परवाच राज्य सरकारचं मासिक ‘लोकराज्य’ प्रकाशित झाला. तो वाचन विशेषांक आहे. मुळातून वाचण्याजोगा. सदानंद मोरे, हरी नरके, रा. रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, जयसिंगराव पवार, अरूण टिकेकर, सतीश काळसेकर, कुमार केतकर, अऱुण साधू अशा अनेक जाणकारांचे लेख आहेत. काय वाचावं, आवडती पुस्तकं असा छान आढावा आहे. तो एक संग्राह्य अंक झालाय. प्रल्हाद जाधवांना याचं श्रेय द्यायला हवं.
या थोरामोठ्यांबरोबर माझाही एक लेख त्यात आहे. त्याचा आनंद आहेच. पण त्याहीपेक्षा आनंद लेख प्रबोधनकार ठाकरेंवर आहे याचा आहे. प्रबोधनकारांना त्यांचं हक्काचं मानाचं स्थान मिळालंय, हे महत्त्वाचं. गेल्या सप्टेंबरात प्रबोधनकारांच्या सव्वाशेव्या जन्मदिनानिमित्त prabodhankar.com ची सुरुवात झाली. ती संकल्पना आणि संशोधन माझंच होतं. तरीही माझा मित्र राहुल शेवाळेची मदत नसती तर ती संकल्पना माझ्या डोक्यातच राहिली असती. वेबसाईट अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक चुका राहिल्यात. अनेक टाइप झालेली पुस्तक अपलोड व्हायचीत. त्यावर मी पुन्हा एकदा नव्याने कामाला लागलोय. एखाद्या वाचन विशेषांकात प्रबोधनकारांचा समावेश होतो, हे प्रबोधनकार डॉट कॉमच्या टीमच्या प्रयत्नांचं यश आहे, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. काल अंक आल्यापासून अनेक जण आवर्जून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. प्रत्येक वेळेस प्रबोधनकार त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा वारंवार आनंद होतोय. लेख पुढे कटपेस्ट केलाय. तुम्ही वाचला तर मला पुन्हा पुन्हा आनंद होईल.