Tuesday 25 January 2011

बच्चू कडूंचं काय चुकलं?

मोठा गॅप झालाय. गेले नऊ दिवस नवा ब्लॉग टाकलेला नाही. थोडा गडबडीत होतो. हा उपास तोडायचा असं रोज ठरवायचो. जुळून येत नव्हतं. आज ठरवलेलंच. गेल्या आठवडयात हा लेख लिहिला होता. नवशक्तित छापूनही आला होता. विषय होता बच्चू कडू. 

मला वाटतं २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी पहिल्यांदा बच्चू कडूंचं नाव ऐकलं. त्याच्या प्रचाराचा धुमाकूळ एवढा होता की इथे मुंबईत त्याचे पडसाद ऐकायला मिळत होते. एखादा अपक्ष उमेदवारासाठी, तेही लोकसभेच्या निवडणुकीत असं घडणं, ही मोठीच गोष्ट. पुढे बच्चूभाऊची भाषणं विधानसभेत ऐकली. तिथे विझलेल्या लोकांच्या गर्दीत आगीची धग लक्ष वेधून घ्यायची.
 


२६/११ नंतर त्यांनी आमदार निवासात आमदारांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. पण फक्त दोनच आमदारांनी रक्तदान केलं. एक बच्चू कडू आणि दोन राजीव राजळे. मी त्यावर मटात असताना बातमी केली होती. अँकर लागली. दुस-या दिवशी त्यावर 'आमदारांचे थंड रक्त' नावाचा अग्रलेखही आला. त्यामुळे त्यादिवशी बच्चू कडू हाऊसमधे येताच आले, गरम रक्ताचे आमदार आले, अशी हेटाळणी केलेली वर प्रेस गॅलरीतून ऐकली होती. यानिमित्ताने बच्चूभाऊशी भेट झाली. पण धावत धावतच कामासाठी असंच अधूनमधून भेटी व्हायच्या. पण कधी फार बोलणं झालं नाही. त्यांच्या आंदोलनांविषयी वाचून होतो. पण इथे मुबईत बच्चू कडूंविषयी फारसं कुणाला माहीत नसायचं. त्यामुळे त्यांच्याविषयी कधीतरी सविस्तर लिहायचं होतं. 

परवा बच्चूभाऊनी एका सरकारी कारकुनाच्या कानाखाली मारलं. शंभरातले नव्वद सरकारी बाबू कानाखाली मारायच्याच लायकीचेच असतात, असा माझा अनुभव. त्यामुळे बरं वाटलं. लेखासाठी त्यांच्याशी फोनवर बोलायचं होतं. पण नंबर नव्हता. मूळ अमरावतीतले पण आता मुंबईत असणारे पत्रकार मित्र पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी त्यांचा नंबर दिला. ब-याच दिवसांनी बच्चूभाऊंचा आवाज ऐकला. लेख थोडा घाईगडबडीत लिहिला होता. पण सॉलिड रिस्पॉन्स आला. पहिल्यांदाच नवशक्तीत लेखाखाली ' ( लेखक मी मराठी चॅनलच्या वृत्तविभागाचे कार्यकारी संपादक आहेत.) ssparab@gmail.com
9004317989'  असं छापलं होतं. 

सतत दोन दिवस फोन सुरू होते. त्यात वाचक तर होतेच. पत्रकार मित्र  होते. मंत्र्यांचे पीए होते.  सगळे पीअर ग्रुपच्या बाहेरची माणसं, म्हणून आनंद अधिक. अगदी आज सकाळीही फोन आला. म्हटलं आता पाणी गळ्याच्यावर  आलंय. लेख ब्लॉगवर टाकायलाच हवा. मूळ लेखात जागेअभावी अनेक तपशील टाकता आले नव्हते. ते आता जोडलेत. त्यासाठी खरेखुरे आयडॉल या पुस्तकातला श्रीपाद अपराजितांचा लेख वाचला. अपराजितांचे लेख आपल्याला एरव्हीही आवडतात. त्यामुळे त्यांच्या लेखातला मजकूर उचलायला बरंच वाटलं. 

