Saturday 8 January 2011

मराठीत इंग्रजी यायलाच हवी!

आपण रोज मराठी बोलताना जे इंग्रजी शब्द वापरतो तेही आपल्याला लिहिताना खुपतात. जे बोलतो ते लिहिलं नाही, तर भाषा संपत जाते. आपण तेच करत आहोत. इंग्रजी आपल्याला स्वीकारावंच लागेल. मराठी भाषेने आपल्या प्रवासात असं कितीतरी भाषांना स्वीकारलंय. त्यामुळे आपण मराठी लिहिताना इंग्रजी शब्द वापरतो, हे मराठी संस्कृतीच्या, मराठी भाषेच्या भल्याचं काम करत आहोत. त्यासाठी कोणताही अपराधगंड डोक्यात बाळगायला नको. ठाण्याच्या साहित्य संमेलनातला एक ठराव मराठी मीडियाला मराठीचं मराठीपण हरवण्यासाठी दोषी ठरवतो. त्याला म्हणूनच मुळातून विरोध करायला हवा.


या विषयावर खूप लिहायचंय. आता झालेला लेख हजार शब्दांचा आहे. आणखी किमान पाचपट लिहून होईल. ते लिहिल्यावरच त्यावर लिहतो. बघा वाचून. नवशक्तिने हाही लेख छान छापला, धन्यवाद! यावर तुमच्या प्रतिक्रिया पाठवलात, तर याच विषयावरचं पुढचं लिहिणं अधिक भरीव होऊ शकेल. ssparab@gmail.com 

 ठाणे जिल्ह्यातल्या साहित्यिकांतलं आजचं सर्वात आदरणीय नाव म्हणजे शं. ना. नवरे. त्यामुळे ठाण्यातल्या साहित्य संमेलनात त्यांना मानाचं स्थान मिळायलाच हवं होतं. तसं ते मिळालंही. समेलनाच्या समारोपाला त्यांचं छान भाषण झालं. साहित्य संमेलनासाठी शन्नांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रणात मराठी लिखाणाच्या सात चुका होत्या, असं त्यांनी भर व्यासपीठावरून सांगितलं. अगदी स्वीकारची वेलांटीही हस्व होती त्यात. नथुराम गोडसेचा गौरव करून संमेलनानं आपली वैचारिक गरिबी आधीच सिद्ध केली होती. शन्नांनी भाषिक दारिद्र्याचीही लक्तरं मांडली. मराठीचा मोठेपणा मिरवणा-या संमेलनाच्या धुरिणांना खरं तर तोंड दाखवायला जागा नव्हती. तरीही टेंभा काही विझला नाही.

असं मराठीच्या भाषिक रुपाचं मातेरं करणा-या साहित्य संमेलनवाल्यांनी मराठी मीडियाला मात्र एक सल्ला दिलाय. विशेष म्हणजे हा सल्ला संमेलनाला आलेल्या कुणा वक्त्याचा वैयक्तिक वगैरे नाही, तर संमेलनाचा अधिकृत आहे. म्हणजे संमेलनात केलेला पाच नंबरचा हा ठराव सगळ्यांनी वाचायलाच हवा, असा आहे, मराठी वर्तमानपत्रे तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांमधून वापरल्या जाणा-या भाषिक रूपामुळे मराठीचे मराठीपण हरवत चालले असल्याबद्दल हे संमेलन चिंता व्यक्त करत आहे. पत्रकार, संपादक तसेच वृत्तवाहिन्यांचे संपादक, मालक यांनी याबाबत अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे आपापल्या माध्यमांमधून नवे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा यथायोग्य मराठी भाषेतून प्रसार करण्याचे आवाहन संमेलन करते आहे.’. ठरावाचे सूचक आहेत, श. रा. गोखले आणि अनुमोदक नंदा सुर्वे.

