Monday, 13 June 2011

रिपोर्टर की पोर्टर?


बरेच दिवस ब्लॉगवर आलो नाही. बरेच दिवस फेसबुकावरही नव्हतो. एका कामात अडकलो होतो. पण लिहिणं तसं सुरू होतं. त्याचदरम्यान एक लेख लिहिलाय. आमचे ज्येष्ठ मित्र संजय आवटे कृषीवलचे मुख्य संपादक झालेत. त्यांच्या रिलाँचिंगच्या अंकात पत्रकारितेवर मला लेख लिहायचा होता. तेव्हा म्हणजे सात तारखेला हा लेख लिहिला. रिपोर्टर की पोर्टर असं त्याचं नाव होतं. पण तो थोडा त्रोटक होता. त्यात भर घालून, काही मुद्दे सविस्तर लिहून हा लेख तयार झालाय. नवा लेख माझ्या नवशक्तितल्या समकालीन कॉलमात रिपोर्टर आहेत कुठे या नावाने शनिवारीच छापून आलाय.

साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी पाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा टीवीच्या बातम्यांत परतलो. तेव्हा खूप गोष्टी बदलल्या होत्या. आम्ही बूम घेऊन धावायचो तेव्हाचं आणि आताचं जग बदलल्याचं दिसत होतो. त्यातला सर्वात धक्कादायक बदल होता, तो रिपोर्टरचं कमी झालेलं महत्त्वं. तेव्हा आम्ही इथे मुंबईतून बसून दिल्लीतल्या चॅनलचेही अजेंडे बदलायचो. आता रिपोर्टरकडून रेम्याडोक्याने धावत राहण्याची अपेक्षा असते. त्यावर लिहिलंय. ९५ साली ऑक्टोबरमधे कॉलेजमधे असताना माझं पहिलं आर्टिकल आज दिनांकमधे छापून आलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मीडियाकडे शक्य तितक्या डोळे उघडे ठेवून बघतोय. प्रिंट, टीवी, नेट, मराठी, हिंदी, थोडंफार इंग्रजी असं फिरून आलोय. मी स्वतःला मुळातला डेस्कवाला मानतो. तरी जास्तीत जास्त काळ बातमीदारीच केलीय. तीही अगदी आनंदाने आणि मानाने. त्यामुळे सालं रिपोर्टरची किंमत कमी होताना बघताना खूप खुपत राहतं.


नवशक्तित हा लेख छापून आला त्याच दिवशी जे. डेंची हत्या झाली. मी काही त्यांचा रेग्युलर वाचक नाही. पण तरीही हादरलो. आज सकाळीच मंत्रालयावर मोर्चालाही गेलो होतो. लेख टाकतोय.

परवाचीच गोष्ट. बाबा रामदेवला रामलीला मैदानातून पोलिसांनी उचललं. अत्यंत नाट्यपूर्ण असा हा प्रसंग. खरं तर अनेक दृष्टीने महत्त्वाची घटना. आपण वर्षानुवर्षं लक्षात ठेवू असं जबरदस्त रसायन यात तुडुंब भरलेलं. आपण ही घटना, त्याचं  टीवीवरचं लाईव रिपोर्टिंग वर्षानुवर्षं लक्षात ठेवणार आहोत. पण त्यातला एक महत्त्वाचा घटक आपल्या नजरेसमोर आहे, तरीही नजरेच्या आड होतोय. तो म्हणजे साक्षात त्यातला रिपोर्टर किंवा बातमीदार किंवा वार्ताहर.

हे सारं घडत असताना टीव्हीचे कॅमेरे सुरू होते. त्यामुळे त्यातलं सगळं नाट्य आपल्या डोळ्यादेखत घडत होतं. आपण प्रेक्षकच थेट रिपोर्टर बनलो होतो. समोर जे घडतंय, ते समजून सांगायला रामलीला मैदानावरचा टीव्हीचा रिपोर्टर अधनामधना पडद्यावर दिसत होतेच. पण त्यांच्यापेक्षा जास्त जागा होती ती छोट्या पडद्यावर आदळणाऱ्या शब्दांना. पडद्याच्या वर आणि तळाला सतत धावणा-या अक्षऱांच्या पट्ट्यांना. शिवाय आक्रमकपणे सगळंच सांगायचा आग्रह करणाऱ्या अँकर अर्थात वृत्तनिवेदकांना. या सगळ्या धांगडधिंग्यात बातमी देणारा रिपोर्टर छोट्या पडद्यावर आपली दिवसेंदिवस आक्रसून जाणारी जागा शोधतोय. हिंदी न्यूज चॅनल्सवर हे घडल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

