Saturday, 18 June 2011

मुंडे आता काय करणार?


गोपीनाथ मुंडे म्हटलं की आजही शरद पवारांच्या भ्रष्टाचाराविषयीची आंदोलनं आठवतात. त्यांना त्या काळात बघितलेली लोकं विशेषतः तेव्हाचे पत्रकार अजूनही त्या इमेजमधून बाहेर आलेले दिसत नाहीत. पण माझ्या वयाच्या पत्रकारांना ते मुंडे माहीत नाहीत. आम्ही बघितलेल्या मुंडेंच्या सभांना गर्दी जमत नाही. अगदी पाशा पटेलच्याही समोर त्यांचं भाषण फिकं पडतं. चार पत्रकारांच्या किंवा नेतेमंडळींच्या वर्तुळातून ते बाहेर पडत नाहीत. कधी पवारांशी, कधी भुजबळांशी, कधी विलासरावांशी त्यांचं मेतकूट सुरू असतं.

कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला नाही. सहज संवाद साधता येतील अशापद्धतीने ते पदाधिका-यांशीही वागताना दिसत नाहीत. ते स्वतःही आपल्या त्याच लढाऊ इमेजच्या प्रेमात आहेत. पण आता कोणत्याही पद्धतीने लढण्याची तयारी दिसत नाही. कदाचित हे फक्त माझं वैयक्तिक निरीक्षण असेल. त्यात काही ग्रह पूर्वग्रहही असू शकतील. पण तरीही माझ्या इतर मित्रांशी चर्चा करताना इतरांच्याही डोळ्यासमोर त्यांच्याबद्दलची प्रतिमा बरीचशी अशीच आहे.

त्यामुळे मुंडेंच्या नाराजीचं विश्लेषण करताना सिनियर मंडळी आणि आमच्या बरोबरची किंवा नंतरची मंडळी यांच्यात बरंच अंतर पडतं. मुंडेंचा मासबेस गडकरी, तावडेंपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे मुंडेंविरुद्ध बोलण्याची त्यांची औकात नेहमीच विचारात घ्यायला पाहिजे, हे खरंच. पण मुंडेंचा तो पूर्वीचा मासबेस खरंच उरलाय का, हा प्रश्न विचारात क्वचितच घेतला जातो. आता मराठवाड्यातून फक्त दोन आमदार निवडून आलेत, त्यात एक मुंडेंची लेक आहे, हे बघितल्यावर नव्या संदर्भात हे मासबेसचं गणित तपासून घ्यायला हवंय. मुळात महाराष्ट्रात भाजपची ताकद ती केवढी. अर्ध्यापेक्षाही कमी सीटांवर लढणारा हा पक्ष. त्यातही अनेक ठिकाणी ताकदीची बोंब. बाकीच्या अनेक राज्यांत म्हणजे उत्तर प्रदेशपासून कर्नाटकापर्यंत भाजपची स्वबळावर एकदा तरी सत्ता आलीय. तिथल्या नेत्यांना जननेता म्हणणं योग्य आहे. पण भाजपच्या एखाद्या नेत्याला असं कसं म्हणता येईल.

आता मुंडेंना शेटजी भटजींच्या पक्षातला बहुजन म्हणून झुकतं माप द्यावं, असंही नाही. खरं तर आता भाजपमधे अनेक नव्या पिढीत तावडेंपासून मुनगंटीवारांपर्यंत अनेक बहुजन चेहरे समोर आलेले आहेतच. संघाच्या एकूण स्ट्रॅटेजीत मुंडे फिट बसले म्हणून त्यांना मोठी स्पेस मिळाली. ते नसते तर त्यांच्याजागी आणखी कुणी असतं. त्यांनी अनेक बहुजन नेत्यांना भाजपमधे आणलं, तसंच अनेक बहुजनांना संपवलं हेदेखील विसरायला नको.


लेख आजच्या नवशक्तित छापून आलाय. नेहमीप्रमाणे कटपेस्ट करतोय.


आज संध्याकाळी दिल्लीत भाजपच्या धुरिणांची बैठक आहे. अजेंडा आहे, गोपीनाथ मुंडे यांची नाराजी. त्यात मुंडेंची नाराजी दूर होई, अशी एक शक्यता आहे. त्यांनीच लखनौच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचं नेतृत्व करायला महाराष्ट्रभर सभा घेत असतानाही आपण त्यांना पाहू शकू. पण मुंडेंचं यावेळचं बंड पूर्वीपेक्षा खूपच गंभीर आहे. आतापर्यंत बंड होताना मुंडे पक्ष सोडून जाणार नाहीत, हे स्पष्टपणे दिसत असे. पण आता स्थिती तशी नाही. मुंडे पक्ष सोडूही शकतात, अशी शक्यता कधी नव्हे इतक्या दाटपणे जाणवतेय. मुंडे नक्की काय करणार हे छातीठोकपण सांगणं कुणालाही कठीण आहे. त्यामुळे आता फक्त या शक्याशक्यतांचा विचार करता येणार आहे.

