Thursday, 4 November 2010

भय्येः मुंबईतले आणि ऑस्ट्रेलियातले

नम्रता रंधवा म्हणजेच निकी हॅले. त्या साऊथ कॅरोलिना नावाच्या अमेरिकेतल्या प्रांताच्या गवर्नर बनल्या. आपल्याला आनंद झाला. एक भारतीय मुळाची बाई अमेरिकेत एवढ्या मोठ्या पदावर निवडून आली. मग संजय निरुपम खासदार झाल्याचं आपल्याला दुःख का होतं? लंडनमधले भारतीय इंग्लंड आणि भारताच्या क्रिकेट मॅच मधे तिरंगा कसा फडकवतात, मला कधीच कळलं नाही.

महाराष्ट्र टाइम्सच्या इंटरनेट आवृत्तीचा प्रमुख असताना मला असेच प्रश्न अनेकदा पडले. माझ्या साइटचा चाळीस टक्के वाचक हा एनआरआय़ होता. त्यांच्याशी मेलवरून आणि एरव्हीही संपर्क होत असायचा. त्यांना काय वाचायला आवडतं हे कळत होतं. आपण इथली मराठी माणसं आजकाल गोंधळलेली आहोतच. पण तिथली मराठी माणसं आपल्यापेक्षाही कितीतरी गोंधळलेली आहेत, असं मला वाटलं. मी राज ठाकरेंच्या विरोधात जेव्हा कधी लिहिलं, तेव्हा मला तिथल्या भारतीयांनी खूप शिव्या दिल्या. अगदी आईबहिणीवरूनही. 


पुढे मुंबई टाइम्सचा प्रमुख असताना माझ्या विंडो सीट कॉलममधे मी लेख लिहिला, भय्येः मुंबईचे आणि मेलबर्नचे. त्यावर नेटवर भयानक प्रतिक्रिया आल्या. सत्तरच्या वर प्रतिक्रिया आजही वाचता येऊ शकतात. लेख वाचलात तर या प्रतिक्रियाही वाचाच. 


'भय्यांना सभ्यता माहीत नाही. विधिनिषेध नाही. कसेही वागतात. कुणाला त्रास होईल, याचा विचार करत नाहीत. घाणेरडे राहतात. पान खाऊन थुंकतात.'
'एकाएका खोलीत दहा दहा भय्ये राहतात. एकजण आला की त्याच्यामागून पन्नास माणसं आलीच समजा.' 
'ते' कमी पगारावर काम करायला तयार असतात. काम करतात तिथेच राहतात. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. यांच्यामुळे मालकांचं फावतं आणि इतरांना हक्काचे फायदे मिळत नाहीत.' 
'भय्ये एकटे असतात तेव्हा गरीबासारखे वागतात. चार जण एकत्र आले की दादागिरी सुरू. पूवीर् ते आपल्या बायकांना 'बहनजी' म्हणायचे. माजलेत ते, आता 'भाभीजी' म्हणतात. सगळे वाईट धंदे करण्यात पुढे. अनधिकृत धंदे, अनधिकृत झोपड्या, गुंडगिरी सगळ्यात तेच.' 
'ते पैसे इकडे कमावतात. पण पाठवतात युपीत. तिथे माड्या बांधतात. इथल्या पैशावर युपी बिहारला पोसतात. इतकी वर्ष महाराष्ट्रात राहतात. पण मराठी बोलत नाहीत. उलट आपलीच माणसं त्यांच्याशी हिंदीतून बोलतात, 'भय्याजी, बटाटा कितने को दिया.' 
'भय्यांनी इथल्या संस्कृतीवर हल्ला केलाय. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन साजरा करतात. छठपूजा करतात. ते शक्तिप्रदर्शनच असतं. वर सरकारही त्यांच्याच बाजूचं.' 
'त्यांनी आपली व्होटबँक बनवलीय. इथे आपले नगरसेवक, आमदार बनवतात. निरुपम खासदार बनलेच आहेत. आता काय कृपाशंकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतील!' 
भय्ये म्हटले की आपण सगळे असंच काहीकाही म्हणतो. म्हणून राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पोरांनी टॅक्स्या फोडल्या. एकेकाला पकडून पकडून मारलं. तेव्हा आपल्याला मनोमन बरं वाटतं. कोणीतरी मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायला हवी होती. म्हणूनच राजचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 


