Wednesday, 17 November 2010

गांधींजींना तुकोबाराया भेटले होते

आज कार्तिकी. एक जैतुनबीवरचा लेख टाकलाय. हा आणखी एक लेख. मटाने ३० जानेवारी २००९ ला एडिट पेजवर छापला होता. या गांधी पुण्यतिथीनंतर दुस-याच दिवशी तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती होती. गांधी आणि तुकारामांचं अद्वैत मला सर्वात आधी अनुभवायला मिळालं ते तुकाराम डॉट कॉम मुळे. मला वाटतं २००८च्या आषाढीत मी त्यावरूनच वारीच्या काळात गांधीजींचा तुकाराम ही सोळा लेखांची लेखमाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर लिहिली होती. 



तुकाराम डॉट कॉ़मचे दिलीप धोंडे हा खूप मोठा माणूस आहे. त्यांच्या तपस्येमुळेच ही साईट उत्तम सुरू आहे. एक ध्यास घेतलेला माणूस काय चमत्कार करू शकतो हे ही वेबसाईट पाहिल्यावर कळू शकतं. इथे आज तुकाराम आपल्याला बावीस भाषांत पाहायला मिळतो. त्यांनी तुकारामांवरचे निवडक लेख यात घेतले आहेत. मला अभिमान वाटतो, की त्यात माझीही लेखमाला आहे. सदानंद मोरे, दि. पु. चित्रे, पु. य. देशपांडे, बाबासाहेब परांजपे अशांच्याबरोबर माझं नाव आहे. मी तो मला मिळालेला मोठा पुरस्कार मानतो. 


पुढे यावर थोडं आणखी जाणून घ्यायचं होतं. धोंडेंच्याच सांगण्यावरून सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन वाचलं. अंधारात लख्ख प्रकाश दिसावा तसं झालं. माहीत नसलेले संदर्भ तर पानांपानांवरच होतेच. पण एक जगण्याकडे पाहण्याची दृष्टीही होती. आता हे पुस्तक पुन्हा एकदा वाचायला हवंय. गाथाही नीट वाचायचीय. एक दशांश टक्काही ती कळलेली नाहीय. आणि पुन्हा एकदा गांधीजींचा तुकाराम लिहायचाय. 


वसंत पुरके शिक्षणमंत्री असताना तुकाराम दर्शनची स्वस्त आवृत्ती काढणार होते. आता ते पुन्हा मंत्री बनोत आणि त्यांची इच्छा पूर्ण होवो, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. फक्त जाता जाता एवढंच. या लेखावर तीन प्रतिक्रिया आल्या होत्या. तिन्ही गांधीजींना शिव्या घालणा-या. वाचायला हव्यात त्याही. त्यासाठी इथे क्लिक करा


अमेरिकचे नवे अध्यक्ष बराक ओबामांच्या जुन्या ऑफिसात गांधीजींचा फोटो होता. तो आताही असेल, तर माहित नाही. पण तर त्यांच्या शिकवणीचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचं ते कायम सांगतात. इसायलच्या दहशतवादाला दहशतवादाने उत्तर देऊन थकलेले पॅलेस्टीनचे लोक मुबारक अवाद यांच्या नेतृत्वात गांधीवादाची कास धरण्याची हिंमत करतात. ब्रिटिश लोक त्यांचा लाडका फुटबॉलपटू गॅरी लिनेकरचा पुतळा उभारण्याची मागणी करत आहेत. पण तो मात्र तिथल्या भारतीयांच्या सुरात सूर मिसळून म्हणतोयगांधीजींचा पुतळा उभारा. दलाई लामा असोत की आँग सान स्यू कीसतत पराभव दिसत असूनही अहिंसेच्या मार्गावरचा त्यांचा विश्वास कणभरही कमी झालेला नाही. गेल्या दोनेक महिन्यांतल्याच या बातम्या आहेत. महात्मा गांधींच्या हत्येला पन्नासहून अधिक वर्षे झाली. पण त्यांचा जगभरातला प्रभाव कमी होत नाही. वाढतोच आहे. 