मुंडे भाजप सोडणार?
सध्याचा वाद मुळात उफाळून आला तो गडकरी तावडे गटातल्या विकास मठकरींची पुणे शहर अध्यक्षपदावर झालेल्या नेमणुकीवरून. मुंडे काल मुंबईच्या अध्यक्षपदावरून वैतागले होते. आता पुण्याच्या अध्यक्षपदाचा प्रश्न आहे. उद्या आणखी कुठल्या अध्यक्षपदाचा प्रश्न असणार आहे. आज विधानपरिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर पांडुरंग फुंडकरांच्या जागी विनोद तावडेंची वर्णी लावण्याचा प्रश्न आहे. उद्या इतरही नेमणुकांवरून, उमेदवारांच्या निवडीवरून वाद होत राहणार आहेत. ते आता मागे आले, तर पुन्हा असे संगीत मानापमानाचे प्रयोग लावता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनाच आता याचा सोक्षमोक्ष लावावा लागेल.

गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे मुंडेंविरोधकांचा एक मोठा गट खूपच उघडपणे समोर आला आहे. मुंडे महाजनांमुळे दुखावलेली पक्षातली अनेक मंडळी यांच्या पाठिशी आहेत. ते मुंडेंना डिवचणार. मुंडे बोंबाबोंब करणार. तेव्हा बघा मुंडे कसं ब्लॅकमेल करतात, असं तेच सांगणार. हे आता थांबणार नाही. पण मुंडेंनीच मुळात हे समजून घ्यायला हवं होतं. जवळपास पंचवीस वर्षं त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपवर अनियंत्रित सत्ता गाजवलीय. आपल्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांच्या एका फळीचं करियर कापून काढलं आहेच. त्यामुळे आता साठीतल्या मुंडेंनी थोडं दुय्यम स्थान स्वीकारून स्वतःचं महत्त्व राखयला हवंय. आपले ज्युनियर आपल्या डोक्यावर बसलेत हे वास्तव मान्य करायला ते तयार दिसत नाहीत. आणि याला ते स्वाभिमानाचा रंग देऊ पाहत आहेत. पण त्याच वेळेस आपणही अनेक वर्षं अशा अनेक सिनियर्सच्या डोक्यावर बसलो होतो. हे मात्र ते विसरलेले दिसतात. ते प्रमोद महाजनांची जागा घेण्यासाठी सरसावले खरे पण महाजनांच्या तुलनेत ते खूपच फिके पडलेले दिसतात. ते त्यांची जागा घेऊ शकलेले नाहीत. पण महाजनांनी दिल्लीत राजकारण करताना राज्यात एक मुंडे तयार केला होता. तसं दिल्लीत जाताना मुंडेंनी राज्यासाठीचा नवा मुंडे तयार केलेला नाही. एकाच वेळेस महाजन आणि मुंडे या दोन्ही दगडांवर पाय ठेवला की कपाळमोक्ष कठीण नाही.

पक्षात आपल्याला स्थान नाही आणि पक्षाला देशाच्या राजकारणात लगेच सत्ता नाही, हेही त्यांना दिसत असावं. त्यामुळे कदाचित ते सत्ताधारी पक्षात जाण्याचा भुजबळ, राणे यांचा मार्ग स्वीकारू शकतात. सत्तेविषयीची अशी भूक असेल तर मात्र त्यांचं पक्ष सोडणं नक्की मानायला हवं. फक्त कोणत्या सत्ताधारी पक्षाशी मांडवली कितपत आणि कधी यशस्वी होते, त्यावर मुहूर्त ठरणार आहे. आणि भूमिकेचीही थोडी अडचण आहेच. भुजबळांकडे मंडल आयोग होता, राणेंकडे नेत्याचं पुत्रप्रेम होतं, मुंडेंना एखाद्या भूमिकेची वाट पाहावीच लागू शकेल?

