काही दिवस माधुरीची जाहिरात टीव्हीवर अधूनमधून दिसतेय. जितक्यांदा दिसते तेव्हा जीव जळतो. त्यावर लेख लिहिला. पण त्यात काहीतरी राहिलंय, असं वाटतं. काहीतरी अडलंय असं माझंच मला वाटतंय. काय झालंय ते कुणी सांगेल का?
टीव्हीवर जाहिराती सुरू असतात. अचानक तुतारी वाजते. तो तिच्या मोबाईलचा रिंगटोन असतो. ती टेच्यात फोन उचलते. ‘गंगूबाई बोलत्येय.’ मोलकरणीच्या वेषात दीक्षित, नेन्यांची आणि तेवढीच आपल्या सगळ्यांची माधुरी गंगूबाई बनलेली असते. ‘इनिसपेक्शन करत्येय.’ असं म्हणत ती घरातल्या भांड्यांची तपासणी करते. कथित मराठी वळणाचं हिंदी बोलते आणि ‘एक्स्पर्ट’ नावाचा एक भांडी घासायचा साबण वापराचा सल्ला देते.
घट्ट हिरवीगर्द नऊवारी आणि पाठउघडं गुलाबी ब्लाऊज ल्यालेली, छान छोट्या नथीसह डिझायनर दागिने घातलेली, पिवळ्या शेवंतीची वेणी घातलेली माधुरी यात छान दिसते. आपल्या जान्यामान्या अदा घायाळ करणा-याच असतात. पण कुणीही तिच्या दिसण्यावर फिदा होत नाही. अदांनी घायाळ होत नाही. डोक्यात एकच विचार येतो, काय हिला ही अवदसा आठवली? आता कालपरवाच ‘आजा नच ले’ या तिच्या एका इशा-यावर बॉलीवूडचं तारकादळ छोट्या पडद्यावर उतरलं होतं. तिच्या डान्सच्या एकेका स्टेपवर आजही सगळा देश जीव ओवाळून टाकायला तयार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याला फार दिवस उलटले नाहीत. तरीही तिने गंगूबाई बनावं. तिने मनात आणलं तर आजही ती चमकत्या दुनियेची राणी बनू शकते. असं असताना तिने छोट्या पडद्यावर, तेही एका जाहिरातीसाठी नोकराणी बनावं?
आपण श्रमप्रतिष्ठा हे एक महान मूल्य मानलेलं आहे. त्यामुळे मोलकरणीचं काम हलक्या प्रतीचं मानणं केव्हाही चुकीचंच आहे. या तर्काने माधुरीने एका जाहिरातीत मोलकरीण बनणं नैतिक आधारावर चुकीचं ठरवताच येणार नाही. तरीही तिला मोलकरीण बनलेली बघताना जीव जळतोच. जिथे तिला फुलं वेचताना बघत लाखो तरुण वा-यावर तरंगले. तिथेच तिने गोव-या वेचाव्यात? आणि खरंच गोव-या वेचण्याजोगी स्थिती असती. रोज कमवून आणल्याशिवाय तिच्या घरची चूल पेटली नसती. तर तिच्या गोव-या वेचणंही समजून घेण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण डॉ. नेन्यांच्या घरी खाण्याचे वांदे आहेत, असंही नाही ना! समजा मोलकरणीची प्रमुख भूमिका असलेलं एखादं नाटक, सिनेमा किवा सिरियल असती. त्यात अभिनयाला वाव असता तरी देखील समजण्यासारखं होतं. ‘बॉबी’मधे दुर्गा खोटेंनी मिसेस ब्रिगेन्झा म्हणून आयाची भूमिका केली. त्याला कुणी कधी आक्षेप घेऊच शकत नाही. पण इथे तसं काहीच नव्हतं. कुठल्या तरी थुकरट साबणाच्या तद्दन फालतू जाहिरातीत मोलकरीण बनायचं तरी कशाला?
