परवा घरी हळदीकुंकू होतं. मोग-याचे गजरे आणायचे होते. त्यासाठी ऑफिस सुटल्यावर दादर गाठलं. श्रीरंगच्या बाईकची सोबत होती. गजरे बनत होते. श्रीरंग म्हणाला आईस्क्रीम खाऊया. मला सर्दी होती. तेवढ्यातच मला समोरून एक नत्थुलालसारख्या मिशांचा माणूस दिसला. मला आठवलं. तू मुछवाला महादेव बघितलायस, मी श्रीरंगला विचारलं. चल, गरम दूध पिऊया, मी त्याला कबुतरखान्याच्या कोप-यावर घेऊन आलो.
दुकानाचं नाव नाही लक्षात राहत. पण लहानपणापासून मी ते दुकान बघतोय. मध्यंतरी चहाशिवाय करमायचं नाही, म्हणून चहा कॉफी सोडली होती. तेव्हा दादरमधे आल्यावर दूध आणि जिलेबी खायला प्यायला तिथेच जायचो. तेव्हा गल्ल्यावर बसणारे काका आता हारवाल्या फोटोफ्रेममधे गेलेत. त्यांच्याच शेजारी जुन्या जमान्यातला शंकर महादेवाचा फोटो आहे. चेह-यावर फार काही तेज नसलेल्या साध्या माणसाच्या चेह-यातला आपला वाटणारा महादेव आहे त्यात. त्याला छान मिशापण आहेत. बाजुलाच रविवर्मा, मुळगावकर यांच्या प्रभावातला शंकर पार्वतीचाही फोटो आहे. त्यातले शंकर अगदी क्लिन शेव्ड आणि मस्त डोले शोले बिल्टवाले आहेत. महादेव ते शंकर असं ट्रान्झिशन तिथं अगदी समोर दिसतं.