सातपुड्याच्या कुशीतलं बहिरम हे विदर्भातलं एक मोठं तीर्थक्षेत्रं. इथला भैरोबा अनेक कुळांचा मूळ देव आणि वरून नवसाला पावणारा. दरवर्षी इथं भैरवनाथाची मोठी यात्रा भरते. लांबून लांबून लोकं येतात. सबंध महाराष्ट्रातले लोक तर येतातच. पण मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातूनही भक्तमंडळी जमा होतात. ही अख्ख्या विदर्भातली एक सर्वात जुनी यात्रा. शिवाय सर्वात दीर्घकाळ म्हणजे जवळपास महिनाभर चालणारी.

पण या सगळ्यापेक्षा ही यात्रा वर्षानुवर्षं ओळखली जायची ती तमाशांमुळं. राज्यभरातले तमाशाचे फड इथे यायचे. महिनाभर नाचगाणी चालायची. पण नाचगाण्याच्या नावाखाली इतर अनेक धंदेच देवाच्या नावाखाली सुरू असायचे. पोरी नाचवण्याबरोबरच जुगार आणि नशापाणी आलंच. इथले तंबू वेश्याव्यवसायाचे अड्डेच बनले होते. अशा नादांना लागून अनेक घरादारांची राखरांगोळी झाली. त्याविरोधात अनेक आंदोलनं झालं. खुद्द गाडगेबाबांनीही याविरोधात रणशिंग फुंकलं होतं. लोकांना चार उपदेशाच्या गोष्टी सांगून त्यांनी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यातल्या गैरप्रकारांना काहीसा आळा बसलाही होता. पण पुन्हा गेल्या काही वर्षांत गैरप्रकारांनी पुन्हा एकदा उसळी मारली होती.

सातआठ वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडूंनी याविरुद्ध दंड थोपटले. वर्षभरातला आमची एकमेव करमणूकही काढून घेता का, असं म्हणत बाप्यांनी विरोधही केला. लोककलेच्या परंपरेची कारण सांगण्यात आली. पुढच्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही मिळाली. पण आमदार काही दबला नाही. आपली सगळी ताकद पणाला लावत कडूंच्या प्रहार संघटनेने इथल्या तमाशाच्या राहुट्या बंद करायला लावल्या. असंतोष असल्याचं वातावरण तयार करण्यात आलं. पण घराघरातल्या स्त्रियांनी आघाडी घेत बच्चूभाऊला अचलपूर मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार बनवलं.

आता गेले काही वर्षं बहिरम यात्रेत प्रहार बहिरम यात्रा महोत्सव साजरा होतो. आजही लावणी तिथे साजरी होते. राज्यभरातून नावाजलेले कलावंत आपली कला सादर करतात. पण तमाशाच्या नावाने होणारे धिंगाणे आता बंद आहेत. तिथे आता बचतगटाच्या महिलांची प्रशिक्षण शिबिरं होतात. शेती आणि पशुपालनासाठी मार्गदर्शन होतं. कधी तिथे शहिद भगतसिंहांचे नातेवाईक तर कधी महात्मा गांधीचं पणतू तुषार गांधी येऊन तरुणांना मार्गदर्शन करतात. तिथे कुस्तीचे फड रंगतात आणि कीर्तनातून समाजप्रबोधनही होतं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिथे मोठ्या रॅली आयोजित केल्या जातात. शासकीय यात्रासारखा अभिनव उपक्रमही तिथे आता यशस्वी होतो. तालुकापातळीवरचे सगळे महत्त्वाचे अधिकारी या यात्रेत काही दिवस हजर राहतात. वीस पंचवीस ट्रक भरून सगळी कागदपत्रं एकत्र होतात. गोरगरिबांच्या गा-हाण्यांवर लगेच कारवाई केली जाते. वर्षानुवर्षं रखडलेली गोरगरिबांची कामं अर्ध्या तासात पूर्ण होतात. एकाच ठिकाणी चौदा खात्यांमधली सात हजार कामं संपवण्याचा विक्रम इथे घडलाय.