असा ठराव संमेलनात मांडला जातो आणि तो पासही होतो, हे खरं तर आपल्या मायमराठीचंच दुर्दैव मानायला हवं. हा ठराव म्हणजे मराठीच्या विकासात स्वतःचं काहीच योगदान न देणा-या काही बनचुक्या लेखकरावांच अगाऊपणाच आहे. आज मराठीला जिवंत ठेवणारी, वाहती ठेवणारी तसंच नव्या विचारांनी, माहितीने आणि शब्दांनी मराठीला प्रगल्भ करणारी माध्यमंच आहेत. त्यांनाच ही मंडळी असं आरोपीच्या पिंज-यात उभं करणार असतील, तर आश्चर्यच आहेत. आज मराठी वाढत असेल, तर त्यात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, इंटरनेट, रेडियो अशा माध्यमांमुळेच. कालपरवापर्यंत दाक्षिणात्य चॅनल्सकडे असुयेने पाहणारी मराठी माणसं आज आठ दहा मराठी चॅनल पाहून सुखावत आहेत. छोटे छोटे पेपरही जिल्हावार आवृत्त्या काढत आहेत, वाढत आहेत. नवे एफएम चॅनल, नव्या वेबसाईट्स भाषेचे नवे प्रयोग करत आहेत. चुकत आहेत, पण धडपडत तरी आहेत. मराठीवर पोट असणारी मीडियातली प्रयोगशील माणसंच मराठीला पुढे नेत आहेत. भरपूर समृद्धी असूनही एका हाताच्या बोटांपेक्षा कमी चॅनल असणा-या गुजरात आणि राजस्थानमधल्या माध्यमांच्या पार्श्वभूमीवर मराठी मीडियाचं काम तपासून बघायला हवं. आणि त्याबरोबरच माध्यमांनी मराठीसाठी केलेल्या कामाचं पोटभर कौतूकही व्हायला हवं. पण ते काही न होता, उलट माध्यमांवरच मराठीला कलंकित केल्याचे आरोप होत आहेत.

साहित्य संमेलनात दशकानुदशकं तेच तेच ठराव होतात. सरकार किंवा सर्वसामान्य माणसंही त्याला भीक घालत नाही. त्यातून समाजात अर्ध्या पैशाचाही बदल घडत नाही. हा आपला अनुभव आहेच. त्यामुळे अशा ठरावांना दखल न घेता सोडून द्यायला हवं. पण म्हातारी मरते त्याचा नाही, तर काळ सोकावतो त्याचा प्रश्न आहे. भाषा वाढवण्याची, श्रीमंत करण्याची जबाबदारी खऱं तर साहित्यिक, प्राध्यापक, संशोधक आणि समीक्षकांवर. तो तसा मीडियाचा थेट प्रांत नाही. पण ही सारी पांढरपेशी माणसं मराठी माणसांपासून लांब एसीत बसून मराठीची चिंता वाहण्याचे वांझ कार्यक्रम साजरे करतात. त्यात कंड शमत नाही म्हणून मातीत राबणा-या माध्यमांतल्या मराठी भाषेच्या ख-या कार्यकर्त्यांच्या डोक्यात अपराधगंड भरण्याची एकही संधी सोडत नाहीत. म्हणून याचा मुळातून विरोध व्हायला हवाय.

एकतर हा ठराव मराठीच्या कोर्टात माध्यमांना दोषी ठरवतो. पण तो थेट काहीच म्हणत नाही. मराठीचा मराठीपणा म्हणजे काय स्पष्ट उल्लेख ठरावात नाही. खरं तर हा शेकडो तास वाद घालण्याचा विषय आहे. अनेक अंगांनी त्याचा विचार आजवर झालेलाही आहे. ठरावाचा रोख मराठीच्या भाषिक रूपांवर आहे. आता भाषिक रूप म्हणजे प्रामुख्याने शब्द आणि वाक्यरचना आली. मराठी माध्यमांमधे इंग्रजी आणि हिंदीच्या वाढणा-या प्रभावाची ऍलर्जी या ठरावाला असावी, असा निष्कर्ष मांडता येतो. इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव महाराष्ट्रभर वाढतो आहे, हे सत्यच आहे. या दोन भाषांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात वाढतो आहे. त्याला घाबरायचं की या भाषांना पचवून त्यावर स्वार व्हायचं हे आपण ठरवायला हवं. यापेक्षा मोठमोठ्या भाषांना आपण मराठीत बुचकळून काढलंय. मुळात आपली मराठी भाषाच कुणा एका भाषेतून बनलेली नाही. रुक्मिणी स्वयंवरकार नरेंद्र म्हणतो तसं मराठीचं मूळ रूपही सहा भाषांतून बनलेली आहे. मराठी फक्त संस्कृतमधून निर्माण झाली, हा अभिजनप्रिय सिद्धांतही फोल असल्याचं विश्वनाथ खैरेंसारख्या भाषावैज्ञानिकांनी सिद्ध केलंय. अशावेळेस अन्य भाषेतले काही शब्द मराठीत घुसले तर फारसं सोवळंओवळं करायची काय गरज आहे.

