Monday, 6 December 2010

बाबासाहेबच बेस्टसेलर!

कालच देहू आळंदीला गेलो होतो. आज चैत्यभूमीवर जाणार आहे. आपल्यासाठी तिघेही माऊलीच. चैत्यभूमीवर जाऊन कधीही दर्शन घेत नाही मी. पण मैदानात भरलेल्या पुस्तकांच्या जत्रेत मात्र जातोच जातो. अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर हे राज्यातलं पुस्तकांचं सर्वात मोठं प्रदर्शन आहे, असा माझा एक दावा आहे. त्याचं रिपोर्टिंग मी गेल्या वर्षी केलं होतं. जागेअभावी बातमी खूप कापून लागली होती. ती इथे कट पेस्ट केलीय.


चैत्यभूमीवरच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीत राजकारण्यांची भाषणं, सरकारची आश्वासनं आणि अस्वच्छतेचीच चर्चा होते. पण यानिमित्त विचारांची परंपरा सांगणाऱ्या शिवाजी पार्कात भरणाऱ्या पुस्तक जत्रेच्या समृद्ध परंपरेकडे मात्र डोळेझाक केली जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलन वगळता एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री महाराष्ट्रात कुठेही होत नाही. विशेष म्हणजे इथे आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांनाच मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. 

चैत्यभूमीवर दरवर्षी पुस्तक आणि कॅसेट यांचे अडीचशेच्यावरचे स्टॉल लक्ष वेधून घेतात. अडीचशेपैकी दीडशेच्या आसपास स्टॉल हे फक्त पुस्तकांचे असून त्यात साठ लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती 'बौद्ध आंबेडकरी साहित्य प्रकाशक व वितरक परिषद, महाराष्ट्र राज्य' या संस्थेचे अध्यक्ष ईश्वर बागडे यांनी दिली. 

नागपूर, वर्धा आणि औरंगाबाद येथील पुस्तकविक्रेते यात आघाडीवर आहेत. पण मुंबई, पुण्यापासून जालंधर, लखनऊपर्यंत विविध ठिकाणचे विक्रेते येथे दिसतात. गेली ३५ वर्षं आंबेडकरी विचारांची पुस्तके विकणारे विक्रेते येथे येत आहेत. समता बुक डेपो, संबोधी प्रकाशन, कौशल्य प्रकाशन, सुगत बुक डेपो, बुद्धिस्ट लिटरेटर असे स्टॉल इथे वर्षानुवर्षं लागत आहेत. पण आंबेडकरी साहित्यात स्वत:चा ठसा उमटवणारे सुगावा प्रकाशन तसेच ग्रंथालीसारखे प्रकाशकही येतात. 'इथे आम्ही फक्त पुस्तक विकण्यासाठी येत नाही, तर चैत्यभूमी हे आमच्यासाठी प्रकाशक, वाचक, लेखक यांच्या वैचारिक देवाणघेवाणीचे केंद आहे', असं 'सुगावा'च्या उषा वाघ यांनी सांगितले. 
रावासाहेब कसबे यांचे 'धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह', संजय सोनवणी यांचे 'विठ्ठलाचा नवा शोध', आनंद तेलतुंबडे यांचे 'साम्राज्यवाद आणि जात' ही यावषीर्ची नवी वैचारिक पुस्तके दिसत आहेत. रमेश जीवने हा यवतमाळमधून आलेला लेखक स्वत:चेच 'कांशी-माया का अम्बेडकर विरोध' हे पुस्तक विकताना दिसत होता. त्याचीही एका दिवसातंच दोनशेहून अधिक पुस्तके विकली गेली होती. पण आजही सर्वाधिक मागणी आहे ती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांनाच. बाबासाहेबांनी लिहिलेले 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म'सारखे पुस्तक आजही बेस्टसेलर आहे, असे बागडे यांने निरीक्षण आहे. बाबासाहेबांच्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या प्रकाशकांनी आणलेल्या विविध आवृत्त्या येथे विक्रीला आहेत. शिवाय बाबासाहेबांचे समग्र साहित्याचे सरकारी खंड, खैरमोडेंनी लिहिलेल्या आठवणी आणि धनंजय कीरांचं चरित्र यात आघाडीवर आहे.

तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

1 comment:

  1. हे पहिल्यांदाच वाचतोय. धन्यवाद.

    ReplyDelete