Tuesday, 14 December 2010

एक होती वाडी

गेल्या पावसाळ्यात मटातल्या माझ्या विंडो सीट कॉलमात हा लेख लिहिला. पण गेल्या वर्षी आमच्या वाडीत पाणीच भरलं नाही. यंदा तर तुफान पाऊस झाला. तरीही पाणी भरलं नाही. महापालिका यंदा तयारीत होती. तिने मुंबईत फारसं पाणी भरू दिलं नाही. ट्रेन एकदाही बंद झाली नाही. पण त्यामुळे वाडीला थोडी मुदतवाढ मिळालीय. पण तरीही वाडीसंस्कृती संपतेय हे खरं.

एक होती वाडी याच नावानं छापून आलेल्या माझ्या लेखाचा इण्ट्रो असा होता, पुण्याच्या वाडा संस्कृतीच्या -हासाची खूप चर्चा होते. सार्वजनिक हळहळ व्यक्त होते. पण मुंबईच्या वाडीसंस्कृतीचं काय ?  आधीच संपत चाललेल्या वाड्यांवर एसआरएने वर्मी घाव घातला आणि आता दरवर्षी तुंबणा-या पाण्याने या मुलखावेगळ्या कल्चरची तिरडी बांधली जातेय. 

नव्या मुंबईकरांना हे वाडीकल्चर फारसं माहीत नाही. त्यांना या झोपडपट्टयाच वाटतात. जुन्यांची वाडीपब्लिककडे बघायची नजर फारशी चांगली नाही. त्यांना ते लोअर स्टँडर्ड वाटतात. मी परळ लालबागचा आहे, असं चारदोन नव्या मुंबईकरांनी मला सांगितलं. मला बरं वाटलं. कारण, आमची वाडीसंस्कृती चाळसंस्कृतीच्या जवळ जाणारी. आमच्या बापजाद्यांची मंबईतली पहिली पावलं तिकडचीच. पण वाड्या या चाळींपेक्षाही गावांतली आपली मूळं शोधत राहिल्यात.


सबाल्टर्न स्टडिज हा इतिहासलेखनाचा एक प्रकार. इथे राजांचा नाही, सैनिकांचा इतिहास लिहिला जातो. कारण युद्ध तेच लढतात. सामान्य माणसांचं जगण्याची नोंद हाच खरा इतिहास आहे. फारा वर्षांपूर्वी पराग पाटलांशी चर्चा करताना हा विषय पहिल्यांदा कळला. मग त्याचा थोडाफार शोध कायम घेतोय. हा लेख लिहिण्यामागे हीच प्रेरणा होती.

लेखाची खूप चर्चा झाली. लेख ट्रॅकमधे पडल्यावर छापून येण्याआधीच ऑफिसात वाचला गेला. प्रकाश अकोलकरांनी केलेल्या कौतुकामुळे त्याला दणदणीत जागा मिळाली. खूप फोन, एसेमेस आले. पण आमच्या वाडीत लेख हिट झाला. लेखाची झेरॉक्स केली होती म्हणे. मला याची बिल्कूल अपेक्षा नव्हती. कधी नाही ते माझ्या बहिणींनीही फोन करून सांगितलं. दोनचार दिवसांनी रामानंद दाढी करायला आला तेव्हा खूप खुष होता. त्याचं नाव पहिल्यांदाच पेपरात छापून आलं होतं.

माझा एक बालपणीचा मित्र. मी रात्री उशिरा ऑफिसमधून घरी येतो, तेव्हा अधनामधना भेटतो. फुल्ल टुल्ल झालेला असतो. नीट उभंही राहता येत नसतं. तो मराठी नाही, गुजराती आहे. जितक्यांदा भेटतो तितक्यांदा या लेखाची आठवण काढतो. आपली वाडी पहिल्यासारखी राहिली नाही. म्हणून आसवं गाळतो. सांगतो पोरांना वाचण्यासाठी लेख घरात भिंतीवर चिटकवलाय. हा मित्र दिवसा भेटला की मात्र शांतपणे हात करून जातो. तेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा असतो.

