Saturday 25 June 2011

एका गावाची गोष्ट


नुकताच कोकणात जाऊन आलो. कोकणात मूळ गाव कोटकामते, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदूर्ग. पण गाव तसं नावापुरतं. मी नवसाचा, म्हणून तीन वर्षांचा असताना कुलदेवी भगवतीला दर्शनाला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गावी गेलो ते थेट लग्न झाल्यावर. त्यामुळे मी राहतो त्या कांदिवलीलाच आपला गाव मानत आलो. पुढे पत्रकारितेत आलो. कधी साहित्य संमेलनासाठी तर कधी निवडणुकांसाठी कोकणात फिरलो. कशामुळे माहीत नाही, पण आतून जाणवत राहिलं की आपली नाळ इथेच कुठेतरी लाल मातीत पुरलेली आहे.

कोकणाचं गारुड एकदा तुमच्यावर भारलं की मग इथल्या दगडमातीपासून भुताखेतांपर्यंत सगळं आपलं वाटायला लागतं. तोच आपलेपणा घेऊन मी नारायण राणे यांची मालवण मतदारसंघातली पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो होतो. साल बहुदा २००५. राणेंनी नुकतंच सेनेविरुद्ध बंड केलं होतं. मुंबईपासून बांद्यापर्यंत सारा कोकणपट्टा राणेमय झाला होता. मी तिथे पोचल्यावर माझ्या डोक्यातल्या कोकणापेक्षा वेगळंच चित्र वेगळंच दिसत होतं. मी बिनधास्त राणेंच्या राड्यांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. अनेक लोक मला समजवायला येऊ लागले. मी काय करतो, कोणाला भेटतो, यावर नजर ठेवली जात होती. अगदी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनीही मालवणात कोणतीही दादागिरी होत नसल्याचा लेख आमच्याच पेपरात लिहून मला जणू व्हिलन ठरवला होता. पण मला तिथे दहशत पावलापावलावर जाणवत होती. खासदारांनाही मारहाण होत होती. मी त्यावर बरंच लिहिलं. एक रोंबाट नावाचा कॉलमही लिहिला होता. हा सगळा अनुभव खूप मस्त होता.


कोकणाचं विशेषतः राणेंचं राजकारण जवळून समजून घेता आलं. अनेक नवे मित्र भेटले. अनेक नव्या गोष्टी कळल्या. तळकोकणाच्या सगळ्या राजकारणावर खरं तर एखादं पुस्तक लिहायला हवं. त्यातली स्थित्यंतरं मला एखाद्या सिनेमापेक्षाही आकर्षक वाटतात. पण पुस्तक लिहायचं तर खरं लिहायला हवं आणि खरं लिहिलं तर हातपाय तोडून घ्यायची तयारी ठेवायला हवी. या विषयावर पुस्तक लिहायचं की नाही, ते मी अजून ठरवलेलं नाही. पण त्याची अर्पणपत्रिका मात्र ठरवलीय. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे, बाळा वळंजू या निवडणुकांतल्या नरबळींना’.

पुस्तकाचं लांबच, निवडणुकीसाठी गेलो तेव्हा साधे लेखही लिहिले नाहीत. कारण तेव्हा मी लेख वगैरे लिहायचोच नाही. बातम्याच भरभरून लिहित राहिलो. फक्त एकच छोटासा लेख लिहिला होता. यातलं गाव हरकुळ खुर्द, माझा जिवाभावाचा दोस्त विठोबा सावंतचं. त्यामुळे त्यातली माहितीही त्याच्याकडूनच मिळालेली. हा लेख माझा खूप आवडता. विशेषतः या लेखाची शैली आणि फ्लो चांगला जमला होता. हा लेख आता पाच वर्षं जुना झालाय. लेख लिहिला तेव्हा प्रचार सुरू होता. त्या निवडणुकीत राणे तुफान मताधिक्याने जिंकले. त्यानंतर भावी मुख्यमंत्री बनून राहिले. पण आता मागच्या विधानसभेत त्यांचा शक्तिपात झाल्याचं दिसतंय. ते मुख्यमंत्री बनण्याची अपेक्षा फारशी कुणाला नाही. आता तिथलं राजकारण वेगळ्याच वळणावर असल्याचं दिसतंय.

तोच जुना लेख पुन्हा आपल्या सेवेत कटपेस्ट करतोय.

