Saturday 25 June 2011

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे


आज डॉ. सदानंद मोरेंचा वाढदिवस आहे. पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, साहित्य अकादमी विजेते लेखक, इतिहास आणि संतसाहित्याचे अभ्यासक यापेक्षाही एक स्वतंत्र प्रतिभेचे महान विचारवंत म्हणून मोरे सरांचं योगदान मला फार मोठं वाटतं. तुकाराम दर्शन आणि लोकमान्य ते महात्मा या त्यांच्या दोन्ही महाग्रंथांनी जगाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलून जातो. लिहिताना किंवा एकूणच विचार व्यक्त करताना जाती, भाषा, प्रदेश, पक्ष, संघटना, विचारधारांच्या अभिनिवेशाला बळी पडणं आज कठीण झालंय. अशावेळेस मोरेंचं लिखाण वेगळं उठून दिसतं. एकाच वेळेस सत्याचा आग्रह आणि विरोधी मताबद्दलची सहिष्णुता त्यांच्या लेखनातून सापडते. ती माझ्यासारख्या नवशिक्या पत्रकाराला महत्त्वाची वाटते.

आज नवशक्तित छापून आलेल्या लेखात वारीविषयी लिहिलंय. यातलं जे काही चांगलं आहे किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते मोरे सरांच्या लिखाणातूनच पूर्वी वाचलं असेल असं खुश्शाल समजावं. लेख कटपेस्ट.

वारी सुरू झालीय. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या समवेत लाखो पावलं पंढरीच्या दिशेने चालू लागलीत. काळी माती सावळ्या विठाईच्या दिशेने आपसूक ओढली जातेय जणू. ही पावलं फक्त आजकाल चालत नाहीयेत. तर आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींचे आईवडीलही दरवर्षी वारीला जात होते, असे उल्लेख आहेत. हजारो वर्षं हा कारवां न थांबता चालतोच आहे. दुष्काळ, पूर, लढाया किंवा रिसेशन कुणीही याला रोखू शकलेलं नाही. इतकी माणसं, इतकी वर्षं, इतकं अंतर, इतके दिवस जगाच्या पाठीवर अन्य कुठे चालत असतील असं वाटत नाही. हा चमत्कार नाही का?


मराठी माणसाची यापेक्षा मोठी ओळख खरंच दुसरी कुठली नाही. आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेली ही मराठी माणसं हा चमत्कार कोणताही गाजावाजा न करता घडवत आहेत. हे फक्त आळंदीहून किंवा देहूहून पंढरीच्या दिशेने चालणं नाही. वारी म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि सामाजिक कणाच आहे. आज महाराष्ट्राकडे जे काही चांगलं आहे, महाराष्ट्रात आजवर जे काही चांगलं झालंय त्या सगळ्याचं मूळ वारीतच जाऊन जुळतं. आज महाराष्ट्राची जी ओळख आहे, तीही या वारीनंच घडवलेली आहे. वारी नसती तर आज जो महाराष्ट्र आहे, तो नसताच. आज आपण मराठी माणूस म्हणून जी भाषा बोलतो, जो विचार करतो, जे वागतो त्यावर वारीचाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव आहे. तरीही आपल्याला या वारीचं फारसं कौतूक नाही. जगानं तोंडात बोटं टाकावीत एवढा मोठा हा इवेंट. पण आपण त्याला जागतिक व्यासपीठावर कधीच घेऊन जाऊ शकलो नाही. जग जाऊ दे, आपण मराठी माणसं वारीला भारताच्या कानाकोप-यातही पोहचवू शकलेलो नाही. प्रामाणिकपणे सांगायचं, तर जगाला वारीच्या तुलनेत जगन्नाथपुरीच्या रथयात्रेचं आणि प्रयागच्या कुंभमेळ्याचं कौतूक कितीतरी अधिक आहे. त्या तुलनेत वारी जगाला अजून अपरिचितच आहे.