दोन तीन महिन्यांआधी अशोक पत्कींची टीवीवर मुलाखत सुरू होती. आई म्हणाली, ते आपल्या वाडीत राहायला होते. आमच्याच चाळीत. मला आश्चर्याचा धक्का बसला. पुलंही अशाच जोगेश्वरीच्या वाडीत राहात होते. त्यांनीच लिहून ठेवलंय. मुंबई आणि परिसरात अशा शेकडो वाड्या आहेत. त्यांचं सविस्तर डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. कोण करणार?

मूळ लेख इथे नेहमीप्रमाणे कॉपीपेस्ट.

आपण मुंबईकर थोडे वेगळेच. इतरांना पाऊस येणार, हे चातक येऊन सांगतो. आपल्याला ते नालेसफाई येऊन सांगते. नालेसफाईविषयी आता सगळ्यांना चिंता वाटते. खासकरून २६ जुलैनंतर. त्यावरून मोठे वाद होतात. मोठाले नेते पाहण्या करतात. पण कोणीही कितीही सांगितलं तरी दरवर्षी वर्षातून सात-आठ दिवस तरी नाले तुंबतातच. मुंबई अर्धी बुडते. तेव्हा मुंबईतल्या वाड्या अख्ख्या बुडलेल्या असतात. 

आमचीही एक वाडी आहे. तुळस्करवाडी. कांदिवली स्टेशनपासून चालत दहा मिनिटांच्या आत. पहिल्या महायुद्धातल्या शूरांना इंग्रजांनी इनाम म्हणून जागांचे तुकडे दिले होते. तुळस्कर मास्तरांना कांदिवलीत जागा मिळाली. पोयसर नदी हाकेच्या अंतरावर. तिच्या दिशेने जाणारा मोठा ओहोळ. त्याच्या कडेने भाताच्या खाचरात वस्ती उभी राहिली. ऐंशीनव्वद वर्षं तरी झाली असतील त्याला. कुणी अडली नडली माणसं एकमेकांना आसरा देत उभी राहिली. कांदिवली, बंदरपाखाडी, चारकोप अशी गावठाणं आधीपासूनच होती. त्यांच्याशी जोडत कष्टक-यांच्या वाड्या उभ्या राहात होत्या. कोकणातून येऊन मुंबईत त्यांनी आपली छोटी छोटी गावंच बांधली. गावासारख्याच वाड्या. हिरव्यागार भवतालातले घरांचे झुपके. 

तेव्हाच कधीतरी कांदिवली ही वीकेण्डला हवापालटासाठी येणा-या गुजराती सेठियांच्या सॅनेटोरियम म्हणजे आरोग्यभुवनांच्या आजुबाजूला आकार घेत होती. टुमदार बंगले उभे राहत होते. चाळीवजा बिल्डिंगी उभ्या राहिल्या. त्यांच्या घरकामासाठी वाडीतल्यांच्या हाताला रोजगार लागला. खोपटांच्या जागी कुडाच्या भिंती आणि कौलांची छपरं झाली. शहरातल्या चाळीतल्या खुराड्यांपेक्षा बैठी घरं थोडी ऐसपैस वाटू लागली. 

कांदिवली गुजराती संस्कृतीचं महत्त्वाचं ठाणं बनलं. वाड्यांमधल्या मराठी माणसांना त्याची असूया वाटावी किंवा प्रेरणा मिळावी असं काही घडलं नसावं. पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं वारं थोडं वेगळंच होतं. तोपर्यंत नवी पिढी गावठणातल्या म्युन्सिपाल्टी शाळेत दोन बुकं शिकली होती. कुठे कारखान्यांत, गिरण्यांत लागली होती. रेल्वेत, म्युन्सिपाल्टीत छोट्या छोट्या नोकऱ्यांत चिकटली होती. नवे संसार फुलत होते. कोकणातले रितीरिवाज, सण पुन्हा खुणावू लागले होते. कांदिवली गावातल्या हिर्लेकर गुरुजींचाही आधार होता. गणपती बसू लागले. गौरी घुमू लागल्या. गुढ्या उभारायला लागल्या. गुरुजींच्या घरी वटसावित्रीला गर्दी जमू लागली. 