अडीच तीन महिन्यांपूर्वी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बेठक लातूर येथे होणार होती. ती ऐन वेळेला औरंगाबादला हलवण्यात आली. विलासराव देशमुखांनी मुंडेंना केलेल्या आग्रहाखातर हा बदल झाल्याचा आरोप झाला. तेव्हापासून पक्ष वाढवण्यास मुंडेंची अडचण कशी होत आहे, यावर पद्धतशीर कॅम्पेन सुरू आहे. मुंडेंचं बदललेलं दरबारी राजकारणही याला हवा तितका मालमसाला पुरवतच आहे. मुंडे गेले तरी विधानसभेतलं विरोधीपक्षनेतेपद गमावण्याखेरीज फारसं काही जाणार नाही. सगळे वंजारीही त्यांच्यासोबत नाहीत, तर ओबीसींची गोष्टच सोडा. इतर कुणी सोडा पण धनंजय मुंडेही त्यांच्यासोबत जाणार नाही. त्यांनी आणलेले चार लोक गेल्याने काही बिघडत नाही, अशी चर्चा सुरू करण्यात आली. त्यामुळे पक्षात आणि पक्षाबाहेर लोकांना मुंडेंविरोधात उभं करण्याची जोरदार तयारी आहेच. त्यात त्यांना बरंच यशही आलेलं दिसतंय.

विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात तर ही रंगसफेदी आधीच झाल्याचं सांगितलं जातंय. जिथे अडवाणींचीही पत्रास ठेवली जात नाही. मुंडेंपेक्षाही मोठं कर्तृत्व असलेल्या कल्याण सिंग, केशुभाई पटेल, उमा भारती यांना संपवलं. तिथे मुंडेंना कोण विचारतोय? शिस्त, कर्तव्य यांच्या नावाखाली उपयुक्तता हाच इथल्या तत्त्वांचा गाभा असल्यामुळे त्यात कुणी भूतकाळात काय केलं अशा भावनाप्रधान गोष्टींना स्थान नाही. त्यात मुंडेंमुळे राज्यातल्या पक्षवाढीस वेग आला हे मान्य केलं तरी मुंडे हे संघाच्या एकूण स्ट्रॅटेजीतले एक प्यादे होते. ते नसते तर त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं. त्याहीपुढे जाऊन मुंडेंनी पक्षासाठी जेवढं केलं त्याहीपेक्षा त्यांना पक्षाने अधिक दिलं, ही वस्तुस्थितीही नजरेआड करून चालणार नाही.

मुंडे भाजपमधेच राहणार?
कोणताही पक्ष आपल्या मोठ्या नेत्याने कितीही मोठी आगळीक केली तरी त्याला परतण्याची दारं बराच वेळ उघडी ठेवतो. आज संध्याकाळच्या बैठकीत अशी अनेक दारं मुंडेंसाठी उघडी होणार आहेत. महाराष्ट्राचं प्रभारीपद दिलं तर सगळा प्रश्नच संपणार आहे. पण महाजनांनंतर स्वतःच्या राज्याचं असं प्रभारीपद कोणाला देण्यात आलेलं नाहीय. तो अपवाद मुंडेंच्या बाबतीत पुन्हा केला जाईल का, हा प्रश्न आहेच. हे झालं नाही तरी अडवाणींनी स्वतः केलेला आग्रह, नेमणुकीच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचं आश्वासन, फुंडकरांनाच विधानपरिषदेतलं विरोधी पक्षनेतेपदी कायम ठेवणं अशा काही गोष्टी सांगून मुंडेंना पक्षात राहता येऊ शकेल.

त्यातही पक्षाने राष्ट्रीय पातळीवर मुंडेंना तक्रार करण्यास जागा ठेवलेली नाही. तिथे त्यांना तिथे पक्षात आणि लोकसभेत फार मोठी पदं दिलेली आहेत. या शिवाय साठीनंतरच्या मानसिकतेचाही एक भाग आहे. अख्खा जन्म ज्यांच्या विरोधात भांडणं केली. त्यांच्याच पक्षात त्याच्याच हाताखाली जाण्यातही अडचण असतेच. हे चाळीशीत पन्नाशीत सहज होऊ शकतं पण साठीत अडचणीचं होतं. आता मुंडेंना पक्षात जितका मान आणि पदं आहेत, तशी त्यांना इतर पक्षात मिळणार का, हादेखील प्रश्न आहेच.

