Sunday 30 January 2011

जय शिवभीम!

कुणाही धर्माने हिंदू असलेल्याला विचारावं, तुझा कुणी मुसलमान मित्र आहे का? उत्तर हो येतंच. त्याला पुढे विचारावं, कसा आहे तो? उत्तर येतं, चांगला, मेहनती, विश्वासू, सुसंस्कृत वगैरे. दुसरा कुणी मुसलमान दोस्त आहे का? उत्तर येतं, हो आहे. तोही चांगला असतो. असं आणखी दोन चारदा विचारूनही उत्तर तेच येतं. मग विचारावं, मुसलमान कसे असतात? उत्तर येतं, आक्रमक, विश्वासघातकी, असंस्कृत, वाईट वगैरे
.
तसंच कुणा धर्माने मुसलमान असलेल्याला विचारलं की हिंदूंबद्दल अशीच उत्तरं येतात.



हिंदू मुस्लिम विषयावर चर्चा सुरू असताना, आमचे अमर हबीब नेहमी ही प्रश्नोत्तरं करतात. आपण स्वतःच्या अनुभवावर अवलंबून न राहता एकूण इतर कुणीकुणी बनवलेल्या प्रतिमेवर कसे अवलंबून असतो, ते कळतं यातून. इतिहासाने किंवा राजकारणाने एकमेकांच्या विरुद्ध उभ्या केलेल्या समाजांतलं किल्मिष संपवायचं असेल तर ते एकमेकांच्या जवळ येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

दलित आणि ओबीसींच्या बाबतीतही असा विचार करायला हवाय. खैरलांजीच्या पुढचे मागचे गेल्या वीस वर्षातले दलित अत्याचाराचे प्रकार पाहिले की दलित विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रात उभा असलेला दिसतो. रोजच्या गावगाड्यापासून आणि नेहमीच्या समाजकारण, राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून ब्राम्हण कधीच बाहेर फेकले गेलेत. देशमुखी मराठ्यांचीही स्थिती फारशी वेगळी नाही. त्यामुळे आता दलितांविरुद्ध अत्याचारासाठी दुर्देवाने उभा राहतोय तो गावाचा नवा सुभेदार बनण्याच्या तयारीत असलेला ओबीसी. कथित वरच्या जातीचे त्यांना पुढे करत असतील, असंही असेल. पण दलितांवर अत्याचाराच्या प्रकरणात ओबीसींचीच नावं दिसून येतात.  

छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे स्वतःला ओबीसींचे तारहणार म्हणवून घेतात. तरी राज्यात शिवसेनाच ख-या अर्थाने ओबीसींचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ओबीसी आणि दलितांना एकमेकांजवळ आणायचं तर शिवशक्ती भीमशक्ती हा प्रयोग महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी याचा विचार मांडला. तेव्हा हे काय नवीन, असं बघितलं गेलं. पण यात नवीन काहीच नव्हतं. सेनेच्या सुरुवातीपासून हे प्रयत्न सातत्याने सुरूच आहेत. आता रामदास आठवलेंच्या मातोश्रीभेटीने त्यावरची धूळ पुन्हा एकदा झटकली गेलीय.

शिवसेनाप्रमुखांच्या पुढाकाराने हा प्रयोग होतोय हे बरंय. उद्धवना पुढे हा प्रयोग सुरू ठेवायचा असेल तर त्याचा फायदा होऊ शकेल. शिवसेनाप्रमुखांना महाराष्ट्रातल्या जातींचं गणित अगदी नेमकेपणानं माहित आहे. महाराष्ट्राच्या जातींवर सर्वाधिक अधिकारवाणीने लिहिणा-या प्रबोधनकारांचे ते पुत्र आहेत. त्यांनी महाराष्ट्र अनेकदा पायाखाली घातलाय. राज्यभरात त्यांचा स्वतःचा जनसंपर्क आहे. त्यामुळे जातींच्या संदर्भातली बाळासाहेबांची समज जबरदस्त आहे. पण त्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं. आणि त्यामुळे त्यांच्या राजकारणाविषयीचे अभ्यासकांचे ठोकताळे कायम चुकतात.

