Wednesday 18 May 2011

तरुणांचा तुकाराम


या शनिवार रविवारी म्हणजे २१ आणि २२ तारखेला पुण्यात पहिलं बहुजन संत साहित्य संमेलन होतंय. देशभरातून वक्ते त्यात बोलत आहेत. त्याच्या आयोजकांशी माझा तसा थेट परिचय नाही. तरीही त्यांनी मला बोलवलंय, याचा आनंद आहे. त्यात २२ तारखेला सकाळीच सकाळी संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं असा एक परिसंवाद आहे. हरी नरके, बबन नाखले अशा जाणकार माणसांबरोबरच मीही त्यात बोलणार आहे. बोलायचा प्रयत्न करणाराय.

आता बोलायचं म्हटल्यावर तयारी हवी म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच मावलींची ज्ञानेश्वरी काढलीय, तुकाराम महाराजांची गाथा काढलीय. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन तर मास्टरपीसच आहे. सोबतीला आ. ह. साळुंखेंचं विद्रोही तुकारामही आहे. सोबत नामदेव आणि चोखामेळ्यांवरचीही दोनदोन पुस्तकं काढलीत.

पुस्तकं उघडण्याआधी थोडं आपल्याच दामन में झाकून बघणं गरजेचं वाटलं. कारण विषय थेट आपल्याशी जोडलेला आहे. मीडियात आहोत तर आपण संतसाहित्यावर काय काय काम केलंय ते तपासायला हव, असं वाटलं. फार काही हाताला लागलं नाही. आणखी करायला हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र टाइम्सने सांस्कृतिक विशेषांक काढले. त्याच्या पहिल्या अंकात बडव्यांवर लिहिल्याचं लगेच आठवतंय. त्याचं श्रेय जयंत पवारांना. त्यांनीच आषाढी विशेषांकांत वारीचं मॅनेजमेण्ट या विषयावर डब्बेवाल्यांशी बोलून लेख करायला लावला होता.


पुढे मटा ऑनलाईनचा प्रमुख बनलो तेव्हा पहिल्यांदा वारीवर थोडं डोकं लावून काम केलं. ई सकाळ अनेक वर्षं वारीत चांगला मजकूर देत होतं. आम्हीही प्रयत्न करून बघितला. नीलेश बने माझ्यापेक्षाही वारीचा वेडा. दरवर्षी दोन दिवस का होईना वारीला जाणारा. आम्ही तेव्हा (२००७) वेगवेगळ्या अंगाने वारी मांडण्याचा प्रयत्न केला. मटामधले जुने लेख काढून नव्याने मांडले. गांधीजींचा तुकाराम ही माझी लेखमाला त्यातलीच. त्यानंतर जागा मिळेल तिथे संत घुसवत आलो. तुकडोजी महाराजांची जन्मशताब्दीही साजरी केली. तेव्हा तुकडोजी महाराजांवर सविस्तर लिहायला सुरुवातही केली. पण आळसामुळे ग्रामगीता डॉट कॉम हे सदर आठ लेखांत सपलं.

पुढच्या वर्षी (२००८) वारीत आम्ही बंडखोर विठोबा मांडला. ते करायला खूपच मजा आली. त्याची लिंक दिलीय. क्लिक करून बघा. चांगलं काम झालंय. बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचा वारकरी परंपरेशी संबंध, स्त्री संत, कर्ममेळा आणि नामदेवांवरचे वेगळे लेख, मॉरिशस ते गिरणगावचा विठोबा असे निरनिराळे लेख आहेत. त्यात नीलेशचा विठोबाच्या आद्यमूर्तीवरचा चांगला लेखही आहे. त्या मुद्द्यावर आमचं तेव्हा कडाक्याचं भांडणही झालं होतं. शिवाय 'व्हॉट इज वारी' म्हणून एक इंग्रंजी लेखही टाकलाय. तो अन्यभाषकांपर्यंत वारी पोहचवण्याचा प्रयत्न होता. तेव्हाच एक महत्त्वाचं काम माझ्याकडून झालं ते म्हणजे प्रशांत जाधवला मटा ऑनलाइनकडून वारी कव्हर करायला पाठवलं. मटाचा एक प्रतिनिधी रोज वारी कव्हर करतोय आणि रोज त्याचे रिपोर्ट प्रिंट मटामधे छापून येताहेत, असं पूर्वी कधी घडलं नव्हतं. आणि दुर्दैवाने नंतरही कधी घडलं नाही.