बहुदा हे अतिपरिचयामुळे असावं की आपल्याला त्यात फारसं मोठेपण वाटत नाही. वारीतली माणसं फाटकीतुटकी असल्यामुळे आपण तिच्यातल्या गर्दीचंही मार्केटिंग होऊ शकलेलं नाही. वारकरी म्हणजे गावाखेड्यात राहणारे साधेसुधे शेतकरी. ते बोलके नाहीत. आपलं कवतिक सांगण्याचा त्यांचा स्वभाव नाही. शहरांतल्या बोलक्या मराठी समाजाने त्यांना आपलं मानलं, ते हातचं राखूनच. आता चोवीस तासाची मराठी न्यूज चॅनल झाल्यामुळे त्यात थोडा बदल होऊ लागला आहे. निदान बातमी म्हणून वारी चांगली कव्हर होते. त्याचे नवनवे पैलू समोर येऊ लागलेत. तिचा भव्य पसारा डोळ्यांना दिपवू लागलेला आहे. तरीही वारी हिंदी, इंग्रजी चॅनलपर्यंत पोहचवत नाही. आपल्यालाच तिचा अभिमान नाही. देशाच्या पातळीवर महाराष्ट्राचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणा-या अभिजनांच्या दृष्टीने हा फक्त एक धार्मिक सोहळा आहे. असंच असेल तर वारीला न्याय कसा मिळणार?

वारीचं धार्मिक, अध्यात्मिक अंग आहेच. पण ते इतर संप्रदायांसारखं पारंपरिक नाही. इथे कोणती कर्मकांड नाहीत. कोणते नियम नाहीत. कुणी गुरू नाही की कोणती गुरुगादीही नाही. वारी केल्याने पापांतून मुक्ती लाभत नाही. भक्तांचा लाडका विठुराया काही नवसाला पावत नाही. तो कुठले चमत्कारही करत नाही. वारीत इतके दिवस चालत पंढरपुरात पोचणा-या लाखो वारक-यांना पांडुरंगाचं दर्शनही मिळत नाही. दुरून कळसाचं दर्शन घेऊन ते आपापल्या गावी परततात. म्हणूनच इतर देवाधर्माच्या गोष्टींपेक्षा हे प्रकरण थोडं वेगळं आहे. कारण याचं वैचारिक पाठबळ खूप मोठं आहे. ते जागतिक पातळीचं आहे. मानवता, समता, बंधुता, एकता हे या बंडखोरीचं तत्त्वज्ञान आहे. पारंपरिक वैदिक अद्वैती परंपरा त्यांनी नाकारली नसली, तरी त्याचा अर्थ आपल्या बंडखोर पद्धतीने लावला आहे. वेद हे गोब्राम्हणहिता होऊनि निराळेअसल्याचा तुकोबारायांनी केलेला टणत्कार वारक-यांचं वेगळेपण सांगण्यासाठी पुरेसा आहे.  

एक दोन दशकं किंवा शतकं नाही, कमीत कमी पाचशे वर्षं महाराष्ट्रातल्या वारकरी संतांनी इथल्या मातीची मशागत केलीय. निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंतची संतांची मांदियाळी सतत बंडखोर विचारांसाठी राबत होती. त्यातून क्रांती घडली. अशी जात नव्हती की ज्यात संत निर्माण झाला नाही. हे संत त्या काळातले आधुनिक धर्मसुधारक तर होतेच, पण तितकेच उत्तम समाजसुधारक आणि लोकनेते होते. फक्त जातींच्याच नाही तर धर्माच्याही पलीकडची ही क्रांती होती. शेख महंमद श्रीगोंदेकरांचं स्थान वारकरी संतांच्या पहिल्या रांगेतलं. शेख महंमद एकटे नाहीत. अशा कित्येकांची ओळख रा. चिं. ढेरेंनी मुस्लिम मराठी संतकवीया ग्रंथात करून दिलीय.

एवढंच नाही तर ज्यांना समाजाने शोषितांपेक्षा शोषित बनवलं, त्या स्त्रियांमध्येही या परंपरेने मोठी जागृती घडवली. कुठे दासी जनाबाई होत्या, कुठे योगिनी मुक्ताबाई होत्या, कुठे बंडखोरांच्या शिरोमणी बहिणाबाई सिऊरकर होत्या, तर कुठे वेश्येच्या घरात जन्मूनही मुक्तीवर दावा ठोकणारा कान्होपात्रा होत्या. अस्पृश्य म्हणून ज्ञानापासून शेकडो योजने दूर असूनही अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग सारखं अफलातून तत्त्वज्ञान मांडणा-या चोखियाची महारी सोयराबाईंचं मोठेपण वादातीत आहे. पण त्या काही एकटा अपवाद नाहीत. सोयराबाईंसारख्याच निर्मळा, भागू महारीण, वत्सला, संताबाई, चंद्राबाई अशी दलित महिला संतांची मांदियाळी आज आपल्याला माहीत आहे. त्यांच्या आज उपलब्ध असलेलं साहित्यावर नजर जरी टाकली तरीही हादरून जायला होतं. त्या काळातल्या भयाण अज्ञानात रुतलेल्या समाजात हे क्रांतीपेक्षा कमी होतं का? आजवरच्या सा-या भारताच्या इतिहासात असं दुसरं उदाहरण आपल्याकडे आहे का?