बाळासाहेब जातीचा विचार कधीच करत नाहीत, असं नेहमीच सांगितलं जातं. पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. जिथं प्रेमपण पोटजात बघून केलं जातं, तिथे राजकारण जातीशिवाय कसं होऊ शकतं?’, असं मला आवडणारं माझंच एक वाक्य आहे. शिवसेनेचा जातींच्या अंगाने अभ्यास वेळोवेळी झालाय, त्यात हे सिद्धही झालंय. विशेषतः मराठवाड्याच्या संदर्भातली पत्रकार सुंदर लटपटेंनी केलेली शिवसेनेची समीक्षा मला महत्त्वाची वाटते. तिचा आधार घेऊन पुढे मोठमोठ्या लोकांनी लिहिलं, पण ती दुर्लक्षितच राहिली.  

बहुजन म्हणून सगळ्या ब्राम्हणेतरांना एका विचारधारेत बांधण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात गेली दीडशे वर्षं तरी सातत्याने होत आहेत. पण त्यात फारसं यश आलेलं नाही. जोतिबा फुले, छत्रपती शाहू, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण असे अंकुश ठेवणारे नेते होते, तोवर ठीक, पण बाकी ब्राम्हणेतरांच्या म्हणजे बहुनांच्या नावावरच्या संघटना नेहमीच मराठ्यांच्या संघटना बनल्या. त्यांनी बहुजनांच्या नावाने फायदे ओरपले. पण स्वतःच्या जातीबाहेर कधीच पाहिलं नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रभातकार वा. रा. कोठारी, तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे अशा  मराठेतर आणि ब्राम्हणेतर नेतेमंडळींनी स्वतःचे वेगळे मार्ग शोधले. ते ब्राम्हणेतरांच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे राहिले. आपापल्या परीने प्रयत्न करत राहिले.

आपल्या विषयाच्या संदर्भात प्रबोधनकार हे नाव खूप महत्त्वाचं आहे. जोतिबांच्या नंतर बाबासाहेबांच्या बरोबरीने बहुजनवादी चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करणारे प्रबोधनकारही मराठा नेत्यांच्या कोंबडझुंजीला कंटाळून सत्यशोधक चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून दूर झाले होते. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात ब्राम्हण नेत्यांच्या भांडणांनाही असेच कंटाळले होते. पण त्यांचं लढणं थांबलं नाही. त्यातून शिवसेनेचा जन्म झालाय. ठाकरे, म्हणजे प्रबोधनकार आणि बाळासाहेब, हे राज्यातल्या जातीच्या राजकारणाचा उभा आडवा अनुभव घेऊन त्याला तळहाताप्रमाणे समजून होते आणि आहेत. नव्या पिढीच्या ठाकरेंनीही समज कमवायला हवीय. या पार्श्वभूमीवर सेनेचा विचार व्हायला हवाय.

ही सगळी चौकट बांधून त्यात शिवशक्ती भीमशक्तीवर लिहिणं हे परीक्षा पाहणारं असतं. पण स्वतःची लायकी नसतानाही डोळे झाकून उडी मारायच्या सवयीप्रमाणे मी या विषयावर लिहून काढलं. आता तोंड इतक्यांदा आपटलंय की त्याची भीती वाटत नाही. या विषयांकडे कुणी फारसं येत नसल्यामुळे आपलं चालूनही जातं. पण माझी ही मांडणी खूप वरवरची आहे. कुणीतरी नीट शिस्तीत अभ्यास करून हे सारं मांडायला हवंय. शिवशक्ती भीमशक्तीचं राजकारण यशस्वी होईल का नाही, हा प्रश्नच इथे महत्त्वाचा नाहीय. निवडणुकीत भलेभले लोक भेलकांडतात. तिथे अशा प्रयोगांना नेहमीच दाद मिळते असे नाही. पण महाराष्ट्रात सामाजिक एकोपा चांगला राहवा, म्हणून हे राजकारण मला हवंसं वाटतं. ही माझी प्रामाणिक भावना आहे. पण उद्या हे गृहितक मुळापासून चुकीचं असल्याचं कुणी समजावून सांगितलं, तर तसाही विचार करायची माझी तेवढीच प्रामाणिक तयारी आहे.

सध्या कालच्या शनिवारी नवशक्तीत छापून आलेला हा लेख कटपेस्ट करतोय.

२६ फेब्रुवारी १९७८ च्या मार्मिकचा अंक. कव्हरवर शिवसेनेचा चट्टेरी पट्टेरी डौलदार वाघ आणि शेजारीच दलित पँथरचा काळा चित्ता असं बाळासाहेब ठाकरेंच्या कुंचल्यातून उतरलेलं रेखाचित्र. पुढच्याच क्षणात ही दोन्ही जानवरं कव्हरवरून बाहेर झेपावतील इतका त्यातला जिवंतपणा. शेजारी लिहिलेला मजकूरही तितकाच थेट. तुमच्या न्याय्य हक्कांसाठी विधानसभेवर ही झेप! शिवशक्ती भीमशक्ती महाराष्ट्राचे भवितव्य बदलणार! आपल्या कर्तव्यास चुकू नका.

