पुण्याच्या अंगारमळ्यात पोहोचले. मेहबूबा मुफ्तींपासून जयललितांपर्यंत आणि ममता बॅनर्जींपासून नरेंद मोदींपर्यंत ब-याच राजकारण्यांच्या जीवनात पस्तिशीचा काळ नवनव्या स्थित्यंतरांचा असल्याचं आढळून येतं. हा केवळ एक योगायोग असणं शक्य नाही. 

' पस्तिशी हे झेप घेण्याचं वय. हे मध्यम वय. माणूस या वयात तसा स्थिर झालेला असतो. त्यामुळे करिअरला नवी दिशा देणं, ही त्याच्या मनाची गरज असते. फक्त राजकारणातच नाही सर्वच करिअर ओरिएंटेड लोकांना आपल्या क्षेत्रात सत्ता हवी असते. त्यातून ही बंडं होतात', मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी सांगतात. पस्तिशीपर्यंत आपापल्या क्षेत्रात चांगला अनुभव मिळालेला असतो. खाचाखोचा समजलेल्या असतात. प्रगल्भता आलेली असते. कुटुंबही स्थिरस्थावर झालेलं असतं. मुलं शाळेत जात असतात. कमाई सुरू होऊन पंधराएक वर्षं झालेली असतात. म्हणजे आर्थिदृष्ट्याही स्थैर्य असतं. अन् म्हातारपण अजून लांब असतं. पन्नाशीनंतर उतरण सुरू होईल, असं मानून आयुष्याची १५-२० उमेदीची वर्षं उरलीत, असं पस्तिशीचा माणूस मानत असते. आता नवी उडी घ्यायची असते. 

समाजानेही पस्तिशीला कर्तेपण सिद्ध करण्याचं वय मानलं आहे. अगदी आश्रमव्यवस्थेतल्या गृहस्थाश्रमापासून. सामाजिक मानसशास्त्र म्हणतं की या वयात प्रत्येकाचे आपापल्या कुवतीविषयीचे समज-गैरसमज पक्के झालेले असतात. आपण नवनिर्मिती करू शकतो किंवा आहे ती व्यवस्था उधळू शकतो, असं त्याला वाटत असतं. त्याच वेळेस त्याला असंही वाटत असतं की आपल्यावर अन्याय झाला आहे. आणि कितीही कर्तृत्व गाजवलं असलं, तरी त्याला असं वाटतं की आपण अजून काही केलेलंच नाही. अर्थात, पस्तिशीत किंवा चाळिशीच्या आरंभी अशी संधी मिळाली नाही तर या साऱ्या उर्मी गळून जातात. नव्या कॉपोर्रेट कल्चरमध्येही मिडल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश करण्याचं हे वय मानलं जातं. त्यामुळे तिथेही संघर्ष असतात. 

हे वयच असं असतं! प्रत्येक बंड नवं सर्जन घडवत असतं. प्रस्थापित संतुलनाला धक्का देऊन नव्या वाटा बनत जातात. पण हे घडतं, संधी मिळते तेव्हा. पण साठीच काय, अगदी सत्तरी ओलांडलेले नेतेही अजून येथे खुर्च्या सोडायला तयार नसतात आणि भारतीय राजकारणातला पस्तिशीच्या उंबरठ्यावरचा सर्वसामान्य पुढारी कसाबसा जिल्हा किंवा प्रदेश पातळीवर रडतखडत असतो. 

तरीही त्यामुळे 'पस्तिशी'चं महत्व कमी होत नाही. किंबहुना हेच वय प्रस्थापितांना धक्के देऊ शकतं! 

तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

1 comment:

  1. अप्रतीम लेख आहे आणि उत्तम अवलोकन आहे. फक्त राजकारणात नाही तर कलेच्या क्षेत्रातही तुमची निरीक्षणं लागू होतात. मजा आली हा लेख वाचून.

    ReplyDelete