गोष्टींमध्ये असतं तसं डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव,  हरकुळ खुर्द. त्याची ही गोष्ट. बारा वाड्यांचं सात-आठशे उंबऱ्यांचं मालवण मतदारसंघातलं, कणकवली तालुक्यातलं हे गाव. निवडणुकीच्या बाजारात या गावाची किंमत आहे, साडेतीन हजार मतं.

स्वातंत्र्यानंतर देशातल्या सगळया गावांसारखंच हरकुळही काँग्रेसचं गाव. गावठणात राहणारे सावकार काँग्रेसचे पुढारी. पुढारपण करता करता त्यांनी वीज आणली,  पाणी आणलं, रस्ते आणले. पण फक्त आपल्या टापूतच! गावातल्या बाकी वाड्यांमध्ये पुढाऱ्यांविरोधात असंतोष फुलू लागला. फोंडा-कणकवलीहून समाजवादी कार्यकर्ते येऊ लागले, काँग्रेस विरोधात बोलू लागले. शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र. गावात दोन तट झाले. काँग्रेसचा गट आक्रसू लागला.

नाथ पै,  मधू दंडवते,  माणसं तशी चांगलीच होती. त्यांना मतं पडत होती. खासदार दिल्ली गाजवत होते. पण गावात मातीचेही रस्ते नव्हते. पाण्यासाठी चारमैल पायपीट होती. वीज तर स्वप्नातही नव्हती. नवा पर्याय हवा होता.

आवाज कुणाचा, शिवसेनेचा. मुंबईहून चाकरमान्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. साल ८५ -८६. सेनेचा भगवा सप्ताह. भगव्याखाली गर्दी जमू लागली. गावच्या चव्हाट्यावर भगवी सभा. उद्घाटनं. वामनराव महाडिक,  दत्ताजी साळवी,  अर्ध्या वाटेवरून चालत आले. ढोल-ताशे,  चिल्लर पिल्लर,  मोठी गर्दी. वामनराव मालवणीत बोलले. दत्ताजी तर मुलुखमैदान तोफ. ४० वर्षांत रस्ते नाही,  वीज नाही,  पाणी नाही,  काँग्रेसनी केलं काय?  काँग्रेसविरोधात बोलल्यावर टाळ्या वाजल्या. त्याची तर सवयच होती.

' थड्या'वर शाखा सुरू झाली. एका घराच्या गच्चीवर शाखेचं बस्तान. आजोळी राहणारा एक ग्रॅज्युएट बेकार शाखाप्रमुख. शिवजयंती सुरू झाली. दहीकाला,  शिवसेना वर्धापन दिन, शाखा वर्धापन दिन,  साहेबांचा वाढदिवस,  कबड्डी स्पर्धा,  क्रिकेट स्पर्धा,  बेकारांना काम नव्हतं आणि कार्यक्रमांतून सवड नव्हती. पोरं जमा होत होती.

खाडखुड करत स्कूटरवरून कणकवलीचे दोघेजण न चुकता येत होते. एकाचं बाजारपेठेत दुकान होतं,  नाव राजन तेली. तर दुसऱ्याचा डेपोसमोर एसटीडीचा बूथ, परशुराम उपरकर-म्हणजे जीजी. ते म्हणायचे,  वीज नाय,  मोर्चा काढू. टेम्पो गावात यायचे. वीज मंडळाच्या ऑफिसवर मोर्चा. बेमुदत उपोषण,  तोंडाला काळं. अधिकारी घाबरायचे. आश्वासन द्यायचे,  विजेचे खांब गावात आणू. खांब यायचे. पुन्हा मोर्चा,  वीज आली. विजेचा प्रकाश भगवा होता. नांदगाव दंगल झाली होती. गर्व से कहो हम हिंदू है. साहेबांच्या भाषणाच्या कॅसेट सभांमध्यें ऐकवल्या जात होत्या.