७८च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच्या या आवाहनाला कुणीही फारसं गंभीरपणे घेतलं नाही. शिवसैनिकांनी नाही आणि भीमसैनिकांनी तर नाहीच नाही. महाराष्ट्राने आणीबाणीच्या विरुद्ध जनता पार्टीला भरभरून मतं देण्याचं कर्तव्य अगदी नीट पार पाडलं. त्यामुळे या वाघ आणि पँथरच्या जोडीनं मारलेली उडी दोघांचाही कपाळमोक्ष करणारी ठरली. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मात्र या युतीला चांगलं यश मिळालं. भांडूपमधून पँथरचे जे. पी. घाटगे निवडून आले आणि सुमंत गायकवाड बेस्ट समितीवर दोनदा गेले, ते याच काळात. हा घरोबा फार टिकला नाही, तरीही ही युती महत्त्वाची होती. कारण चारच वर्षांपूर्वी वरळीची दंगल झाली होती.

महाराष्ट्रातल्या बहुजनसमाजाला आत्मभान देणा-या प्रबोधनकार ठाकरेंचा मृत्यू झाला नोव्हेंबर १९७३ ला. तर वरळीच्या दंगलीला सुरुवात झाली जानेवारी ७४ ला. त्यात थेट संबंध नाही, तरीही आहे. कारण वरळी बीडीडी चाळीतली दलित विरुद्ध सवर्ण अशी होती. ती जवळपास चार महिने सुरू होती. त्यात पाच जणांचा बळी गेला. दलितांचं नेतृत्व पँथरकडे होतं. सवर्णांचं सेनेकडे. आज पस्तीस वर्षांनंतरही या दंगलीच्या आठवणीने जुन्या वरळीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. तरीही दंगलीनंतर चारच वर्षांनी शिवसेना आणि पँथर्सचा एक गट यांच्यात युती झाली होती. आता तर सगळं खूपच निवळलंय.

तेव्हाचे पँथर आणि आताचे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मंगळवारी मातोश्री येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. आतापर्यंत चारकोपला राहणा-या आठवलेंनी दोनच महिन्यांपूर्वी कलानगरला लागून असलेल्या गुरू नानक हॉस्पिटलजवळ नवीन घर घेतलंय. त्यामुळे हे नवे शेजारी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट द्यायला गेले, असं सांगण्यात आलं. पण शिवसेनाप्रमुखांनी जय शिवभीमचा नवा नारा देऊन आठवलेंना खुलं आवताण दिलं. त्यामुळे ही सदिच्छा भेट अचानक राजकीय झाली. एकीकडे शिवसेना राज ठाकरेंच्या बंडानंतर अडचणीत आलीय. दुसरीकडे रिपब्लिकनांच्या गटांचं ब-यापैकी ऐक्य होऊनही त्यांना ना आपली ताकद दाखवता आलेली नाही. अशावेळेस ७९ च्या मुंबई महापालिका निवडणुकांतल्या शिवशक्ती भीमशक्ती युतीची पुनरावृत्ती होणारच नाही, असं कुणीही छातीठोक सांगू शकणार नाही. मनसे आणि भाजपची युती स्वाभाविक आणि स्पष्ट दिसत असताना तर हे समीकरण लगेच धुडकावून लावता येण्याजोगंही नाही. 

आजवर शिवशक्ती भीमशक्तीचे प्रयत्न वारंवार झालेत. मुळात प्रबोधनकारांनी मांडलेल्या बहुजनवादी हिंदुत्वात या समीकरणासाठी पुरेशी स्पेस आहे. शिवसेना सुरुवातीच्या दिवसांत याच रस्त्याने जात होती. नाटककार आणि विचारवंत संजय पवार यांनी श्रीदीपलक्ष्मीच्या २००६च्या दिवाळी अंकातल्या मुलाखतीत हे नोंदवलंय. ७२ सालच्या आजारपणानंतर मराठी माणूस वगैरे बाजूला ठेवून त्यांनी (शिवसेनाप्रमुखांनी) हिंदूकांड सुरू केलं. पुढे बाबरी मशिद – राम मंदिराच्या वेळी ते वाढत गेलं. त्यापूर्वी ठाकरे यांची भूमिका प्रबोधनकारांच्या अंगाने जाणारी होती. सभेतून वगैरे ते नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत. तसंच साळी माळी शहाण्णव कुळी, एक व्हावे बहुजनांनी वगैरे आशय असलेली शुभेच्छापत्रं ते स्वतःच्या सहीनं पाठवत. तो प्रबोधनकारांचा ठसा होता.’  गिरणगावात राहून मार्मिक आणि बाळासाहेबांच्या सभांच्या प्रभावात असताना पवारांनी नोंदवलेली ही निरीक्षणं आहेत, म्हणून महत्त्वाची.
 
