भाऊ पाध्येंचं 'होमसिक ब्रिगेड' वाचलंय का? नसेल तर वाचाच. भाऊने लिहिलेलं कुठेही कसंही मिळालं तर वाचायलाच हवं. कारण त्याच्याएवढ्या ताकदीचा लेखक मराठीत मी तरी दुसरा वाचलेला नाही. होमसिक ब्रिगेडमधे त्याने हुमायू मकब-याचं छान वर्णन केलंय. त्यामुळे मी दिल्लीत असताना तो एक आकर्षणाचा विषय होता. मी ई टीवीतून दीडेक वर्षं दिल्ली प्रतिनिधी होतो. अनेकदा तिथे गेलोय मी. आज ओबामाही गेलेत तिकडे. त्यांच्या भारतभेटीतला तो एकच स्पॉट मला आवडला. बाकी बकवास. म्हणून एक आर्टिकल लिहून टाकलं. नवशक्तित छापून आलं होतं ते.
या वर्षीच्या सुरुवातीपासून माझा कॉलम नवशक्तिमधे नियमित सुरू आहे. नाव आहे समकालीन. दर शनिवारी. येतो. त्यात माझा फोटो असतो. मी अनेकदा ठरवलं त्यातला लेख लगेच ब्लॉगवर टाकुया वगैरे. पण जमलं नाही. पण आज सुरुवात करतोय. हा लेख ओबामांवरचा की राहुल गांधींवरचा मला माहीत नाही.
आता ओबामा मुंबईतून दिल्लीत गेलेत. पण ते मुंबईत असताना हा छापून आला होता. म्हणून मथळा दिला होता, ओबामा मुंबईत आलेत का? बघा वाचून जमलाय का?
ऱाहुल गांधी नियमित ‘सामना’ वाचत असावेत बहुतेक. कारण ते हिंदीत भाषण करताना भारताला हिंदुस्थान असं म्हणतात. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अधिवेशनात त्यांचं भाषण झालं. दोन हिंदुस्थान आहेत, एक गरिबांचा, एक श्रीमंतांचा. काँग्रेसच या दोन हिंदुस्थानांना एकत्र आणू शकते वगैरे. असं बरंच काही राहुल म्हणाले. गेली सहा सात वर्षं भारतभर फिरताना आलेल्या अनुभवांचं सार आपल्या छोट्याशा भाषणात मांडल्याचं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसवाले कोणाचंच भाषण फारसं मनावर घेत नाहीत. त्यामुळे तिथल्या कुणी राहुल गांधींच्या या भाषणाकडे फारसं लक्ष दिलं असेलसं वाटत नाही. पण मीडियानंही छोट्या बातम्या वगळता फारसं महत्त्व दिलं नाही. आलेल्या बातम्यांत हा दोन हिंदुस्थानांचा एकच मुद्दा होता. खरंतर या विषयावर राहुल गांधींवर सडकून टीका व्हायला हवी होती. दोन हिंदुस्थानना एकत्र करण्याची गोष्ट कुणी काँग्रेसवाला करूच कसा शकतो ? कारण सगळ्यात आधी हा प्रश्न यायला हवा, की एका भारतात दोन हिंदुस्थान निर्माण कोणी केले. अर्थातच याला उत्तर आहे, काँग्रेस.
साठपैकी गोळाबेरीज दहा वर्षंच विरोधकांचं राज्य होतं. बाकी काँग्रेसचाच सुखेनैव कारभार सुरू होता. आज दोन हिंदुस्थान निर्माण झाले असतील, तर त्याचं पाप केवळ काँग्रेसच्याच माथी आहे. मग त्यात नेहरूंपासून सोनियांपर्यंत प्रत्येकजण भागीदार आहे. अशावेळेस हे दोन हिंदुस्थान जोडण्याची ताकद काँग्रेसमधेच आहे, असं म्हणणं म्हणजे निव्वळ दुटप्पीपणाच नाही काय? आधी तोडायचं आणि मग जोडायच्या गोष्टी करायच्या, हे आपणच चालवून घेत आलोय. अशा नेत्यांची उलटतपासणी करायची तसदी कोण घेणार? विरोधी पक्षांची धार तर कधीचीच बोथट झालीय. दोन हिंदुस्थान घडवण्याच्या पापात आपणही जबाबदार असल्याची त्यांचीही मानसिकता आहेच. त्यामुळे त्यांचा आवाजच फुटत नाही. फक्त त्यांच्याकडूनच नाही, तर इतर कोणाकडूनही फारशा अपेक्षा ठेवण्याचं आपण सगळ्यांनी कधीच सोडून दिलंय.
