जेम्स लेनच्या प्रकरणात शिवसेना आमच्याबरोबर येऊन हा मुद्दा जोरात उचलेल असं वाटलं होतं, मराठा संघटनांच्या राजकारणात आघाडीवर असलेले एक मोठे नेते एकदा सांगत होते. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे ते मोकळेपणानं बोलत होते. राष्ट्रवादीपेक्षा सेनेला हा मुद्दा फायद्याचा होता. आता आम्ही त्यांना संपवणार. वगैरे बरंच काही बोलले.
असं असलं तरी शिवसेनेने दादोजी कोंडदेव प्रकरणात पुतळा न पाडण्याची भूमिका घेतली. यावेळच्या दसरा मेळाव्यात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी ही भूमिका मांडली होती. मीडियात कुणीच त्याची दखल घेतली नाही. दसरा मेळाव्यानंतर मी नवशक्तित लेख लिहिला होता, दसरा, दादोजी आणि शिवसेनाप्रमुख. शिवसेनेची याविषयीची भूमिका फायद्याची ठरेल की नुकसानीची हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा मुद्दा आता लवकर संपण्याची शक्यता नाही. तो धुमसत ठेवला जाणार. महाराष्ट्रात पुन्हा जात हा सगळ्यात मोठा अजेंडा बनणार.
मी ब्राम्हणवादाचा विरोधकच आहे. पण पुतळा कापणा-यांनी हे कृत्य काही सामाजिक भल्याच्या भावनेतून केलेलं नाही. यामागे केवळ राजकारण आहे. सरंजामदारी मानसिकता असणारी राष्ट्रवादी यात आघाडीवर आहे. जेम्स लेन प्रकरणात आर. आर. पाटलांनी जे केलं होतं, तेच आता अजितदादा करत आहेत. मराठ्यांच्या संघटना दादा पोसतात पाळतात हे काही आता गुपित राहिलेलं नाही. मराठ्यांच्या मतासाठी महाराष्ट्रात असं विष पसरून कसं चालेल? मराठ्यांनी आपली दादागिरी अशीच चालू ठेवली, तर ते मराठ्यांच्याही भल्याचं नाही. यातून मराठ्यांचं नुकसान होतंय. होत राहणार आहे. पण इथे मराठा नेत्याना आणि संघटनांना मराठ्यांचं भलं करायचंय का? निवडणुकांच्या राजकारणातही हे उलटू शकतं.
त्यातला माझा एक उतारा मी इथे अधोरेखित करतोय, ‘मुख्य प्रवाहातल्या पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी कायमच या मुद्द्यापासून दोन हात लांबच राहायचं ठरवलेलं दिसतंय. आपल्यावर कोणतंतरी लेबल लागेल, याची भीती त्यांना असावी. पण लोकांच्या भावनेशी निगडीत असलेल्या या मुद्द्यांपासून शहाण्यांनी दूर राहणं, हे महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही. यावर राज्यातल्या माध्यमांमधे थेट चर्चा होऊन खरं खोटं करून टाकणं गरजेचं आहे. असं होत नाही, तेव्हा दोन्ही टोकाचे अतिरेकी विचारवंत आपापले एकांगी विचार मांडत राहतात. ते त्या त्या वर्तुळात वाचले जातात. त्यातून द्वेष पसरतो. वातावरण सडत जातं. असं ढगाळ वातावरण राजकारण, समाजकारण तसंच विचारकारण करणा-या अनेक भामट्यांच्या फायद्याचं असतं. त्यामुळे अशा विषयांचा सोक्षमोक्ष लावायला नेहमीच वेळ लावला जातो. मढ्यावरचं दही वर्षांनुवर्षं खाल्लं जातं. प्रश्न अयोध्या बाबरी मशिदीचा असो, सीमाप्रश्न असो. मूळ मुदद्यांवर चर्चा घडवून आणायला हव्यात, तिथे आपण कमी पडतोय.’ मला वाटतं आपण या प्रश्नावर चर्चा करायला हवी. सगळे अभिनिवेष बाजूला ठेवून. पण हे शक्य आहे का?
जुना लेख नेहमीप्रमाणे कॉपीपेस्ट केलाय.
जुना लेख नेहमीप्रमाणे कॉपीपेस्ट केलाय.
दसरा म्हणजे सोनं वाटणं. दसरा म्हणजे सीमोल्लंघन. दसरा म्हणजे यंत्रांची पूजा. दसरा म्हणजे सरस्वतीपूजन. दसरा म्हणजे रावण जाळणं. दसरा म्हणजे ठिकठिकाणच्या जत्रा. दसरा म्हणजे धम्मचक्रपरिवर्तनदिन. आणि दसरा म्हणजे शिवाजी पार्कवरचा शिवसेनेचा दसरा मेळावाही.
दस-याच्या दुस-या दिवशी निदान मराठी पेपरांना तरी हेडलाइनची चिंता नसते. गेली चाळीस वर्षं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याची न चुकता चांगली सोय करत आहेत. पण दोन वर्षांपूर्वी थकलेले आजारी बाळासाहेब बघून त्यांच्या विरोधकांनाही वाईट वाटलं. पण परवाच्या दस-याने ती सगळी हळहळू पार धुवून टाकली. जवळपास पाऊण तास बाळासाहेब दणदणीत बोलले.