रामदेवच्या उचलतंगडीसारखी जोरदार बातमी कव्हर करणारा एखादाही रिपोर्टर आपल्याला तासन्तास टीव्ही बघूनही लक्षात राहत नाही, ही आज वस्तुस्थिती आहे. पण अगदी सात आठ वर्षांपूर्वीपर्यंत टीव्हीवर स्थिती वेगळी होती. सगळ्या प्रेक्षकांनाही अँकर्सच्या इतकीच रिपोर्टर्सची नावंही माहीत होती. दिल्ली आणि मुंबईचे रिपोर्टर तर स्टार होतेच. पण छोट्या शहरांच्या रिपोर्टरनाही ओळख होती. लखनऊचा कमाल खान, जयपूरचा विजय विद्रोही किंवा नागपूरचा मनीष अवस्थी देखील आपल्याला नावगावानिशी माहीत होतेय आणि आता नव्या रिपोर्टर्सच काय? त्यांचे चेहरेही आपल्याला नीट लक्षात राहत नाहीत.

गेल्या काही वर्षांत टीव्हीची सगळीच गणितं बदलली आहेत. बातमी नसलेल्या बातम्या गाजवायला आधी स्टार न्यूजने सुरुवात केली. त्यांनी आधी एका पळून आलेल्या जोडप्याचं स्टुडियोत लग्न लावलं. कुणा फरार गुन्हेगाराला स्टुडियोत आणलं. त्याच काळात इंडिया टीव्ही अमिताभच्या अँग्री यंग मॅनसारखं अवतरला. दीडेक वर्षं टीव्ही पत्रकारितेला आदर्शवत ठरावं, असं हे चॅनल सुरू होतं. पण त्याची प्रेत्रकांनी साधी दखलही घेतली नव्हती. पहले उसकी साईन लेके आओ, असं सांगत त्याने व्यवस्थेवर सूड उगवायला सुरूवात केली. स्टारने सुरू केलेल्या भलत्या बातमीदारीच्या उरल्यासुरल्या सगळ्या मर्यादाही त्याने फेकून दिल्या. शक्ती कपूरचं कास्टिंग काऊच आणि बिहारच्या आमदार निवासातलं सेक्स स्कँडल यांचं स्टिंग ऑपरेशन ही सुरुवात होती. मग भूतंखेतं, नागनागिण, अश्वत्थामा छोट्या पडद्यावर बातम्या होऊन अवतरले. त्याच्या वाढत्या टीआरपीने सगळ्यांना दणके दिले. मग जवळपास सगळे चॅनल या भयानक स्पर्धेत उतरले. यात मग न्यूज चॅनलमधे न्यूजलाच जागा कमी उरली.

