Monday 17 January 2011

निमित्त संक्रांतः सध्याच्या राजकीय संक्रमणांविषयी

सदराची भूक खूप असते. दर आठवड्याला काहितरी द्यावंच लागतं. कधीतरी काही सूचत नसतं. विषय असतात पण त्यावर थोडाफार हवा तेवढा तरी अभ्यास करायला वेळ नसतो. मूड नसतो. दुसरी अधिक महत्त्वाची कामं असतात. अशावेळेस पाटी टाकावी लागते. तो कामाचा भाग असतो. पण ती पाटीपण थोडी नीट टाकायला हवी.

पाटी टाकलेले दोन लेख आठवताहेत. एक मुंबईतल्या थंडीवर लिहिलेला. हा लेख लिहिण्याआधी काही तासच आधी राडिया आणि मीडियावर एक लेख लिहिला होता. त्यामुळे वेळेची आणि जागेची गरज म्हणून एक लेख नवशक्तिला लिहून पाठवला. तसंच परवा शुक्रवारीही झालं. असीमानंदाच्या कबुलीजबाबावर लेख लिहिल्यावर लगेचच काही तासांत लेख लिहायचा होता.
 


खरं तर संक्रांतीनिमित्त गुजराती आणि मराठी संस्कृतींच्या समन्वयावर लेख लिहायची इच्छा होती. पण त्यासाठी काही रेफरन्स शोधावे लागणार होते. चार पाच जणांशी तरी बोलायची गरज होती. वेळ नव्हता. त्यामुळे लिहिता आलं नाही. संसदेच्या समितीनं आयपीएलवाल्यांना विचारलेल्या सवालांवरही लिहायचं होतं. पण त्यावर पूर्वी एकदा लिहिलं असल्यामुळे नवी लिंक मिळत नव्हती. त्यामुळे शेवटी राजकारणावर लिहायचं ठरवलं. राजकारणावर लिहायचं म्हणजे फारसा त्रास नसतो. पार्टी पॉलिटिक्स हा मुळातूनच आवडीचा भाग असल्यामुळे त्याविषयी अपडेट असतोच. त्यावर एका बाजुला कायम डोक्यात विचारही सुरू असतो. कुणाकुणाशी किमान फोनवर चर्चाही सुरू असतातच. त्यामुळे काही सूचत नसलं की राजकारणावर लिहायला घेतो. तसंच शुक्रवारी झालं. काढलं लिहून. संक्रांतीच्या दिवशी छापून आला लेख.

मटात असताना कधी लिहिताना नीट जमत नसेल, तर जॉन कोलॅसो सांगायचे, दे आता पानावर, छापून आल्यावर चांगलं वाटतं. टाकलेली पाटी सोबत कटपेस्ट केलीय नेहमीप्रमाणे. 

पतंग उडवणं, कन्नी कापणं, काटाकाटी, ढील देणं, पेच लावणं, काय पोच्चे या सगळ्या शब्दांचा फक्त राजकारणाशी संबंध नाही, तर हे शब्द पतंग उडवण्याशी म्हणजे मकर संक्रांतीशी संबंधित आहेत, हे आजकाल वेगळं सांगावं लागतं. संक्रांतीचा राजकारणाशी संबंध आहेच असा जवळचा. १९९१ साली शरद पवारांविरुद्ध झालेल्या निष्टावंतांच्या बड्या बंडाची कन्नी तुटणं असो किंवा २००३ ला विलासरावांचा पतंग हवेतल्या हवेत कापला जाणं असो, मुहूर्त मकर संक्रांतीचा होता. पण या काटाकाटीच्या राजकारणात संक्रांतीचा उल्लेख निगेटिवच होतो. कुणावरतरी संक्रांत येते म्हणे. पण खरी संक्रांत ही नव्या पिकाची, नव्या वर्षाची सोबत घेऊन येते. दक्षिणेतून उत्तरेकडे झालेलं संक्रमण यादिवशी साजरं होतं. म्हणून हा दिवस फक्त सूर्याच्याच नाही तर सगळ्याच संक्रमणांचा वेध घेण्यासाठीचा मुहू्र्त मानायला हवा. निदान संक्रांतीशी राजकारणाशी असलेलं नातं पाहता राजकारणातल्या संक्रमणांचा तरी धांडोळा घ्यायला हरकत नाही.

संक्रांतीचे दिवस तसे गुलाबी थंडीचे असतात. पण हा काळ सर्वसाधारणपणे राजकीय धामधुमीचाच असतो. यंदाही तेच आहे. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी मराठवाड्याच्या मातीत दमदार एण्ट्री केलेली आहे. राज ठाकरेंचं आकर्षण महाराष्ट्रभरातल्या तरुणांना आहेच आहे. शिवाय शिवसेना पोचलेली आहे, तिथे अर्थातच राजना चांगली जमीन आयती तयार मिळतेच. निवडणुकांचे निकाल काहीही लागोत, पण मराठवाडा आजही सेनेचा बालेकिल्ला आहेच आहे. त्यामुळे राज यांच्या दमदार सभेने कुणाला नव्या राजकीय संक्रमणाचा पायरव ऐकू आला, तर आश्चर्य वाटायला नको.