७९चा प्रयोग फसला, तरी दहा वर्षांनी बडं रिपब्लिकन ऐक्य झालं, तेव्हा अर्जुन डांगळेंनी रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेबरोबर जावं, असा प्रस्ताव ठेवला होता. राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित समाजघटकांना सत्तास्थानी आणणा-या शिवसेनेला सोबत घ्यायला हवं, अशी त्यांची मांडणी होती. पण त्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर फार वर्षांनी युती सरकारच्या काळात नामदेव ढसाळ नख्या आणि दात तुटलेल्या पँथरसह शिवसेनेच्या सोबत आले. प्रचंड बौद्धिक क्षमतेमुळे त्यांनी त्याची सारे काही समष्टीसाठी ही वैचारिक मांडणीही चांगली केली. पण ढसाळांच्या पदरात निवडणुकीच्या काळातल्या दोन तीन पडेल सीटशिवाय फारसं काही आलं नाही. सेनेलाही त्याचा फायदा झाला नाही. फार नंतर मुंबई विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरेंच्या चित्राच्या उद्घाटनासाठीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी रामदास आठवलेंना शिवशक्ती भीमशक्तीची ऑफर दिली. तेव्हा तानसेन ननावरेंचा एक गट सेनेबरोबर आला. तो आजही सेनेबरोबर आहे. उद्धव हे काहीतरी नवीच गोष्ट सांगत आहेत, असं या सगळ्याचं विश्लेषण केलं गेलं. पण त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी हे प्रयोग फार आधीच केलेले होते.

पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बाळासाहेबांपेक्षा एक गोष्ट वेगळी होती. ती म्हणजे त्यांच्या डोक्यावर भूतकाळाचं ओझं नव्हतं. दलितविरोध हा बाळासाहेबांच्या ७४ पासूनच्या राजकारणाचा एक प्रमुख भाग सातत्याने आहे. वरळीच्या दंगली या पोटनिवडणुकांच्या राजकारणाचा अपघात होता. त्यामागे राजकारण असलंच तर ते दलितविरोधाचं नव्हतं, तर पँथर्सच्या कम्युनिस्टप्रेमाच्या विरोधाचं होतं. पण नामांतराचं तसं नव्हतं. शरद पवार काँग्रेसमधे परतल्यानंतर मराठवाड्यातल्या पोरक्या पिढीला बाळासाहेबांमधे आपला नेता मिळाला. त्यात सत्तेत स्थान नसलेले देशमुखेतर  मराठे होते आणि ओबीसी होते. त्यांचा नवबौद्धांशी परंपरागत संघर्ष होता. त्याचा फायदा घेण्यासाठी शिवसेना सरसावली. खरं तर ठाकरे घराण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी घरोब्याचे संबंध. तरीही मराठवाडा विद्यापीठाला त्यांचं नाव द्यायला बाळासाहेबांनी विरोध केला. आरक्षण आणि मंडल आयोगालाही त्यांनी जोरदार विरोध केला. पुढे लगेचच रिडल्स प्रकरणही आलं. मुंबईत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या टकरा झाल्या. दोघांनीही दंडावरच्या बेटकुळ्या दाखवल्या. पूर्ण राज्यातलं वातावरण चिघळलं. त्याचा सेनेला राजकीय फायदा झाला. पुढे युतीची सत्ता असताना रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या गोळीबारात या संघर्षाचं टोक गाठलं गेलं. आणि रिपब्लिकन पक्षांना काँग्रेसच्या पूर्णपणे वळचणीला जाण्यावाचून पर्याय उरला नाही. त्याचा काँग्रेसला काहीही न करता आजपर्यंत सतत फायदा मिळतोच आहे.