******
गेल्या दहा दिवसांत ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर एकामागून एक हल्ले झाले. गोऱ्यांनी भारतीय मुलांना जीव जाईस्तोवर मारलं. काही आयसीयूत दाखल आहेत. मोठी चर्चा सुरू आहे. विशेषत: इंटरनेटवर दोन्ही बाजूंचं जोरदार लिखाण येतंय. ब्लॉग आणि बातम्या-लेखांवरच्या प्रतिक्रियांमधून सामान्य माणसं मोकळी होताहेत. बरंचसं टोकाचं आहे. क्वचित कुठेतरी संतुलित मतं आहेत. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वेबसाइटवर एका बातमीखाली मेलबर्नच्या हरीश नावाच्या एनआरआयची प्रतिक्रिया त्यातली एक. ती ऑस्ट्रेलियन स्थानिकांचा दृष्टिकोन मानणारी आहे... 

'दोन संस्कृतींमधल्या संघर्षातून हे घडतंय. भारतातल्या अनेक शहरांत आपल्याला रात्री नऊनंतरही धावाधाव करण्याची सवय असते. पण इथे संध्याकाळी सात, उन्हाळ्यात फार तर साडेआठनंतर रस्ते सामसूम होतात. भारतीय विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात, पण अनधिकृत नोक-या करतात. बऱ्याचदा मालक भारतीयच असतात. त्यामुळे कमी मोबदला आणि रात्री उशिरापर्यंत राबणं आलंच. त्यानंतर मध्यरात्री भटकणं चालू असतं. अनेकांना पब कल्चर कूल वाटतं. इथं रात्री गुंडाराज असतं. अशावेळेस रात्री भटकणाऱ्या मुलांना मारहाण झाली नसती, तरच नवल. पोलिसही त्यांना रात्री अपरात्री न फिरण्याचा सल्ला देतात... 


...महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या एका मॅचमध्ये काही भारतीय विद्यार्थी सिडनी स्टेडियममध्येच दारू पित होते. तसं बाकी कुणीच करत नव्हतं. अनेक भारतीय भारतात असल्यासारखंच वागतात. रस्त्यावर कचरा फेकतात. पान खाऊन थुंकतात. जिथे भारतीय बहुसंख्येने राहतात. तिथले रस्ते थुंकल्याने लाल झालेले असतात. मुलींकडे हपापलेल्या नजरेने पाहतात. त्याचा इथल्या लोकांना खूप राग आहे. मी माझ्या मुलीसोबत एका भारतीयबहुल वस्तीत किराणासामान आणण्यासाठी गेलो होतो. ती पुन्हा तिथे जायला तयार नाही. कारण भारतीयांच बघणं तिला सहन होत नाही.' 

हा जो कोण हरीश आहे, त्याचं वाचून आपण मुंबईतल्या भय्याविषयी नाहीतर किमान पुण्यातल्या परप्रांतीय उनाड पोरांविषयी वाचतोय की काय असं वाटतं. असं म्हणणारा हरीश एकटा नाही. ते इतर अनेकांच्या लिखाणातून क्रॉसचेक करता येतं. पण हे सगळं खरं मानलं, तरीही मारायचं कशाला? आपण त्यांचा निषेध करायला हवा. 

