झक मारली आणि पत्रकारितेत आलो, असं सांगणारे मित्र जवळपास रोज भेटतात. पण मला तसं कधीच वाटलं नाही. पत्रकारितेत असण्याचा अभिमान आणि आनंद मी सतत अनुभवतो. पत्रकारितेत रोज नवं आणि नव्याने जगता येतं. त्यात असे काही अतीव समाधानाचे क्षण अनुभवता येतात की त्यांवर अख्खं आयुष्य आनंदात जाऊ शकतं. तसा एक अनुभव माझ्या गाठिशी आहे, तो वरळी नाक्यावरच्या भिमडीवाला बिल्डिंगमधला.
गोरेगावचे वारंग आजोबा. आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षांचे परिचित. वारकरी आणि स्वाध्यायी. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीच्या बातम्या पेपरात आल्या इतके ते सामाजिक कामात होते. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. त्यांचं काय करायचं, हा त्यांच्या घरातल्यांना मोठा प्रश्न होता. त्यांचे नातू राजू सावंत यांचे आमचे घरोब्याचे संबंध. त्यांनी मला पुस्तकं बघायला घरी यायला सांगितलं. पण मी तेव्हा नुकताच नव्या नोकरीत लागलो होतो. माझं जाणं झालं नाही. तसं त्यांनीच दोन पुस्तकांचे गठ्ठे आमच्या घरी आणले. हे गठ्ठे अनेक वर्षं शो केसच्या कपाटावर पडून होते.
सगळी पुस्तकं जुनी झाल्यामुळे थोडी फाटलेली पण नीट कव्हर घातलेली. जवळपास सगळी अध्यात्मिक. त्यात एक पुस्तक दिसलं, ‘श्रीसंत चोखामेळा महाराज याचे चरित्र व अभंग गाथा’. छान बाईंडिंग, पानं जवळपास अडीचशे. नवा खजिनाच सापडला होता. चोखोबांबद्दल थोडं फार ऐकलं होतं. पण माझ्यासाठी तो वारकरी परंपरेने घडवलेल्या क्रांतीचा दाखलाच होता. त्याहीपेक्षा मी हादरलो ते चोखोबांच्या पत्नी सोयराबाईंचे अभंग वाचताना. ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग माझ्यालेखी तोवर फक्त किशोरी आमोणकरांचाच होता. आता तो माझ्यासाठी चोखियाच्या महारीचा, सोयराबाईंचा झाला होता. मला झालेला हा साक्षात्कार मी जमेल त्याला सांगत होतो. चोखोबांवरची इतर पुस्तकं जशी जमतील तशी वाचत होतो. तेव्हा मला या चोखोबांच्या गाथेचं महात्म्य आणखी कळत होतं.
ही गाथा लिहिणारे स. भा. कदम माझ्यासाठी गूढ बनले होते. त्यांचा पुस्तकातला पत्ता वरळी नाक्याचा होता. तिथे मी एकदा जाऊन आलो. भिमडीवाला नावाची बिल्डिंग मला तिथे सापडली नाही. एकदा जयंत पवारांशी सहज बोलता बोलता हा विषय काढला. आधी पुस्तक घेऊन तर ये, असं त्यांनी त्यांच्या बारकुशा चष्म्यातून बाहेर बघत सांगितलं. मी आणलेलं पुस्तक त्यांनी नीट बघितलं. स. भा. कदम मला माहितेत. ते माझ्या वडिलांचे मित्र होते, जयंत म्हणाले. ते वारले आता. नेमाडेंनी त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली सभा आय़ोजित केली होती. नेमाडेंनीच गाथेची नवीन आवृत्ती छापली होती, ते बरंच बोलले. भिमडीवाला बिल्डिंग नसल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यांनी म्हटलं बहुतेक तिथे टॉवर होतोय. ते नंतर नायगावला राहत होते, असं ते म्हणाले. पवारांनी त्यांच्या बहिणीकडून कदमांच्या घरचा नायगावचा पत्ता मिळवून दिला.