पण गांधीजींवर कोणाचा प्रभाव होतागांधीजींनी सत्याचे प्रयोग करताना स्वत:ला मोहन ते महात्मा असं विकसित केले. त्यात आनौ भद्र: म्हणत गौतम बुद्धांपासून लिओ टॉलस्टॉयपर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टींचे संस्कार स्वत:वर करून घेतले. त्यात एक संस्कार मराठी मातीतलाही होता. आपल्याला फारसा माहीत नसलेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचारांचा संस्कार. 


गांधीजींनी तुकोबारायांचे संस्कार कसे पचवले याचा साक्षीदार आहेगांधीजींनी तुकारामांच्या सोळा अभंगांचा इंग्रजीत केलेला अनुवाद. त्यांनी हा अनुवाद आश्रम भजनावली साठी केला होता. या भाषांतरात साहेबाच्या भाषेचात्या भाषेच्या विदेशी पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा येत नाही आणि तुकोबांचे विचार थेट जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहोचतात. लेखक आणि अनुवादकामधले असे अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळते. दोन सच्च्या वैष्णवांमधले हे अद्वैत. विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलेय. त्यांना जिवे मारण्याच्या यशस्वी अयशस्वी योजना जिथे आखल्या गेल्या त्या पुण्यातल्या येरवडा तुरुंगात बंदी असताना त्यांनी हे लिहिलेय. 

तुकारामांच्या हजारो अभंगांमधून गांधीजींनी अनुवादासाठी अवघ्या सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे. मुळात त्यांनी आश्रम भजनावलीत देशभरातल्या विविध संतांच्या रचना एकत्र केल्या आहेत. त्यातून गांधीवाद उभा केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले वाटतील असेच अभंग यात निवडले आहेत. पण मुळात त्यांना मराठी येत होते काहा प्रश्न येतोच. डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी तुकाराम गाथे चे हिंदी भाषांतर केले होते. गांधीजींनी त्याला छोटी प्रस्तावना लिहिली आहे. मला फारसं मराठी येत नाही तरी तुकाराम मला खूप प्रिय आहेत', असे त्यात आवर्जून लिहिले आहे. मराठी अभंगांचे अर्थ समजून घेताना त्यांना अनेकांची मदत झाली असावी. महादेवभाई देसाई,  स्वामी आनंद,  काका कालेलकर,  विनोबा,  किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सावल्यांना मराठी उत्तम येत होते. त्यातले काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यात त्यांच्या सोबतही होते. त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील. पण या हृदयीचे त्या हृदयी पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवे असते ते अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होतं. 

महाराष्ट्र आणि गुजरातेतली सांस्कृतिक देवाणघेवाण अनेक शतकांची आहे. तुकाराम गांधीजींपर्यंत पोहोचण्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे संत नामदेव. नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी भागवत विचारांची ध्वजा आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचवली होती. त्यांचे बराच काळ गुजरातेत वास्तव्य होते. त्यांनी गुजरातीत अभंगरचनाही केली आहे. त्याचा प्रभाव नरसी मेहतांसहित सर्व वैष्णव संतांवर स्पष्ट दिसून येतो. आणि नरसींचा प्रभाव पारंपरिक वैष्णव संस्कारांत वाढलेल्या गांधीजींवर होता. म्हणूनच तर नरसींच्या वैष्णव जन तो... याच्याशी अपार साम्य असलेल्या जे का रंजले गांजले... चा अनुवाद गांधीजी आवर्जून करतात. 

