Monday, 28 February 2011

सामाजिक कार्यकर्ते आहेत तरी कुठे ?


आजचा लेख वाचलाय का तुम्ही, शनिवारी रात्री घरी परतल्यावर बायकोनं विचारलं.
आता लग्नाला सात वर्षं झालीत. त्यामुळे या प्रश्नाचा अर्थ मुक्ताला लेख आवडला नाही
असा ऐकणं स्वाभाविक होतं.
का आवडला नाही लेख, मी विचारलं.
अहो, हे पुस्तकाचं परीक्षण वाटलं, म्हणून विचारलं, ती म्हणाली. लेखाचं हेडिंग वेगळं आणि लेखात मात्र भलतंच, हे तिला खटकलं होतं.
बरोबर आहे गं, गेले चार पाच दिवस चंदूभाऊंच्या पुस्तकाशिवाय दुसरं डोक्यात काही नाही, म्हणून त्यावरच लिहिलं, मी म्हणालो. चार दिवस आधी लोकप्रभेत परीक्षण लिहिलं होतं. आता आणखी काय लिहायचं, म्हणून हे लिहिलं. या उत्तरावर तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं.

Saturday, 26 February 2011

यात माणूस बदलायची ताकद आहे


चंद्रकांत वानखडेंच्या दोन्ही पुस्तकांवर परीक्षणं मी लिहिलित. त्याचा मला अभिमान आणि त्यापेक्षाही जास्त आनंद आहे. आपुला चि वाद आपणासी चं परीक्षण गेल्या आठवड्यात लोकप्रभेत छापून आलं होतं. पण खरं तर ही परीक्षणं किंवा समीक्षा नाही. ही या पुस्तकांची मला भावलेली ओळख आहे. कारण असं स्वतःपासून अलिप्त ठेवून मी ही दोन्ही पुस्तकं नाही वाचू शकलो. आपुलाचिने तर खूपच अस्वस्थ झालो होतो. अमरजींकडे सांगितलेली माझी पहिली प्रतिक्रिया होती, हे पुस्तक वाचण्याचीही आपली लायकी नाही.

सोमवारी चंदूभाऊंची प्रकट मुलाखत होतेय. प्रतिमाताईंसारखं तोलामोलाचं व्यक्तिमत्त्व ही मुलाखत घेतंय. रवी बापट बोलणार आहेत. हा कार्यक्रम जबरदस्त होईलसं वाटतंय. चंदूभाऊना ऐकणं हा मुंबईकरांसाठीचा दुर्मीळ योग आहे. आपण सगळ्यांनी साधायलाच हवा तो.
कुठेः रवींद्र नाट्यमंदिराचं मिनी थिएटर, प्रभादेवी.  
कधीः २८ फेब्रुवारी २०११, संध्याकाळी ६.३० वाजता

चंदूभाऊंच्या एका साध्या सत्यासाठी!


मुंबईत रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमधे चंदूभाऊंची मुलाखत आहे. प्रतिमाताई जोशी मुलाखत घेणार आहेत. डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत. २८ फेब्रुवारी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आहे. चंदूभाऊंना ऐकणं ही खरंच पर्वणी आहे. तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचं माझ्याकडून निमंत्रण. या, आम्ही आपली वाट बघतोय.

Saturday, 19 February 2011

हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप, नक्की ना?

सचिन आज लवकर आऊट झाला. पण आता चिंता नाही. आठव्या नंबरपर्यंत आपली बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. अशावेळेस पाकिस्तानविरोद्धची टेस्ट आठवते. समोर एकामागून एक विकेट पडत होत्या. सचिन एकटा उभा होता. त्याने सेंच्युरीही केली. पण तो आऊट झाला. आणि जिंकण्यासाठी हवे असलेले वीस पंचवीस रनही पुढचे बॅट्समन करू शकले नव्हते.

आपल्या टीममधे किलर इन्स्टिंक्ट का नाही, असं तेव्हा आपण विचारायचो. कारण तो एकटाच टिच्चून खेळायचा. पण आता त्याचा खेळ बघत वाढलेली पिढी जन्माला आलीय. ती त्याच्यासोबत खेळतेय. म्हणून आज टीम इंडिया जे काही आहे, त्यात सचिनचा वाटा मोठा आहे.

फक्त त्याच्या टीममेंबरच कशाला सगळा भारत त्याच्यासोबत मोठा झालाय. तीनेक पिढ्यांनी तरी त्याला आपल्या घरातलाच एक मानलाय. त्याच्या आनंदात सगळा भारत खुष असतो. त्याच्या दुःखात सगळा भारत सुतकात असतो. इतकं प्रेम मिळेल असं कर्तृत्व बाकी कुणाचं आहे का? नाही आठवत नाव. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळो अथवा नाही, आपल्याला फारसं काही घेणंदेणं नाही. तो या सगळ्याच्या खूप पुढे पोहोचलाय. आणि त्याच्याबरोबर आपल्यासारखे त्याचे चाहतेही.