पण मी स्वतः कधी वारीला गेलेलो नाही. आज ना उद्या मावली बोलावणार, हे नक्की! पण २००३ साली बोलावणं आलं होतं. मीच गेलो नाही. त्याचं असं झालं. मी तेव्हा ई टीवीत होतो. दर दोन महिन्यांनी प्रत्येक चॅनलची रामोजी रावांसोबत हैद्राबादला बैठक व्हायची. त्यात मी एकदाच गेलो होतो. सोबत मित्र संजय देशपांडे होता. तेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी कशी जोरदार केली जातेय, हे डेस्कवाल्यांनी सांगितलं. तेव्हा मी नेहमीसारखा अगाऊपणा केला. कुंभमेळा एवढा दणक्यात करायचा तर त्यापेक्षा वारी दणक्यात करायला हवी. कारण महाराष्ट्राला कुंभमेळ्याचं काय पडलंय. त्याचा कुंभमेळा म्हणजे वारीच, असं सांगितल्याचं आठवतंय.

खरं तर ईटीवी वारीचं कव्हरेज सुरुवातीपासूनच चांगलं करत होतं. पण सोबत ओबी घेऊन जाण्याची सुरुवात त्यावर्षीपासून झाली. तेव्हा ओबीसोबत मीच जाणार होतो. पण तोपर्यंत मी ईटीवीचा राजीनामा दिला होता आणि सहारा जॉइन करणार होतो. वारीबरोबर जात असशील, तर तुझा राजीनामा लगेच हेडऑफिसला पाठवत नाही, असं साठे सरांनी विचारलंही. मावली बोलवत होती. पण मी नाही म्हटलं. आज त्याचं वाईट वाटतंय. आमचा मित्र दीपक भातुसेला ओबीबरोबर वारीला जाण्याचं भाग्य लाभलं. आता सगळे चॅनल वारीचं भरपूर कव्हरेज करतात. ते बघून बरं वाटतं. याचा पायंडा पाडण्यात आपलाही खारीचा वाटा होता, याचं अधिक बरं वाटतं. अर्थातच ते त्या वर्षी नाहीतर कधीना कधी होणारच होतं. मावलीन निमित्त बनवण्याची कृपा केली एवढंच.

इंटरनेटमधून मटा प्रिंटमधे परतल्यावर पुढच्या वर्षीच्या वारीत काही करू शकलो नाही. कारण मुंबई टाइम्सची जबाबदारी होती. तिथे फारसा स्कोप नव्हता. त्यावर्षी वारीलाच इंटरनेटसाठी वारीचे अठरा दिवस चोखोबांवर लेख लिहणार होतो. तयारीही चांगली झाली होती. पण चार पाच लेखांवर माझा उत्साह मावळला. पण त्याचवर्षी एक चांगली गोष्ट केली होती. तुकोबारायांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त शुक्रवारच्या मुंबई टाइम्सच्या पहिलं पानभर लिहिलं.

