परवा घरी हळदीकुंकू होतं. मोग-याचे गजरे आणायचे होते. त्यासाठी ऑफिस सुटल्यावर दादर गाठलं. श्रीरंगच्या बाईकची सोबत होती. गजरे बनत होते. श्रीरंग म्हणाला आईस्क्रीम खाऊया. मला सर्दी होती. तेवढ्यातच मला समोरून एक नत्थुलालसारख्या मिशांचा माणूस दिसला. मला आठवलं. तू मुछवाला महादेव बघितलायस, मी श्रीरंगला विचारलं. चल, गरम दूध पिऊया, मी त्याला कबुतरखान्याच्या कोप-यावर घेऊन आलो.
दुकानाचं नाव नाही लक्षात राहत. पण लहानपणापासून मी ते दुकान बघतोय. मध्यंतरी चहाशिवाय करमायचं नाही, म्हणून चहा कॉफी सोडली होती. तेव्हा दादरमधे आल्यावर दूध आणि जिलेबी खायला प्यायला तिथेच जायचो. तेव्हा गल्ल्यावर बसणारे काका आता हारवाल्या फोटोफ्रेममधे गेलेत. त्यांच्याच शेजारी जुन्या जमान्यातला शंकर महादेवाचा फोटो आहे. चेह-यावर फार काही तेज नसलेल्या साध्या माणसाच्या चेह-यातला आपला वाटणारा महादेव आहे त्यात. त्याला छान मिशापण आहेत. बाजुलाच रविवर्मा, मुळगावकर यांच्या प्रभावातला शंकर पार्वतीचाही फोटो आहे. त्यातले शंकर अगदी क्लिन शेव्ड आणि मस्त डोले शोले बिल्टवाले आहेत. महादेव ते शंकर असं ट्रान्झिशन तिथं अगदी समोर दिसतं.
पण या दुकानाला कोणत्याच ट्रान्झिशन्सचं काहीच घेणंदेणं नाही. ते पन्नास वर्षांपूर्वी असावं, तसंच आजही आहे. किती वर्षं जुनं दुकान आहे. पन्नासतरी, उत्तर आलं. समोर उत्तर देणारा आमच्याच वयाचा तिशीच्या आसपासचा भय्या. मागेच कस्तुरचंद मिल. त्यामुळे हे दुकान गिरणीकामगारांसाठी सुरू झालं असावं, याला फारशा लॉजिकची गरज नव्हती. तरीही विचारलं. तो म्हणाला हो तर. त्याची चौथी पिढी मुंबईत. यूपीत तो जातो कुणाच्या लग्नासाठी फार तर दोन दिवस. आजही त्याच्या दुकानातली जिलेबी मिल सुटायच्या वेळेनुसार बनते. रात्रपाळी, सकाळपाळी आणि दुपारपाळी सुटायच्या वेळेनुसार पूर्वीही जिलेबी पाकातून बाहेर पडायची. आजही तो मुहूर्त चुकत नाही. सकाळी पाच वाजता रात्रपाळी सुटूनचे कामगार यायचे म्हणून तीन वाजताच कोळसे पेटवले जायचे. आता गिरणी उरली नाही. तिथे छोटे कारखाने, गोदामं आणि एक टोलेजंग टॉवर आहे. गिरणी सुटायची वेळ झाली म्हणून घोळक्याने कामगार आता गेटमधून बाहेर येत नाहीत. तरीही मलाई मारलेलं दूध आणि गरमागरम जिलेबी सकाळी पाच वाजताही त्यांची वाट पाहत असते.
भय्ये आणि गिरणगावाचा संबंध मला पहिल्यांदा नीट जाणवला तो रवी तिवारीमुळे. तो इन मुंबई आणि मी सी न्यूजमधे असल्यापासून आम्ही या विषयावर बोलतोय. त्यांचं सगळं खानदान काळाचौकीचंच. तो मराठी बोलताना थोडंसंच अडखळतो, तरीही माझ्यापेक्षा जास्त मुंबईकर आणि मराठी आहे, असं मला तरी वाटतं. त्यांची गिरणगावात मिठाईची दुकानं आणि डेअ-या होत्या. या दुकानांतून ज्यांच्या घरात दोन लीटर दुधाचा रतीब रोज जात होता, त्यांची मुलं चाराण्याचं दूध मागायला येऊ लागली. गिरण्यांच्या संपामुळे हे घडलं होतं. आपल्या घरातल्या मुलांना नोक-या कराव्या लागतील, असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. पण आज आम्ही सगळेच नोक-या करतोय, रवी सांगतो. आता कधी आमची कार काळाचौकीच्या त्या भागातून जाते, तेव्हा रवी खिडकीतून बाहेर बघत असतो. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालंय की काय, असं मला वाटत राहतं.
