२००९च्या जूनमधे एकामागून एक परीक्षांचे निकाल समोर येत होते. त्यात गुजराती पोरांची संख्या खूप होती. यावर्षी परीक्षांचे निकाल वाचताना मला तेच आठवत होतं. गुजराती मुलांची नाव यंदाही मेरिट लिस्टमधे अधूनमधून दिसली. हे थोडं धक्कादायकच आहे. कारण गुजरात्यांची आपल्या लेखी ही ओळख नाही. आपल्याला गुज्जू माहीत ते असे स्कॉलर म्हणून नाहीच. तेव्हा लिहिलेल्या लेखाचा इण्ट्रो होता, ‘एखाद -दुसरा अपवाद वगळला तर यंदाच्या झाडून सगळ्या परीक्षांमध्ये गुजराती मुलं टॉपर्स आहेत. या मेरिटच्या गरब्याचं थेट गणित ग्लोबलायझेशनशी जोडलेलं आहे.’
मी राहतो तो कांदिवलीचा भाग गुजराती भाषकांचा गड आहे. माझे कित्येक शेजारी, लहानपणीचे खेळगडी, मित्रमंडळी गुजराती आहेत. आजूबाजूला जितकं मराठी ऐकलं, तितकंच गुजराती आणि हिंदीही. शेजारीपाजारी जितका नवाकाळ यायचा तितकाच गुजरात समाचार आणि मायापुरीही. त्यामुळे गुजराती भाषा कानाला डोळ्याला कधीच परकी वाटली नाही. आणि माणसंही. ती घरातलीच होती. गुजराती मित्र आमच्यासोबत दस-याचं सोनं वाटायला यायचे. आम्ही त्यांच्यासोबत दिवाळीत साल मुबारक करत फिरायचो. एकमेकांच्या बोलण्यावर, खाण्यापिण्यावर, जगण्यावर प्रभाव टाकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. गुजराती म्हणजे गर्भश्रीमंत असतात, असं काही लोकांना वाटत असतं. पण आमच्या वाडीत गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय गुजराती लॉटमधे बघितले. त्यात एक बदल समोर दिसत होता. इथले गुजराती पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणावर भर देत होते. ते निरीक्षण या लेखात नोंदवलंय. आता दरवर्षी हा बदल अनुभवता येतो. जुना लेख कटपेस्ट.
उदित चितलिया, इंजिनीअरिंग सीईटी, राज्यात पहिला
शगुन शाह, मेडिकल सीईटी, राज्यात पहिली
परार्थ शाह, आयआयटी एण्ट्रन्स, राज्यात पहिला
कंदर्प खांडवाला, सीबीएससी दहावी, मुंबईत पहिला
राजीव मेहता, आयसीएसई दहावी, मुंबईत पहिला
अंकिता शाह, बारावी प्युअर सायन्स, मुंबईत पहिली
रिद्धी शाह, बारावी, मुंबईत मुलींमध्ये पहिली
सिद्धार्थ पारेख, मुंबई युनिव्हर्सिटी, टीवायबीकॉम पहिला
ही सगळी यादी गेल्या काही वर्षांची वगैरे नाही. फक्त या वर्षीचीच आहे. या यादीतल्या सगळ्या नावांत एक साम्य आहे, ते म्हणजे ही आठच्या आठ नावं गुजराती आहेत. मुंबईतल्या गुजरातींनी गेल्या महिनाभरात आलेल्या प्रत्येक परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये राज्य केलंय. आता ते दहावीच्या रिझल्टची वाट बघत आहेत. तिथंही गुज्जूंचंच राज्य असेल, अशी त्यांना खात्री आहे.