आजवर मी मुंटाच्या पहिल्या पानावर आग्रहाने नागड्या उघड्या बाप्या बायांचेच फोटो छापत होतो. तिथे मी तितक्याच आग्रहाने संतशिरोमणी आणले होते. विषय होता तरुणांचा तुकाराम. लेखात 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी हा अभंग मूळ रुपानेच कोट केला होता. ते कासेची लंगोटी असा नसून गांडीची आहे, हे आजही अनेकांना धक्कादायक वाटतं. आचार्य अत्रेंसारख्या फाटक्या माणसानेही मराठाचं ब्रीद म्हणून हे वाक्य मुळाबरहुकूम स्वीकारलं नव्हतंच. दुस-या दिवशी ऑफिसात या विषयाची चर्चाही होत होती. काही दिवसांनीच माझा निषेध करणारी दोन पत्रंही माझ्यापर्यंत आली. अशी पत्रं माझ्याकडे फार क्वचितच येत. आज मी मटामधलेच जुने लेख पुन्हा ब्लॉग फेसबुकवर टाकतो, तेव्हा त्यावर धो धो प्रतिक्रिया येतात. पण तेव्हा त्याच लेखांवरची पत्रं कधी मटात छापून आली नव्हती. तेव्हा वाटायचं, वाचक पत्रंच पाठवत नसतील. पण आता ते खरं वाटत नाही. मटा ऑनलाईनमधे या लेखावर आलेल्या दोन प्रतिक्रिया वाचून मला बरं वाटलं होतं.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारीच अंक छापायला गेला. पण अचानक नव्या संपादकांनी प्रिटिंग थांबवलं. लेखाचं हेडिंग तरुणांचा तुकाराम होतं. ते तरुणांचे तुकाराम असं करण्यात आलं. अर्ध्या अंकांमधे चे छापून आलं, अर्ध्यांमधे चा. माझ्याघरी आलेल्या अंकात चा होतं. मला बरं वाटलं. माझा तुकाराम माझ्याघरी माझा जवळचा एकेरी बनून आला होता. आक्षेप फक्त नावावरच नसावा, असं वाटत राहिलं. खरं खोटं मावली जाणे. लेख सोबत कटपेस्ट केलाय. बघा फार काही आक्षेपार्ह वाटतोय का?

लेखाचा इण्ट्रोः उद्या, शनिवारी (३१ जानेवारी २००९) संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती. संत, भक्ती, अध्यात्म म्हणजे तरुणांचा काय संबंध, असा प्रश्न येतो खरा. पण हा चारशे वर्ष जुना रोकडा संत वेगळा होता. त्याने करिअर आणि फॅमिली सांभाळत, आनंदाने जगण्याचा मार्ग सांगितला. त्याची बंडखोरी, त्याची भाषा तेव्हाही तरुण होती आणि आजही तेवढीच टवटवीत आहे. आजही वेगवेगळ्या स्पिरिच्युअल प्रोग्राम्समधे लाखोंच्या संख्येने जाणा-या तरुणांना खरा सुखाचा ठेवा देण्याची ताकद तुकोबांच्या फिलॉसॉफीत आहे.

' माझा जन्म न्यू यॉर्कचा. वाढले मी जॅक्सनविलेत. आईने माझ्यावर भारतीय संस्कार केलेत. त्यामुळेच आज मी ब्रिटनी स्पिअर्सची साइट न पाहता तुमची वेबसाइट पाहते आहे. हे घडलंय ते फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगांमुळे. मी पंढरपूर आणि विठ्ठलाच्या प्रेमात पडले आहे. याचं आश्चर्य वाटणं स्वाभाविकच आहे. पण तुकाराम महाराजांसारख्या महान संतांचे हे उपकारच आहेत.'

हे पत्र आहे, गानाव्या अय्यर दोरायस्वामी या मियामीत राहणा-या पंधरा वर्षाच्या मुलीचं. 'तुकाराम डॉट कॉम' या वेबसाइटवर तिने आपलं हे मत लिहिलंय. ती अशी एकटीच नाही. अशी पत्रं लिहिणारे अनेक तरुण आहेत. एक ल्यूझी नावाची सिएटलची अमेरिकन मुलगी तर भलताच चमत्कार सांगते. तिला म्हणे तुकाराम हे शब्द स्वप्नात दिसले होते. तो शब्द आणि भाषा शोधत शोधत ती भारतातही आली होती.

फक्त दूर अमेरिकेतच कशाला, तुकारामांच्या महाराष्ट्रातही अशा कितीतरी गानाव्या आहेत. त्यांना करिअर करायचंय, पण 'सुखी माणसाचा टी-शर्ट'ही शोधायचाय. मग ती धाव येते, तुकारामांपर्यंत. कारण तुकाराम हे तरुणांचे संत आहेत. हसत हसत जगण्याचं तत्त्वज्ञान मांडणारे. रोखठोक भाषा बोलणारे आणि बंडखोरी ज्यांच्यात खोलवर रुजली आहेत ते. तुकाराम म्हटले, की अनेकांसमोर सगळं सोडून निवृत्तीला लागलेला, नोकरीधंद्यात खोट खाऊन हतबल झालेला, बायकोच्या कटकटीने गांजलेला शामळू वाणी उभा राहतो. तो बहुतेक प्रभातच्या 'संत तुकाराम' सिनेमाचा प्रभाव असावा.

