Friday, 14 September 2012

प्रबोधनकारांवरील व्याख्यानाचं आग्रहाचं निमंत्रण

१७ सप्टेंबर २०१०. बरोबर दोन वर्षांपूर्वी प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटची सुरुवात झाली. ती प्रबोधनकारांची सव्वाशेवी जयंती होती. संकल्पना माझीच होती. संशोधन, संपादन वगैरेही माझंच. माझा कॉलेजचा मित्र आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष राहुल शेवाळेने आर्थिक भार उचलला. काम करताना खूप मजा आली. खूप फिरावं लागलं. खूप शोधाशोध झाली. उद्धव ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्याहस्ते एका जंगी कार्यक्रमात वेबसाईटचं लॉन्चिंग झालं.

गेल्या दोन वर्षांत चार लाखांहून अधिक जणांपर्यंत, थोडं टेक्निकल भाषेत सांगायचं तर युनिक विझिटर्सपर्यंत, प्रबोधनकार घेऊन जाण्यात ही वेबसाईट यशस्वी झाली. पण साईटमधे खूपच त्रुटी राहिल्या होत्या. विशेषतः अपलोड करताना अनेक पुस्तकं अर्धवटच पडली होती. आता मला पुन्हा जाग आलीय. गेले दोन तीन महिने धावपळ सुरू आहे. सोमवारी १७ तारखेला साईटचं रिलॉन्चिंग आहे. काम जोरात सुरू आहे.

त्यानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. विषय आहे, 'आजही प्रबोधनकार महत्त्वाचे का?' लोकमान्य ते महात्मा या महाग्रंथात मोरे सरांनी प्रबोधनकारांची जशी दखल घेतली आहे, तशी या काळाचा इतिहास लिहिताना कोणीच घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सरांकडून प्रबोधनकार ऐकताना मजा येणार आहे. दिग्विजय सिंग यांनी प्रबोधनकारांनी लिहिलेलं मागचापुढचा संदर्भ नसलेलं एक पान समोर आणून गदारोळ उडवून दिला होता. असं एखादं पान काय समजून घ्यायचं? प्रबोधनकार सगळाच समजून घ्यायला हवा. त्याची सुरुवात या व्याख्यानापासून होऊ शकते.

याचबरोबर प्रबोधनकारांवर पहिला संदर्भग्रंथ लिहिणारे धर्मपाल कांबळे यांचा सत्कारही आयोजित केला आहे. ते पुण्यात पोस्टमन आहेत. अण्णा भाऊ साठेंवरही त्यांचं काम महत्त्वाचं आहे. कार्यक्रमात मजा येईल. तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण...

कधीः सोमवार १७ सप्टेंबर २०१२, संध्याकाळी ५ वाजता 
कुठेः ब्राह्मण सेवा मंडळ, दुसरा मजला, भवानीशंकर रोड, कबुतरखान्याजवळ, दादर पश्चिम. 

 तुम्हाला यायचंच आहे. आम्ही वाट बघतो आहोत.

Thursday, 6 September 2012

ठाकरेंचं मूळ कुठलं? प्रबोधनकार नेमकं काय सांगतात?


बुधवारी दिवसभर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचे ट्विट गाजत होते. त्यात ते म्हणतात, प्रबोधनकार ठाकरे (राज ठाकरेंचे आजोबा) समग्र वाङ्मय पाचव्या खंडाचे ४५ वे पान पाहा. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारनेच हे प्रसिद्ध केले आहे. त्यात ठाकरे घराण्याचा प्रवास इतिहास बिहारमधील मगधपासून भोपाळ ते चित्तोडगड ते मांडवगड ते पुणे असा शोधता येतो.

महाराष्ट्राला आत्मभान देणा-या या महान विचारवंताचं डॉक्युमेंटेशन असणा-या prabodhankar.com  या वेबसाईटचं संपादन, संशोधन मी केलं होतं. दोन वर्षांपूर्वी ही साईट आली होती. त्यामुळे अनेक पत्रकार मित्रांनी फोन करून माहिती विचारली. तीन टीवी चॅनलांनी इंटरव्यूही केले. त्यावेळी प्रबोधनकारांच्या झालेल्या थोड्याफार अभ्यासातून या ट्विटकडे बघताना समोर येणारे हे काही मुद्दे इथे मांडतो आहे. राजकारण बाजूला ठेवून निदान आपण तरी याकडे बघायला हवं.