शेकडो वर्षं चाललेल्या अशा एखाद्या परंपरेला नवं वळण लावणं सोपं काम नाही. ही त्या ठिकाणासाठी छोटी क्रांतीच असते. सध्या लोकांचं अनुयय करण्यात पुढा-यांपासून पत्रकारांपर्यंत सगळेच गुंतलेले असताना एखादा आमदार अशी लोकप्रिय परंपरा थांबवतो, ही नवलाची आणि कौतुकाची गोष्ट मानायला हवी. आमदार म्हटल्यावर कडक इस्त्रीचे पांढरे कपडे, बोटात अंगठ्या, फिरायला मोठ्या गाड्या असं चित्रं उभं राहतं. पण बच्चू कडूंकडे असं काहीच नाही. हा पुढारी वेगळा आहे, हे भेटणारा कुणीही सांगून जातो. सात वर्षांपूर्वी अमरावती लोकसभा निवडणुकीत रा. सू. गवईंपेक्षाही जास्त मतं घेणारा अपक्ष उमेदवार म्हणून बच्चूभाऊने पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं होतं. इतकं सगळं असलं तरी बच्चू कडू हे नाव पुण्यामुंबईच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत काही केल्या पोहोचत नव्हतं.

आठवीत असताना त्यांनी पहिलं आंदोलन केलं होतं. गाव चांदूरबाजार तालुक्यातलं बेलोरा. मोठ्या खटल्याच्या घरातलं हे उद्योगी बाळ, सर्टिफिकेटांवरचं नाव ओमप्रकाश. पण सगळ्यांचा हा बच्चूच. गावात तमाशा आला होता. गाव त्याच्या नादी लागला होता. बच्चूला हे काही पटत नव्हतं. तो मित्रांना घेऊन अचलपूरला एसडीओंना भेटायला गेला. एसडीओ स्वतः गावात आले आणि तमाशा बंद पडला. गावात कौतूक झालं. स्वभावच चळवळ्या होत्या. कबड्डीपटू असल्यामुळे सोबत मित्रांचा गराडा होताच. तालुक्याच्या गावी दूध टाकायला जावं लागायचं. तिथेही नवा अड्डा बनला. प्रस्थापितांचा विरोध करणारी शिवसेना तेव्हा आपलीशा वाटली होती. बच्चू तिचंही काम करत होता. विद्यार्थी सेनेचा नेता बनून पोरींना छेडणा-या गुंडांना हाणत होता. अशात एका घटनेने आयुष्य बदलून टाकलं.

कबड्डी खेळताना बच्चूचा जानी दोस्त गुणवंत गवतेला अचानक रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. अमरावतीला डॉक्टरने सांगितलं हार्टचा प्रॉब्लेम आहे, मुंबईला जावं लागेल. कबड्डीच्या स्पर्धेत जिंकलेले दोन हजार रुपये घेऊन मित्रं मुंबईला निघाले. आईने एक क्विंटल कापूस विकून पैसे दिले. तिकिटात पैसे खर्च करायचे नव्हते. विदाऊट तिकिट म्हणून सारखं गाडीतून खाली उतरवलं जायचं. त्यामुळे अमरावतीहून मुंबईला पोचायला दोन दिवस लागले. मुंबईत सगळेच पहिल्यांदा आलेले. केईएम शोधून काढलं. दहा हजाराचा खर्च सांगितला. दारोदार फिरून पैसे जमवले. रक्त जमवलं. तेव्हाचे महापौर दिवाकर रावते आणि आमदार विठ्ठल चव्हाण यांनीही मदत केली. मैदानावर झोपून रात्री काढल्या. एक बाटली रक्त कमी पडत होतं. बच्चूभाऊचं वजन पन्नासपेक्षा कमी होतं. रक्तदान करता येत नव्हतं. म्हणून मग खिशात दगड घालून वजनाला उभे राहिले. गुणवंत वाचला. वयाच्या विशीत यायच्या आतच बच्चू गावाचा हिरो बनला होता.