माझ्याकडे फक्त पत्ता होता. एका दुपारी मी तिथे पोहोचलो. सगळं घर झोपलं होतं. मी पत्रकार आहे. स. भा. कदमांविषयी जाणून घ्यायला इथे आलो. माझं नाव त्यांनी वाचलं होतं. त्यामुळे सोपं झालं. स. भा. कदमांनी आणखीही बरीच पुस्तकं लिहिलीत हे कळलं. त्यातली काही पाहिली देखील. त्यांच्या अंत्ययात्रेला खूप लोक आले होते. अनेक अनोळखी माणसं कितीतरी दिवस घरी येत आणि सांगत, तुमच्या बाबांनीच आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला शिकवलं. तुमच्या बाबांनीत मला माळ दिली. माझी दारू सोडवली. चांगल्या रस्त्याला लागलो नाहीतर वायाच गेलो होतो, कदमांचा मुलगा आणि सूनबाई सांगत होते. पीएचडी करणारे लोक नेहमी भेटायला यायचे. मी एलिनॉर झेलियटनी तुमच्या वडिलांविषयी लिहिल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं एक गो-या बाईही तुमच्यासारख्याच शोधत शोधत भेटायला आल्या होत्या. मोठा भाऊ अजून जुन्या घरीच राहतो, भिमडीवाला बिल्डिंगमधेच. तिथे अधिक माहिती मिळेल असं त्यांनी सांगितलं.
मी पुढे जसा वेळ मिळाला तसा वरळी नाक्यावर गेलो. भिमडीवाला बिल्डिंगचं नाव आता भिवंडीवाला बिल्डिंग झालं होतं. तिथे असाच अचानक धडकलो. स. भा. कदमांच्या मुलानं प्रकाश कदमांनी स्वागत केलं. आमचं बोलणं ऐकून शेजारच्या दिवाणावरच्या मोटकुळाला जाग आली. नऊवारीतल्या एक जख्ख म्हाता-या बाई उठून बसल्या. सुरकुत्यांनी भरलेला तरीही नितळ चेहरा. जिवंत डोळे. स्वच्छ वाणी आणि स्पष्ट स्मरणशक्ती. स. भा. कदमांच्या पत्नी मंदाकिनी कदम बोलू लागल्या. गाथेला प्रकाशक म्हणून त्यांचंच नाव आहे. देवमाणूस असणा-या आपल्या नव-याविषयी बोलताना त्यांना पदर सारखा डोळ्याला लावावा लागत होता. तुम्हाला पांडुरंगानेच पाठवलं, असं त्या म्हणाल्या.
चोखोबांचं पुस्तक आलं तेव्हा लोक आम्हाला महारच समजायचे. आमच्या घरी पाणी प्यायचे नाहीत, त्या सांगत होत्या. सिंधुदुर्गातल्या मराठा घरात जातीपातीचं किती प्रस्थ असतं हे मी माझ्या घरात आणि बाहेरही खूप बघितलंय. आजही फक्त जातच नाही, पोटजातच नाही, तर आपल्या गावाच्या पट्ट्याबाहेरही, म्हणजे देवगड पट्टा, मालवण पट्टा, कुडाळ पट्टा अशा काही ठराविक गावांबाहेरही सोयरीक करायची इथे तयारी नसते. देवदेवस्की, रितीभाती डोक्यातून जाता जात नाहीत, हे आजही घडतंय. घरात पेजेसाठी तांदूळ नसेल, पण शहाण्णव कुळीचा माज काही जात नाही, अशी अजुनही स्थिती. असं असतानाही त्यांच्यातलाच एक असलेला स. भा. कदम हा साधा माणूस महाराष्ट्रभर फिरून एवढं मोठं काम करून ठेवतो. हे काम कोणतीही पोज न घेता, कोणतीही विद्रोहाची भाषा न बोलता, अगदी सहजपणे होऊ शकतं ते वारकरी परंपरेतच. त्यानंतर मी एका आषाढी एकादशीला चोखोबांचा चरित्रकर्ता हे छोटं स्फुट लिहिलं. स. भा. कदमांच्या अनेक जुन्या स्नेह्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरी फोन केले. पत्रं लिहिली. प्रकाश कदमांनी आवर्जून फोन करून