अभंगांमधून भेटणारे खरे तुकाराम तसे नाहीत. राजा रवि वर्माने तुकारामांचं एक चित्र काढलंय. त्यात तुकारामांना शहीद भगतसिंगांसारख्या धारदार मिशा आहेत. ते पाहिल्यावर वाटतं तुकाराम असे असतील. 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी,  नाठाळाचे काठी देऊ माथा',  म्हणण्याची हिंमत असणारे. सगळ्यांना पुरून उरणारे आकाशाएवढे तुकाराम.

तुकाराम महाराजांनी त्यांच्या तरुणपणात सगळ्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सगळा फॅमिली बिझनेस तर सांभाळलाच. पण संसारही नीट चालवला. त्यामुळे त्यांनी संसार सोडण्याचा निवृत्तीमार्गी उपदेश कधीच केला नाही. पण 'येऊनि संसारा काय हित केले, आयुष्य नासिले शिश्नोदरा' अशा नको तितक्या थेट शब्दांत फक्त करिअरमधेच गुंतण्याची अव्यवहार्यताही सांगितली.

तुकारामांचे काही अभंग तरुणांसाठीही आहेत. एक अभंग 'तारुण्याच्या मदाने सांडासारख्या मुसमुसलेल्या तरुणा'साठी आहे. 'अठोनी वेठोनी बांधला मुंडासा' अशी फॅशन किती दिवस करणार? देवाचा विचार हा फक्त म्हातारपणी करायचा नसतो. आताच तरुणपणी कामाला लागा, नाहीतर 'करिता टवाळी जन्म' जाईल, असा उपदेश ते करतात.

आज गाजणा-या सेल्फ हेल्प पुस्तकांसारख्या टिप्स तर गाथेच्या पानापानांवर आहेत. 'निंदकाचे घर असावे शेजारी' आहेच पण 'कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा' असंही आहे. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे,  उदास विचारे वेच करी', हा एथिकल इन्वेस्टमेण्टचा वेगळाच विचारही आहे. 'जे का रंजले गांजले', 'बोले तैसा चाले', 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी'सारखी सुविचार बनलेली वाक्यं शेकड्याने आहेत.

तुकोबांची बंडखोरी ही सर्वात तरुण होती. त्यांनी त्यांच्या देवाशीच भांडण केलं,  तर समाजातल्या पुंडांची काय त-हा?  तो त्यांचा अॅण्टिएस्टॅब्लिशमेण्टचा लढा होता. वेद हे 'गोब्राह्माणहिता होऊनि निराळे' असल्याचा भूकंप करणारा दावा त्यांनी केला. जातीवर्णव्यवस्थेला आव्हान दिलं. पण त्याच वेळेस परंपरेचं अधिष्ठान सोडलं नाही. जबाबदार बंडखोरीने सगळ्यांना सोबत नेलं आणि समाजात स्थित्यंतर घडवून आणलं. हा सर्वसमावेशक मार्ग क्रांती करू इच्छिणा-या तरुणांना आजही आदर्श आहे.

' आमुचा स्वदेस भुवनत्रयामाजी वास' असा ग्लोबल विचार मांडणा-या तुकारामांची भाषा प्रचंड बोल्ड आहे. पुढे ती खूप सोवळी करून मांडण्याचा प्रयत्न केला. पण आता आधुनिक बोल्डपणाचं नातं सांगत ती भाषा पुन्हा एकदा समोर येतेय. उदाहरणार्थ भक्तीचा अयोग्य मार्ग अवलंबला, की कशी फजिती सांगताना ते म्हणतात. 'एक ब्रह्माचारी गाढवा झोंबता। हाणोनिया लाता पळाले ते।। गाढवही गेले ब्रह्माचर्य गेले। तोंड काले जाले जगामाजी।।' आपणही कट्ट्यावर असंच बोलत असतो ना!