सकाळी भविष्य, तीर्थयात्रा आणि प्रवचनं. दुपारी टीव्ही सिरियलमधला मसाला, घाबरवणारी आरोग्यविषयक बुलेटिनं, जेवणखाण. त्यानंतर संध्याकाळपासून क्रिकेट, सिनेमा, स्पेशल्सच्या नावाखाली भूतंखेतं आणि स्टिंग ऑपरेशन अशी २४ गुणिले ७ न्यूज चॅनल्स चालू लागली. यात बातम्यांना जागाच नव्हती. नेहमीच्या बातम्या यायला लागल्या त्यादेखील मीठमसाला मारूनच. त्यातलं नाट्य नको तितकं वाढवलं जाऊ लागलं. राज ठाकरेंच्या राड्याच्यावेळी हा शिमगा आपण सगळ्यांनीच अनुभवला. तीनेक वर्षांत टीव्ही न्यूजचं सगळं व्याकरण मुळातून बदललं होत.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना कण्टेण्ट इज किंग असं शिकवलं जात. म्हणजे रिपोर्टरने आणलेली माहिती ही पत्रकारितेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण टीव्हीने हे खोटं ठरवलं. त्यांनी विज्युअल इज किंग असं म्हणायला सुरुवात केली. ज्याच्याकडे सर्वात आधी आणि सर्वोत्तम विज्युअल आणि बाईट्स असतील तो जिंकायचा. पण हिंदी इंडिया टीव्हीच्या दणक्यानंतरच्या नव्या टीव्हीचा नवा मंत्र होता, ट्रीटमेंट इज किंग. आता दुनिया की टीव्ही के इतिहास में पहली बार किंवा कमजोर दिल के लोग इसे न देखे म्हणत प्रेक्षकांना आपल्याकडे येण्यास भाग पाडलं जाऊ लागलं. तीस सेकंदांच्या विज्युअलवर अर्धा तास स्पेशल बुलेटिन चालू लागले. तडकभडक ग्राफिक्स, आक्रस्ताळे व्हॉइसओव्हर आणि चित्रविचित्र गोष्टी सांगणारे अँकर यांचा जमाना आला. यात रिपोर्टरना फारसं स्थान नव्हतं.

ऑफिसात बसून डेस्कचे सिनियर्स टीआरपीच्या गणितानुसार बातम्यांचे विषय ठरवत होते. २.५५ ला कोणत्या बातम्या जाणार आणि ५.५५ ला कोणतं स्पेशल बुलेटिन जाणार हे २४ तास आधीच ठरू लागलं. रिपोर्टर हे बाईट कलेक्टर बनले. डेस्कवाल्याने आधीच लिहिलेल्या स्क्रिप्टमधे उपयोगी ठरतील असे बाईट आणि विज्युअल गोळा करून आणणं हे त्याचं काम उरलं. शिवाय त-हेत-हेचे एक्सपर्ट छोट्या पडद्याच्या बोकांडी बसलेले होतेच. दोन दिवस मेहनत करूनही रिपोर्टर एखाद्या विषयावर जी माहिती आणतो त्यापेक्षा अधिक चांगली माहिती हे एक्स्पर्ट टीव्हीवरच्या चर्चांमधे देत होते. रिपोर्टरला डोकं वापरायला जागाच ठेवलेली नव्हती. उदाहरणार्थ, आधी एखाद्या राजकीय सभेचं कव्हरेज करणारा टीव्हीचा रिपोर्टर सभेआधी आणि सभेनंतर टीव्हीवर लाईव्ह माहिती देत असे. त्यात तो विश्लेषण करत असे. त्याला चार प्रश्न विचारले जात असत. शिवाय तो नंतर संपूर्ण सविस्तर बातमीही पॅकेज स्वरूपात सादर करत असे. पण आता स्थिती मुळातून बदललीय. सभेवर चर्चा करण्यासाठी आधीच स्टुडियोत एक्पर्ट किंवा गेस्ट बसलेले असतात. त्या चर्चेत तोंडी लावण्यापुरता रिपोर्टर दिसला तर दिसतो. पॅकेज म्हणजे संपूर्ण बातमी हा प्रकार आता फारसं उरलेलं नाही. आणि रिपोर्टर ते क्वचितच लिहितात. शिवाय त्यात आपलं मत मांडण्यासाठी म्हणजे पीटूसी द्यायलाही ते आता फारसे दिसत नाहीत. त्यात त्यांचं फक्त नाव असतं. काम नसतंच. रिपोर्टर बातमी करण्यासाठी ऑफिसबाहेर पडण्याआधीच बातम्या लिहिलेल्या असतात. त्यातल्या गाळलेल्या जागांमधले विज्युअल आणि बाईट रिपोर्टरना भरायचे असतात.

आता रिपोर्टर हे टीव्हीच्या एकूण व्यवस्थेचा आत्मा उऱला नाहीत. लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या ओबी वॅन फिल्डवर घडणाऱ्या घटना थेट ऑफिसात पोचवतात. त्यामुळे रिपोर्टरची फारशी गरज उरतच नाहीय. इंटरनेट आणि मोबाइल क्षणाक्षणाला माहितीचा स्फोट घडवत आहेत. त्यामुळे नेहमीची माहिती खूप सविस्तर ऑफिसात पोहचू लागलीय. फार महत्त्वाची बातमी नसेल तर वृत्तसंस्थांची माहिती खेळण्यासाठी पुरेशी ठरू लागलीय.