इथे प्रश्न माधुरीच्या इमेजचा आहे. माधुरीला अख्ख्या देशाने डोक्यावर घेतलं. ती होती तेव्हा अनभिषिक्त नंबर वन होती. किमान दोन पिढ्या तिला पाहून अचानक म्हाता-याच्या तरुण झाल्या. तेवढ्याच पिढ्या तिच्यासोबत तरुण झाल्या. काही पिढ्यांनी आपण आधी का जन्मलो नाही, म्हणून तक्रारी केल्या. तिचं लग्न झाल्यावरच या पिढ्यातल्या पुरुषांनी आपलं वय झाल्याचं कबूल केलं. ती ‘एक दो तीन’ म्हणत आली तेव्हापासून ते ‘मार डाला’ म्हणत गेली तेव्हापर्यंत हे कौतूक कधीही कमी झालं नाही. देशाने तिला पद्मश्री देऊन गौरवलं. ती आणखी थोडी सिनियर झाली की महाराष्ट्रभूषण किंवा व्ही शांताराम पुरस्कार फार काही दूर नाहीत. पण यापेक्षाही मोठा पुरस्कार तिला दिला होता तो पाकिस्तानातल्या रसिकांनी. भारत पाकिस्तानची मॅच सुरू असताना त्यांनी फलक फडकावले होते, ‘माधुरी दे दो, कश्मीर ले लो’.
मराठी माणसाने तर तिला मोठाच सन्मान दिला. तिने खरं तर अनेक उथळ आणि उत्तान भूमिका केल्या. पण त्याकडे मराठी माणसाने आपलेपणाने दुर्लक्ष केलं. तिचं चांगलं तेवढंच मराठी माणसाने आणि मीडियाने पुढे आणलं. तिच्या संजय दत्तबरोबरच्या लफड्याची थानेदारपासून खलनायकपर्यंत चर्चा झाली. पण मराठी मीडियाने त्याला कधी भाव दिला नाही. दुसरी कोण असती तर मीठमसाला लावून फोडण्या दिल्या असत्या. अनिल कपूर आणि अमीऱ खान बरोबर तिचं नाव जोडलं गेलं ते मराठी माणसाने आपल्या गावीही येऊ दिलं नाही. उलट सिनेमावर लिहिणा-या सगळ्याच नावाजलेल्या मराठी लेखकांनी कौतुकाची दळणं दळली. तिच्या विरोधात ऐकून घ्यायला मराठी माणूस फारसा कधी तयार नव्हता. एम. एफ. हुसेनने तिच्यावर फिदा होऊन गजगामिनी नावाचा सिनेमा काढला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला आपल्या चित्रांत जागा दिली. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी तिच्यावर कविताच लिहिली.
तिच्यासोबत इंडस्ट्रीत दुस-या मराठी नायिका नव्हत्या असं नाही. उर्मिला मातोंडकरने धमाल उडवून दिली होती. ममता कुलकर्णीकडे एकाहून एक टॉपचे सिनेमे येत होते. अश्विनी भावेला आर के बॅनरचा सिनेमा मिळाला. भाग्यश्री पटवर्धनचा मैने प्यार किया तर सुपरडुपर हिट होता. किमी काटकरचाही जलवा होता. मयुरी कान्गो एका सिनेमात येऊन गाजून गेली. अगदी मराठीतून हिंदीत प्रयत्न केलेल्या अश्विनी भावे, वर्षा उसगावकर किंवा अर्चना जोगळेकरलाही त्यांनी आपलं मानलं नाही. माधुरीची सुरुवात खरं तर या सगळ्यांपेक्षा वाईट होती. पण तिला मराठी माणसाने आपलं मानलं. इतर कुणालाच नाही. एकटी माधुरी ती माधुरीच. दुर्गा खोटे, नलिनी जयवंत, सुलोचना, नूतन अशा एका हातावर मोजता येईल अशा सन्माननीय अभिनेत्रीच्या रांगेत मराठी माणसांनी तिला बसवलं. अगदी एक जमाना गाजवलेल्या तनुजा आणि नंदा अशांनाही तो आदर मिळाला नव्हता.
म्हणून माधुरीने मोलकरणीची भूमिका करायला नको होती. कारण ती आज नव्या मराठी माणसाचं प्रतीक बनलीय. हिंदी सिनेमाच्या सुरुवातीचा बराच काळ मराठी सिनेमात मराठी माणूस सन्मानाने दिसायचा. तो हवालदार असला तरी व्ही शांतारामांच्या ‘आदमी’मधला होता. पण मध्यंतरीच्या काळात मराठी माणूस पडद्यावर दिसला तो मोलकरीण आणि हवालदार बनून. उद्घट, कामचोर आणि त्यातही वाईट म्हणजे मोठ्या गळ्याच्या ब्लाऊज घालणा-या उफाड्याच्या मराठी मोलकरणी ही मराठी बाईची हिंदी पडद्यावरची प्रतिमा होती. आणि लाच खाणारा पोलिस ही मराठी पुरुषाची प्रतिमा. पुढे भाईगिरीच्या सिनेमांत मराठी माणूस थोडाफार दिसला तो गुंड बनून. पंजाबी, मारवाडी आडनावांच्या गर्दीत मराठी माणसाला फारसं स्थानच नव्हतं.