***

तुकाराम आणि शिवराय

आजही महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी केलेल्या क्रांतीमागे महाराष्ट्रात वारकरी संतपरंपरेने शेकडो वर्षं केलेली मशागत होती,  हा सिद्धांत आता सर्वमान्य आहे. शिवाय तुकाराम महाराज तर शिवरायांचे समकालीन. ते एकमेकांना भेटले होते,  त्याचा प्रसंग सर्वश्रुत आहे.

तुकोबांच्या कार्याचा आणि जीवनाचा प्रभाव शिवरायांवर होता. शिवरायांचं संपूर्ण काम जिथे चाललं त्या मावळ खोऱ्यात आणि ग्रामीण समाजावर इतर कोणत्याही संतापेक्षा तुकारामांचा प्रभाव जास्त होता. तो आजही आहे.

'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' म्हणणा-या तुकारामांनी पाईकांचे अभंग लिहिले आहेत. पाईक म्हणजे सैनिक. या अभंगांमधे गनिमी काव्यापासून स्वामीनिष्ठेपर्यंत अनेक गोष्टींचं मार्गदर्शन सैनिकांना केलं आहे.

***

तुकोबांचा प्रभाव कोणावर?

लोकमान्य टिळकांनी क्लास आणि मास यांचा समन्वय केला,  त्यामागे तुकोबांचा आदर्श असावा. गीतारहस्यात सर्वाधिक वीस कोटेशन्स तुकाराम महाराजांचीच आहेत. या महान ग्रंथाची सुरुवातच 'संतांची उच्छिष्टे...' या तुकारामांच्या अभंगाने केली आहे.

न्यायमूर्ती रानडेंनी महाराष्ट्रात आधुनिक विचारांचा पाया प्रार्थना समाजाच्या रूपाने घातला. त्यासाठी आधार म्हणून तुकारामांचंच तत्त्वज्ञान होतं. एवढंच नाही, तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून दादोबा पांडुरंग आणि महात्मा फुलेंपासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंपर्यंत अनेक समाजसुधारकांवर तुकोबांचा थेट प्रभाव होता.

गांधीजींवर तुकोबांचा प्रभाव होताच. त्यांनी येरवडा जेलमधे असताना तुकोबांच्या १६ अभंगांचं भाषांतर केलं होतं. त्यांची प्रसिद्ध तीन माकडं तुकारामांच्याच अभंगांवर बेतली आहेत. त्यांनीच गाथा हिंदीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला प्रस्तावनाही लिहिली.

गांधीजींप्रमाणेच रवींद्रनाथ टागोरांनी तुकोबांच्या १२ अभंगांचा बंगालीत अनुवाद केलाय. त्यांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ तर तुकोबांचे मोठेच चाहते होते. त्यांनी ६० अभंग भाषांतरित केले आहेत. शिवाय चरित्रही लिहिलं आहे. ते तुकोबांवर प्रवचनंही देत. शांतिनिकेतनमधले ज्येष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांनीही तुकारामांची चित्रं काढली होती.

बंगाली संस्कृतीचा मराठीवर प्रभाव आहेच. पण तुकोबांसारख्या संतकवीचा बंगालवरही प्रभाव आहे. तो इतका, की विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी तुकोबांचं सुंदर रेखाचित्र काढलंय. अश्विनीकुमार दत्त हे आताच्या बांगलादेशातल्या प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानींना स्वातंत्र्यावर कविता रचण्याची प्रेरणा मिळाली ती तुकाराम गाथेतून.

प्रख्यात गायिका भारतरत्न एम. सुब्बलक्ष्मी यांच्या दिवाणखान्यात तुकारामांचा भव्य फोटो होता. प्रत्येक मैफलीत त्या तुकारामांचा एक तरी अभंग त्या गात असत. 'सुंदर ते ध्यान' आणि 'बा रे पांडुरंगा' हे त्यांचे आवडते अभंग. अगदी अमेरिकेतल्या त्यांच्या मैफलीतही तुकोबांच्या अभंगांनी हजेरी लावलीच. फक्त सुब्बलक्ष्मीच नाही तर तामिळनाडूतील सर्वच पारंपरिक भजनीमंडळं भजनाचा समारोप तुकारामांच्या दोन अभंगांनी करतात.