राज यांनी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीला, त्यातही अजित पवार आणि आर. आर. पाटील यांना टार्गेट केलं. अजितदादांनीही कधी नव्हे इतक्या घाईत अरेला कारे उत्तर देऊनही टाकलं. राज यांच्या भाषणाचे अनेक अर्थ काढता येऊ शकतात पण त्यातला लसावि काढायचा तर मनसेने आता उघडपणे मराठा राजकारणाच्या विरोधातली लाईन घेतली आहे. पत्रकार कुमार केतकरांच्या घरावरच्या हल्ल्यापासून दादोजींचा पुतळा तोडण्यापर्यंतचा सगळा इतिहास काढत त्यांनी संभाजी ब्रिगेडला धारेवर धरलं. आणि या सगळ्याचं गोळाबेरीज पाप राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडलं. शिवसेनेने आधीच दादोजी पुतळ्याच्या निमित्ताने मराठा राजकारणाच्या विरोधी भूमिका घेतलीच आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची मागणी करत मराठवाड्यातल्या मराठ्यांना बुचकळ्यात पाडायला सुरुवात केली आहेच. त्याच रांगेत राज ठाकरे यांचा डाव आलाय. उद्धव आणि राज हे दोन भाऊ ब-याच दिवसांनी एकाच सुरात बोलताना दिसत आहेत. त्याचा अर्थ ज्याला हवा तसा काढता येईल. उद्धव राज एकत्र येण्याबाबत तर्काची तार हवी तितकी लांबवता येते. पण वास्तवात ही खूपच खासगी अहंकारांची लढाई आहे. त्यामुळे याविषयातले हवेतले इमले अनेकदा हवेतच विरून जातात. तरीही दोघांना या मुद्द्यावर तरी एकत्र पाहून जुने शिवसैनिक मनसे आमदार हर्षवर्धन रायभान जाधवांना दुवा देत असतील.

सेना असो वा मनसे, ही मराठवाड्यात मराठाविरोधी मतं मिळवण्याची ही धडपड आहेच. पण यातली जातीची समीकरणं दोन अधिक दोन बरोबर चार कधीच येत नाहीत. मराठवाड्यात ती खूपच गुंतागुंतीची होतात. त्यामुळे या डावांचा शेवट कसा होईल, निवडणुकांमधे पारडं कोणाच्या दिशेने हलेल, हे भले भले राजकारणीही सांगू शकत नाहीत. ज्या हर्षवर्धन जाधवांसाठी राज ठाकरे अजित पवारांना शिव्या देत आहेत. तेच हर्षवर्धन उद्या मनसेचं मराठाविरोधी राजकारण मानवत नाही म्हणून राष्ट्रवादीच्या दिशेने पावलं टाकू शकतात. कारण हर्षवर्धन यांचा राजकीय पिंड शरद पवारवादी राजकाणावरच पोसला गेलेला आहे. त्यामुळे उद्या हे संक्रमण उद्या कुणाला कुठे घेऊन जाईल हे कोणीही सांगू शकत नाही.

जातीच्या राजकारणावरून राज्याच्या राजकारणात दोन उभे तट पडलेले दिसताहेत. एकीकडे शिवसेना, भाजप आणि मनसे एकत्र आल्यात. आश्चर्य म्हणजे या तटाचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे. या तटाचं सगळं लक्षं वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकांवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आहे. ते मराठा मतं एकगठ्ठा करण्यासाठी आक्रमक झालेले आहेत. काँग्रेसही नरो वा कुंजरो वा म्हणत तिच्यामागून फरफटत येताना दिसतेय. पण नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसला नवा चेहरा मिळालाय. नव्या नेत्याबरोबर नवं संक्रमणही आलंय.

