नवशक्तित ‘समकालीन’ हा कॉलम लिहायला लागल्याला एक वर्षं झालं. दर आठवड्याला हजारेक शब्दांचा लेख लिहिणं, हे काम माझ्यासारख्या आळशी माणसासाठी जास्तच जिकिरीचं होतं. पण हा एक वर्षाचा प्रवास आनंदाचा गेला. वेगवेगळे विषय हाताळायला मिळाले. हात लिहिता राहिला. नव्या विषयांचा अभ्यास झाला. नव्या माणसांशी ओळखी झाल्या. आणखी काय हवं?
मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड सुरू होता. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक महेश म्हात्रेंचा फोन आला. आमच्याकडे आठवड्याला कॉलम लिहिशील का, त्यांनी विचारलं. पहिल्या लेखाच्या इण्ट्रोत त्यांनी लिहिलं होतं, ‘मुंबई आणि सर्वच महानगरांना एक संस्कृती असते. ही संस्कृती त्या शहरातील समाजजीवनाचे दर्शन घडवत असते. जसा काळ बदलतो, तशी शहरे आणि त्यांची संस्कृतीही कात टाकते. या बदलांचा आढावा घेणारे, व्यासंगी पत्रकार सचिन परब यांचे हे नवे कोरे सदर.’ वाचून बरं वाटलं. व्यासंगी वगैरे म्हटल्यावर मूठभर मास चढलं.
मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड सुरू होता. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक महेश म्हात्रेंचा फोन आला. आमच्याकडे आठवड्याला कॉलम लिहिशील का, त्यांनी विचारलं. पहिल्या लेखाच्या इण्ट्रोत त्यांनी लिहिलं होतं, ‘मुंबई आणि सर्वच महानगरांना एक संस्कृती असते. ही संस्कृती त्या शहरातील समाजजीवनाचे दर्शन घडवत असते. जसा काळ बदलतो, तशी शहरे आणि त्यांची संस्कृतीही कात टाकते. या बदलांचा आढावा घेणारे, व्यासंगी पत्रकार सचिन परब यांचे हे नवे कोरे सदर.’ वाचून बरं वाटलं. व्यासंगी वगैरे म्हटल्यावर मूठभर मास चढलं.
पण ‘समकालीन’ तसं मुंबईच्या सीमेत नाही थांबलं. कधी त्यात बारामतीच्या जैतुनबी आल्या, कधी अमेरिकेतले सी. के. प्रल्हाद आले. पण स्थित्यंतरं टिपणं ही थीम ब-यापैकी टिकलीय, असं वाटतं. एखादं सदर लिहिताना त्याची धाटणी आधीच ठरवता येत नाही. लिहिता लिहिता त्याचं टोक मिळत जातं. महाराष्ट्र टाइम्स मधे ‘विंडो सीट’ लिहिताना स्थित्यंतरं टिपणं आणि सर्वसामान्यांच्या नजरेतून त्यावर थोडी बंडखोर टिपणी करणं, असं मला मिळालेलं टोक होतं. तोच धागा समकालीनमधेही कायम ठेवला. मी माझ्यासाठीच लिहित आलो. पण सगळ्यांना कॉलम आवडला, याचा अधिक आनंद.
गेल्या वर्षाच्या पहिल्या गुरुवारी पहिला लेख छापून आला. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या. त्यावर लिहिलं. दुस-या गुरुवारी संक्रांत होती. म्हटलं त्यावर लिहू. कारण स्थित्यंतर ही आवडीची गोष्ट आणि संक्रांत म्हणजे स्थित्यंतराचाच उत्सव. त्यावर लेख लिहिला, ‘संक्रमणाचा उत्सव रोजच्या रोज‘. लेखाचा इण्ट्रो होता, ‘आज मकर संक्रांत. दक्षिणायनातून उत्तरायणात होणारं सूर्याचं संक्रमण आपण दरवर्षी साजरं करतो. पण विशेषत: जागतिकीकरणानंतर आणि त्यातही या दशकात रोजच संक्रमणं आपण रोजच अनुभवतोय. नातेसंबंधांपासून तंत्रज्ञानापर्यंतची ही बरीवाईट संक्रमणंही आनंदाने साजरी करायला हवीत.’ तो सोबत जोडलाय. आनंद याचाही आहे, की गेली वर्षभर खूप सारी संक्रमण मीही साजरी करत होतो. आता नव्या वर्षातही अशीच संक्रमण यावीत. स्थिरस्थावर जगण्यापेक्षा स्थित्यंतरं केव्हाही चांगलीच, नाही का?