Friday, 29 June 2012

रिंगणचा पहिला कार्यक्रम

रिंगण ने आणखी एक कार्यक्रम आयोजित केलाय. डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत. त्याचं हे निमंत्रण. 
 
थोडी अधिक माहिती 

डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत 

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या वयाची साठ वर्षं नुकतीच २५ जून २०१२ रोजी पूर्ण केली. त्यांच्या या साठीनिमित्त मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी संयुक्तपणे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार १ जुलै रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित केला आहे. 

सर्वजनवादासारखी नवी विचारधारा मांडणारे विचारवंत, तुकाराम दर्शन साठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, लोकमान्य ते महात्मा मधून इतिहासाची बहुविद्याशाखीय माडणी करणारे समतोल इतिहाससंशोधक, पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, श्रीकृष्णाच्या जीवनावर पीएचडी करणारे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, कवी, नाटककार, वक्ते, कीर्तनकार आणि प्रवचनकार डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी विविध अंगांनी आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून मनोविकास प्रकाशन आणि रिंगण आषाढी अंक यांनी मोरे सरांच्या साठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!


मी परवाच काही मित्रांना पाठवलेला मेल इथे देतोय,

मित्रांनो, दिवाळी अंक निघतात, तसा आषाढीचाही अंक असावा, अशी कल्पना गेली काही वर्षं डोक्यात होती. यावर्षी ती प्रत्यक्षात येतेय. रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार ३० जून रोजी पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय. देशभर फिरून केलेले रिपोर्ताज, मान्यवर अभ्यासकांचं नामदेवांविषयीचं चिंतन आणि भास्कर हांडे या आंतरराष्ट्रीय चित्रकाराने मुखपृष्ठावर साकारलेले अभ्यासपू्र्ण नामदेव, अशी या अंकाची काही वैशिष्ट्य.

सोबत सविस्तर प्रेस नोट, कव्हर आणि लोगो अटॅच केले आहेत. शक्य होत असेल तर कृपया आपल्या वर्तमानपत्रात, टीव्हीत, रेडियोत किंवा वेबसाईटमधे प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती. जेणेकरून अंक लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि आषाढी अंकांची दिवाळी अंकांसारखीच परंपरा निर्माण होईल.

येत्या काही दिवसांतच www.ringan.in या नावाने याची वेबसाईटही येत आहे.

धन्यवाद,
आमच्या या धडपडीत तुम्ही आमच्यासोबत आहातच, या खात्रीसह,

आपला नम्र,

सचिन परब
९९८७०३६८०५

Thursday, 14 June 2012

तुझा माझा तुका


काल सोलापूरहून एक मेल आला होता. राकेश कदम या पत्रकाराचा. बरेच दिवस ब्लॉग नाही. लिहा अशी मागणी होती. तसे मेल किंवा कमेंट गेले काही महिने सुरूच आहेत. बरेच दिवस ब्लॉग लिहिला नाही, अशी आठवण बरेच जण भेटल्यावरही करून देतात. मी ओशाळतो. पण आळस झटकत नाही. लेख लिहिलेलेही असतात ते अपलोड करायचं राहून जातं. आज आळस झटकलाय. तुकाराम सिनेमावरचा लेख अपलोड करतोय.