*****


आधीचं आपलं भय्यांबद्दलचं मत आणि नंतर ऑस्ट्रेलियनांचं भारतीयांविषयीचं मत. खूप सारखं वाटतं सगळं. मेलबर्नचे भारतीय म्हणजे तिथल्या लोकांसाठी भय्येच. आणि हे आजचं नाही. भारतीय माणसं टोळीनं जिथे गेली, तिथे सगळीकडचे. किमान दीडेक शतकांचा इतिहास आहे त्याचा. स्थानिकांच्या भारतीय उपऱ्यांवर असलेल्या रागासाठी 'इंडोफोबिया' असा शब्द आणि संकल्पना अनेक देशांत स्थिरावलेली आहे. भारतीय म्हणजे त्यात सगळेच आले. आपली मराठी माणसंही. या इंडोफोबियाचा आविष्कार मग कधी अमेरिकेत होतो, कधी ऑस्ट्रेलियात. तेव्हा आपण त्याचा निषेध करतो. पण आपल्या 'भय्योफोबिया'चं काय? 

युरोप अमेरिकेने व्हिसाचं धोरण सैल केलं. आपल्या लोकांना तिथे वसण्याच्या सोयी केल्या. की आपण स्वागत करतो. पण आपल्याला भय्यांना महाराष्ट्रात प्रवेश नको असतो. भारतीयांनी ओबामांच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्याचं आपल्याला कौतुक. पण उत्तर भारतीयांचं लॉबिंग जाचतं. बॉबी जिंदाल सिनेटर बनले की आनंदाला पारावार उरत नाही. पण कृपाशंकर नकोसे होतात. विक्रम पंडित सिटी ग्रुपचे अध्यक्ष झाल्यावर आपण सार्वजनिक सण साजरा करतो. पण मेरिट लिस्टमधे अमराठी टक्का वाढला की दु:ख होतं. आपल्या उद्योगांनी बाहेरच्या कंपन्या गिळंकृत केल्या की आपण टाळ्या वाजवतो. पण कोळ्यांच्या जागी मासे विकणारे भय्ये आपल्याला चालत नाहीत. जगभरची मराठी मंडळं आपल्या अभिमानाची केंद्रं असतात. पण उत्तर भारतीय दिनामुळे आपला स्वाभिमान दुखावतो. मराठी माणूस जातो तिथे गणपती साजरा करतो. पण छटपूजेमुळे आपली संस्कृती धोक्यात येते. वगैरे वगैरे. 

आणि असं वागण्यात आपल्याला काहीच चुकीचं, दुटप्पी वाटत नाही. उलट जगभरातले मराठी बहुसंख्येने राज ठाकरेंच्या वक्तव्यांविषयी पराकोटीचा आनंद व्यक्त करतात. कोणत्याही मराठी वेबसाइटवर हे पाहता येतं. स्वत: उपरेपणाचं दु:ख सहन करणारे 'ब्लडी इंडियन्स' उत्तर भारतीयांना तितक्याच द्वेषाने 'भय्ये' म्हणतात. आता आपल्या कर्तृत्वाला कोणत्याच सीमा उरलेल्या नाहीत आणि आकाशही आपल्या सार्मथ्यासमोर तोकडं ठरू शकतं, हे माहीत असूनही मराठी तरुण हताश होऊन टॅक्स्या फोडण्यासारखी नेभळटाची कामं करतो, हे सगळं कळण्याच्या पलीकडे आहे. 

मुद्दा राज ठाकरे आणि त्यांच्या कथित मराठी बाण्याला समर्थन देण्याचा नाही. कारण तो ज्याच्या त्याच्या विवेकाचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरेंना जन्मभर विरोध करणारे विचारवंत, तशाच गोष्टी अधिक सूडबुद्धीने करणाऱ्या राज यांचा उदो उदो करतात. मग आपण सर्वसामान्य माणसं राज यांच्या मागे गेलो तर आश्चर्य कसलं? पण मग हे लक्षात ठेवायला हवं की ऑस्ट्रेलियात भारतीयांवरच्या हल्ल्याचा निषेध करण्याचा अधिकार आपल्याला उरत नाही. कारण ऑस्ट्रेलियातले वंशवादी निदान दुसऱ्या देशातल्या लोकांना विरोध करत आहेत. इथे आपण ज्यांना मारलं, ती आपल्याच मायभूमीची लेकरं होती.तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

No comments:

Post a comment