एक जानेवारी. पश्चिमी परंपरेचं नवं वर्षं आपण नुकतंच साजरं केलं. आता गुढीपाडवा येईल. हे आपलं मराठी नवं वर्षं. तेही आपण उत्साहात साजरं करू. काहीजणं एक नवं वर्षं साजरं करताना दुस-याच्या नावानं नाकं मुरडतात. कुणाला गुढीपाडवा आऊटडेटेड वाटतो, तर कुणाला थर्टीफर्स्ट हे अंधानुकरण वाटतं. खरंच असं काही वाटण्याची गरज आहे का? जगाला प्रेम करायला शिकवणा-या येशू ख्रिस्ताच्या आठवणीत सुरू असलेलं इसवी सन काय, किंवा जिवंतपणीच मातीचे पुतळे झालेल्या मराठी माणसांमध्ये प्राण फुंकून परकीय आक्रमण उलथवून टाकणा-या मराठमोळया सातवाहन राजांचा वारसा सांगणारं शालिवाहन शक काय, दोन्ही दिवस साजरे करण्याच्याच थोरवीचे. त्यावरून भांडायचं कशाला आणि कसला द्वेष करायचा?
या दोन कालगणनेतलं भांडण संपवण्यासाठी मकर संक्रांत येते. हा अस्सल भारतीय मातीतला सण दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरमधला १४ जानेवारीचा मुहूर्त घेऊन येतो. दोन कालगणनेतला वाद संपवणारा हा दिवस आहे, कारण हा निसर्गाचा उत्सव आहे. हा निसर्गाचाच उत्सव. आपल्या सृष्टीचा पोषणकर्ता सूर्य मकर राशीत शिरतो. मोठया रात्री संपून मोठे दिवस सुरू व्हायला लागतात. संक्रांतीपासून अंधार कमी होत जातो. प्रकाश वाढत जातो. अंधारातून प्रकाशाकडे अशी ही वाटचाल सुरू होते. म्हणून हा उत्सव. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यापेक्षा दुसरा अधिक पुण्यकाल तो कोणता! म्हणूनच आपल्या देशात उत्तर टोकापासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र हा उत्सव वेगवेगळया नावाने, वेगळया पध्दतीने साजरा होतो.
संक्रमणांचा, स्थित्यंतरांचा आणि बदलांचा भारतीय संस्कृतीने कायमच सन्मान केला आहे. कारण आपली संस्कृती वाहत राहण्यावर विश्वास ठेवणारी आहे. वाहलो नाही, तर डबके होते, याचे भान असणारी संस्कृती आहे. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचं सार मानलेल्या भद्रसुक्तात ‘आनौ भद्र:’ म्हणत कुठूनही येणा-या चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याची भूमिका मांडली आहे. या नव्याच्या स्वीकाराच्या हिमतीवरच ही जगातली एक सर्वात जुनी संस्कृती मानवजातीवर आपला ठसा उमटवत राहिली. पण जेव्हा जेव्हा हा मनाचा मोठेपणा खुंटला. जाती, धर्म, प्रांताच्या नावावर कोतेपणा वाढला. तेव्हा हा देशाचा विकास अडकून बसला. त्यामुळे दरवर्षी तीळगुळ वाटत येणारी संक्रात याची आठवण करून देते.
नव्याचा स्वीकार करणं सोपं नसतं. कारण ते जुन्याला जुनं ठरवतं. आणि आपण सगळेच स्वत:ला मॉडर्न मानत असतो. आपल्यापेक्षा नवं काही आलं, की आपण त्याचा स्वीकार करत नाही आणि जुने ठरत असतो. आपण जुने ठरताना आपल्या धारणांना धक्का बसतो. मग प्रस्थापित नव्याला विरोध करतात. त्या नव्यावर स्वत:चा कब्जा मिळवतात आणि नवं संक्रमण सर्वांपर्यंत पोहचू नये. यासाठी जीवापाड मेहनत घेतात. जेव्हा इंग्लंडात टेलिफोनचं तंत्रज्ञान आलं, तेव्हा ब्रिटिश पोष्टखात्याच्या प्रमुखाने त्याला अमेरिकेतलं फॅड मानलं होतं. आपल्याकडे इतके निरोपे आहेत, की आपल्याला फोनची आवश्यकताच भासणार नाही, असा अहवाल त्याने पाठवला होता. पण पाच सात वर्षातच तो साफ उघडा पडला. वाढतं तंत्रज्ञान आपल्याला असंच रोजच्या रोज उघडं पाडत असतं. मोबाईललाही अनेकांनी असंच फॅड ठरवलं होतं. पण आजघडीला आपल्या देशात पन्नास कोटी मोबाईल वापरले जात आहेत. रस्त्यावर भीक मागणा-यांच्या कनवटीलाही मोबाईल आहे. गेल्या दशकभरातली हे एक मोठं संक्रमण आहे. ज्ञानापासून माध्यमांपर्यंत अनेक मक्तेदा-या मोडण्याची ताकद या आपल्या मुठीतल्या मोबाईलमध्ये आहे.