प्रकाश कदम पुढेही नियमित माझ्या संपर्कात होते. पण मोबाईल बदलण्याच्या नादात माझ्याकडून त्यांचा नंबर हरवला. त्यामुळे संपर्क थांबला. दोनेक महिन्यांपूर्वी आमचं ऑफिस वरळीला आलं. पुन्हा भिवंडीवाला बिल्डिंगीत गेलो. घर बंद होतं. शेजा-यांकडेही काही माहिती नव्हती. जिन्यात एक म्हातारे आजोबा दिसले. त्यांना विचारलं. त्यांनी घरी नेऊन फोन नंबर दिला. पुन्हा कदमांच्या घराशी संपर्क झाला. आता आमच्या घराजवळ म्हणजे बोरिवलीला राहायला आलो होतो. परवाच पुन्हा एकदा कदमांच्या घरी गेलो. थोडी घाई होती. पण कदम आजींना बघायचं होतं. त्यांना सगळं लक्षात होतं. आता मी मराठीत आहे म्हटल्यावर ते गजानन महाराजांचा प्रोग्राम लागतो तेच का, असंही विचारलं.
पुन्हा एकदा सविस्तर भेटायला जायला हवं. स. भा. कदमांवर पुन्हा एकदा सविस्तर लिहायला हवं. जुना लेख नव्याने कटपेस्ट. वारीला सुरुवात झालीय त्यानिमित्त.
वरळीच्या नाक्यावर भिवंडीवाला नावाची मोडकळीला आलेली गोलाकार बिल्डिंग आहे. तिचं मूळ नाव भिमडीवाला बिल्डिंग. ३५/ए, भिमडीवाला बिल्डिंग, वरळी नाका, मुंबई या पत्त्यावर न. र. फाटकांपासून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांपर्यंत आणि आचार्य अत्रेंपासून पु. ल. देशपांडेंपर्यंत अनेक दिग्गजांचा पत्रव्यवहार झालाय; कारण स. भा. कदम. सेशन कोर्टात रजिस्ट्रार असलेल्या या साध्यासरळ माणसाशी या मोठमोठ्या लोकांचा संबंध येण्याचं तसं कारण नव्हतं. पण त्यांनी लिहिलेल्या 'श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंग गाथा' या ग्रंथावर एक नजर टाकली तरी हे कारण सहज कळू शकतं.
संतसाहित्याबद्दल थोडाबहुत जरी गंभीर अभ्यास करायचा असेल तर या ग्रंथाला टाळून जाता येणार नाही. ज्ञानेश्वर-नामदेवांचे समकालीन असणारे चोखोबा महाराष्ट्राच्या संतमेळ्यातले पहिल्या फळीतले संत. तत्कालीन समाजव्यवस्थेने ज्ञानाची सगळी कवाडं बंद केलेली असतानाही त्यांनी मोठं बंड करून अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला कळस गाठला. वारकरी संप्रदायाने घडवलेल्या क्रांतीचा हा भक्कम पुरावा होता. पण त्यांची चांगली अभंग गाथा १९६९ पर्यंत उपलब्ध नव्हती. काही प्रयत्न झाले होते, पण चरित्रही उपलब्ध नव्हतं. त्याचं शल्य फारसं कुणाला वाटत नसावं. आळंदीचे श्रावणबुवा कांबळे नावाचे फाटके वारकरी मात्र त्यामुळे अस्वस्थ होते. अनेकांकडे प्रयत्न केल्यानंतर त्यांनी कदमांकडे हट्ट धरला. फावल्या वेळात संतवाङ्मयाचं मोठ्या आवडीने वाचन करणाऱ्या कदमांनी हे शिवधनुष्य उचललं.