हे सगळं लिहिताना मला हूबनाथ सारखे आठवताहेत. काल गांधी पुण्यतिथीनिमित्त ते त्यांच्या इस्माईल युसूफ कॉलेजच्या मुलांना घेऊन चर्चगेटपर्यंत पदयात्रा करून आले. मलाही जायचं होतं. पण दोन तीन दिवस बरं नव्हतं. ग्रँट रोडच्या सर्वोदय मंडळातच मी हूबनाथचं पुस्तक पहिल्यांदा पाहिलं. कवितासंग्रहाचं नाव होतं, लोअर परेल. नवभारत टाईम्समधले आमचे सिनीयर मित्र कैलास सेंगर यांच्याकडून ते मिळवलं. त्याच्यावर लिहिलं. राज ठाकरेंच्या पोरांचा राडा आणि त्यानंतरच उन्माद शिगेला असताना हे लिहिलं होतं. पुस्तक वाचल्यानंतर त्यावर लिहेपर्यंत मी खूप अस्वस्थ होतो. लिहिलं, खूप बरं वाटलं. सोबत कटपेस्ट केलंय. आता पुन्हा बरं वाटतंय.
कवीलोक गावांवर कविता लिहितात. पण ती गावं माडाच्या बनात, डोंगराच्या कुशीत, नदीच्या काठावर वसलेली असतात. म्हणूनच कुणी 'लोअर परेल'वर कविता लिहितं, तेव्हा आश्चर्य वाटतं. हूबनाथ नावाच्या कवीचा 'लोअर परेल' हा काव्यसंग्रह नुकताच आलाय. आणि हो, या कविता मराठी नाहीत तर सध्या ज्या भाषेचा द्वेष करायची टूम आपल्याकडे सुरूय, त्या हिंदी भाषेत आहेत.
पुस्तकातली पहिली कविता लोअर परेल रेल्वे स्टेशनवरची. त्यात गिरणी कामगारांनी गजबजलेला या स्टेशनचा उबदार भूतकाळ भेटतो. मग उभा राहतो, गिरणी संपांमुळे आलेला सन्नाटा. आणि नंतर पुन्हा मॉल कॉलसेंटरमुळे आलेला सध्याचा झगमगाट. पण तरीही कवितेतलं हे स्टेशन कामगारांच्याच जुन्या आठवणींत रमलेलं...
पर इस बेवकूफ स्टेशनको
इसकी कदर नही
आजभी
उसी गंवाई मासूमियत की राह देखता
रातभर जागता रहता है
यातल्या सगळ्या कविता अशाच सामाजिक अंगानं जाणा-या. कष्टक-याचं, त्यांच्या संस्कृतीचं वर्णन करणा-या. या कवितांत जिथे कुठे ठिकाणाचा संदर्भ आलाय, तो हटकून एकजात मुंबईचाच आहे. यात सिद्धिविनायक मंदिराच्या भिंतीवरचं सटायर आहे. लोकलमधल्या बॉम्बस्फोटांची वेदना आहे. एका कवितेचं नावच 'पीक ऑवर में चर्चगेट फास्ट' असं आहे.
काही अपवाद वगळता आज मुंबईत घडणाऱ्या स्थित्यंतराशी मराठी साहित्याचा फारसा वास्ता उरलेला नाही. अशावेळेस एक 'भय्या' या विषयावर लिहितो, चांगलं लिहितो, आपलेपणानं लिहितो, हे महत्त्वाचं. हूबनाथचं आडनाव पांडे, टिपिकल यूपीवालं. डावीकडे झुकलेल्या उत्तरेतल्या अनेक इंटलेक्च्युअल्सप्रमाणे तेही आडनाव लावत नाहीत. गेल्या शतकाच्या सुरुवातीला त्याचे आजोबा मुंबईत आले. ते ट्रामचे कंडक्टर होते. वडील बेस्ट बसचे कंडक्टर. हेही बेस्टमध्येच होता. एमडी कॉलेजात शिकले. गिरणगाव बघतच मोठे झाले. आता जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजात शिकवतात. त्याची चौथी पिढी मुंबईत स्थिरावलीय. 'मी माझी मुळं शोधत उत्तर प्रदेशात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी महाराष्ट्रीय आहे. मला गावी जायचं असलं तरी महाराष्ट्रातल्याच एखाद्या गावी जातो', ते म्हणतात. गिरणगावातल्या कष्टक-यांच्या संस्कृतीवर त्यांना आणखी सविस्तर लिहायचंय.