९० ची निवडणूक. काँग्रेसचा उमेदवार पैशाने भारी. आपला उमेदवार नारायण राणे. 'आधी कधी नाव ऐकला नाय. ठीकाय आपलो हा ना!'  प्रचार एकदम मुंबई इष्टाईल. भगव्या टोप्या,  भगवे बिल्ले,  चकाचक पोस्टरं,  रंगवलेल्या भिंती. आणि रात्री साडेबाराला राणेंची सभा. तेव्हा शेषन माहीत नव्हते. तोवर जागं ठेवण्यासाठी दशावतार सुरू होता. गाड्यांचा ताफा जोरदार. अनाऊन्समेंट झाली. दादा कपडे बदलूत येत आहेत. दादा आले. दादा बोलले. गाडी फास्ट,  एका सुरात. 'काँग्रेस काय कामाची नाय. आम्ही चित्र बदलवणार' वाक्यावाक्याला साहेबांचे नाव. चार दिवसात निकाल लागला. दादा जिंकले. पण सत्ता आली नाही. तरीही कामाचा धडाका जोरदार. रस्त्यावरती डांबर पडले. साकव तर खिशातल्या पैशातून. मुंबईत बेस्ट कमिटीचे अध्यक्षपद. सगळं लक्ष इथेच.

श्रीधर नाईकांचा खून झाला. मागे वळून पाहिलंच नाही. मग तर सत्ता आली. मंत्रालयावर भगवा. मंत्रालयात दादा. विकासाची तिरीप दिसू लागली. म्हणता म्हणता दादा सहाव्या मजल्यावर पोचलेसुद्धा. दादा मुख्यमंत्री झाले. गावात दिवाळी साजरी झाली. तेव्हासुद्धा मालवणात महिन्यातून दोनदा फेरी. आपला माणूस मुख्यमंत्री होता.

आता विकास दूर नाही. पुन्हा निवडणूक. दादाच पुन्हा सीएम बनणार. दादा प्रचाराला आले नाहीत. पण जिंकून देणं आपलं कर्तव्यच. भरघोस मतं. जिल्हापरिषदही ताब्यात होती. वाडीत रस्ते पोहचू लागले. दवाखाने सुरू झाले. विहिरी आल्या. नळही आले. बचतगट सुरू झाले. दादांचे गावातले शिलेदार फॉर्मात होते. आता आवाज शिवसेनेचाच गावातल्या काँग्रेसवाल्यांनीही सेनेत उडी घेतली होती. सेना आता प्रस्थापित. आव्हान द्यायची कुणाचीही टाप नाही.

पुन्हा निवडणूक. दादा पुन्हा प्रचारात नाही. तरी निवडून द्यायचं होतं. पुन्हा सत्ता. दादा सीएम नाहीत. वर्षभरात काय बिनसलं माहीत नाही. दादांनी सांगितलं होतं पेपरवाल्यांवर भरवसा ठेवू नका. मी तुम्हाला काय ते सांगेनच. पण आक्रित घडलंच. भूकंपच झाला जणू. राणे आणि शिवसेना आता एक नाही. यावर विश्वास बसत नव्हता. दादांवर अन्याय झाला,  शिलेदार ओरडू लागले. गाववाल्यांना पटत होतं. मोठ्या साहेबांनी असं करायला नको होतं. दादा आता काँग्रेसमध्ये. आम्ही काँग्रेसमध्ये. मग गावात शाखा कशाला?  शाखा बंद,  बोर्ड कशाला. टाकला उखडून,  विरोध करायची हिम्मत कुणाची. आवाज कुणाचा,  दादांचाच.

निवडून घोषित झाली. जीजी पुन्हा येऊ लागला. मोहूळवाडीत एक शाखाप्रमुख शोधला. नाव जाहीर झालं. पण एका रात्रीचाच काय तो खेळ. दुसऱ्या दिवशी सकाळी दादांच्या बंगल्यावर शाखाप्रमुख बसला होता. पेपरवाल्यांना सांगत होता,  मी तर काँग्रेसमध्येच. गाववालेही सांगू लागले,  आम्हीही काँग्रेसमध्येच. दारादारावर स्टिकर लागली 'आम्ही काँग्रेसचे मतदार,  नारायण राणेंना मते देणार'  आता 'पंजाला' मत द्यायचं,  'धनुष्यबाण'वाला कोण तर तो मनातच. गावचा एक चाकरमानी खासदारांना घेऊन आला. सेनेचा प्रचार गावात आला. गाव दादांचा. खासदारांना अडवायला हवं. घोषणाबाजी, बाचाबाची. मारहाण,  खासदारांनी तक्रार केली पोलिसात. गावामध्ये वॉण्टेड आणि धावाधाव. आता गावात खासदार येतात अधूनमधून. प्रचारही सुरू आहे अधूनमधून.

No comments:

Post a Comment