अवघं मॅट्रिकपर्यंत शिक्षण असणाऱ्या आणि ओढग्रस्त आयुष्य असलेल्या कदमांसाठी हे सारं कठीणच होतं. पण त्यांनी हे नीट पार पाडलं, एवढंच नाही तर एक माईलस्टोन निर्माण केला. या ग्रंथात त्यांनी महाराष्ट्रभर भटकून चोखोबांचे एकत्र केलेले ३४९ अभंग आहेत. त्यांचं विषयवार वर्गीकरण केलेलं आहे. चोखोबांच्या पत्नी सोयराबाई, ज्यांनी 'अवघा रंग एक झाला' सारखा मास्टरपीस लिहिलाय, त्यांचे ९२ अभंग, बहीण निर्मळा आणि तिचे पती बंका महार यांचे अनुक्रमे २४ आणि ३९ अभंग आहेत. मराठीतला पहिला विद्रोही कवी म्हणून ज्यांचा उल्लेख व्हायला हवा ते चोखोबांचे सुपुत्र कर्ममेळा यांचे २७ अभंग एकत्र आणले आहेत. हे कमी म्हणून की काय नामदेवांनी आपला शिष्य चोखोबा यांच्यावर लिहिलेले चरित्रपर विविध अभंग यात आहेत. चोखोबांच्या समाधीसमोर म्हटली जाणारी त्यांची आरती यात आहे. कदमांचे गुरू प्रख्यात विद्वान सोनोपंत दांडेकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना, पंढरपूरचे भा. पं. बहिरट आणि मंगळवेढ्याचे रा. ग. करंदीकर यांचे चोखोबांवरचे लेखही त्यात आहेत. चोखोबांविषयीच्या लोककथांचाही त्यात समावेश आहे.
हा सगळा ऐवज घेऊन कदम यांनी अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले. पण मराठी साहित्याच्या त्या 'सुवर्णकाळा'त त्यांना कुणीच उभं केलं नाही. शेवटी पदरमोड करून, कर्ज काढून त्यांनी हा ग्रंथ स्वत: छापला आणि ही जवळपास अडीचशे पानांची हार्डबाउंड गाथा अवघ्या सहा रुपयांत उपलब्ध करून दिली. ते आणि त्यांच्या मित्रांनी दारोदार भटकून ही पुस्तकं खपवली. अनेक वर्षे मिळण्यास अवघड असलेल्या या ग्रंथाची भालचंद नेमाडे यांनी दुसरी आवृत्ती काढली. महाराष्ट्रावर अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या अमेरिकन विदुषी एलिनॉर झेलियट यांच्यासारख्यांनीही कदमांविषयी अत्यंत प्रेमाने आणि आदरपूर्वक लिहिलं आहे.
स. भा. कदमांच्या पत्नी मंदाकिनी कदम या पुस्तकाच्या प्रकाशिका आहेत. त्यांनी दोन पानांत मांडलेलं प्रकाशिकेचं मनोगत अप्रतिम आहे. प्रामाणिक आणि तज्ज्ञ अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कदमांनी निवृत्त झाल्यावर संतअभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं. बरीच छोटीमोठी पुस्तकं लिहिली. त्यात संत कबीरांचं चरित्रही आहे. दर एकादशीला ते घरी प्रवचन देत असत. त्याला मोठी गर्दी होत असे. त्यांनी निधनापर्यंत अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. त्यातून व्यसनं सोडवली. पण हे सारं कर्तृत्व अजूनही फारसं कोणाला माहीत नाही. अगदी भिमडीवाला बिल्डिंगमध्येही नाही!
Sahi, PORTER chya aimless life madhe anand kasa shodhava, yache uttar tu ch dile ahes....!
ReplyDeleteJitendra