Tuesday 4 January 2011

मिलिंद नार्वेकरविषयी

नीलमताई गो-हे आता फार आदर्शवादाच्या चर्चा आणि गप्पा करू शकणार नाहीत. कारण मिलिंद नार्वेकरांचा आदेश. त्यांचं फोनवरचं संभाषण समोर आलं आणि मिलिंद नार्वेकर हे नाव पुन्हा चर्चेत आलं. मिलिंदवरचा एक जुना लेख ब्लॉगवर टाकण्यासाठी हे निमित्त पुरेसं असावं. मुंबई टाइम्समधे असताना सुहास फडके सरांनी मटा ऑनलाईनसाठी खास हा लेख लिहून घेतला होता.

त्या मूळ लेखाचा इण्ट्रो असा होता. प्रत्येक निवडणूक जवळ आली की मिलिंद नार्वेकर या नावाची चर्चा होते. यावेळीही शिवसेनेचे औरंगाबादेतले बंडखोर माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या आरोपांमुळे नार्वेकर गाजले. पण हे नार्वेकर कोण आहेत ? ते मातोश्रीपर्यंत पोहोचले कसे ? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. एका अनिल सावे या अमेरिकेत राहणा-या महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमच्या वाचकानं आपल्या एका बातमीतवरच्या प्रतिक्रियेत हे प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नांचं हे उत्तरं ...


पण या लेखाचं मूळ अधिक जुनं आहे. श्रीदीपलक्ष्मीच्या दिवाळी अंकासाठी मी एक दीर्घ माहितीपर लेख लिहिला होता, कहानी किटली की. चायसे किटली गरम या राजकारणातल्या प्रसिद्ध म्हणीचा संदर्भ यात होता. राजकारण्याच्या पीएंवर त्यात लिहिलं होतं. अगदी गांधीजींचे पीए महादेवभाई देसाई ते प्रमोद महाजनांचे पीए विवेक मोईत्रा असा प्रवास त्यात मांडला होता. त्यात काहीजणांवर सविस्तर लिहिलं होतं. अर्थातच मिलिंद नार्वेकर हे नाव होतंच. तेव्हा त्याला खास मालाडला जाऊन भेटलो होतो. पण त्याने स्वतःविषयी फार न बोलता इतर टंगळमंगळ चर्चाच खूप केल्याचं आठवतं.

मिलिंदचा उल्लेख एकेरी करावा की अनेकवचनी आदरार्थी, हा मोठा प्रश्नच आहे. कारण मिलिंदचा आदरार्थी उल्लेख करणारी माणसं मलातरी अजून भेटलेली नाहीत. अगदी मातोश्री किंवा सेनाभवनावरचे साधे प्यून, टेलिफोन ऑपरेटर ही मिलिंदचा उल्लेख एकेरीच करतात. त्यात मिलिंदलाही काही खटकत नसावं. कारण आदर वगैरे गोष्टींना फारसं महत्त्व नसतं, हे पक्का व्यवहारी असणा-या मिलिंदला फार पूर्वी कळलं असावं. तरीही निदान त्याच्यावर लिहिताना त्याचा उल्लेख शिष्टसंमत पद्धतीने आदरार्थी करायला हवा होता, असं आता मला वाटतंय. पण मूळ लेख लिहिला तेव्हा असं काही वाटलं नव्हतं. इंटरनेट हे माध्यम थोडं अघळपघळ असल्यामुळे हे झालं असावं.

आजच सेनेचा एक नवा पुढारी भेटला होता. या फोन टॅपिंग प्रकऱणानंतर मिलिंदचं काय होणार अशी चिंता त्याला होती. पण मला जितका मिलिंद माहित आहे, त्यावरून मला वाटत नाही, की मिलिंदला याचं काही टेन्शन असेल. त्याच्याविरोधात बातमी लागली की तो पत्रकारांना फोन करून सांगायचा, अरे फोटो जरा मोठा लावायचा होतास. तो या सगळ्याला पुरून उरेल. कधी कुठे काय करायचं याची त्याला नेमकी खबर असते. तो कितीही वरून पडला तरी मांजरासारखे त्याचे पाय छानपैकी जमिनीवरच असतात. कुणी वंदो, कुणी निंदो, मिलिंद हे एक वेगळंच रसायन आहे.