ज्येष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू आणि 'सुवार्ता'चे संपादक बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी तुकारामांच्या वैकुंठगमन सोहळ्याविषयी व्हॅटिकन सिटीत पेपर वाचला होता. त्यांची डॉक्टरेटही तुकाराम याच विषयावर आहे

***

इण्टरनॅशनल तुकोबा

सत्तरच्या दशकात जगाला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या बीटल्स ग्रुपचा प्रसिद्ध ड्रमर जॉर्ज हॅरिसन हा तुकारामांचा प्रचंड चाहता होता. तो तुकारामांच्या तत्त्वाज्ञानाचा सतत अभ्यास करत असे.
ज्युडी रस्ट ही बेल्जियमची ऑपेरा सिंगर. तीही तुकारामांच्या आकंठ प्रेमात आहे. ती वारकरी पद्धतीने तुकारामांची भजनं गाते. भारतातही तिचे कार्यक्रम होत असतात. तिच्या भजनाचा आल्बमही निघाला आहे.

र अलेक्झांडर ग्रांट हे ऑक्सफर्ड युनिवसिर्टीचे विद्वान प्रोफेसर. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य होते. तुकारामांवर त्यांनी भरपूर लिहिलं. एवढंच नाही तर अभ्यासपूर्ण तुकाराम गाथा छापून मराठी माणसावर अनंत उपकार करून ठेवले.
भारतीय विद्येचे प्रसिद्ध अभ्यासक जर्मनीतही लोथार लुत्से यांनी तुकारामांवर ग्रंथ लिहिला आहे. तुकारामांचं तत्त्वज्ञान आणि अध्यात्म असा त्याचा विषय आहे. त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताब दिला आहे.

जर्मन संशोधक गुंथर सोन्थायमर यांनी दामोदर कोसंबींपासून प्रेरणा घेऊन भारतीय लोकपरंपरांचा अभ्यास केला. महाराष्ट्रात आले आणि ते वारकरीच बनले. त्यांनी वारी केली. विठोबा आणि खंडोबा या विषयावर त्यांनी अनेक डॉक्युमेण्ट्री बनवल्या.

प्रसिद्ध साहित्यिक 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड फ्रान्समधे भरलेल्या साहित्य परिषदेला गेले होते. मराठी भाषेबद्दल बोलताना त्यांनी अनेक नव्या-जुन्या नामवंत साहित्यिकांचा संदर्भ दिला. पण कुणालाच काही माहीत नव्हतं. गायकवाड मागे मागे जाता संतसाहित्यापर्यंत गेले. त्यात तुकोबांचा उल्लेख होताक्षणीच सर्वांना मराठीची ओळख पटली. याचं कारण गी डलरी यांनी तुकोबांवर फ्रेंच भाषेत लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे.

डेना विल्किन्सन हा न्यू यॉर्कचा तरुण चित्रकार तुकोबांच्या अभंगांनी पार वेडावला आहे. तो आणि त्याचं कुटुंब गेली पंधरा वर्षं तुकोबाने भारावलंय. गाथेतले अनेक अभंग त्याला पाठ आहेत. तिथल्या मराठी कुटुंबांनाही तो हे अभंग ऐकवतो.

अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स इथून ४५ मिनिटांच्या अंतरावर १९७८ मधे प्रो. आडा आल्ब्रेट यांनी 'तुकाराम पेडॉलॉजिकल सेंटर' म्हणजेच तुकाराम अध्यापन केंद्राची स्थापना केली आहे. त्याला त्यांनी 'इन मेमरी ऑॅफ ग्रेट पोएट ऑॅफ इंडिया' असं संबोधलं आहे. यात भारतीय आणि ग्रीक देवदेवतांची दहा मंदिरं आहेत.