मला माहीत असलेला तुकोबा दिसायला वेगळाच होता. अंगापिंडानं थोराड. आडदांड. सावळा. गदागदा हसणारा. आडवा तिडवा मनमोकळा. राजा रविवर्मांच्या चित्रात आहे तसा पिळदार मिशांचा. आपला जीतू जोशी अंगापिंडानं वेगळाच. आपला आवडता नट. पण तुकाराम म्हणून नाही पटणारा. विशेषतः गुटखा तोंडात असल्यासारखे गाल आणि हनुवटी. तरीही तुकाराम बघताना जीतू हळूहळू हरवत गेला. तुकाराम म्हणून भेटत गेला. ही ताकद सिनेमाची होती. सिनेमावर लिहिणं हे मला येत नाही. मला ते काही कळतही नाही. आपल्याला काय साला एक डाव धोबीपछाडही आवडतो. तो कुठल्यातरी इंग्रजी आणि मग हिंदी सिनेमाची कॉपी आहे, हे माहीत असूनही आवडतो. त्यामुळे आपण सिनेमावर न लिहिलेलंच बरं. म्हणून सिनेमावर नाही लिहिलंय. सिनेमातून भेटणा-या तुकोबांवर लिहिलंय. तो विषय आणखी कठीण. मला त्यातलंही काही कळत नाही. तरीही लिहिलंय. अगाऊपणा आहेच अंगात. लेख कटपेस्ट करतोय. रविवारी पुरवणीत छापून आला होता. त्यावर दिवसभर फोन खणखणत राहिला.

Friday, 30 March 2012

आयक्यू कायकू..?


या लेखालाही आता बरेच दिवस झालेत. फेब्रुवारी महिन्यातला हा लेख. निवडणुका नुकत्याच आटोपल्या होत्या, तेव्हा हा लेख लिहिला होता. विषय माझा नेहमीचा आवडीचा, राज ठाकरे, मनसे. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांची एक फेसबूकवरची पोस्ट वाचली आणि धक्का बसला. त्यांना राज यांच्या पत्रकार परिषदेत आलेला अनुभव त्यात लिहिलाय. असला अनुभव काही नवीन नाही, पण त्याला अभिजीतने तोंड फोडलं. मला वाटलं अभिजीतचा पेपर लोकसत्ता त्याची दखल घेईलच. पण तसं काही दिसलं नाही. म्हणून म्हटलं आपण लिहुयाच.

या लेखाचा इण्ट्रो होता, या लेखात माझं काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी फेसबूकवर लिहिलेली एक पोस्ट आणि त्यावरच्या प्रतिक्रिया. आपलं राजकारण, लोकशाही, पत्रकारिता आणि एकूणच मराठी समाज याविषयी खूप काही सांगणारं हे सगळं.’ लेखाच्या शैलीविषयी मला खूपच कौतुकाचे फोन आले.

लेख छापून आल्यावर पुढच्याच आठवड्यात भाजपच्या एका नेत्याशी मी फोनवर बोलत होतो. कशाला नेहमी राजसाहेबांच्या विरोधात लिहिता, तो म्हणाला. यात जाब विचारणं नव्हतं तर एक जवळचा मित्र म्हणून सहज प्रेमाने केलेली चौकशी होती. काही चुकीचं लिहिलंय का, मी माझ्यापरीनं उत्तर दिलं. एखाद्या समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याला इतर कुणी विरोध करत नाही, म्हणून मी करतो, वगैरे वगैरे. उत्तर देताना मला मजा आली. गंमत वाटली. लेख पुढे कटपेस्ट.

Thursday, 29 March 2012

आपला अखिलेश कुठेय?


हा लेख लिहून तसे बरेच दिवस झाले. आता अखिलेश यादव यूपीचे सीएम बनून स्थिरस्थावर झालाही असेल. जेव्हा तो सीएम बनलाही नव्हता तेव्हा लिहिलेला हा लेख. म्हणजे नुकताच यूपीचा निकाल लागला होता. मुलायम स्वतः मुख्यमंत्री बनणार की अखिलेशला बनवणार, यावर चर्चा सुरू होत्या. लेखाचा इण्ट्रो होता, अखिलेश यादवांना अवाढव्य यूपीने खणखणीत बहुमत दिलं. पण सगळा महाराष्ट्र विश्वास ठेवू शकेल, असा एकही अखिलेश आपल्याकडे मात्र नाही. बुटकबैगणांनाच आपण दिग्गज मानत आले, त्याचा तर हा परिणाम नाही?’

लेखाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आला. तीनेक दिवस वाचक कुठून कुठून फोन करत होते. मजा आली. लेखातलं नेमकं काय अपिल होतंय, ते कळत नव्हतं. काहींना महाराष्ट्र आणि यूपीची तुलना आवडली असावी. कुणाला ठाकरे आणि पवारांची केलेलं मूल्यमापन आवडलं असावं. धारणांना थोडा धक्का बसला की लेख आवडतात बहुतेक. मलाही आपल्या धारणा तपासून घ्यावात असं वाटतं नेहमी. पण ते क्वचितच जमतं. यूपी, पवार, ठाकरे, मराठी माणूस या सगळ्यांच्याविषयी असलेल्या माझ्या धारणाही या निमित्ताने थोड्या साफसूफ झाल्या. लेख पुढे आहेच.