हा लेख मटाच्या वेबसाइटवर छापून आल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर आम्ही भेटलो. मधे आमचं कधी फोनवर बोलणंही नव्हतं. तुम्ही लिहिलेला लेख माझ्या बाबांनी अमेरिकेत वाचला हां. चांगला होता, सांगत होते. माझा वाचायचा राहून गेला, अशी मिलिंदची प्रतिक्रिया होती. त्याने लेख वाचला नसेल, याच्यावर मलातरी विश्वास नाही. कारण त्या भेटीत मिलिंदने मला विचारलं किती मोबाईल बदलतोस, आता कोणता नंबर सेव करू, कोणता डिलिट करू, असं विचारत माझे आतापर्यंतचे सगळे मोबाईल नंबर दाखवले. त्यातले काही नंबर तर मलाही आठवत नव्हते, इतके जुने होते.

मूळ लेख ऑक्टोबर २००९ चा आहे आणि तो असाय. 

रणजीत देसाईंनी श्रीमान योगी लिहायचं ठरवलं तेव्हा प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी त्यांना एक पत्र लिहिले . ते पत्रच श्रीमान योगीची प्रस्तावना म्हणूनही छापले आहे,  त्यात कुरुंदकरांनी देसाईंना औरंगजेब प्रभावीपणे रंगवायला सांगितलाय . कारण जेवढा औरंगजेब मोठा दाखवालतेवढेच शिवाजी मोठे ठरणार आहेत. नारायण राणेंनी हे वाचलेलं नसणार हे निश्चित. पण त्यांच्यातल्या अंगभूत शहाणपणाने त्यांनी याचं मर्म ओळखलं असणार बहुतेक. म्हणून तर त्यांनी शिवसेना सोडताना आपली मोठी प्रतिमा उभी करण्यासाठी आपल्या कहाणीत एक नवा औरंगजेब रंगवला. त्याचं नाव मिलिंद नार्वेकर .

मिलिंदशी राणेंचं काही वैयक्तिक वैर नव्हतंच. तेव्हा उद्धव ठाकरेंचा फोन आला तरी राणे घरी उठून उभे राहायचे. त्याकाळात अनेकदा आपल्या कल्पना उद्धवच्या गळी उतरवताना त्यांनी मिलिंदची मदतही घेतलीय. पण तरीही पक्ष सोडताना त्यांनी बाळासाहेब,  उद्धव, सुभाष देसाई,  मनोहर जोशी यांना थेट टार्गेट करण्याऐवजी केलं ते मिलिंदला. सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारीही मिलिंदला मातोश्री आणि आपल्यामधली धोंडच समजत होता. मिलिंदचा रूबाब , श्रीमंती आणि वेगाने झालेले प्रगती त्यांच्याही डोळ्यात भरत होती. त्यामुळे राणे यांनी आपलं सॉफ्ट टार्गेट ठरवलं. तो मीडियाच्याही ब्लॅक लिस्टमध्येच होता. त्यांनीही त्याला मस्त काळ्या रंगात रंगवला. या सगळ्यामुळे आज कुणाची इच्छा असो अगर नसो,  तो महाराष्ट्राच्या ओळखीचा बनलाय .

मुळात मिलिंद साधा शिवसैनिक होता. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला. म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत,  हुशार,  स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. ते स्वतच तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते. उद्धवनी त्याला विचारलं,  फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद पटकन उत्तरला,  तुम्ही सांगाल ते .