पण गुजराती म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर मेरिटवाल्यांची इमेज बिलकुल येत नाही. गुज्जू म्हटल्यावर एकतर आपल्याला गरबा आठवतो, नाहीतर जिलेबी-फापडा. किराण्याच्या दुकानातला शा. मूळजी श्यामजी नावाचा बनिया. शेअर बाजारातला सटोडिया. लोकलमधील ग्रुपवाल्यांची बडबड. रंगीबेरंगी कपडे, गुटख्याचे तोबरे. घासाघीस करुन १००-२०० ग्रॅम भाजी घेणा-या कुठच्यातरी बेन. हीच मुंबईच्या गुजरात्यांची इमेज. यात टॉपर्सचा 'ट'देखील नाही.
हे चित्र आता बदललंय. गेली ५-७ वर्षं मेरिट लिस्टमध्ये त्यांच्या या दबदब्याचा पायरव ऐकू येत होता. सीबीएसई, आयसीएसईत त्यांचं अस्तित्व जाणवण्याइतपत होतं. पण यंदा त्यांनी आपल्या वर्चस्वाची ग्वाही सर्वदूर पसरवलीय.
आपणा मराठी माणसांच्या नजरेसाठी हे स्थित्यंतर १८० अंशांचं आहे. कारण आता आतापर्यंत गुज्जूंमध्ये शिक्षणाचं महत्त्व नव्हतंच. दहावी-बारावी झाली की बापजाद्यांच्या दुकानात, फॅक्टरीत उमेदवारी करायची. हळुहळु गल्ल्यापर्यंत पोहोचल्यावर त्याची इतिश्री व्हायची. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल असणारी मोठी दुकानं, दुकानांच्या चेन्स आणि फॅक्ट-या यांचे मालक दहावी-बारावी असल्याचं सहज दिसून येतं. असाच डिग-यांच्या भेंडोळ्याशी फटकून राहणारे मनू माणेक प्रभृती परवापर्यंत सेन्सेक्सचा चढउतार नक्की करत होते. एनआरआय असले त्यातले तरी पटेल आणि शहा फार तर ग्रॅज्युएट असतात. जगाला अचंब्यात पाडणारा धीरुभाईजम दाखवणारा माणूसही अवघा चौथी पासच होता, तर आणखी दुसरं उदाहरण कशाला हवं?
पण खुल्या व्यवस्थेने गेली दीड-दोनशे वर्ष सुखनैव चालणा-या लाइफस्टाइलला गदागदा हलवलंय. परकीय गुंतवणुकीने शेअर बाजारातल्या गुजराती व्यापा-यांचं गर्वहरण केलं. जगाच्या बाजारात आपली पत काहीच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चायनीज मालाच्या मा-यात छोटे उद्योग गळपटले. मॉलच्या धक्क्याने छोटी दुकानं धक्क्याला लागली. ट्रॅडिशनल ट्रेडिंग कंपन्यांना कॉपोर्रेट्सशी पंगा महागात पडू लागला. सफारींची जागा ब्लेझर्सनी घेतली. या सगळ्यात गुजराती गल्ल्यांची दादागिरी आऊटडेटेड झाली होती. त्यामुळे नव्या जमान्यात शिक्षणाला महत्त्व येणं स्वाभाविक होतं. शिवाय आताचं शिक्षण ब-यापैकी प्रोफेशन ओरिएन्टेडही झालं होतं.
गुजराती व्यापा-यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांच्यात कमी शिक्षणाचा आणि इंग्रजीचा प्रचंड न्यूनगंड होता. त्यामुळे त्यांचं पावलापावलावर अडू लागलं होतं. 'आमचा गुजराती समाज ग्लोबलायझेशनचा सर्वाधिक फायदा उचलणारा आहे. तो उद्याचा नाही, तर परवाचा विचार करतो. म्हणूनच एकटा गुजरात सोडून पूर्ण देशभर एसईझेडला विरोध होतो. ग्लोबल मार्केटमध्ये राहण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह राहणं आवश्यक आहे. हे हेरून त्यांनी मुलांच्या शिक्षणावर गुंतवणूक करायला सुरुवात केली,' हे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जतिन देसाई यांचं मत महत्त्वाचं आहे. या बदलाचं प्रतिबिंब गुजरात सरकारच्या शैक्षणिक धोरणातही दिसतंय. आयआयटी आणि आयआयएम असणारी दोनच राज्ये देशात आहेत. पैकी एक गुजरात. शिवाय गुजरातमध्येच मुंबई आयआयटीचं सबसेंटरही आहे.