Thursday, 17 February 2011

वी फॉर वजायना


काल अचानक दादर स्टेशनावर वंदना खरे भेटल्या. त्यांच्या योनीच्या मनीच्या गुजगोष्टीचा ७५ वा प्रयोग होतोय. एकूण नव्या मराठी संस्कृतीसाठी हा एक मोठा ठेपा मानायला हवा. वजायना मोनोलॉगसारख्या अनेक दृष्टीने क्रांतिकारक नाटकाचा मराठीत प्रयोग यशस्वी होतोय. हे मराठी माणूस बदलतोय याचंच द्योतक मानायला हवं. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीच्या प्रवासात माझाही एक छोटासा वाटा आहे. खारीपेक्षाही लहान.

मुंबई टाइम्समधे असताना वॅलंटाइन डे च्या दिवशी काहितरी वेगळं करावं, असं डोक्यात होतं. आठवलं. १४ फेब्रुवारीलाच जगभर वी डे साजरा होतो. इथे वी म्हणजे वॅलेटाइन नाही तर वजायना. वजायना म्हणजे योनी. वजायना मोनोलॉगवर लिहायचं ठरवलं. वीकेण्ड पुरवणीची कवरस्टोरी करायचं ठरवलं. नेटवर सर्च केला. वी डे डॉट ऑर्ग नावाची वेबसाईटच मिळाली. त्यावर सविस्तर माहिती मिळाली. शिवाय यंदाच्या वी डे निमित्त जगभर कोणते कार्यक्रम होणार याची यादीही. त्यात मुंबईत वंदना खरे या नाटकाचा मराठी प्रयोग करणार असल्याची नोंद होती.

Tuesday, 15 February 2011

एका संपादकीय पानाचा मृत्यू


डीएनए पेपर मला आवडतो. परवडतो. मुंबईत तो लॉन्च झाल्यापासून ब-यापैकी नियमित वाचतोय. टाइम्सला त्याने दिलेली टक्कर मानायलाच हवी. त्याचा टवटवीतपणा ही सगळ्यात आवडीची गोष्ट. हा ताजेपणा त्यातल्या प्रयोगांमुळे. त्यांचा नवीन प्रयोग आहे, एडिट पेज- संपादकीय पान गायब करण्याचा. एका मोठ्या पेपराचं संपादकीय पान संपलं, पण त्यावर काही प्रतिक्रिया निदान मला दिसल्या नाहीत. आवडो न आवडो, त्यावर चर्चा घडायला हवी. म्हणून आठवड्याच्या कॉलमात त्यावर लिहिलंय. नवशक्तित छापून आल्यावर त्याला चांगल्या प्रतिक्रियाही आल्या.

पण डीएनएच्या या प्रयोगाचं स्वागत करायचं की विरोध, मला अजुनही कळलेलं नाहीय. तरीही लिहिलं. जे वाटलं ते लिहिलं. जबाबदार माणसांनी यावर अधिक चांगलं लिहायला हवंय. पण का शांत बसतात ही मोठी माणसं, नाही माहीत. आजूबाजूला एवढी स्थित्यंतर घडत असताना डोळे का बंद करून घ्यायचे, कळत नाही.

Tuesday, 8 February 2011

गणपती टॉप टेन


गणपतीबाप्पा वर मी लिहिलेला हा आणखी एक लेख. यात बाप्पाच्या गाण्यांवर लिहिलंय. मुंबई टाइम्स ऑन सॅटर्डे म्हणजेच मॉसची ही कवरस्टोरी होती. लिहिताना खूप लोकांशी बोललो होतो. छान गंमत आली. नवीन माहिती मिळाली.

यातही माझी बायलाइन दिली नव्हती. तरीही लेख आवडल्याचे दोन चार एसेमेस आले होते. काल माघी गणपती म्हणजे गणेशजयंती झाली. मुंबई कोकणात अनेक ठिकाणी घरात आणि सार्वजनिक गणपती आलेत. ते निमित्त हा लेख अपलोड करण्याचं.

Monday, 7 February 2011

बाप्पा आणि लीडरशीपचे फण्डे

आज गणपती बाप्पाचा हॅप्पी बर्थ डे. आपण आस्तिक असो, वा नास्तिक. सगळ्यांनी तो सेलिब्रेट करायलाच हवा. कारण बाप्पा हा फक्त देव कुठेय? तो आपल्याला रोजच जगताना कुठे कुठे भेटत असतो. कम्प्युटर वॉलपेपरांपासून पेपरांच्या मास्टहेडपर्यंत कुठेही.

खुदा नहीं न सही, आदमी का ख्वाब सही,
कोई हसीन नज़ारा तो हो, नज़र के लिए

असं दुष्यन्त कुमारनं लिहून ठेवलंय. ते मला बाप्पाच्या बाबतीत खूप खरं वाटतं. दरवर्षी तो घरी येतो. आठवडाभर पाहुण्यासारखा थांबतो. आवडीने पाहुणचार घेतो. जन्मभराचा सोबती होऊन जातो.