मग रुग्णांची सेवा अशीच सुरू राहिली. बच्चू आणि त्याचे मित्र अडल्यानडल्याला मुंबईला घेऊन जाण्याची सगळी जबाबदारी घेऊ लागले. मोतिबिंदू पासून ब्रेन ट्युमरपर्यंत ऑपरेशन झाली. केईएम, जेजे, सेंट जॉर्ज, कामा, नायर अशी हॉस्पिटल दुसरं घरच बनली. कधी हिंदुजासारखे खासगी हॉस्पिटलवाले नडू लागले तर आंदोलनही केली. प्रहार आरोग्य समिती उभी राहिली. फक्त रुग्णांसाठीच नाही तर मुंबईत आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही आधार दिला. नायरमधे तर आज नातेवाईकांसाठी शिध्याचीही व्यवस्था करून द्यायला सुरुवात झालीय. रक्तदानाचे अनेक विक्रम केलेत. अगदी आमदार निवासातही रक्तदान शिबिर राबवलं. आजवर छोटी मोठी अशी चार हजार ऑपरेशन बच्चू कडूंच्या प्रयत्नांनी झालीत. हा आकडा काही छोटा नाही. असं असलं तरी याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतलेली दिसली नाही.

या समाजकारणाला पुढे राजकारणाची जोड मिळाली. सुरुवातीला शिवसेनेशी असलेला संबंध नंतर संपला होता. कोणाताही राजकीय पक्ष सोबत नाही. स्थानिक आमदार वसुधाताई देशमुख या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री. अशा परिस्थितीत एकदा नाही, तर दोनदा लोकांनी त्यांना आमदार बनवलं. पण आमदार बनवण्याआधी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती बनले. सत्ता आली तरी आंदोलनं बंद पडली नाहीत. अगदी आमदार बनल्यावरही आंदोलनं वेगानं सुरू राहिली. पत्रं पाठवून, निदर्शनं करून किंवा उपोषणं करून प्रश्नाकडे लक्ष वेधलं जात नाही हे लक्षात आल्यावर अभिनव आंदोलनं सुरू केली. सभापती असताना संडास बनवण्यात भ्रष्टाचार झाला होता. त्यासाठी सरकारच्या पंचायत राज समितीला सडलेले संडासाचा पॉट देण्यात मागंपुढं पाहिलं नाही. सरकारी अधिकारी आपल्या खुर्चीवर कधीच नसतात, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव. मग रविवारची सुटी धरून सोमवार, मंगळवारी तर जणू हक्काचीच रजा. मग बच्चूभाऊनी रिकाम्या खुर्च्यांचा लिलाव करायला सुरुवात केली. वर लिलाव करून मिळालेला पैसा सरकारी खजिन्यातही जमा केला. सरकारी अधिका-यांचे धाबे दणाणले. जेवायला जातानाही अधिकारी कधी येणार याचे निरोप शेजारच्या खुर्चीवाल्याकडे द्यायला लागले.

