Monday, 3 January 2011

हॅपी न्यू इयर

एक माझा मित्र आहे, निनाद नावाचा. तो फ्रीलान्स पत्रकार आहे आणि चांगला इवेंट मॅनेजरही. भरपूर बोलतो, बडबडतो. मी मुंबई टाइम्सचा प्रमुख असताना तो तिथे नव्याने लिहायला लागला. त्यासाठी त्याने फोन केला होता. सगळं बोलून झाल्यावर त्यानं सांगितलं तुमचा एक लेख मी लॅमिनेट करून माझ्या ऑफिसातल्या डेस्कवर लावलाय. खरं खोटं निनाद जाणे. लेखाचं नाव होतं, 'हकुना मटाटा'.


दोन वर्षांपूर्वी मुंबई टाइम्सच्या वीकेण्ड पुरवणीत ही कवर स्टोरी केली होती. स्टोरी कसली, जे सुचलं ते लिहित गेलो. तेव्हा मंदी जोरात होती. लोकांच्या नोक-या जात होत्या. २६/११ होऊन दोन महिनेच झाले होते. टेन्शन होतं वातावरणात. अशावेळेस नवं वर्षं सेलिब्रेट कसं करायचं हा प्रश्नच होता. उत्तर काय शोधणार, लिहित गेलो. मजकूर छोटा होता. लिहायला काय यावर पुस्तकही लिहिता आलं असतं. पण लेख छोटाच लिहायचा होता. डोळ्यासमोर पान दिसत होतं. भरपूर सूर्यफुलं नाहीतर डेलियाच्या फुलांच्या शेतात हा मजकूर दिसायला हवा होता. तसला फोटो कुठल्याश्या वेबसाइटवर मिळाला आणि पान सजलं. लेख अनेकांना आवडला.

या लेखातून पुढे एका कॉलमची कल्पना पुढे आली. 'अॅड़्यात्म'. जाहिरातींच्या पंचलाइन्समधलं अध्यात्म थोडक्यात लिहायचं ठरवलं. 'नेबर्स एन्वी ओनर्स प्राइड' पासून 'घराला घरपण देणारी माणसं' पर्यंत लिहिलं. कॉलम लिहायला मजा आली. लोकांचा रिस्पॉन्सही मिळाला. पत्रकार मित्रांचा रिस्पॉन्स 'विंडो सीट'ला असायचा आणि पत्रकार नसणा-यांचा 'अॅड्यात्मा'ला. मटाची नोकरी सोडेपर्यंत अॅड्यात्म लिहिलं.

गेल्यावर्षी नव्या वर्षाच्या स्वागतालाही अॅड्यात्म लिहिलं होतं. पण लेख नव्हता लिहिला. कारण तेव्हा मटातली नोकरी सोडली होती. छानपैकी तीन महिन्यांच्या नोटिस पिरियडवर होतो. पुढे काय करायचं ते नक्की नव्हतं. ते माझं आतापर्यंतचं सगळ्यात छान न्यू इयर होतं. कारण हकुना मटाटा.

लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट न करता, थोडे जुने रेफरन्स काढून नवे रेफरन्स टाकलेत.

' हकुना मटाटा' हे कुठल्याशा स्वाहिली भाषेतले दोन शब्द. ते 'लायन किंग' या अॅनिमेशनपटामुळे जगातल्या सगळ्या भाषांमधे जाऊन पोहोचलेत. विकिपिडिया त्याचा अर्थ सांगते, देअर आर नो वरीज. आपल्या भाषेत सांगायचं तर 'टेन्शन कायको लेनेका' नाहीतर ' आता कशाला उद्याची बात'. या सगळ्याचा मतलब एवढाच आहे, की आता कितीही उदास वाटत असलं, तरी हसायला तर पाहिजेच ना! 

मग त्याला नव्या वर्षासारखा चांगला मुहूर्त कुठे सापडणार?

* * *

जमाना टेन्शनचा आहे. कांदा महागलाय. बाकी सगळंही तेवढंच महाग आहे. जातीपातींतली भांडणं विकोपाला जायच्या वाटेवर आहेत. अशा वेळेस काय करायचं? टेन्शन तर येणार, अशीच स्थिती आहे.

गोविंदाची लक्स बनियनची जाहिरात आठवतेय? त्याचा एकाला धक्का लागतो. धक्का क्यूं दिया, धक्का लागलेला विचारतो. गोविंदाचं नेहमीच्या जबरदस्त टायमिंगमधलं उत्तर असतं, धक्का दिया, लेकिन तुने लिया कायको? टेन्शन घ्यायचं की नाही, हे आपल्यावर आहे. परिस्थिती कितीही बेकार असेल, आनंदी राहता येतं. अंधार कितीही असला, तरी दिवा पेटवता येतो.

संकटं आहेत, म्हणून आनंदाला मोल आहे. दु:खं आहेत, म्हणून सुखाची मजा आहे. काळोख आहे, म्हणून उजेडाला किंमत आहे. हसणं अमूल्य आहे, कारण रडणं आहे.