कांदिवलीत तेव्हा होते,  काँग्रेस किंवा समाजवादी. दोघांचही स्थानिक नेतृत्त्व गुजरातीच. ते जवळचे नव्हतेच. तेवढ्यात शिवसेनेचा आवाज घुमला. वाडीतल्या मुलांना आवाज मिळाला. वाडीत सेनेची कांदिवलीतली पहिली शाखा उभी राहिली. अख्ख्या कांदिवलीतल्या धडपडणाऱ्या मुलांचा हा अड्डा बनला. गणपती,  गोविंदा,  दसरा,  होळी घोळक्याने साजरा होऊ लागले. आता वाडीकडे वाकड्या नजरेने पाहायला कुणाची टाप नव्हती. 

पण तोपर्यंत बरंच काही बदललं होतं. वाडीच्या भोवताली शेकडो झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. जिथे कपडे धुतले जात. पोरं तासन्तास डुंबत. ती नदी काळ्या चिखलाचं गटार बनली. जळण आणायला,  शेणी थापायला जात,  त्या जंगलात काँक्रिटचा वणवा पेटला होता. पण सणांमधला उत्साह आटला नव्हता. मैदानात शिवजयंतीला क्रिकेट कबड्डीचे जंगी सामने भरायचे. स्पर्धा व्हायच्या. कारण माणसं एकमेकांना धरून होती. भांडणं नव्हती असं नाही. पण स्नेहाचा धागा मजबूत होता. 

बारशापासून तेराव्यापर्यंत सगळं एकत्र व्हायचं. घरासमोर मंडप टाकून लग्नाचा सोहळा पार पडायचा. कॅटरर नसायचा की इवेंट मॅनेजर. कुणी मेलं की आजुबाजूच्या पंचवीस घरांना तरी सूतक लागायचं. पूजेला कर्ण्याचा स्पीकर लागला की रात्रभर नाचून धिंगाणा चालायचा. गणपतीत एका बाजूला रमीचा डाव रंगायचा,  दुसरीकडे बाल्या डान्स सुरू असायचा,  तिसरीकडे भजनाची तयारी व्हायची आणि काम आटोपून झिम्मा फुगडीत शीण संपायचा. म्हाताऱ्याकोताऱ्या न चुकता वारीला,  तीर्थयात्रेला नाही तर सप्ताहाला जायच्या. कोजागिरीला वर्गणी काढून व्हीसीआर भाड्याने आणून एका रात्रीत ओळीत तीन सिनेमे पाहण्याचा कार्यक्रम व्हायचा. 

वाडीत अठरापगड लोक होते. पण ब-यापैकी एक होते. मराठी घरातला दिवाळीचा फराळ न चुकता इस्त्रीवाल्या भय्याच्या घरातही जायचा. दस-याच्या सोनंवाटपाइतकाच गुजराती सालमुबारक करण्याचीही चढाओढ असायची. शिवजयंती आणि आंबेडकर जयंती एकत्र साजरी व्हायची. रिडल्स मोर्चाच्या वेळी हुतात्मा स्मारकाचा अपमान झाल्याचा निषेध करणारा शिवसेनेचा फलक लागला होता. त्याखाली शाखाप्रमुख अॅड. अविनाश मोहिते आणि उपशाखाप्रमुख सत्यवान कांबळे अशी नावं आ़डनावं होती. जॉनसनने मुलगा व्हावा, म्हणून सार्वजनिक गणपतीला नवस बोलला होता. वॉटसन झाला तेव्हा अकरा दिवस आरती प्रसाद करून तो नवस फेडलाही. जेकब्सने आपल्या मुलीचं नाव मुद्दामहून अनुष्का ठेवलं. दाढी करायला सगळ्यांना महंमदभाईच लागायचा. जात,  भाषा,  धर्म याचा विचार न करता झालेल्या लग्नाची तर कितीतरी उदाहरणं. 