कधी सगळे केस भादरून घेतले. कधी जमिनीत स्वतःला गाडून घेतलं. कधी कांद्याचा वर्षाव केला. कधी तहसील कार्यालयाला टाळं मारून कर्मचा-यांना कोंडलं. आश्वासनं न पाळणा-या मंत्र्यांच्या गाडयांवर काळ्या रंगाचे पट्टे मारले. कधी ऑफिसांमधे साप सोडले. शाळेत न शिकवता खासगी क्लासेसमधेच शिकवणा-या शिक्षकांच्या कानाला धरून ओढणारं च्याऊ माऊ आंदोलन ही कल्पकतेची कमाल होती. पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा इशारा देणारं शोले आंदोलन तर खूपच गाजलं. आर. आर. पाटील, सुनील देशमुख यांना त्यात लक्ष घालावं लागलं. राहुल गांधी विदर्भात येऊन कलावतीला घर बांधून देतात. म्हणून थेट अमेठीत जाऊन तिथल्या एका गरजू बाईला घर बांधून दिलं. नुकतंच अंगात शर्ट न घालता विधानसभेच्या सभागृहात जाऊन लक्ष वेधून घेतलं होतं. हे सगळं असलं तरी पुण्यामुंबईच्या लोकांना बच्चू कडू काय करतात, याचं फारसं घेणंदेणं नव्हतं.

असं करत असताना सामाजिक कामांत खंड पडला नव्हता. आमदारांना गाडीसाठी बिनव्याजी कर्ज मिळतं. त्यांनी गाडी घेतली. विकली आणि त्यातून अम्ब्युलन्स घेतली. एकाच्या चार अम्बुलन्स घेतल्या. न्हाणोरा शिबिर हे आणखी एक वेगळा प्रयोग. गावात घरात दुर्लक्षित असणा-या म्हाता-याकोता-यांसाठी हे शिबिर. यात त्यांना प्रेमानं उटणं सुगंधी तेल लावून आंघोळ घातली जाते. नवा पोषाख दिला जातो. पुरणपोळीचं जेवण देऊन सन्मानानं गाडीत घालून घरी नेऊन सोडलं जातं.

लग्न केलं तेही गांधी जयंतीच्या मुहूर्तावर. होणारा खर्च टाळून दोन हजार अपंगांना मदत केली. गळ्यात हार घातले नाहीत, तर तिरंगा झेंडा एकमेकांना दिला. मंत्र मंगलाष्टक गायली गेली नाहीत. तर वंदे मातरम आणि राष्ट्रगीताच्या सुरावटीत लग्न लागलं. विधानसभेतही अनेकदा चांगली भाषणं केली. विदर्भातले अनेक दुर्लक्षित विषय चव्हाट्यावर आणले. नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा आपल्यासारख्या पुढा-यांनाच गोळ्या घालायला हव्यात, असं थेटे विधानसभेत सांगून सगळ्यांना अचंबित केलं. पण याचा आवाज सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत फारसा कधी पोहोचला नाही.

आणि अचानक बच्चू कडू गेल्या आठवड्यात चर्चेत आले. मुंबईच्या पेपरांनी त्यांचे फोटो लावून पहिल्या पानावर मोठाल्या बातम्या छापल्या. टीव्हीवर तासातासांच्या चर्चा पार पडल्या. घराघरांत त्यांच्या नावाची चर्चा झाली. कारण त्यांनी लाच मागणा-या मंत्रालयातल्या एका कारकुनाला कानखाली लगावली. त्याविरोधात कर्मचा-यांनी आंदोलनही केलं. बच्चू कडूंवर कारवाई करण्याची मागणी झाली. पण कारकुनालाच निलंबित करण्यात आलं. कडूंनी स्वतःसाठी ही मारामारी केली नव्हती. भ्रष्टाचाराच्या विरोधात सापळे रचून, आंदोलनं करून काही फरक पडत नाही, हा त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव होता.  अशावेळेस गेंड्याच्या चामडीच्या सरकारी कर्मचा-यांना कळणा-या भाषेत बच्चू कडूंनी आपलं काम करून घेतलं.

पण प्रश्न हादेखील आहे, की एकटे बच्चू कडू अशा कितीजणांच्या कानफटीत आवाज काढणार? एकटा बच्चू कडू काय काय करणार?

1 comment: