सध्या मार्गशीर्ष सुरूय. दर गुरुवारी लक्ष्मीच्या व्रताची पूजा होते. गेले आठदहा वर्षं माझ्याही घरी पूजा होतेय. सहज म्हणून त्याचं पुस्तक बघितलं. लक्षात आलं, हे पुस्तक लिहून कशीबशी पन्नास वर्षच झालीत. पहिली आवृत्ती आलेल्याला तर पस्तीस वर्षंही झालेली नाहीत. हे व्रत प्रकाशकांनी आपले खिसे भरण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माथी मारलंय. हा घोटाळा आहे. टूजी स्पेक्ट्रमपेक्षाही मोठा फ्रॉड आहे. सोबत माझा लेख नेहमीप्रमाणे जोडलाय.कालच्या शनिवारी नवशक्तित माझ्या समकालीन कॉलमात छापून आला होता
सध्या सगळ्यांना थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत. सेलिब्रेशनचे प्लान्स आखले जात आहेत. तरीहीअनेक मध्यमवर्गीय मराठी घरांमधे अजून तो रंग आलेला नाही. कारण मार्गशीर्ष महिना. त्याच्या धार्मिक महात्म्यामुळे अनेक किचन सोवळ्यात आहेत. खरंतर श्रीमद्भगवद्गीतेतच या महिन्याचा महिमा गायला गेलाय. पण श्रावणाच्या समोर त्याचं महात्म्य फारसं कुणाच्या खिजगणतीत नव्हतं. पण गेल्या दोनेक दशकांपासून निदान महाराष्ट्रात तरी मार्गशीर्ष हा महिना श्रावणाच्या कॉम्पिटिशनमधे उतरलेला दिसतो. ही क्रांती करून दाखवलीय ती ‘श्रीमहालक्ष्मी महात्म्य’ या दोन रुपयांच्या छोट्या पुस्तकानं.
मार्गशीर्ष आला की दुकानदारांना व्रत न करताही लक्ष्मी पावते. फुलं, फळं, नारळ महाग होऊन जातात. मार्गशीर्षातल्या गुरुवारांच्या पूर्वसंध्येला एरव्ही पाच रुपयाला मिळणारा गजरा पंचवीस रुपयांपर्यंत जातो. मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी तर दादर मार्केटात पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय श्रीलक्ष्मी महात्म्य पूजा विधी या पुस्तकाच्या दहाबारा प्रती घरी असल्या तरी हे पुस्तक घेण्यासाठी दुकानांमधे गर्दी होते.
धार्मिक मंडळी या लहानशा पुस्तिकेला पोथी म्हणतात. दरवर्षी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करताना याची पाच पुस्तकं वाटावी लागतात. पण हे पुस्तक खरं तर पुस्तक म्हणण्याच्याही लायकीचं नाही. त्यातल्या काही पुस्तकांवरचं रंगसम्राट मुळगावकरांचं श्रीलक्ष्मीचं अप्रतिम चित्र वळगता हे तद्दन फाल्तू आहे. यात निव्वळ थोतांड आणि थोतांडच आहे. किंबहुना आजवर ज्यांना आपण थोतांड म्हणतो, अशांनाही दर्जेदार म्हणावं इतकं ते बकवास आहे.
आता देवधर्म वगैरे म्हटल्यावर असं काही म्हणण्याची पद्धत नाही. पण याचा खरंच देवधर्माशी काही संबंध आहे का? बायकांनी धर्म टिकवलाय असं म्हटलं जातं. पण हा टिकवलेला धर्म पाहिला की असा धर्म कशाला टिकवला, असं वाटायला लागतं, अशा आशयाचं विधान सध्या ज्यांची नव्वदी साजरी होतेय त्या स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचं आहे. लक्ष्मी महात्म व्रत कथा किंवा महालक्ष्मी व्रताकडे बघितलं की या विधानाची सत्यता शंभर टक्के पटते. त्यालाच केसरीव्रत असंही म्हटतात. पण मार्गशीर्षातले गुरुवार हेच याचं लोकप्रिय नामानिधान. पैसे मिळवण्यासाठी आणि आलेलं धन जाऊ नये यासाठी हे व्रत केलं जातं. यात एका तांब्यात नारळ, पाच प्रकारची फळं, पाच प्रकारची पानं आणि लक्ष्मीयंत्राचं चित्र याचं पूजन केलं जातं. त्यानंतर ही पुस्तिका वाचली जाते. त्यात गुरुवारची कहाणी आहे. उद्यापनाच्या दिवशी पाचजणींना ही पुस्तिका वाटली जाते.
ही गुरुवारची कहाणी द्वापारयुगातल्या आणि सौराष्ट्रातल्या राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका यांची आहे. देवी लक्ष्मीला गरिबांच्या घरी जायचं नसतं, कारण ते तिला खाऊन संपवतात. लोकांच्या उपयोगी पडावं म्हणून लक्ष्मी एका म्हातारीच्या वेषात राजाकडे येते. पण सुरतचंद्रिका राणी तिला हाकलून देते. पण राजकन्या शामबाला मात्र म्हातारीचा सन्मान करते. तिने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीचं व्रत करते. त्यामुळे शामबालेचं लग्न होतं. तिच्या सासरी समृद्धी येते. सुरतचंद्रिकेकडे मात्र गरिबी येते. दरिद्री झालेला राजा मुलीकडे येतो. मुलगी धनाचा हंडा देते. पण लक्ष्मीच्या अवकृपेने त्या धनाचे कोळसे होतात. मुलीने कोळसे पाठवले म्हणून आई रागावते. मुलगी माहेरपणाला आलेली असताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवते. पण ती माहेरहून एक चिमूट मीठ घेऊन जाते. माहेरहून काय आणलंस, असं विचारल्यावर ती नव-याला सांगते राज्याचं सार आणलंय. मग अळणी जेवणात मीठ घालून त्याला जिंकते. पुढे आईलाही व्रताचं मोठेपण पटवते. ती व्रत करते. पुन्हा राज्य आणि समृद्धी मिळते. अशी ही कहाणी सफळसंपूर्ण होते. यात एक सुरतचंद्रिकेच्या पूर्वजन्माचा फ्लॅशबॅकही आहे. तेव्हा ती गरीब असते. नवरा तिला मारत असतो, छळ करत असतो. ती हे व्रत करते, म्हणून पुढच्या जन्मात राणी बनते.
ही पद्मपुराणातली कहाणी असल्याचं या पुस्तिकेत लिहिलेलं आहे. कमी समज असणा-यांसाठीच पुराणांमधल्या कहाण्या सांगण्यात आल्या आहेत. पण गेली शेकडो वर्षं ही पुराणंच धर्माच्या नावाने राज्य करत आहेत. जन्मभर बाराखडीच गिरवावी आणि आपण सुशिक्षित असलेल्याचं सांगावं, तसं हे आहे. पुराणातल्या व्रतांना धार्मिकता किंवा अध्यात्मातली फारतर पहिली पायरी म्हणता येईल. त्या पहिल्या पायरीवरच राहणा-यांना मूर्ख म्हणायला हवं आणि सर्वसामान्यांना या पहिल्या पायरीवरच ठेवणा-यांना स्वार्थी ठरवायला हवं.
संतांनी त्याविरुद्ध कायम बंड केलं. पुढे एकोणिसाव्या शतकातल्या समाजसुधारकांनीही याविरुद्ध आवाज उठवला. ब्राम्हो समाजापासून प्रार्थना समाजापर्यंत आणि विवेकानंदांपासून दयानंदांपर्यंत सगळ्यांनी धर्मसुधारणा वैचारिकतेच्या अग्रक्रमात आणली. तुकडोजी महाराजांपासून वर उल्लेख झाला त्या पांडुरंगशास्त्री आठवलेंसारख्या अध्यात्मिक नेत्यांनीही हीच परंपरा पुढे चालवली. महात्मा फुलेंच्या परंपरेतल्या सत्यशोधकांनी तर या थोतांडांची सालटी काढली. प्रबोधनकार ठाकरेंनी शनिमहात्म्य, सत्यनारायण आणि व्यंकटेशस्तोत्र या पॉप्युलर व्रतवैकल्यांना फोडून काढलंय, ते मुळातून वाचायला हवं. या सगळ्यांनीच पुराणांवर, चमत्कारांवर, निर्बुद्ध कर्मकांडांवर सडकून टीका केलीय. तरीही आपण आजही त्यातून बाहेर पडायला तयार नाही.