11 comments:

  1. सर खूप मस्त आणि माहितीपूर्ण लेख झाला आहे. फक्त लेखच नाही तर ब्लॉगवर नव्याने लिहिलेला इंट्रोही तितकाच भारी आहे. 'तुकाराम तरुणांसाठीच रिलेवंट आहे, म्हाता-यांसाठी नाही' हे लेखातून आलेल्या संदर्भांमुळे पटतं. मात्र 'सुखी माणसाचा टी शर्ट' शोधणार्‍या आमच्या पिढीला 'संत तुकाराम' सिनेमात दिसलेला संसारात लक्ष नसलेला आणि बिज़्नेस मधे अपयश आलेला 'तुकाराम वाणी'च माहीत आहे. त्यामुळे 'तुकाराम महाराजांनी त्यांच्या तरुणपणात सगळ्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सगळा फॅमिली बिझनेस तर सांभाळलाच. पण संसारही नीट चालवला. त्यामुळे त्यांनी संसार सोडण्याचा निवृत्तीमार्गी उपदेश कधीच केला नाही.' या तुमच्या मताला दुजोरा देणारे आणखी काही संदर्भ यात असायला हवे होते. बाकी 'इण्टरनॅशनल तुकोबा'चं दर्शन तुमच्या लेखामुळेच होऊ शकलं. तुमच्या लेखामुळे संतसाहित्य एकदा तरी वाचावे अशी उत्सुकता निर्माण होते. ते मी वाचेल की नाही माहीत नाही पण किमान २२ तारखेला हरी नरके, बबन नाखले आणि तुमचा ‘संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं’ हा परिसंवाद ऐकण्यासाठी मी पुण्याला येणार हे नक्की.

    ReplyDelete
  2. Yogesh Sapkale18 May 2011 at 16:54

    सचिन, खूपच छान लेख आहे. वाचल्यावर कळले कि रोजच्या धावपळीत आपले नेमके काय हरवले आहे. एकाच विनंती, तुकोबांच्या मूळ गाथा कुठे मिळतील ते सांग. धन्ववाद

    ReplyDelete
  3. मिलिंद भागवत19 May 2011 at 00:07

    सचिन.. मी जळतो रे तुझ्यावर... तुझ्याउतकी मला कधी चांगलं लिहीता येईल काय माहिती..

    ReplyDelete
  4. @योगेश. तुकोबांची मूळ गाथा tukaram.com वर पाहता येईल.

    ReplyDelete
  5. तुकाराम असाच आहे... उठता लाथ आणि बसता बुक्की घालून अक्कल शिकवणारा... कोलमडून पडू पाहणा-याचा दंड खस्सदिशी ओढून त्याला आधार देणारा... जीवनभराचा सांगाती असल्यासारखा गळ्यात हात घालून चालणारा...

    ReplyDelete
  6. Kharach khup chan...............apratim

    ReplyDelete
  7. धन्यवाद सचिनजी माझं आभाळ हे कितीही लिहिले तरी रितेच राहणार,,,पण आपण वैचारिक लेखन वेगळ्या खुबीने छान करीत आहात. तुकाराम महाराजांवर छान मांडले जे लिहिता ते सत्य यालाच सत्यशोधक म्हणायचे दुसरे काय..खरे बोलण्याचे धाडस वृत्तपतरात फार कमी लोकांच्यात आहे.त्यात तुम्ही आहात...नवीन शिकताय अन ते इतरांना देताय हे मह्त्वाचे....तुकारामांच्यावर छान भाष्य केलंय....काय बोलावे....

    ReplyDelete
  8. सचिन साहेब आपण खूप छान लिहीताय. आम्हा वाचकांना विचार करायला लावताय. आपल्या ब्लॉग वर आल्यावर खूप दिवसांनी
    खूप सशक्त, चांगले काही वाचल्याचे समाधान मिळाले. साप्ताहिक 'साधना' तील आपले लेख आवडतात. दाभोलकर, पानसरे यांचा
    विवेक विसरायचा नाही, मात्र आक्रोश जिवंत ठेवायचा, धर्माची पताका विवेकवाद्यान्नी हाती घ्यायला हवी. या सारखी विचार
    मौक्तिके आवडलीत. धन्यवाद.

    ReplyDelete
  9. आत्तापर्यंत मी तुकोबांविषयी वाचलेल्या ब्लॉग पैकी सर्वोत्तम ..

    - स्वप्नील मोरे
    संस्थापक - फेसबुक दिंडी - A Virtual Dindi
    app.facebookdindi.com

    ReplyDelete
  10. धन्य तुकोबा समर्थ | तेणे केला हा पुरूषार्थ||

    ReplyDelete