कलमाडी, टू जी आणि आदर्शच्या चिखलात रुतलेल्या काँग्रेसला खेचून बाहेर काढण्याच्या कामात सध्या पृथ्वीबाबा गुंतले आहेत. २०१० मधे शांत वाटणारे चव्हाण नवं वर्षं येताच अचानक आक्रमक झालेले आहेत. आदर्श प्रकरणी त्यांनी नोकरशहांना नोटिसा पाठवल्यातच. त्यांनी रामानंद तिवारींसारख्या दांडगट अधिका-यालाही बुडबुडे आणलेत. पुढारी आणि बिल्डर यांच्या अनिष्ट युतीवर ते टीका करत आहेत. त्यांच्यात मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आणि त्यांच्याच पक्षाचे अनेक आमदार, पदाधिकारी यांचा प्रमुख व्यवसाय बिल्डरचाच असल्याचं उघड गुपित आहे. अशावेळेस दिल्लीचं अभय आहे म्हणूनच पृथ्वीराज हे बोलू शकत आहेत. त्यातून त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागेल. पृथ्वीराज फारकाळ मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत अशी भाकितं मंत्रालय परिसरात फिरताना सहज ऐकू येतात. पण अशा चर्चा जेव्हा सुरू असतात तेव्हा त्याच्या उलटच होतं, हे काँग्रेसच राजकारण थोडफार जाणून असणारा कुणीही सांगू शकेल. नवे मुख्यमंत्री खूपच चाणाक्ष आणि यापेक्षाही मोठ्या राजकारणात पारंगत आहेत. त्यांच्या राजकारणाचा अंदाज अद्याप राज्यातल्या पुढा-यांना आलेलाच दिसत नाही. हे सगळं खरं असलं तरीही उद्या राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसले तर पृथ्वीराज उद्या अचानक दिल्लीत पुन्हा पंतप्रधान कार्यालय सांभाळण्यासाठी जाऊ शकतात.

दिल्लीतलं वातारवण सध्या भलतंच तंग आहे. चार पावलं चालल्यावर काय येईल हे घनघोर धुक्यात कुणालाच कळत नाहीय. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात नवी संक्रमणं घडताना दिसत आहेत. गादीवर असलेलं नेतृत्व जुनं होऊन नवं नेतृत्व येताना नेहमीच अशी स्थिती असते. तशीच स्थिती आताही आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. बिहारच्या निवडणुकांत तोंडघशी पडल्यानंतर युवराज राहुल गांधी नव्या जोमाने तयारीला लागलेत. इथे दिग्विजय सिंग त्यांना मार्गदर्शन करत आहेत. मायावती, मुलायम सिंग, राजनाथ सिंग या युपीतल्या नेहमीच्या नेत्यांपेक्षा याच दोघांचा धुरळा सध्या जोरात उडतोय. बाकीच्या पक्षांचं राजकारणही राहुलच्याच भोवती फिरतंय, अशा भास निदान आता तरी तयार करण्यात त्यांना यश मिळालंय. देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या निवडणुका उद्या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहेत. राहुल यांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्तही तेव्हाच ठरणार आहे.

भगव्या दहशतवादाचा मुद्दा लावून धरत काँग्रेसने भाजपला बॅकफूटवर टाकण्यात यश मिळवलंय. अगदी कालपर्यंत कलमाडी, टू जी आणि आदर्श प्रकरणात काँग्रेसची फे फे उडत होती. पण आज असीमानंदांच्या कबुलीजबाबावर स्पष्टिकरणं द्यायची वेळ भाजपवर आलीय. पण म्हणून काँग्रेसमधे सगळं आलबेल आहे असं मुळीच नाही. सोनिया गांधी विरुद्ध मनमोहन सिंग, राहुल गांधी विरुद्ध अहमद पटेल अशा ख-या खोट्या भांडणांमधून राजकारणाची दिशा ठरणार आहे. काँग्रेससाठीही काळ मोठा कठीण आहे. तिथे भाजपमधे सर्वमान्य नेतृत्व उरलेलं नाही. नवं एकमुखी नेतृत्व निर्माण होण्याआधीचा हा संक्रमणाचा काळ आहे. बिहार निवडणुकांतल्या यशानंतर नितीन गडकरींना अनेक शत्रू तयार झालेले दिसतात. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे गट त्यांच्या पायात पाय टाकण्यास सरसावलेले दिसतात. त्यामुळे कुणीच धड उभं राहू शकत नाहीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चाणक्य यातून काय मार्ग काढतात, ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही सगळी संक्रमणं देशाचं आणि राज्याचं राजकारण वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाणार आहेत. आजची संक्रातं संपली तरीही पतंग उडवणं, कन्नी कापणं, काटाकाटी, ढील देणं, पेच लावणं, काय पोच्चे हे शब्द आपल्याला वर्षभर वापरावेच लागणार आहेत.

3 comments:

  1. छान लेख आहे.

    ReplyDelete
  2. chan lekh ahe sachin, shivraj

    ReplyDelete
  3. विशालाक्षी चव्हाण.22 January 2011 at 16:31

    खुप छान लिहिल आहे सर वाचताना इतर कुठे मन लागतच नाही तुमचे लेख अगदी वाचकाला जागेवर खिळवून ठेवतात. अगदी तुम्ही सांगितलेल्या अँकर या शब्दाप्रमाणे.

    ReplyDelete