टीवी आणि पेपरांत या भाषणाचं दणक्यात रिपोर्टिंग झालं. सविस्तर बातम्या छापून आल्या. अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. पण एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला. तो म्हणजे दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवण्याला केलेला विरोध. शिवसेनेने घेतलेली ही जुनीच भूमिका आहे, हे खरंच. पण या संवेदनशील मुद्दयाविषयी बाळासाहेबांचं बोलणं हीच बातमी होती. पण एखादा अपवाद वगळता कोणत्या पेपरने त्याला हात लावला नाही. शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘आता जात बघून तुम्ही पराक्रम ठरवणार का? नेताजी पालकर, खंडोजी खोपडा हे महाराजांशी गद्दारी करणारे कोणत्या जातीचे होते?’, पण हे फारसं कुठेच लिहून आलं नाही.
कदाचित याचं रिपोर्टिंग करणा-या बातमीदारांना हा मुद्दा महत्त्वाचा वाटला नसेल. विषय संवेदनशील आहे, त्यामुळे उगाच आगीत तेल का टाकायचं, अशीही माध्यमांची भूमिका असू शकेल. माध्यमं या सगळ्यात हात घालायला घाबरतही असतील. मुख्य प्रवाहातल्या पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी कायमच या मुद्द्यापासून दोन हात लांबच राहायचं ठरवलेलं दिसतंय. आपल्यावर कोणतंतरी लेबल लागेल, याची भीती त्यांना असावी. पण लोकांच्या भावनेशी निगडीत असलेल्या या मुद्द्यांपासून शहाण्यांनी दूर राहणं, हे महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही. यावर राज्यातल्या माध्यमांमधे थेट चर्चा होऊन खरं खोटं करून टाकणं गरजेचं आहे. असं होत नाही, तेव्हा दोन्ही टोकाचे अतिरेकी विचारवंत आपापले एकांगी विचार मांडत राहतात. ते त्या त्या वर्तुळात वाचले जातात. त्यातून द्वेष पसरतो. वातावरण सडत जातं. असं ढगाळ वातावरण राजकारण, समाजकारण तसंच विचारकारण करणा-या अनेक भामट्यांच्या फायद्याचं असतं. त्यामुळे अशा विषयांचा सोक्षमोक्ष लावायला नेहमीच वेळ लावला जातो. मढ्यावरचं दही वर्षांनुवर्षं खाल्लं जातं. प्रश्न अयोध्या बाबरी मशिदीचा असो, सीमाप्रश्न असो. मूळ मुदद्यांवर चर्चा घडवून आणायला हव्यात, तिथे आपण कमी पडतोय.
आनंद आहे, की बाळासाहेबांनी निदान स्पष्ट भूमिका मांडलीय. आज मनात जातीयवाद आणि तोंडाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव, असं थोतांड काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत आणि राष्ट्रवादीपासून रिपब्लिकनापर्यंत सातत्याने सुरू आहे. तीच गोष्ट धर्मवादाविषयीही दिसून येते. अगदी मनसेसारख्या नव्या आणि शहरी वळणाच्या पक्षाच्या नेत्यांमधेही हे ढोंग दिसून येतं. असं असताना बाळासाहेबांनी आपली जी काही योग्य अयोग्य भूमिका आहे, ती उघडपणे मांडलीय. यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. आता त्यावर चर्चा घडायला हवी.
शिवसेनेची गेल्या काही वर्षांची भूमिका ही याच लाईनवर जाणारी आहे. जेम्स लेन प्रकरणात लेनच्या नालायकीला विरोध सगळ्यांनीच केला. प्रश्न मराठा संघटना आणि ब्राम्हण इतिहासलेखक यांच्यापैकी एकाची बाजू घेण्याचा होता. शिवसेनेने यात इतिहासलेखकांची बाजू घेतली होती. तेव्हा सेनेत असणारे राज ठाकरे तर लेखक गजानन मेहेंदळेंचं सांत्वन करायलाही गेले होते. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंशी असलेला दोस्ताना शिवसेनेने कधीच लपवलाही नव्हता. तेव्हा म्हणजे २००४ च्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानही बाळासाहेबांनी याविरोधातली उघड भूमिका घेतली होती. पण त्याचा परिणाम शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या धक्कादायक ठरला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात असंतोष असतानाही मराठा मतांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष बनला होता. आणि सत्तेचा घास शिवसेनेच्या तोंडात येता येता राहिला होता. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेने अशी भूमिका मांडणं, तीही बाळासाहेबांनी मांडणं, हे महत्त्वाचं आहे.