मुंडे काँग्रेसमध्ये जाणार?
मुंडेंनी भाजप सोडलं तर ते काँग्रेसमधे जातील, हीच शक्यता सर्वाधिक तर्कसंगत आहे. कारण काँग्रेसकडे मुंडेंना देण्यासाठी सत्ता आहे. ते विलासरावा, प्रणव मुखर्जी यांना भेटल्याचं सांगितलं जातं. मुंडे आपल्यासोबत रावसाहेब दानवे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्यापैकी एक खासदार तसंच दोन्ही सभागृहांतले मिळून सहा सात आमदार घेऊन जाऊ शकतील. पण त्याबदल्यात त्यांना केंद्रात आणि राज्यात एकेक मंत्रिपद हवंय. आता काँग्रेस यासाठी तयार होईल का. पवारांसारख्या दिग्गजालाही जे झुलवत ठेवतात, त्या काँग्रेससाठी मुंडेंची ताकद फार काही मोठी नाही. त्यामुळे मुंडेंना सन्मान्य पदं मिळतील की त्यांना एकदा पक्षात घेऊन मग राणे किंवा वाघेला करण्यात येईल. काँग्रेसमधे जाण्यासाठी त्यांच्यासोबतचे किती भाजपचे कट्टर कार्यकर्ते तयार होतील, असे अनेक प्रश्नही आहेतच.

मुंडे राष्ट्रवादीत जातील?
प्रकाश सोळुंके, सुरेश धस यांच्यासारखे मुंडेचे अनेक जवळचे सरदार आधीच राष्ट्रवादीत गेलेत. राष्ट्रवादीतल्या भुजबळ आणि पिचडांची त्यांनी भेटही घेतलीय. शरद पवारांविषयी त्यांना आदर आहेच. पण राष्ट्रवादीकडे त्यांना देण्यासाठी काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यात ते अजितदादांच्या हाताखाली काम कसे करणारत्यांचा प्रमुख आधार असणा-या वंजा-यांना मराठ्यांच्या पक्षात जाण्यात कितपत स्वारस्य असेलया अशा अनेक मुद्द्यांवर मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेश अवलंबून आहे.

मुंडे शिवसेनेत जातील?
मुंडेच्या नाराजीची जेवढी दखल भाजपने घेतली त्यापेक्षाही अधिक शिवसेनेने घेतलीय. उद्धव ठाकरें सोबत त्यांच्या दोन बैठका झाल्यात. महापालिका निवडणुकांसाठी शिवशक्ती भीमशक्तीचं राजकारण जमवून आणलेलं असताना हा अपशकून उद्धवना नकोय. त्यासाठी ते मुंडेंना सेनेचा दरवाजाही उघडा ठेवू शकतील. पण उद्धव यांनी आपल्या पक्षात आधीच अन्य कुणी नेता शाबूत ठेवलेला नाही. अशावेळेस नाकापेक्षा जड मोती ते कशाला स्वीकारतीलसेनेकडे मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासनाखेरीज काहीच नाही. परवापर्यंत ज्यांच्यावर खासगी चर्चांत सतत टीका केली त्या उद्धवचं नेतृत्व ते कसं स्वीकारणार?  शिवाय मुंडेंना घ्यायचं म्हटल्यावर सेनेला भाजपशी युती मोडावी लागेल. तिथे गडकरींची भाजप मनसेशी युती करण्यात उत्सुक आहेत. ही सगळी नवी मांडामांड सेनेला परवडेल का, हा प्रश्न आहे?

मुंडे वेगळा पक्ष काढणार?
कोणत्याही पक्षात न जाता वेगळा पक्ष काढण्याचा पर्यायही मुंडेंसमोर आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंडे, भुजबळ, राणे, मनसे, शेकाप, रिपब्लिकन आणि अन्य पक्ष अशा महायुतीची पर्याय उघडपणे मांडलाही होता. पण आता त्यांच्यासोबत जाण्यासाठी भुजबळ आणि राणे तयार होण्याची शक्यता नाही. स्वतःची मंत्रिपदं, पोरांची खासदारकी सोडून ते मुंडेंना सामील कशाला होतील. मग मुंडेंचा पक्ष मनसे, शेकाप, भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पार्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, लोकभारती अशा छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र आणून नवं राजकारण करू शकेल काहे पक्ष मोठ्या आनंदाने मुंडेंसोबत जातील कशावरूनहे राजकारण यशस्वी होईल कशावरूनत्यासाठी रस्त्यावर उतरून नव्याने पक्षबांधण्याची उमेद आणि सवय मुंडेंकडे नाही. हेदेखील गेल्या काही वर्षांत सातत्याने दिसून आलंय. त्यामुळे या पर्यायाची शक्यता फार नाही.

काहीही झालं तरी, म्हणजे मुंडे भाजपमधे राहिले काय किंवा बाहेर गेले काय त्यांचं राजकारण फारकाळ चालेल असं दिसत नाही.

No comments:

Post a Comment