त्यात सोशल नेटवर्किंगची भर पडलीय. अगदी कालपरवा मुंबईत पाऊस पडल्यानंतर तीन दिवसांनी अनेक चॅनल्सवर मुंबईच्या पावसाची बातमी झळकली होती. कारण एवढंच होतं की सलमान खानने मुंबईच्या पावसावर ट्विट केलं होतं. त्याला फॉलो करणाऱ्या दिल्लीतल्या सिनियर्सना अचानक जाग आली होती. या सिनिअर मंडळींनी रिपोर्टरचा आणखी एक लोच्या करून ठेवलाय. तो म्हणजे कुठे काही महत्त्वाचं घडलं की सगळी मोठमोठी संपादक मंडळी मैदानात उतरतात. मग राजदीप सरदेसाई मुंबई हल्ला कव्हर करण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाच्या रस्त्यावर दिसतात किंवा बरखा दत्त कोलकात्याला ममता बॅनर्जींचा इंटरव्यू घेत असतात. एरव्ही गाढवकामं रिपोर्टरनं करायची आणि जेव्हा खरोखर चमकायची वेळ असते तेव्हा मात्र तो कुठेच नसतो.

अर्थात रिपोर्टर नावाची प्रजाती संपतेय असं नाही. पण आधी तो चॅनलची दिशा आणि अजेंडा ठरवायचा. आता तो बातम्या वाहणारा हमाल बनला आहे. हिंदी न्यूज चॅनल्सवर आज हे स्पष्टपणे घडतंय. मराठी न्यूज चॅनल्सवर एवढी वाईट स्थिती नाही. पण आज ना उद्या हे घडणार आहेच. आकाशवाणीवरच्या बातम्यांना रिपोर्टरना कधीच फारसं महत्त्व नव्हतंच. तसंच भारतातल्या इंटरनेटने रिपोर्टर्संची स्वतःची यंत्रणा कधीच उभी केलेलीच नाही, त्यामुळे त्यांचा प्रश्नच नव्हता. आता प्रिंटमधेही हा ट्रेंड दिसून येतोय. प्रिंटचे रिपोर्टर हे सुपात आहेत एवढंच. मॅगझिन्समधे तर आऊटसोर्सिंग आधीपासूनच खूप आहे. रिपोर्टर ऑफिसात पोचण्याआधीच टीव्हीवरची बातमी बघून किंवा इंटरनेटवरची माहिती उचलून बातमी तयार असते. बजेट कमी असणा-या भाषिक पत्रकारितेत एकेका बीटचे मोठे ब्युरो ठेवणं आता परवडत नाहीय. क्रीडा, अर्थ, राष्ट्रीय अशा पानांसाठी थेट बातमीदारी कमी होऊन इंटरनेट, टीव्ही आणि वृत्तसंस्थांवर अवलंबून राहणं सुरू झालंय. बातम्यांसाठी पूर्वी देशभर आणि गावागावांत बातमीदारांची जाळी उभी केली जायची. पण आता अनेक मोठ्या पेपरांना मोठमोठ्या शहरांत आपले रिपोर्टर ठेवण्याची गरज वाटत नाहीय.

त्यामुळे आता रिपोर्टरांचं काय होणार, हा प्रश्न आहे. काहीही झालं तरी बातमीचा कच्चा माल रिपोर्टरनाच आणावा लागतो. न्यूज चॅनलमधे नाही तरी वृत्तसंस्थांमधे बातमी आणण्यासाठी रिपोर्टर लागणारच. त्यामुळे कितीही झालं तरी एका पातळीनंतर बातमीदार संपवणं कुणालाच चालणारं नाही. तरीही त्याचं एकूण पत्रकारितेतलं वजन आणि महत्त्व कमी होत चाललंय. म्हातारी मेल्याचं दुःख आहेच, पण काळ सोकावल्याचं अधिक आहे. कारण यामुळे पत्रकारिता जमिनीपासून दूर होत चाललीय. 