एका देशात दोन देश, हा काही राहुल गांधींचा शोध नाही. आपल्याच देशात भारत आणि इंडिया असा संघर्ष आहे, ही भाषा निदान महाराष्ट्राला नवीन नाही. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी महाराष्ट्रातल्या शेतीच्या बांधाबांधावर हा सिद्धांत पोहोचवला. पण हा विचार मूळ त्यांचा नसावा. ‘व्हाय पुअर पीपल स्टे पुअर’ या पुस्तकात मायकेल लिप्टन या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. त्याला आता तेहतीस वर्षं उलटून गेलीत. आणि आता राहुल गांधींचे डोळे उघडलेत.
इंडिया म्हणजे शहरी आणि भारत म्हणजे ग्रामीण असं हे भूगोलाचं वर्गीकरण नाहीय. तर शेतीवर आधारित असलेले लोक म्हणजे भारत आणि बिगरशेती उद्योगांवर ज्यांचा विकास आधारित आहे, ते इंडिया, असा हा अर्थशास्त्रीय पेच आहे. म्हणजे गावात राहणारा शिक्षक, सरकारी नोकरदार हे इंडियाचा भाग आहेत. तर शेती फायद्याची ठरली तर गावी जाण्यासाठी उत्सुक असणारे शहरी झोपडपट्टीवाले यांना भारत मानायला हवंय. राहुल गांधी हे कित्ती हुश्शार आहेत, हे सांगणारे मजकूर सध्या इंग्रजी वर्तमानपत्रांतून सातत्याने छापून येत आहेत. त्यावरून तरी त्यांना हे सगळं माहीत असावं, असा समज करून घ्यायला हरकत नाहीय. पण म्हणून दोन हिंदुस्थान म्हणताना, त्यांचा दृष्टिकोन तसाच असावा, अशी जबरदस्ती करायची गरज नाही. याकडे अनेक वेगवेगळ्या संदर्भात पाहता येऊ शकतं.
भारत आणि इंडिया या नावांमधून व्यक्त होणा-या सांस्कृतिक विरोधाभासाच्या नजरेतूनही याकडे पाहायला हवं. हा दोन संस्कृतींमधलाही संघर्ष आहेच. एक संस्कृती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, दुसरी थेट पाठ करून पश्चिमेकडे. गांधीजी इतर कुणापेक्षाही अधिक भारताचं प्रतिनिधित्व करत होते आणि आहेत. भारत आणि इंडिया त्यांना तोंडपाठ होता. त्याचे बारीक बारीक तपशील त्यांना माहीत होते. आपल्या देशाची मानसिकता त्यांनी समजून घेतली होती. आणि ते भारताच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. त्यांना भारताला भारताच्या नजरेतून पाहिलं. इंडियाच्या नाही. तुमचा जगाला संदेश काय, असं त्यांना एका परदेशी पत्रकारानं विचारलं होतं. त्यावर त्यांचं उत्तर होतं, जगाला सांगा गांधी इंग्रजी विसरलाय. हे उत्तर एका भाषेशी संबंधित नव्हतं. तर एका दृष्टिकोनाशी संबंधित होतं. भारत समजून घ्यायचा असेल तर भारताच्या नजरेतून पाहायला हवं.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतात येत आहेत. नेत्यांच्या, व्यापा-यांच्या भेटीगाठी, करारमदार, पत्रकारपरिषदा, भाषणं असं बरंच काही त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण तेही भारत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मुंबईत एका शाळेत दिवाळी साजरी करणार आहेत. तरुणांना भेटणार आहेत. दिल्लीत एका गावाच्या चावडीलाही भेट देणार आहेत म्हणे. राष्ट्रपती भवनात त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात भारताची झलकही दाखवली जाणार आहे. पण यातून भारत कळणार आहे का? त्यासाठी भारताची नजर हवी. ती ओबामा ज्यांना भेटणार त्यांना आहे का, हा प्रश्न आहे. गांधीजींविषयी अनेक तपशील माहीत असणा-या ओबामांनी गांधीजींची भारतीय नजर कमवण्याची तयारी ठेवली आहे का? सध्या तरी त्याचं उत्तर नाही असंच दिसतंय.