हे महालक्ष्मीचं व्रत पुराणाचं नाव घेऊन सांगितलं जातं. पण त्याला पुराणाचाही आधार फारसा मिळत नाही. पुराणातल्या बहुतांश कथांमधे निदान काहीतरी बोध असतो. काहीतरी सद्गुणांचा आग्रह धरलेला असतो. काही नसलं तरी निदान दोन घटका चमत्कृतीजन्य मनोरंजन असतं. पण या पोथीत यापैकी काहीच नाही. असलाच तर दुर्गणांचाच परिपोष आहे. हातपाय न हलवता केवळ नारळ पुजून लक्ष्मी मिळण्याची कदापिही शक्यता नाही. अशाच ढोंगांमधून आलेल्या अकर्मण्यतेमुळे आपलं आजवर मोठं नुकसान झालेलं आहे. धर्मसुधारक अशा व्रतांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यातून काहितरी चांगलं घडवतात. उदाहरणार्थ संतांनी सांगितलेलं एकादशी व्रत किंना लोकमान्यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव. पण या व्रतात आणि त्याच्या कहाणीत त्यादष्टिनेही काहीच हाती लागत नाही. त्यामुळे हे व्रत फोलफटासारखं कचराकुंडीत टाकूनच द्यायला हवं. कुठे असेल तर देवधर्म तोच आहे.
खरंतर भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला मोठा मान आहे. भरपूर पुरुषार्थ करा आणि भरपूर कमवा, असंच आपली परंपरा सांगत आलीय. दोनचार अपवाद वगळले तर आपले सगळेच ऋषीमुनी आणि देवदेवता छान कमवून, सोनं नाणं अंगावर लेवून, पोराबाळांसह सुखी संसार करणारे होते. वेदांमधलं श्रीसुक्तम् हे एकच सुक्त दाखला म्हणून पुरेसं आहे. पण निवृत्तीमार्गाच्या प्रभावाने हा विचार अनेक वर्षं झाकला गेलाय. मग पैसे कमवणं हे काहीतरी अनैतिक आणि धर्मविरोधी मानलं गेलं. अशावेळेस एक धार्मिक व्रत भरपूर धनाची ग्वाही देतं. वर त्यात फारसा खर्च नाही. वर ते पंधरा मिनिटात आटोपतं आणि वर्षातून फक्त चार किंवा पाच वेळेस करावं लागतं. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. हे व्रत केलं आणि पैसे मिळाले तर उत्तमच. नाही मिळाले तरी ठिकाय. असा विचार करून हे व्रत घरोघर पोहोचलं असावं. शिवाय याची नायिका राणी सूरतचंद्रिका गेल्या जन्मात नव-याचा मार वगैरे खाणारी आहे. त्यामुळे तिच्याविषयी माहेरच्या साडीतल्या अकला कुबलला किंवा आजच्या सास बहू सिरियलमधल्या सोशिक सुनांना मिळते तशी एक सहानुभूतीही आहे.
या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे व्रत काही जुनंपुराणं बिल्कूल नाही. याची पहिली आवृत्ती 1973 सालची आहे. त्यांच्या पोथीचा लेखक मिलिंदमाधव आहे. तोच स्वतः म्हणतो की हा ‘ग्रंथ’ ‘शके अठराशे चौ-याण्णौ’ला लिहून पूर्ण झाला. शके वगैरे म्हटल्यावर आपल्याला हे जुनं वाटतं. पण शके अठराशे चौराण्यव म्हणजे 1962 सालं. भारती चीन युद्ध झालं आणि शम्मी कपूरच्या जंगली सिनेमातलं याहू गाणं गाजत होते ते हे साल. आता ही कालपरवाची पोथी आपण प्राचीन धार्मिक ग्रंथ म्हणून पूजा करणार असू तर आपलं कठीणच आहे.
केवळ पुस्तकांची तुफान विक्री व्हावी, निव्वळ याच हेतूने पुस्तक प्रकाशकाने हे व्रत आपल्या माथी मारली आहे. पुस्तकातल्या पूजाविधीत ही पोथी पाच जणाना दान देण्याचे उल्लेख आहे. काही प्रकाशकांनी तर या वाक्याखाली रेषा मारून ठसवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. तरीही आज लाखो बायका हे व्रत करत आहेत आणि करत राहणार आहेत. त्यातून प्रकाशकांचं फावणार आहे.
तसं पाहिलं तर हाही एक मोठा घोटाळाच आहे, असं नाही का वाटत? इतर आर्थिक घोटाळ्यांमुळे होतं, त्यापेक्षाही जास्त नुकसान याने केलंय.
तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.
No comments:
Post a Comment