फक्त महाराष्ट्रावरच नाही, तर वारकरी संप्रदायाचा प्रभाव पूर्ण भारतावर आहे. संतश्रेष्ठ नामदेव महाराज स्वतः आजच्या पाकिस्तानापर्यंत वारकरी पताका खांद्यावर घेऊन गेले होते. महाराष्ट्राच्या बाहेर विठ्ठलाची जितकी मंदिरं नाहीत तितकी नामदेवांची आहेत. त्यांनी फक्त मराठीत नाही तर तेव्हाच्या सहा प्रमुख भाषांत काव्यरचना केली आहे. शिखांच्या पवित्र गुरुग्रंथ साहेबात त्यांचे अभंग आहेत. देशात महाराष्ट्राबाहेर आजही असे लाखो लोक आहेत जे आपलं आडनाव नामदेव लावतात. त्यांनी देशातल्या भक्ती आंदोलनाचा निखारा फुलवायचं काम केलंय. त्यांचा कबीरांवर प्रभाव आहे, नानकांवर प्रभाव आहे, रोहिदासांवर प्रभाव आहे, मीरेवर प्रभाव आहे, नरसी मेहतांवर प्रभाव आहे. प्रवासाची, संवादाची आजच्यासारखी साधनं नसताना त्यांनी हे करून दाखवलंय. पण आपल्याला हे नामदेव माहीतच नाहीत. आपल्याला कुत्र्यामागे तूप घेऊन धावणारा, कच्चं मडकं असणारा भाववेडा भाबडा नाम्याच ठावूक. कबीराची दिंडी अगदी कालपरवापर्यंत दरवर्षी काशीहून न चुकता पंढरीला येत होती. कबिराचा लाडका मुलगा कमालाची समाधी आपल्या पंढरपुरातच अगदी दुर्लक्षित पडून आहे. आपल्या वैचारिक वारशाविषयी इतका अडाणीपणा आपणच करू जाणे!

फक्त धार्मिक आणि अध्यात्मिक नाही, वारकरी चळवळीने त्या काळात सामाजिक भानही दिलं. परकीय आक्रमणात आपलं सत्व आणि स्वत्व टिकवण्याचा आधार याच विचारांनी दिला. याच विचारांनी शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना लढण्याची प्रेरणा दिली. हे आता अनेक अंगांनी सिद्ध झालं आहे. एवढंच नाही तर आधुनिक काळात प्रार्थना समाजाच्या रुपाने प्रबोधनाचा पहिला हुंकार महाराष्ट्रात ऐकू आला, त्याचा आधारही वारकरी विचारच होते. ख्रिस्ती विचारांचा मुकाबला करण्यासाठी न्या. महादेव गोविंद रानडेंना तुकारामच आठवला. स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा आधुनिक काळातल्या रथी महारथींवरचा वारकरी विचारांचा प्रभाव अनेकदा मांडण्यात आलेला आहे.

पण याच काळात म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या शेवटी काही स्वजातिभामानाच्या दलदलीत अडकलेल्या विचारवंतांनी वारकरी परंपरेवर टीका करायला सुरुवात केली. इतिहासाचार्य राजवाडेंनी वारकरी संतांना संताळे म्हणून हिणवलं. इतिहासाच्या नावाने वारकरी संतांविषयी नको नको ते घुसडण्यात आलं. इतर परंपरेतल्या संतांना त्यांचं गुरू म्हणून दाखवण्यात आलं. त्याचीच री पुढेही अनेक वर्षं ओढण्यात आली. त्याचा विरोध झाला नाही असे नाही. पण आपणच आपल्या डोळ्यात धूळ उडवण्यात गुंतलो होतो, तर कोण आपले डोळे उघडू शकणार? या भानगडीत मग संतांचा अभ्यास झाला तो प्रामुख्याने अध्यात्मिक, धार्मिक आणि वाङमयाच्या अंगाने. त्याचा सामाजिक आशय क्वचितच पुढे आला. हा सामाजिक आशयच तर या परंपरेचा प्राण होता. तो जेव्हा आपण जगापुढे आणू शकू तेव्हाच आपण आपल्या वारीला जगाच्या व्यासपीठावर मांडू शकू. अन्यथा नाही.  

1 comment:

  1. aagdi khar aahe sir.... jo paryant aapan jat, dharma, pant hya goshti madhye padun rahu to paryant aaply mhanje maharashtra chya changlya goshti baddal jagal kahich kalnar nahi

    ReplyDelete