Thursday, 23 February 2012

शिवाजी आमुचा बाणा


रविवारी शिवजयंतीच्या दिवशी हा लेख आमच्या नवशक्तित छापून आला. मला दिवसभर लेख आवडल्याचे एसेमेस येत होते. दुस-या दिवशी आमच्या ऑफिसात कुणा पुरोहित नावाच्या माणसाच्या फोन आला होता. तो काहितरी ब्राम्हण जातीच्यांची संघटना चालवतो म्हणे. माझा मोबाइल नंबर लेखाखाली असूनही त्याने मला फोन केला नाही. काही पत्रंही पाठवलं नाही. तो मला भेटायलाही येणार होता. पण आला मात्र नाही. त्याचं म्हणणं असं की हा लेख ब्राम्हणविरोधी आहे. तसंच संत नामदेवांवर लिहिलेला लेखही ब्राम्हणविरोधी आहे. त्या लेखाचं पेपरात छापून आलेलं हेडिंग तर 'नामा म्हणे' होतं. मला हसूच आलं. मी अस्वस्थही झालो. तुम्हीच सांगा हे लेख ब्राम्हणविरोधी आहेत का. लेख जशाच्या तशा कटपेस्ट केलाय. 

Thursday, 16 February 2012

एल्गार येत आहे

आज महापालिका निवडणुकांचा दिवस. निवडणुका कव्हर करणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग होता आणि आहे. आपल्या आसपासचे लोक नेमका काय आणि कसा विचार करतात, ते आपल्याला कळू शकतं का, हे समजून घ्यायला मिळतं. आपण किती जमिनीवर आहोत, त्याचाही ताळा लागतो. याच संदर्भात मी महिनाभरापूर्वी लेख लिहिला होता. तो कटपेस्ट करतोय.

Wednesday, 15 February 2012

गझलनवाझ


गेल्या महिन्यात गोव्यात अखिल भारतीय गझल संमेलन पार पडलं. हे सहावं संमेलन. याआधीची पाचही माझी चुकली होती. त्यामुळे काही झालं तरी हे चुकवायचं नाही ठरलं होतं. म्हणून गेलोच. समृद्ध होण्याचे अनेक क्षण अनुभवले. त्या रविवारची आमची नवशक्तिची पुरवणी आम्ही गझल संमेलन विशेषांकच केला होता. त्यात माझ्या कॉलमात मी गझलनवाज भीमराव पांचाळेंवर लेख लिहिला होता. तो कटपेस्ट करतोय.

तुम कहां के बम्मन


संत नामदेव. माझा फार काही अभ्यास नाही. तरीपण नामदेवांविषयी लिहायचा चान्स मिळाला की मी सोडत नाही. यावेळा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातले प्रमुख पाहुणे डॉ. महीप सिंगांनी हा चान्स मिळवून दिला. मी वारंवार इथेतिथे नामदेवांविषयी लिहिलंय. पण संपूर्ण एक लेख लिहिण्याचा प्रसंग आला नव्हता. तो इथे मिळाला.


लोकप्रभाचा दासनवमी विशेषांक वाचून हा लेख लिहायचं नक्की केलं. समर्थ रामदासांविषयी मला आदर आहे. पण समर्थांना मोठं ठरवण्यासाठी इतर संतांना छोटं का ठरवायचं. लोकसत्ता लोकप्रभाचे संपादक गिरीश कुबेर यांनी हा उपद्व्याप या अंकातल्या लेखात केला आहे. त्याची पार्श्वभूमीही या लेखाला आहे. या लेखाच्या शेवटच्या पॅरेग्राफमधला उल्लेख गिरीश कुबेरांच्याच लेखाचा आहे. 

Wednesday, 8 February 2012

संपादक वाचतात...