‘मला हवं ते मी करतो. मराठ्यांच्या महाराष्ट्रात मी ‘बामण’ मुख्यमंत्री करून दाखवला’, असं बाळासाहेबांनी याच भाषणात सांगितलं. तशाच कुणाचीही पर्वा नसणा-या ठाकरी नादात ही भूमिका मांडली असेल असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवसेनेत कधीच जातपात पाहिली जात नाही, असं वारंवार सांगितलं जातं. बाळासाहेब असोत किंवा यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशा मोठ्या नेत्यांच्या वैयक्तिक जीवनात जातपात आणि धर्मवाद यांना कुठेच थारा नसतो, हे खरंच. त्यांनी कधी कोणाला एखाद्या जातीचा म्हणून जवळ केलं किंवा एका धर्माचा म्हणून दूर लोटलं असं झालेलं नाही. म्हणूनच ते एवढे मोठे बनू शकले. पण याचा अर्थ असा बिल्कूलच नाही की त्यांना राज्याच्या जातींची माहिती नाही. आणि राजकारण करताना त्यांनी जातीची समीकरणं केलेली नाहीत. पवारांना महाराष्ट्राच्या समाजरचनेचा अभ्यास कुणाही अभ्यासकापेक्षा अधिक आहे. पण बाळासाहेबांच्या बाबतीतही ते तितकंच खरं आहे. महाराष्ट्रीय समाजजीवनाविषयी सर्वाधिक सखोल लिखाण करणा-या प्रबोधनकार ठाकरेंचे ते पुत्र आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांचा पाया पक्का आहेच. पण एका जाणकार पत्रकाराच्या नजरेतून त्यांनी महाराष्ट्र अनेकदा पायाखाली घातला आहे. त्यांचा लोकसंग्रहही महाप्रचंड आहे. त्यामुळे त्यांना राज्यातल्या जातींची, त्यांच्या मानसिकतेची तपशीलात जाण आहे, हे केवळ तर्कानेही समजून घेता येऊ शकतं. त्यांचे अनेक भाषणांमधले बिटविन द लाईन्स पंच हेच वारंवार सिद्ध करत आलेले आहेत. या जातींच्या बारीक अभ्यासामुळेच जातीच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं राजकारण य़शस्वीपणे त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे ते जातीपातींच्या पलीकडे वाटत राहिले. पण जिथे प्रेमदेखील पोटजात पाहून केली जाते, तिथे निवडणुकांचं राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन करणं शक्यच नाही.
‘जय महाराष्ट्र’ या प्रकाश अकोलकरांच्या शिवसेनेवरच्या पुस्तकात एक वाक्य आहे, सवर्णांनी मराठ्यांविरुद्ध आणि दलितांनी महारांविरुद्ध केलेलं बंड म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या जातीच्या गणिताचा एक अंदाज या वाक्यातून कळू शकतो, म्हणून हे महत्वाचं आहे. पण अर्थातच ते अंतिम सत्य नाही. कारण शिवसेनेत मराठाही मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या लोकप्रतिनिधींमधेही मराठ्यांचं प्रमाण कायमच मोठं आहे. विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांचा एक फार मोठा गट शिवसेनेच्या पाठिशी कायम उभा राहिलाय. शेकापच्या मराठा राजकारणावर घडलेल्या परभणीसारख्या मराठाबहुल जिल्ह्यावरची सेनेची पकड, हे त्याचं ढळढळीत उदाहरण. तरीही शिवसेनेने मराठा संघटनांच्या विरोधातली भूमिका घेण्याचं धाडस सहजपणे दाखवलंय. कायम मराठ्यांच्या प्रस्थापित नेतृत्वाला विरोध करताना त्यांनी छत्रपती शिवराय, भगवा झेंडा, जय भवानीचा गजर अशी मराठा संघटनेसाठी वापरलेली प्रतीकं यशस्वीपणे वापरलीत. ओबीसी हा शिवसेनेचा सर्वात मोठा आधार. पण तरीही बाळासाहेब मंडलच्या विरोधात उतरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रबोधनकारांच्या काळात घरोब्याचे संबंध असतानाही त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध केला होता. हिंदू देव देवतांच्या विरुद्ध प्रबोधनकारांची लेखणी जितक्या सडेतोडपणे चालली तितकी अन्य कुणाचीच चालली नाही. तरीही बाळासाहेबांनी रिडल्सला विरोध केला. एका ब्राह्मणाला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं.
हे सगळं राजकीय समीकरणांमधे तोट्याचं वाटत असतानाही केलं.
त्या त्या वेळेस त्यांना मूर्ख ठरवण्यात आलं. पण लांबवरच्या राजकारणात त्याचा फायदाच झाला. मला वाटतं ते मी करतो, असा बेफिकीरीचा आव यात असला तरी त्यात राजकारणाचं एक सूत्रं आता शोधता येतं. त्यामुळे आताही मराठा संघटनांच्या विरोधातली भूमिका वा-यावर सोडून देता येणार नाही. कारण याच मराठा संघटनांमधील बहुतांश नेते आणि कार्यकर्ते काही वर्षांपूर्वीपर्यंत शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. काही तर आजही आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवरही शिवसेनेचाच प्रभाव आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteजिथे प्रेमदेखील पोटजात पाहून केली जाते, तिथे निवडणुकांचं राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन करणं शक्यच नाही
ReplyDelete