एकदा या मार्केटमध्ये उतरल्यावर गुज्जूंनी टॉपला पोहोचण्यासाठी कंबर कसली. पैशांच्या जोरावर उत्तम कॉलेज, कोर्सेस, कोचिंग क्लासेस यांना राबवलं. उदाहरणार्थ इंजिनीअरींग सीईटीत पहिल्या आलेल्या उदितचे वडिल साधे मंडप डेकोरेटर आहेत. पण त्यांनी फक्त कोचिंग क्लासेसवर अवलंबून न राहता भरघोस मोबदला देऊन पर्सनल ट्यूशन लावली होती. मुंबईत ७० नंतर गुजरातमधून मायग्रेशन जवळपास थांबलंय. म्हणजेच बहुतांश गुजरात्यांना मिडल क्लासमध्ये प्रवेश करण्यास पुरेसा काळ मिळालाय. या मोठ्या मिडल क्लासमध्ये कुटुंबसंस्थेचा आदर ब-यापैकी टिकून आहे. त्यांच्यामध्ये पॉप्युलर असलेल्या विविध आध्यात्मिक चळवळींचाही हा एक परिणाम आहे. इथे संपूर्ण कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी झटू लागलं. आयांनी मुलांसाठी मोठी स्वप्नं पाहिली. मूळ गुजराती असलेल्या सुनिता विल्यम्समुळे मुलींच्या शिक्षणाची उरलीसुरली आबाळही संपली.
मुंबईतल्या गुजराती मीडियमच्या शाळा पूर्वीच्या तुलनेत फक्त ५ टक्के उरल्यात. या सगळ्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी मेरिट लिस्टमध्ये दिसणं स्वाभाविक होतं. कारण मुंबई परिसरातली गुजराती भाषकांची संख्या तब्बल ४० ते ४५ लाख मानली जाते.
माजी खासदार किरीट सोमय्या एक वेगळाच मुद्दा मांडतात. 'महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबईत जन्मलेल्या आमच्या पिढ्या पूर्णपणे मुंबईकर आहेत. मराठी आणि दक्षिण भारतीय शेजा-यांचा आमच्यावर खूप प्रभाव आहे. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आम्हालाही पटलं.' नोक-यांमध्येही धंद्याइतकीच कमाईची अपॉर्च्युनिटी मिळतेय. त्यामुळेही शिक्षणाकडे ओढा वाढल्याचं ते सांगतात. उदाहरणादाखल, नव्या पिढीचे सीए बापांच्या प्रॅक्टिसमध्ये बसण्याऐवजी मल्टीनॅशनल्समध्ये नोक-या करणं स्वीकारतात, असंही ते म्हणाले. सोमय्या स्वत:ही सीए आहेत.
मेरिट लिस्टमधील बरीच मुलं जैनधर्मीय आहेत, हेही लक्षात ठेवायला हवं. गेली दोनेक दशकं जैनधर्मीय मुंबईत स्वत:ची ओळख उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत ठसा उमटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ते करत आहेत. या सगळ्याचाही प्रभाव मुलांच्या आकांक्षांवर होतच असणार.
गुज्जू समाजातलं हे स्थित्यंतर मेरिट लिस्टच्या निमित्ताने आपल्याला दिसून आलंय. ‘जाने तू...’ मधला जिग्नेस किंवा सांस-बहू मालिकेतले कॉपोर्रेट विराणी ही गुज्जूंची बदललेली इमेज आहे. ग्लोबलायझेशनच्या जाळ्यात फक्त गुज्जूच नाहीत, आपण सगळेच बदलतोय. कुणाच्या बाबतीत हे बदल स्पष्ट दिसू लागलेत. काहींच्या बाबतीत नाही, एवढंच.
No comments:
Post a Comment