कोण काय वाचतंय, असं सांगणारे कॉलम छापून येतात कुठे कुठे. रविवार पुरवण्यांत, मासिकांत वगैरे. ते मी आवर्जून वाचतो. आता मलाच तसं लिहायला सांगेल असं कधी वाटलं नव्हतं. युनिक फीचर्सने एक ऑनलाईन संमेलन भरवलंय. त्यात संपादक काय वाचतात असा एक कॉलम आहे. त्यात कुमार केतकर, अरुण खोरे अशा दिग्गजांबरोबर माझंही नाव. बरं वाटलं.

मजा येते आपलंच वाचून. तुम्हीही http://uniquefeatures.in/e-sammelan-12/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AC इथे क्लिक करून मी काय वाचत होतो ते वाचू शकता.

युनिक फीचरवाल्यांनी माझ्यासारख्या नव्या संपादकाला सांगितलं याचा अर्थ अनेक मोठमोठ्या संपादकांनाही सांगितलं असणार. त्यांनी का लिहिलं नसावं, मला कळत नाही.


पुन्हा पुन्हा 'राडा'


मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर. त्यांचा अचानक फोन आला. सोबत शब्द प्रकाशनचे येशू पाटील होते. शब्द समग्र भाऊ पाध्ये काढताहेत. मी येशू पाटलांना सांगितलं याचा सगळ्यात जास्त आनंद सचिनला होईल. म्हणून फोन लावून दिल. बोला त्यांच्याशी... मी बोललो. मला खूप आनंद झाला. पार्टी करावी. पेढे वाटावेत. आनंद साजरा करावा असं वाटलं.

समग्रमधलं पहिलं पुस्तक राडा आल्याचं कळलं. एका रविवार पुरवणीत राडाच्या दुस-या आवृत्तीतली नेमाडेंची प्रस्तावना छापून आली होती. पुस्तक विकत घेतलं. पुन्हा वाचून काढलं. दोन बैठकीत अधाशासारखं वाचून काढलं. याआधीही कितीदातरी असंच अधाशासारखं वाचून काढलंय. त्यावर लिहिलं. माझ्या आठव़ड्याच्या कॉलमात.

एक राजकीय बातमीदार म्हणून शिवसेना हा माझ्या आवडीचा विषय. मी त्यावरचं बरंच वाचून काढलंय. मराठी, इंग्लिश, हिंदीतली सेनेवरची जवळपास सगळीच पुस्तकं वाचलीत. त्यात राडा मला सरस वाटते. त्याचा विषय शिवसेना नाही तरीही. ती एक राजकीय कादंबरी आहे, असं मला वाटतं. त्यादृष्टीने एक त्याकाळाचा दस्तावेज म्हणून राडा खूपच मोठी आहे. सगळ्यांनी वाचायलाच पायजे.

एक साधीशी समस्या


जवळपास तीन महिने झाले याआधीचा ब्लॉग लिहून. काम नवीन आहे. त्यात नेहमीप्रमाणे बुडालोय. काय काय नवीन प्रयोग सुरू आहेत. मजा येतेय. त्यात ब्लॉग लिहिणं राहून गेलंय. गेले दोनेक महिने तरी सतत कुणा ओळखी अनोळखी मित्रांचे मेल, मॅसेज सुरू आहेत. बरेच दिवस काही लिहिलं नाही. काही मित्र भेटल्यावरही सांगतात. गेल्या चारपाच दिवसात हे अतीच झालं. रोज दिवसातून तीनचारदा कुणी ना कुणी ब्लॉगची आठवण करून देतोय. म्हटलं आता आळस खूप झाला. ब्लॉग टाकायलाच हवा.


२८ जानेवारीच्या संध्याकाळी माहीमला एक घटना घडली. सार्वजनिक संडासातून बाहेर यायला वेळ लागला म्हणून एकाचा खून झाला. २९ला बातम्याही छापून आल्या. मी हादरलो. सार्वजनिक संडास काय असतात हे मुंबईतल्या साठ सत्तर टक्के लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे. मीही त्यातलाच एक. यापूर्वीही याच विषयावर शी या नावाने मटात मी लेख लिहिला होता. त्याचा पूनर्जन्म हगायचं आणि जगायचं या ब्लॉगच्या रूपाने झालेला आहे.