आता ही स्थिती नाहीय. नव्या सिनेमांमधे फक्त मराठी माणूसच नाही तर इतर कुणीही पूर्वीसारखं स्टिरियोटाइप दिसत नाहीय. मराठी माणूस आता प्रत्यक्षातही एका प्रतिमेत अडकून घेत नाही. त्यामुळेही त्याची प्रतिमा बदलतेय. पण यात फार मोठा हात सचिन तेंडुलकरबरोबरच आपल्या प्रतिभेने देशाला दिपवणा-या माधुरीचाही आहे. कारण तिने आपली मराठी ओळख कधीच सोडली नाही. ती सर्वत्र मराठी बनून राहिली. आपलं मराठी आडनाव तिने सोडलं नाही. त्यामुळेच तिच्यानंतर हिंदी सिनेमात पडद्यावर आणि पडदयामागे अनेक मराठी नावं अभिमानाने झळकली. मधुर भांडारकर किंवा आशुतोष गोवारीकरला एन. चंद्रांसारखी ओळख लपवावी लागली नाही. या सगळ्याचं क्रेडिट काही प्रमाणात का होईना माधुरीला द्यायला हवंच हवं. आणि इतकं सगळं असताना माधुरीनेच पुन्हा चक्र उलटं फिरवावं. मोलकरीण बनून यावं, हे पटत नाही.
तिने गेल्या वीस वर्षांत बदललेलं मराठी जग जवळून बघितलंय. अमेरिकेसारख्या ठिकाणी मराठी माणसांनी कर्तृत्व ती पाहून आलीय. तरीही ती जुन्या जमान्यातल्या मराठी इमेजमधेच स्वतःला अडकवून ठेवते. यात ती मराठी माणसाची ओळख बनलेली तुतारी वाजवत येते. यात ती मराठी बोलते. यात ती मराठी वेश घालून येते. आज कुणीही बोलत नाही, तरीही मराठी माणसाची जबरदस्तीने ओळख बनवलेलं हिंदी बोलते. हे सगळं सहजपणे टाळता येण्याजोगं होतं. तिच्याच सोबत हिंदी पडदा गाजवणा-या जुही चावला किंवा श्रीदेवीच्या जाहिरातींचं अनुकरण करायला काहीच हरकत नव्हती. खरं तर तिने हे टाळायलाच हवं होतं. कारण यात मराठी माणसाने आपलं मानलेल्या आमच्या अस्सल मराठमोठ्या माधुरीचाच तिने अपमान केलाय.
"झाकली मुठ सव्वा लाखाची" ही म्हण माधुरीला कोणीतरी समजवायला हवी होती..असो आता काही फायदा नाही कारण मुठ आधीच उघडली आहे..माधुरी दिक्षित ने या तुक्कर जाहिरातीसाठी थोडेफार पैसे कमावले आणि अमेरिकेला निघून गेली पण 'श्रीमंत परप्रांतीयांचा घरगडी मराठीच आणि तो सुद्धा हेल काढून बोलणारा' ही बोचरी ओळख अजून ठसठशीत करून...
ReplyDeleteएवढ्या अभिजात अभिनेत्रीने मराठी पोशाखात 'मराठी उरले घरगड्या पुरते' याची आठवण करून नको द्यायला होती.
Deletewe still love Madhuri, kaam to kaam hota hai naa....chota ho yaa bada....
ReplyDeleteshe is goddess...♥♥♥♥♥
ReplyDeleteसचिनभाऊ,
ReplyDelete‘माधुरी दे दो, कश्मीर ले लो’ हा आपल्याला सन्मान वाटतो? मला नाही वाटंत.
आपला नम्र,
-गामा पैलवान
काम तर काम असत.माधुरी दिक्षित-नेने यांना कदाचित चित्रपट सृष्टित काम नाही आहे कारण जवळपास सगळेच दिग्दर्शक नागराज मंजुळे सारख नवीन चेहरे चित्रपटात आनत आहे आणि दुसरीकडे एक विचार करा जर माधुरी दिक्षित यांनी मान आणि प्रतिष्टेचा विचार केला तर त्यांचा जहिरातीच्या माध्यमातून जो PR (सतत जाहिरातीतून दिसल्याने Advt.होते.तो PR चा फंडा आहे) होतो तो होणार नाही.म्हणून ती त्या जाहिरातीत काम करते
ReplyDelete