मुंबईतले त्यांचे कार्यक्रम पाहिले तरी हे स्पष्ट होऊ शकतं. ते ताज हॉटेलात राहायला आहेत. तिथून टाऊन हॉल, कुलाब्यातलं हायस्कूल आणि झेवियर्स कॉलेज याच्या पलीकडे ते काही जाणार नाहीत. ही भेट मुंबईची आहे का? दक्षिण मुंबईतच्या एका कोप-याच्या पलीकडे ते कुठेही फिरकणार नाहीत. आणि ही मुंबईही नाही. असलीच तर बॉम्बे आहे. जसं भारत आणि इंडिया आहे. तसंच मुंबई आणि बॉम्बेही आहे. हा फरक भाषेचा नाही, अधिक खोलात सांस्कृतिक आहे. मुंबई रोजच्या धावपळीत आपल्या पाळंमुळांना घट्ट धरून ठेवण्यासाठी धडपडते. बॉम्बेला तिच्या रूट्सशी काही घेणंदेणं नसतं. असलंच तर बेगडी हेरिटेज कन्जर्वेशनच्या पलीकडे फारसं नाही. साहेबाच्या काळापासून ही बॉम्बे साहेबी थाटातच वावरत आलीय. मुंबईला क्षुल्लक आणि लो स्टँडर्ड मानून चाललीय. ओबामांना दिसणार आहे ती बॉम्बेच, मुंबई नाहीच.
ओबामा मुंबईच्या तरुणांना भेटण्यासाठी झेवियर्स कॉलेजात जात आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंचा नातू झेवियर्स कॉलेजमधे शिकतो. पण म्हणून झेवियर्स हे काही मुंबईच्या तरुणांचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. डोकं, कान आणि डोळे न्यू यॉर्क आणि पॅरिसकडे लावणारी ही पिढी मुंबईची नाही. त्यांचं ग्लोबल म्हणून कौतूक करायला काही हरकत नाही. पण अशाच ग्लोबल तरुणांना भेटण्यासाठी न्यू यॉर्क ओस पडलंय का? मातीत पाय गाडून उभा असलेला मुंबईचा तरुण तिथे हायफाय गर्दीत कसा भेटणार. उद्याची मुंबई आणि उद्याचा भारत हाच तरुण घडवणार आहे. हेच खरं आहे, कारण कालची आणि आजची मुंबई आणि भारत त्यानेच घडवला आहे. सर्वसामान्य माणसंच इतिहास घडवत असतात. देश समजून घ्यायचा असेल. तर तिथले अभिजन हा तर चमकणारा मुखवटा असतो. खरा चेहरा असतो तो सर्वसामान्यांचाच. तेच कुलाब्याच्या होली नेम स्कूलमधे. जिथे खरंच दिवाळी दरवर्षी साजरी होते, अशा शाळेत खरी दिवाळी मिळणार होती. ताज आणि ओबेरॉय हॉटेलात ते मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. पण त्याची खरी जागा छत्रपती शिवाजी टर्मिनसच होतं.
आतापर्यंत अमेरिकेचे अनेक अध्यक्ष मुंबईत आले आणि गेले. ते बॉम्बेतच घुटमळत राहिले. पण त्यांच्याकडून अशा काही अपेक्षाही नव्हत्या. पण ओबामा वेगळे आहेत. ते ख-या अमेरिकेचे, सर्वसामान्य अमेरिकनांचे प्रतिनिधी आहेत. ते इथे आलेत तर त्यांनी ख-या भारतीयांना भेटायला हवं होतं. खरी मुंबई आणि खरा भारत अनुभवायला हवा होता.
ठीकाय, ते निदान मणिभवनमधल्या म्युझियमच्या गांधीजींना भेटायला जाताहेत, यावर समाधान मानून घेऊया.
No comments:
Post a Comment