एकटा मोबाइलच नाही, तर गेल्या दशकभरातल्या अनेक संक्रमणांनी आपल्या आयुष्यात नवे प्रवाह निर्माण केले आहेत. आपल्या अनेक धारणांना धक्के बसवले आहेत. नवे मार्ग उभे केले आहेत. पिढयानपिढया दाबलेले अनेक विषय उसळी मारून वर आले आहेत. समलैंगिकतेला मान्यता देणं, योग्य की अयोग्य, यावर वाद झडले. कोर्टाने त्यावर जवळपास मान्यतेची मोहोर उमटवली. ‘दोस्ताना’ सारखा एक मुख्य प्रवाहातला आणि आघाडीच्या कलाकारांनी काढलेला सिनेमा आला. तो लोकांनी पाहिला. घराघरात टीव्हीवर सहकुटुंब पाहिला. हे दहा वर्षांपूर्वीही लोकांना खरं वाटलं नसतं. सरोगेसीचंही तेच. सरोगेट मदर हाही चर्चेचा विषय ठरला. लिव्ह इन रिलेशनशिपवर फक्त गुळगुळीत इंग्रजी मासिकांमध्येच नाही तर सर्वसामान्यांमध्येही चर्चा झाली. त्यातून नातेसंबंधांवर एक मूलभूत आणि महत्त्वाचं मंथन घडून आलं. त्यात मांडलेले मुद्दे कदाचित वरवरचेही असतील. पण त्यामुळे प्रत्येकात अनेक वादळ उभी राहिली आणि नव्या नातेसंबंधांच्या नव्या संक्रमणात प्रत्येकाला स्वत:ला तपासून पाहावंसं वाटलं. हे खूप महत्त्वाचं होतं. इतर कोणत्याही तंत्रज्ञानापासून तत्त्वज्ञानापासूनच्या सर्व संक्रमणापेक्षा महत्त्वाचं.
कधी कुणी विचारही केला नव्हता की मनमोहन सिंगांसारखा दुबळया वाणीचा नोकरशाह देशाचा पंतप्रधान बनेल. पाच वर्षं निर्वेधपणे राजवट करेल आणि पुन्हा निवडून येईल. पण ते झालं. स्वत:ला चाणक्य आणि आणखी काही म्हणवणा-या मुत्सद्दयांपेक्षाही हा प्रामाणिक प्रतिमेचा माणूस यशस्वी बनला. तिथे अमेरिकेतही एक कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असलेला काळा माणूस अध्यक्ष बनला. अमेरिकनांच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनातच बदल घडवणारे ओबामा नव्या युगाचे प्रवर्तक बनले. हे सगळं राजकारण, समाजकारणाच्या रूढ पठडयांपेक्षाही खूप वेगळं होतं. एकीकडे भारतात प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होत असल्याचे निवडणुकीचे निकाल सांगत होते, त्याचवेळेस राज ठाकरेंसारख्या मराठी अस्मितेचा मुद्दा मांडणारा नेत्यांमागे उच्चशिक्षित तरूण नादावल्यासारखा उभा राहिला आहे. आणि तिथे ऑस्ट्रेलियातही तेच घडले. हे गोंधळात पाडणार आहे आणि म्हणूनच महत्त्वाचं आहे,
जागतिक महामंदीही अशीच महत्त्वाची होती. तिने अनेकांना रस्त्यावर आणलं. होत्याचं नव्हतं करून टाकलं. अमेरिकेपासून दुबईपर्यंतचे बुरूज उध्द²वस्त करून टाकले. पण त्याने पैशाने खरंच सुख विकत घेता येतं का, हा प्रश्न उभा केला. चंगळवादाचा बुरखा फाडला. श्रमाची महती पुन्हा उभी केली. एकीकडे मोठमोठे उद्योग बंद पडत असताना बचतगटांसारख्या चळवळीने मोठी ताकद उभी केली. एकीकडे व्हिसासाठी लागणा-या रांगा वाढल्या, पण नेस्ट रिटर्न्ड एनआरआयची संख्याही वाढली. अनेक लोक परदेशात पैसा कमवून नवा भारत उभारण्यासाठी परतू लागलेत.
ही अशीच अनेक बुचकळयात पाडणारी संक्रमणं आपल्या आजुबाजूला घडत आहेत. नवनव्या वेगाने घडत राहणार आहेत. कधी काळी लोकांनी चपलांनाही विरोध केला होता. असे दिवाभीत नेहमीच असतात. दिवाभीत म्हणजे दिवसा झोपून रात्री जागणारी घुबडं. ती उजेडाचा विरोध करतच राहतात. पण म्हणून उजेड थांबत नाही. कोंबडं झालं, ते आरवलं नाही, तरीही सकाळ होतेच. ती होतच राहणार आहे. आपण त्या सकाळचं स्वागत करायला सगळयात आधी उभं राहायला हवं. कारण ती आपली परंपरा आहे. या दशकाची शेवटची मकर संक्रांत तेच सांगत आलीय.
No comments:
Post a Comment