आज आपण मराठी मानतो ते शब्दतरी कुठे मराठी आहेत. जगभरातल्या भाषांमधून मराठी आजवर समृद्ध होत गेलीय. कन्नड, गुजराती, हिंदी, उर्दू, तेलुगू या तर मराठीच्या सख्ख्या भाषाभगिनी. आपण आजही पाढे पाठ करतो ते बे एके बे म्हणत. हा बे आलाय गुजरातीतून. अगदी ज्ञानेश्वरीतही कन्नड आणि तेलुगूचा मुबलक वापर आहे. खडी हिंदी किंवा उर्दू तर मराठीत आपलंच घर असल्यासारख्या छान बागडल्या आहेत. त्यांचं बागडणं इतकं आहे की हिंदी आणि उर्दू या भाषा मराठीतूनच विकसित झाल्याचाही सिद्धांत मांडण्यात आलाय. पण फक्त हेच नाही, तर तमिळ, बंगाली, फारसी, तुर्की, अरबी, पंजाबी अशा थोड्या दूर असणा-या भाषांनीही मराठीला आपली चौथाई शेकडो वर्षं दिलीय. बायको हा आपला अस्सल मराठी शब्द मूळचा तुर्की आहे. शब्द जोडण्यासाठी येणारा व अरबीतून आलाय. दगडही आपण तमिळमधून आयात केलाय. गेल्या शतकात आपण मराठी माणसांची शेकडो नावं बंगाली नावांवर ठेवलीत. आपण मराठीतला एखादा शब्द घेऊन त्याचं मूळ शोधायला जावं तर ते कोणत्या न कोणत्या भाषेत नक्की सापडेल, अशी स्थिती आहे.

मराठी अशीच सर्व भाषांत बेबंदपणे दौडत राहिली आणि आपली श्रीमंती वाढवत राहिली, म्हणूनच ही भाषा देशात शेकडो वर्षं राज्य करत होती. पण बहुदा विसाव्या शतकाच्या दुस-या दशकाच्या आसपास आपण स्वतःला आवळून घ्यायला सुरुवात केली. एका संस्कृतशिवाय अन्य भाषेतल्या शब्दांना नो एण्ट्री लागली. भाषा वाढवण्याच्या नादात नवे शब्द बनवू लागलो. पण त्यामुळे चारही दिशांनी मराठीकडे येणारा प्रवाह आटला. तारिख हा वर्षानुवर्षं आपला शब्द होता. पण त्यातलं यावनीपण अचानक आपल्याला डाचू लागलं. त्याचा आपणच दिनांक केला. भाषाशुद्धीमागचा विचार आणि भावना उदात्त असतीलही, पण त्यामुळे मराठी वाढली का, तर बिलकूल नाही, असंच म्हणावं लागेल. मराठी राज्यकारभाराची भाषा बनल्यानंतर खरं तर वाढायला हवी होती. पण का कोण जाणे आपण शेतीला कृषि आणि पाहुण्यांना अभ्यागत म्हणायला लागलो. अगदी घरबांधणीसारख्या साध्या शब्दालाही गृहनिर्माणासारखा शब्द आपण उगाचच शोधून काढला. आज इंग्रजीमुळे अनेक चांगले मराठी शब्द संपत असल्याबद्दल हळहळ व्यक्त होतेय. पण असं म्हणणा-यांना संस्कृतमुळे आपण गमावलेल्या शब्दांचा हिशेब आधी द्यावा लागेल. खरं तर असा हिशेब कुणीच कुणाला द्यायला नको कारण शब्द काय येत जात असतात. भाषा त्यापेक्षाही महत्त्वाची आहे, आपण तिचा विचार करायला हवा.

इंग्रजांनी कोर्ट आणलं. ते मराठीसाठी अर्थातच कोर्टच होतं. हा शब्द जात्यावरच्या ओव्यांपासून माजघरातल्या म्हणींपर्यंत सगळीकडे आला. तो इतका आपला झाला की सगळ्या लिंगवचनापासून सगळ्या विभक्त्या मराठीने त्याला आपलेपणाने लावल्या. तरीही आपल्यातल्याच कुणाला तरी अचानक हा शब्द परका वाटला. आपण त्याजागी न्यायालय हा शब्द घुसवला. सगळ्या मीडियात, सरकारी कागदांत, जिथे जिथे लिहिलं जातं तिथे नव्या शब्दाला मारून मुटकून चिटकवलं. तरीही आज मराठीत वापरला जातो तो कोर्ट हाच शब्द. आपण लिहितो तो एखाद्या भाषेचा फार तर दोनचार टक्के वापर असतो. भाषा ही प्रामुख्याने बोलली जाते. तिथे इतके प्रयत्न होऊनही आपण बोलणा-या मराठीतून कोर्टला हिसकावू शकलेलो नाही. हा धडा आपल्याला पुरेसा नाही का?