काँग्रेसचं महाराष्ट्रातलं पारंपरिक राजकारणाचं समीकरण थ्री एमचं मानलं जातं. मराठा, मुस्लिम आणि महार हे ते तीन एम. शिवसेनेचं आजवरचं सगळं राजकारण या तीन एमच्या विरोधात राहिलं. मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपल्या जातिसमूहाविरुद्ध केलेलं बंड म्हणजेच शिवसेना, असं रावसाहेब कसबेंनी केलेलं वर्णन शिवसेनेच्या राजकारणावर नेमकं बोट ठेवतं. डॉ. भा. ल. भोळे, प्रकाश अकोलकर, प्रा. सुहास पळशीकर आणि सुंदर लटपटे यांनी शिवसेनेच्या सामाजिक अंगानं केलेल्या विश्लेषणात हीच गोष्ट वारंवार अधोरेखित झालीय. आता मुस्लिमविरोधाचं आकर्षण पूर्वीसारखं उरलेलं नाही. अशावेळेस शिवसेनेत पुन्हा प्राण फुंकण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी मराठाविरोधी राजकारणाची सुरुवात केल्याचं स्पष्ट दिसतंय. दादोजी कोंडदेव प्रकरण ही त्याची सुरुवात मानायला हवी. बदलत्या वातावरणात या नव्या समीकरणात भीमशक्तीची साथ अगदी फिट बसणारी आहे. 

आज राज्यात सगळी सत्तास्थानं मराठ्यांकडे आहेतच. दोन्ही काँग्रेसमधे दलितांना कुठेच स्थान मिळालेलं दिसत नाही. त्यात मराठा जातीचं राजकारण करणा-या नेत्यांचा आणि संघटनांचा मस्तवालपणा इतर जातिसमूहांना चांगलाच सलू लागलाय. त्यांचे दाखवायचे दात शाहू, फुले, आंबेडकर असे असले, तरी खायचे जात हे जातिद्वेषाचेच आहेत, हेही लपून राहिलेलं नाही. अशावेळेस दलितांना सोबत घेऊन मराठा वर्चस्वाला विरोध करण्याचा सेनेचा नवा अँटिएस्टॅब्लिशमेंटी पवित्रा यशस्वीही होऊ शकतो. पण फक्त दोन्ही काँग्रेसना किंवा सत्ताधारी मराठ्यांना धडा शिकवायचा अशा निगेटिव्ह अंगाने केलेली मांडणी द्वेषाचं पीक वाढवेल. त्याऐवजी सगळ्यांना सत्तेत स्थान मिळवण्यासाठीची धडपड अशी या समीकरणाची पॉझिटिव मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

पण हे गणित साधंसोपं नाही. शिवशक्ती भीमशक्तीसाठी आधी सेनेले भाजपला घटस्फोट द्यावा लागेल. 
शिवसैनिकांमधे भिनवलेला दलितद्वेष पातळ करावा लागेल. अनेक वर्षं सोबत असलेल्या हिंदू दलितांना आणि मराठवाडा- कोकणातल्या देशमुखेतर मराठ्यांना नवं राजकारण पटवून द्यावं लागेल. रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून येतील याची व्यवस्था करावी लागेल. त्यांना सत्तेत स्थान देण्याचं आश्वासन खुद्द शिवसेनाप्रमुखांना द्यावं लागेल आणि पूर्णही करावं लागेल. शिवाय. बाबासाहेब निजामाचे हस्तक होते हे वक्तव्य आणि रमाबाई नगरातील गोळीबाराचा आरोपी मनोहर कदम याच्याविषयी आपली भूमिका शिवसेनाला स्पष्ट करावी लागेल. कारण या दोनच गोष्टींसाठी आंबेडकरी जनतेने सेनेला दूर ठेवलेलं आहे. हे सगळं घ़डणं सोपं नाही. ती मोठीच रिस्क आहे.

कदाचित हे राजकारण निवडणुकांच्या हिशेबात अपयशी होईलही. पण यातून महाराष्ट्राचं भलं होणार आहे. कारण आज नवबौद्ध आणि ओबीसी हे राज्यभरात एकमेकांशी संघर्षाच्या पावित्र्यात आहेत. खैरलांजी हे त्याचं अगदीच उघड उदाहरण आहे. म्हणून कुणीतरी दलित आणि ओबीसींना एकमेकांच्या जवळ आणायला हवंय. शिवशक्ती भीमशक्तीतून हे घडण्याची शक्यता आहे. म्हणून याचं स्वागत व्हायला हवं.

2 comments:

  1. khup chhan lihalay sir, aagdi manapasoon aawadl.