हूबनाथ हे काही एकटे नाहीत. मुंबईच्या इतिहासात पूरभय्यांचे किमान दीडेकशे वर्षांचे संदर्भ सहज सापडतात. गिरणीत मराठी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून घाम गाळणा-या किंवा गिरणगावात दूध, मिठाया, पान, चणे विकणा-या उत्तर भारतीयांची संख्या कधीच दुर्लक्ष करण्याजोगी नव्हती. आज उत्तर भारतीयांचे काही नेते उपटसुंभासारखे वागत आहेत. त्यांच्यातल्या काही मीडियावाल्यांना हिंदीचं वर्चस्व मराठीवर लादायचंय. हे सगळं खरंच. पण म्हणून एकजात सगळ्या 'भय्यां'ना मुंबईतून हाकलायचं का? हूबनाथच्या 'लोअर परेल'ने हा प्रश्न उभा केलाय. कारण तो आपली मुळं गंगेच्या किना-यावर नाही, तर लोअर परेल स्टेशनवर शोधतोय. अशा हूबनाथांना आपण मराठीचे तथाकथित प्रेमी मुंबईच्या बाहेर कुठे हाकलणार आहोत?
चमचमीत विषय न हाताळता तू हृदयाला हात घालणार्या विषयांवर चरचरीत लिहितोस हे मला खूप आवडतं... लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. हो, आणि "भय्यान्ना" "हाकलणे" अशक्य, अवाजवी, अतर्क्य आणि अनाकलनीय आहे. पण जसं नितीश कुमार करत आहेत बिहार मध्ये तसं उत्तर प्रदेशात कुणी केलं तर मुंबापुरीत येऊन आदळणारे लोंढे नक्की कमी होतील.... आणि माझ्यासारखे स्वखुशीने मुंबई सोडून जाणारे लोक अधिकाधिक संख्येने वाढू देत हीच हाजी अली दर्ग्याला, माहीमच्या चर्चला, प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाला, वडाळ्याच्या विठ्ठलाला, फोर्टच्या सायनागोगला, अंधेरीच्या गुरुद्वाराला,अथांग अरबी समुद्राला, विक्रोळीच्या बौद्ध विहाराला मनःपूर्वक प्रार्थना
ReplyDeleteशशांक म्हसवडे
सचिन, एक तर तुझी शैली भन्नाट गोड आहे. एकदम भाऊ पाध्येंची आठवण यावी अशी. ही मुंबई मला माहीत आहे . मी डोंगरीला रहायचो .नूरबाग, दोन टाकी, चार नळ, नागपाडा ,कुंभारवाडा, भेंडी बाजार, सीपी टेंक या भागात सिगरेटची पाकिट गोला करीत फिरायचो . त्यावेळी भय्ये, मुसलमान,पारशी , अशा नजरेने कधी कोणाकडे पाहिले जायचेच नाही . मद्यंतरी काही तरी पोलिटिकल हुशारी सुरु झाली नि यु .पि. वाल्यांनी एकदम प्लान केल्यागत मुंबईवर चढ़ाई सुरु केली. तसे भय्याशी आपले कधीच भांडन नव्हते .तुझ्या लेखातले भय्ये म्हणजे मुंबईचे खरे nut bolt . आता मराठी बोलायला हक्काने नाकारणारे १९९० नंतर आलेले भय्ये म्हणजे ते नव्हेत. मात्र मुंबईचा तू घेतोस तो चित्रमय रिपोर्ताज मस्त. keep it up सचिन.
ReplyDeleteSir Aapan mhanta te agdi yoegya aahe. apanas konala hi haklnyacha adhikar nahi ye. kaydyane aapan tasa karu dikhil shakat nahi. pan aapan thoda vichar kelas aapnas asa janun yeil ki Mumbai varil Payabhut suvidha kan=mi padu laglya aahet. UP wale aaso kiva punjab wale koni jari asle tari tyacha taan ha mumbai var padtoy je pvripasun aahet tya babat aapan kahi mhanu shakat nahi pan ata vadte londhe tya babat kya???????
ReplyDelete