कुंभाराला आपण हवं तर भांडं घडवून दे असं सागतो तसं शब्दांचं नाही करता येत. शब्द लोकच आपल्या वापरातून तयार करतात, सोडतात किंवा स्वीकारतात, असं भगवान पतंजलीने सांगून ठेवलंय. तरीही आपण बोलायची भाषा आणि लिहायची भाषा वेगळी करतच राहणार का? डॉक्टर पेशंटला डायबेटिस झाला म्हणून सांगणार आणि लिहिताना मात्र मधुमेहाचाच आग्रह धरणार. इंग्रजीत शिकणा-या मुलांशी अर्धं इंग्रजी आणि अर्धं मराठी असं बोलणार. पण पेपरात इंग्रजी शब्द आला की संपादकांना पत्रं लिहिणार.

जग बदलतंय, महाराष्ट्र बदलतोय, मराठी माणूस बदलतोय, त्याची बोलाचयी मराठी भाषा बदलतेय. अशावेळेस फक्त लिहायची मराठी भाषा तीच असावी, असा आग्रह आपण धरणार असू तर मराठीही संस्कृतसारखीच संपून जाईल. तेव्हा आपल्याच विहिरीत अडकवून ज्या कूपमंडुकांनी संस्कृतला संपवलं. तेच मराठीच्या नाशाचे गुन्हेगार असतील. त्यामुळे अशांचं ऐकण्याची काही गरज नाही. तो साहित्य संमेलनातला ठराव आहे, म्हणून तर बिल्कूलच नाही.  

3 comments:

  1. प्रिय सचिन सर जेव्हा कुठल्याही भाषेची निर्मीती झाली असेल तेव्हा त्यामागे फक्त एकच उद्देश असेल की माझ्या भावना तुंमच्या पर्यंत पोहचवणे. त्याचमुळे मला जे सांगायच ते तुम्हाला जर कळल तीथेच त्या भाषेचे कार्य संपते. मग ती भाषा महत्वाची न ठरता आपल्या मधल्या माहीतीची देवाणधेवाण होणे महत्वाचे असते. मग आपण तो आपला संवाद हातवा-याच्या भाषेत करो वा इतर कोणतेही साधन त्यासाठी वापरो फक्त संवाद होणे महत्वाचा. आपण वापरत असलेली भाषा जेवढी सरळ व सोपी असेल तेवढी ती जास्त लोक योग्य प्रकारे वापर करतील मागे एका कार्यक्रमा मधे एका थोर विचारवंतानी भाषे बद्दल आपले मत व्यक्त करताना सांगीतले होते की जर त्या भाषेची लायकी असेल तरच ती टीकेल नाहीतर नाही टीकणार.

    अमोल मोरे
    9821455601

    ReplyDelete
  2. ''मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ''
    या साठी मराठी भाषा जगायला हवी पण ती 'जुने ते सोने' या अर्थाने ललित साहित्य लिहिणारे बरेच लेखक प्रवाही भाषा नाकारतात!
    त्यांची कलाक्रुतिची भाषा ही किचकट असते ! मराठीच्या कांही अभ्यासकांचा असा पवित्रा आहे की मराठीत इंग्रजी शब्द आले तर मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात! त्यांचा अभ्यास नवोदितांसाठी चिंतेचा विषय वाटतो.अशा सर्व चळवळी आपापल्या परीने काम करत आहेत पण मला मराठीत इंग्रजी शब्द येण्याचे समर्थन करावेस वाटते !
    बाबुराव खेडेकर
    मो-९९६९६६८३६६
    http://yuvamarashtra.blogspot.com/

    ReplyDelete
  3. लेख फार छान लिहिलाय. सर्वात जास्त आवडली ती तळमळ. ज्या पोटतिडीकेने तुम्ही लिहिलेय ती विचार करायला लावते. मी बऱ्याच मुद्द्यांवर सहमत आहे. पण काही बाबतीमध्ये चर्चा करावी लागेल. आपण भेटणार आहोत एकदा.......भेटणार नक्की !
    शुभेच्छा !
    : महेश यशराज.

    ReplyDelete