माहीमच्या र्दग्यातला एक प्रसन्न फकीर 'साईबाबा की दुवा हैं प्यारे' म्हणत यायचा. सूर्य उगवायच्या आधी येणारे वासुदेव आणि पिंगळा गुजराती घरातूनही भिक्षा घेऊन जायचे. अस्वलवाले दरवेशी आणि डोंबारी नाही येत आताशे, पण नंदीबैलवाले आणि गधी का दूध ओरडत जाणारे अजूनही येतात. कल्हईवाले आणि पिंजारी भूतकाळ बनलेत,  पण कुल्फीवाले आहेत अजून. रामानंद न्हावी अजूनही पेटी घेऊन घरी येतो. जुन्याच्या अशाच काही खुणा ठेवत नव्वदच्या आसपास सगळं बदलत गेलं. वाडीच्या पाचवीला पुजलेल्या दारूने एका पिढीची उमेद कापून काढली. तेव्हाच कार्यकर्ते बनणं हा बिझनेस बनला होता. मैदानं संपली. एका सार्वजनिक गणपतीचे चार गणपती झाले. केबलने शेजा-यांमधला सांधा तोडला. पत्र्याच्या आणि कुडाच्या जागी पक्की घरं उभी राहिली. जुनी झाडं पडून गेली. बिल्डर येणार म्हणून काही झाडं तोडून टाकली. वाडीचं वेगळेपण संपत गेलं. ती कधी झोपडपट्टीचा एक भाग बनली तिलाच कळलं नाही. 

त्याचवेळेस नवी पिढी शिकत गेली. जिथे इलेक्ट्रिशियन आणि रिक्षावाला बनणंही 'स्टेटस सिम्बॉल' होतं. तिथे डॉक्टर,  सीए,  इंजिनीअर बनून मुलं अमेरिकेतही गेली. जी मुंबईत राहिली त्यांची घरात संडास नाही म्हणून लग्नं होत नव्हती. ती बिल्डिंगमध्ये गेली. म्हाडाच्या बैठ्या सोसायट्या अनेकांना आपल्या वाटल्या. त्यात एसआरएमुळे सगळ्याच वाड्यांना शेवटची घरघर लागली. आता शेजारच्या मोहिते वाडीचा सुरभी कॉम्प्लेक्स बनलाय. हनुमानवाडीच्या जागी बावीस मजली टॉवर उभा राहतोय. या सगळ्यात वाडी म्हणून टिकून राहणंही कठीण आहे. कारण वाडी हीच आजुबाजूच्या बिल्डिंगमधली सखल जागा उरलीय. बिल्डरनी नाले 'पॅक' केलेत. मैदानं उरलेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात सगळं पाणी तुंबण्यासाठी वाडीच उरलीय. दरवर्षी घरांमध्ये ढोपराएवढं पाणी जमतं. पाऊस म्हटला की, पोटात भीतीचा गोळा येतो. त्यामुळे सगळ्यांना लवकरात लवकर बिल्डर हवाय. एका बिल्डरशी बोलणी जवळपास नक्की झालीत. कदाचित पुढच्या दोन चार पावसांत पाणी साचायला वाडी असणार नाही. 

ही एका तुळस्करवाडीची गोष्ट नाही. अख्ख्या मुंबईभर अशा वाड्या आहेत. गिरगावातल्या चाळींच्या वाड्या वेगळ्या. पण भायखळ्याच्या चमेली वाडीपासून जोगेश्वरीच्या मेघवाडीची. दादरच्या वज्रेश्वरी वाडीपासून सायनच्या जोगळेकर वाडीपर्यंत सगळ्या वाड्यांची एकसारखी कहाणी आहे. थोडा फरक इकडे तिकडे, पण इतिहास तोच. नव्या मुंबईकरांना तर हे असलं काही कल्चर असल्याचं ठाऊकही नाही. पण याचा इतिहास कोण लिहिणार?  इतिहास राजांचा लिहिला जातो,  शिपायांचा नाही. राजवाड्यांचा लिहिला जातो,  वाड्यांचा नाही. 

No comments:

Post a Comment