पापांची वासना नको दांवू डोळा... चे त्यांनी केलेले भाषांतर वाचताना गांधीजींना या अभंगात त्यांची तीन माकडे दिसली असतील असं वाटतं. तेव्हा त्यांच्या अजेंड्यावर वरचे स्थान असणाऱ्या अस्पृश्यता निवारणाशी थेट भिडणारा महाराच्या सिवे कोपे ब्राम्हण तो नव्हे हा अभंगही येथे आहे. वारकरी संप्रदायातील सर्व जातींचा संतमेळ्याचे वर्णन पवित्र ते कूळ... या अभंगात आहे. तशीच समाजातील सर्व घटकांमधील जागृती स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींना अपेक्षित होतीअसे त्याचा अनुवाद वाचताना वाटते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती... आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती...'  हे प्रसिद्ध अभंग यात आहेतच. पण मोक्षालाही नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या तुकोबांच्या रोकड्या तत्त्वज्ञानालाही येथे जागा आहे. तसेच भगवद्भक्ती आणि नाममहात्म्याचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगांनाही. हेचि दान देगा देवा... '  आणि शेवटची विनवणी... '  या चटका लावणाऱ्या अभंगांनाही मानाचे स्थान दिले आहे. 

पण फक्त हे अभंगच नाहीत,  तर गांधीजींवरचा तुकारामांचा प्रभाव सिद्ध करणारे इतरही अनेक दाखले आहेत. त्यांच्या लिखाणात,  वक्तव्यांत तुकारामांचा उल्लेख अनेकदा आलाय. त्यांचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात तुका असा इंग्रजी सर्च दिला की अनेक संदर्भ समोर येतात. एका ठिकाणी महाराष्ट्राचे वर्णन करताना ते म्हणतात , ' जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झालाआधुनिक युगाचे नायक असलेल्या शिवाजी महाराजांची जी भूमी आहेजिथे तुकारामांनी आपले कार्य केले,  ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे.'  आणखी एक महत्त्वाचा संदर्भ वाईच्या एका भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांच्या कठीण वज्रास भेदू ऐसे अशा तत्त्वज्ञानाचा दाखला दिला आहे. 

पुढे दलितांच्या सभेतील एका भाषणाचा संदर्भ येतो. त्यात हिंदूधर्माचे मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर- तुकारामांचा धर्म चिरकाल टिकणार असल्याचे सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेकडे ओढल्या जाणाऱ्या दलितांनी हिंदू धर्म सोडू नयेअशी गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचा संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात तामिळ संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकतेअसे अधोरेखित केले आहे. एका पत्रात ते लिहितात , ' तुकाराम ,ज्ञानेश्वर नानक कबीर हे दैवी अवतार नव्हते का?...  गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामांसारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. 

गांधीजींचे सुहृद गुरुदेव रवींदनाथ टागोरांनाही तुकारामाने मोहिनी घातली होती. ब्राह्मो समाजामुळे टागोरांचा महाराष्ट्राशी संबंध आला होता. त्या ब्राह्मो समाजाचे मराठी रूप असणाऱ्या प्रार्थना समाजाने तुकारामांच्या तत्त्वज्ञानालाच आधार बनवले होते. त्या प्रभावातून गुरुदेवांनीही तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादित केले आहेत. शांतिनिकेतनातल्या कलाभवनचे प्रमुख आणि जागतिक कीर्तीचे चित्रकार नंदलाल बोस यांच्याकडून गांधीजींनी तुकारामांची चित्रे काढून घेतली होती. डॉ. भिंगारेंच्या तुकाराम गाथेच्या हिंदी अनुवादात ही चित्रे छापण्यात आली आहेत. 

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वारकरी विचारांचा वारसा मानणारी महाराष्ट्रातील एक पिढी गांधीजींकडे ओढली गेली. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. साने गुरुजी तुकडोजी महाराज दादा धर्माधिकारी विनोबा भावे ,अच्युतराव पटवर्धन सेनापती बापट ही त्यातली काही महत्त्वाची नावे. या पिढीनेच साने गुरुजींच्या नेतृत्वात विठ्ठलमुक्तीसाठी मंदिरप्रवेशाचे आंदोलन केलं. तुकारामांच्या विठोबाच्या मुक्तीसाठी गांधीजींचे तत्त्वज्ञान धावून आलं. पण मुळात हे तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे होतेच कुठे?

तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

No comments:

Post a Comment