9 comments:

  1. विषय खरेच गंभीर आहे. मी कायम प्रिंटमध्येच काम करत आल्यामुळे मला इलेक्ट्रोनिक्स माध्यमांबद्दल फारसे माहीत नाही. पण मी तुझ्या एका वाक्याशी अजिबात सहमत नाही. एका ठिकाणी तू म्हणतोस, "मॅगझिन्समधे तर आऊटसोर्सिंग आधीपासूनच खूप आहे." माझा इंडिया टुडेमधला अनुभव खूपच वेगळा आहे. इथे प्रत्येक गोष्ट मला स्वतःलाच करावी लागते. लोकांना भेटणे, माहिती मिळवणे, कोट घेणे आणि फोटो शूट लावणेदेखील. मी दैनिकात करत होतो त्याच्या चौपट काम मॅगझिनमध्ये करतो आहे आणि तेही रोज. साप्ताहिक असूनदेखील. खरे तर मॅगझिनमध्ये रिपोर्टरच राजा आहे. त्याने ओके केल्याशिवाय पान छापायलाच जात नाही.

    ReplyDelete
  2. @किरण. मी मांडलेली मतं प्रामुख्याने मराठी संदर्भातली आहेत. इंग्रजीत आणि त्यातही इंग्रजी प्रिंटमधे हे फारसं नाही दिसत.हे मान्यच.

    ReplyDelete
  3. खरे म्हटले तेर पत्रकारांची कामे वेगळ्या माध्यमातून वेगवेगळी आहेत ..तुमच्या लेखनात आजच्या चित्रित मध्यमांचा विचार दिसतो . तो खराही असेल ..पण दैनिकातल्या तरुण पत्रकारांना अधिक वेगली दिशा हतालावी लागते.....ती बरोबर की चुकीची ते काल सांगेल ..पण आज ती पत्रकार चुनुक दिसत नाही हे खरे ....

    ReplyDelete
  4. नमस्कार सर. लेख खूप छान झालाय. मुळात, विचार करायला भाग पाडतोय हा लेख असा झालाय. तुमच्या तूलनेत या क्षेत्रात मी बाळच आहे. किंबहुना, अजून जन्मच झाला नाही माझा असं म्हणू. पण खरंच अशी परिस्थिती आहे आपल्या फिल्डमध्ये???? मला धक्का बसला.

    ReplyDelete
  5. प्रेक्षकच थेट रिपोर्टर हे खरे आहे. अतिशय सुंदर लेखन. शुभेच्छा .

    ReplyDelete
  6. माझा आणि मिडीयाचा तसा संबंध नाही, पण एक प्रेक्षक म्हणून आजच्या रिपोटर्स किंवा एन्कर्सच्या अकलेचे दिवाळेच निघाल्यासारखे वाटतात. बातम्यांमध्ये बातमी कमी यांच्याच खिशातले अधिक असते. एखाद्या पक्षाची भूमिका मग ती योग्य का असेना, त्याला पाडल्याशिवाय काही चॅनेलचे भागत नाही.

    ReplyDelete
  7. आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये रिपोर्टरला कधीच स्थान नव्हतं हे विधान अडाणीपणाचे आहे. वस्तुतः आकाशवाणीच्या वृत्त विभागांमध्ये बातमीदार हेच स्टार असतात.आकाशवाणीने सगळ्यात आधी दिलेल्या बातम्या लक्षात घेतल्या, तरी पुरे.आकाशवाणीची बातमीपत्रे १० ते १५ मिनिटांची असल्याने वार्ताहरांचे v.o.कमी असतात पण असतात मात्र नक्की.

    ReplyDelete
  8. @ anonymous, आकाशवाणीत बातमीदाराचं वार्ताहराचं नाव क्वचितच कळतं म्हणून हे वाक्य लिहिलं होतं. प्रिंट, टीवीमधे गाजलेले दहा रिपोर्टर थोड्या फार नियमित वाचक प्रेक्षकालाही सहज सागंता येतील. असं आकाशवाणीचं आहे का.

    ReplyDelete