    ReplyDelete
  2. महानायक च्या बातमीवरून मा.रामदास आठवले यांना लिहिलेलं पत्र इथे जोडत आहे.
    मा. रामदास आठवले जी ,
    शिवसेने सारख्या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आपण कॉंग्रेस शी युती करीत आहोत अस आज पर्यंत सांगत आलेत. तुमच्या या जातीयवादी शक्तींना रोखण्याच्या फार्मुल्यामुळे तुमचा राजकारणाचा शौक पूर्ण झालेला दिसत नाही पण रिपब्लिकन आंदोलनाचे तीन तेरा वाजले हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. नामदेव ढसाल सारख नाव व् त्याला तुमची साथ असतानाही फक्त दोन तिन हजार मतापर्यत येवून थांबतो तेव्हा आपन २० वर्ष राजकारण करून काय कमावल याच चिन्तन कदाचित तुम्ही करीत नसाल पण केल तर तुमच्या लक्षात येइल की अश्या युती च्या फार्मुल्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे कि कॉंग्रेस शी युती नसतानाही आपल्या मोहल्यात बहुतेक घरी काँग्रेसी उमेदवाराचे फलक बघायला मिळतात परन्तु १४ एप्रिल च्या दिवशी मात्र फक्त तीन घरांना निळ तोरण बघायला मिळत. शहरामध्ये बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आम्बेडकरी कार्यकर्त्यांचे शुभेश्चा फलक बरेच पहायला मिळतात पण त्यावर फोटो मात्र कुण्या आठवले, गवई,कवाडेचे नसतात तर कुण्या कांग्रेसी नेत्यांचे असतात. समाजामध्ये निर्माण झालेल्या अश्या प्रदूषनाचे सर्व श्रेय तुमच्या सारख्यांनाच द्यायला पाहिजे. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण तुमच्या युती फार्मुल्यामुळेच तुमच्याही गटात पुष्कळ उपगट पडलेली आहेत अणि याचही कारण फक्त एकच ते म्हणजे काँग्रेसी उमेदवाराकडे चालत असलेला पैश्याचा व्यवहार. चळवळीवर एवढे सर्व संकट आल्यावरसुद्धा पुन्हा कोणत्या शक्तींना रोखण्यासाठी तुम्ही शिवसेनेच्या दारावर चाललेत ? काय या नंतर बाळ ठाकरेंच्या फोटो सोबत अम्बेडकरी कार्यकर्त्याचा सुभेश्चा फलक समाजाकडून अपेक्षित आहे ? काय आपल धोतर सोडून या देशात सर्व शक्तींना रोखण्याचा कंत्राट तुम्हालाच मिळाला आहे ? किंवा रिपब्लिकन आंदोलन कधीच आत्मनिर्भर बनू नये याचा कंत्राट तुम्ही घेतला असावा. रमाबाई नगर मध्ये तुमचे फाटलेले कपडे तुम्ही विसरलेत कि काय ? आठवलेजी, एका पंढरपूर आणि शिर्डी च्या बदल्यात ४७ ठिकाणी कार्यकर्त्याद्वारे हमाल्या करण्याचा व्यवसाय तुम्ही २० वर्ष चालवला . हे किती व्यवहारीक होत हे कॉंग्रेसी उमेदवारांच्या पैश्यामुळे कदाचित तुमच्या कार्यकर्त्यांना कळल नसेल. आता नवीन समीकरणात तुम्ही हमाली ऐवजी कुठला व्यवसाय कर्यकर्त्याना देणार हे तर आम्ही आज सांगू शकणार नाही पण त्यातून आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत होणार हे मात्र नक्की सांगू शकतो. आठवलेजी, आयुष्य भर भिक मागुन जगण्याच तुम्ही ठरवलच असेल तर तुमचा निर्णय तुम्हाला लखलाभ असो. कदाचित तुम्हाला ही भाषा आवडणारही नाही पण तुम्ही जे २० वर्ष केल व् पुन्हा जी कृति करायला निघालेत तेव्हा मला अस वाटते की तुमच्या कृति पेक्षा माझी भाषा फार वाईट ठरणार नाही. अणि शेवटी एवढच की तुमच्या सारख्या एका पक्ष्याच्या अध्यक्षाला शहानपण शिकवण्याची हिम्मत माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यानि का केली असावी , एवढ जरी तुम्ही चिन्तन केल तर मला एवढा विश्वास आहे की उदयाच रिपब्लिकन आंदोलनाच चित्र नक्कीच सुंदर असणार. जयभीम ...

    ReplyDelete