दु:ख हे असणारच. दु:ख हेच खरं आहे, असं भगवान बुद्ध सांगतात. कारण तोच सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. राजमाता कुंती आपल्या मुलांसाठी संकटं मागायची. कारण संकटात तापूनच सोनं तयार होतं. आता दगड बनून खाणीत पडायचं, की घाव सोसून हि-यासारखं चमकायचं ते आपल्यालाच ठरवावं लागेल ना! समुदाच्या किना-यावरची जहाजं सुरक्षित असतात, पण त्यासाठी ती बनलेली नसतात, हे एक प्रसिद्ध कोटेशन. त्यामुळे वेलकम टू मंदी. वेलकम टू दु:खं आणि वेलकम टू संकटं.

अशा अस्वस्थ दिवसातही आनंदी राहता येतं. नव्हे संकटात आनंदी जगण्याचं भरभक्कम तत्त्वज्ञान, जगण्याची रीत आणि हिमतीचा इतिहास आपणा भारतीयांकडे आहे. मग घाबरायचं कशाला? कारण आता तर त्याच्यासोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक दृष्टी जोडीला आहे. त्यातूनच समोर येणारे, उदासीत आनंदी होण्याचे हे काही साधेसुधे नुस्खे. त्यात काही नवीन नाही, आपल्याला माहीत असलेल्याच या नेहमीच्या गोष्टी. पण त्याची एक रिविजन, नव्या वर्षात शिरताना. नव्या वर्षाचे नवे संकल्प करताना.
  
रिलेशन्स

* फॅमिली लाइफ सांभाळू या. त्यात अशी उब आहे, जी कुठेच नाही मिळत.

* असा एक लाइफ पार्टनर असू दे, ज्याला मनातलं सगळं सांगता येईल.

* संकटात मदत, पण यशावर जळणार नाही. असा मित्र तुटायला नको.

* झुकावं असे पाय आणि डोकं टेकावं असे खांदे पुन्हा शोधू या.

* मुलांमधे रमू या. म्हाता-यांकडून ऐकू या. खूप शिकता येईल आपल्याला.

बी पॉझिटिव

* वाईट गोष्टीतही काहीतरी पॉझिटिव घडत असतं. ते पकडायलाच हवं

* टेन्शन कायको लेनेका. चिंतेमुळे काहीच होत नाही, ही खूणगाठ बांधू या.

* टेक इट इझी पॉलिसी. दडपण कितीही मोठं असेल, तटस्थपणे पाहू या.

* स्वत:वर शंभर टक्के विश्वास हवा. प्रयत्नांती परमेश्वर.

* नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अनलिमिटेड एन्थुझिऍझम.

खर्चापानी

* पैसा हवाच. पण सगळ्या मौल्यवान गोष्टी पैशात मोजता येत नाही.

* हवा तिथे भरपूर खर्च, पण नको तिथे पैसे कशाला?

* शॉपिंगची धम्माल हवीच. एखादी चांगली खरेदी भरपूर मजा देते.

* आपल्या गरजा मुळात किती, याचा एकदा थांबून विचार करू या.

* खर्चाचं नियोजन हवं. बिलं, हफ्ते वेळीच भरून छोटी टेन्शन्स संपवू या.

फिटनेस फण्डा

* हसायला हवं. खदखदून. एखादा लाफ्टर क्लब बघू या.

* चालू या नाहीतर पोहू या. फिटनेस का फिटनेस, फन का फन.

* आवडतं ते खाऊ या. सोबत पाणी भरपूर पिऊ या आणि कच्चं खाऊ या.

* योगासनं,  ब्रह्माविद्या,  विपश्यना काही तरी जॉइन करता येईल का?

* मेडिटेशन, कॉन्सण्ट्रेशनला पर्याय नाही.

ऐश करो

* धम्माल हवीच. दिल खोलके नाचो,  गाओ. त्यासाठी पैसे लागत नाहीत.

* आवडते सिनेमे,  टीवी शो,  गाणी,  नाटकं, चित्रं पाहायलाच हवीत.

* चित्रं,  कविता वगैरे. कधीतरी सुटलेले छंद पुन्हा जोडू या.

* जरा जवळच फिरायला जाऊ या. सहकुटुंब किंवा मित्रांसोबत.

* पुस्तकांसारखे सोबती नाहीत. वाचाल तर कितीही मंदीतही वाचाल.

ऑफिस ऑफिस

* काम असं करू या, की आपली जागा दुसरा कोणीच घेऊ शकणार नाही.

* उगाच धुसफुसण्यापेक्षा परिस्थिती समजून घेऊ या.

* मोठं ध्येय समोर हवंच. त्यासाठीच्या छोट्या पाय-यांची ध्येयं आधी ठरवू या.

* यशाला शॉर्ट कट नसतोच. स्टेशनवर पोहोचण्यापेक्षा प्रवासात आनंद आहे.

* ढोणी म्हणतो ना, एकमेकांच्या यशात आनंद मानतो, म्हणून जिंकतोय.

No comments:

Post a Comment