आधी मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचा पीए बनला. अपॉइण्टमेण्ट घेणं,  डायरी ठेवणं,  फोन घेणं,  दौरे आखणं,  व्यवस्था करणं अशी कामं तो करू लागला. पुढे स्मिता आणि राज ठाकरे मातोश्रीतील सत्ताकेंद्राच्या वर्तुळाबाहेर सरकली आणि उद्धवकडे सेनेची अनभिषिक्त सत्ता आली. उद्धव मोठे होत होते आणि मिलिंदही. कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारा, सांगितलेली गोष्ट काहीही करून पूर्ण करून देणारा,  गोड बोलणारा,  प्रसंगी स्वतःकडे वाईटपणा घेणारा,  लोकांना कटवण्यात चतुर असणारा हा पीए उद्धव यांच्या गळ्यातला ताईत बनला. उद्धव बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नव्हते. घरात,  कुटुंबात आणि आपल्या छंदांत रमणारा हा साधा मध्यमवर्गीय डोक्याचा माणूस . त्यामुळे त्यांच्या अपॉइण्टमेण्ट कार्यकर्त्यांनाच काय पण पदाधिकारी आणि पत्रकारांनाही महाग होत्या. त्यामुळ मिलिंदचं महत्त्व वाढत चाललं .

कार्यकारी अध्यक्षांशी अपॉइण्टमेण्ट नक्की कोण टाळतं, स्वतः धाकटेसाहेब की मिलिंद हे भल्याभल्यांना कळत नव्हतं. पण मिलिंदच्या मातोश्रीवरच्या वर्चस्वाची चर्चा सगळ्यांमध्येच होती. पण २००४ च्या निवडणुकांत सत्ता दोन बोटं उरल्यामुळे त्याची जाहीर वाच्यता कुठे होत नव्हती. त्याला तोंड फोडलं आता राज्यमंत्री असणा-या भास्कर जाधवांनी. त्यांना शिवसेनेची उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यांनी बंडखोरी केली. याचं कारण सांगताना त्यांनी आपल्याला मातोश्रीवर मिलिंदने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. तेव्हा पहिल्यांदा मिलिंदचं नाव गाजलं. पण त्या दिवसांत राणे मिलिंदची बाजू घेऊन जाधवांच्या विरोधात प्रचार करत होते. पुढे सत्ता आली नाहीच उलट राणेंच्या बंडाने सगळंच बदललं .

राणेंनी मिलिंदकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप केले. राणेंनी मिलिंदविरोधात केलेली हवा इतकी जबरदस्त होती,  की त्याच्यावरच्या आरोपांची शहानिशा करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. पण यातून मिलिंदच मोठा होत होता. भल्याभल्यांना जेरीस आणणा-या राणेंचेही मिलिंदसमोर काही चालले नाही,  असे चित्र राणेंच्याच प्रचारातून उभे राहिले. राणेंच्या पोटनिवडणुकीत कणकवलीला तिथल्या लोकांनी मिलिंदला पाहण्यासाठी गर्दी केली होती , यातच सगळं आलं. पुढे राज यांनीही मिलिंदला सोडलं नाही. त्यांनी सांगितलेल्या मातोश्रीवरच्या चांडाळचौकटीत दुसरे तीन कोण हे स्पष्ट नव्हतं,  पण त्यातला एक मिलिंद असल्याचं सगळ्यांना माहीत होतं. वर एवढा गहजब झाल्यानंतरही उद्धवच्या दरबारी त्याचं स्थान बळकट होतं आणि आहे .

राज यांच्या बंडानंतर उद्धव बरेच अॅक्सेसेबल झाले. छोटे मेळावे घेत होते. राज्यभर फिरत होते. शिवसेना भवनावर नियमित बसू लागले. मातोश्रीवर पोहोचणं तुलनेनं सोपं झालं. उद्धवपर्यंत पोहोचण्यासाठी अनिल देसाई , विनायक राऊत असे पर्यायही उभे राहिले.. पालिकेतल्या विजयानंतर सेनेविषयी वातारवणही बदललं. त्यात अपक्ष आणि गवळीच्या नगरसेवकांना सेनेपर्यंत आणण्यात मिलिंदने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मिलिंदला विधानपरिषदेवर पाठवायला हवं,  अशी चर्चा त्याच्या हितशत्रूंनी केली. पण या सगळ्यात मिलिंदचं आधीचं प्रस्थ कमी झालं,  पण मातोश्रीवरचं महत्त्व नाही. अजूनही त्याचा मातोश्रीवरचा वावर तसाच आहे. त्याचं उद्धवसोबत दौ-यावर जाणं तसंच आहे . उगाच काहीतरी कारणं सांगून स्टेजवर उद्धवच्या कानाशी लागणंही थांबलेलं नाही

No comments:

Post a Comment