Sunday 26 December 2010

श्याना कव्वा

शनिवारच्या लोकसत्ताबरोबर एक फाल्तू पुरवणी असते, वास्तुरंग नावाची. त्यात वास्तुशास्त्र वगैरे विनोदी विषयांवरचे चिरकूट लेख असतात. कालच्या अंकात अशाच एका लेखाखाली एक चांगला लेख आलाय. उमेश वाघेला यांचा चतुर कावळा नावाचा. त्याच्या मथळ्याची कॅलिग्राफीही छान आहे आणि कावळ्याविषयी चांगली माहितीही आहे.

कावळ्याविषयी फार कोणी लिहित नाही. मी लिहिलं होतं, गेल्या वर्षीच्या श्राद्धाच्या दिवसांत. कावळेपुराण नावानं. खूप लोकांना आवडलं होतं. प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे एसेमेस आले होते, त्या रविवारी. आता पुन्हा एकदा त्या कावळ्यांची आठवण. आपल्यासारख्यांचा पितृपंधरवडा वर्षभर सुरू असतो.

अतुल आंबेरकरनं या लेखाचं नाव श्याना कव्वा असं ठेवायला सूचवलं होतं. तो लेख जश्याच्यातश्शा.

निवडणुका जवळ आल्यात. अठरा सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस. पण त्यादिवशी एकही महत्त्वाचा उमेदवार अर्ज भरणार नाही. कारण ती सर्वपित्री अमावस्या आहे. त्याआधी पितृपंधरवड्यात कसलंच शुभ काम करत नाही. खरंतर हा श्राद्धपक्ष आपल्याला समृद्ध वारसा देणाऱ्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पावन काळ. पण आपण आपल्याच पितरांना घाबरतो. या दिवसांत लग्नाळू वेबसाइटस्वर सर्च कमी होतात. तर बाकी सगळं राहूदेच.
 
या पंधरा दिवसांत सगळ्यांचेच वांदे असतात, एक कावळे सोडून. नसलेले पितर आणि असलेले कावळे खुश असतात या दिवसांत. कावळे याला सुगी म्हणत असतील, नाही तर दिवाळीतरी. भलेभले त्यांची वाट बघत असतात. या दिवसांत ते हवे तिथे भेटतही नाही आणि भाव खाऊन घेतात. 

पण एरव्ही ते सगळीकडे दिसतात. मुंबईत भरपूर कावळे आहेत. माणसांपेक्षाही जास्त. माणसं इथे यायच्या आधीही ते होते. माणसाला पार पोचवणं तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जॉब प्रोफाइल. विकिपिडियाला विचारलं तर कळतं शास्त्रीय भाषेत कावळ्यांना बरंच कायकाय कठीण कठीण म्हणतात. त्यांचे जगभर खूप वेगवेगळे प्रकारही आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचे दोन. एक नेहमीचे साधे कावळे आणि अख्खे काळे कुळकुळीत ते डोमकावळे. 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अतुल साठेंना विचाराल तर ते कावळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सांगतात, तो साफसफाईचा. घारी आणि कुत्र्यांच्या मदतीने ते शहरं स्वच्छ ठेवतात. पक्षीप्रेमी इतरांची मोजणी करतात. अगदी चिमण्यांचीही. तशी कावळ्यांची कधी झालेली नाही. पण मुंबईत त्यांची संख्या अतोनात वाढतेय. कारण इथे उकिरडा वाढतोय. आणि त्यावर जगणारे कावळेही. जंगलात राहणारे डोमकावळेही कचऱ्यासाठीच मोठ्या संख्येने शहरात आलेत. एकूण कावळ्यांची संख्या गरजेपेक्षा वाढलीय. मुंबईतल्या माणसांसारखीच. म्हणून मग तेही आपापसात मारामाऱ्या करतात. बाकीच्या पक्ष्यांनाही ते हुसकून लावतात. स्थानिक, परप्रांतीय वगैरे त्यांनाही समजत असावं बहुतेक. 

खरंच कावळ्यांना बरंच काही समजतं. आठवा इसापाची गोष्ट. शहाण्या कावळ्याची. गेल्याच महिन्याच्या करंट बायोलॉजी विज्ञानाच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या जर्नलमध्ये केम्ब्रिज आणि क्वीन्स मेरी युनिव्हसिर्टीतलं संशोधन छापून आलंय. गोष्टीतल्यासारखीच परिस्थिती निर्माण केली गेली. तेव्हा कावळे तसंच मडक्यात दगड टाकून पाणी प्यायले. जर्मनीच्या मॅक्स प्लान्क इन्स्टिट्यूटमध्ये कावळ्यांनी परीक्षानळीच्या तळाशी असलेले शेंगदाणे पाणी ओतून वर काढले आणि खाल्ले. सुमित पाटील नावाचा एक मुंबईतला कावळावेडा तर सांगतो की कावळे यापेक्षाही अॅडव्हान्स्ड आहेत. त्याने एका कावळ्याला फ्रुटीच्या टेट्रापॅकमधून आपण पाडतो तिथेच भोक पाडून स्ट्रॉ लावल्यासारखं फ्रुटी पिताना पाहिलंय. 

सुमितकडे असे अनेक किस्से आहेत. तो प्रभादेवीच्या रचना संसद कॉलेजात अप्लाईड आर्टस् शिकतोय. मित्र त्याला 'क्रो पाटील'च म्हणतात. गेली तीन वर्षं तो कावळ्यावर काम करतोय. कावळे सुंदर आहेत, असं तो म्हणतो. त्याने कावळ्यांचे शेकडो फोटो काढलेत. व्हिडिओे उतरवलेत. त्यांच्यावर हायकू लिहिलेत. त्यांची चित्रं काढलीत. आईसाठी साडीवर कावळ्यांची डिझाइन केलीय. ते सगळं बघून आपल्यालाही पटतं की कावळा सुंदर आहे. मोराचा पिसारा काय फक्त सुंदर असतो. पंख विस्फारलेल्या कावळ्याचे आकार बघितलेत किती सुंदर असतात, असं तो सांगतो तेव्हा पटत जातं. खरंच कावळा नीट बघितला तर तितकासा काही कुरुप नाही. त्याच्या काळ्या रंगातली चमक तर प्रेमात पाडणारी आहे. पण आपण आपल्या पूर्वग्रहांमध्येच अडकलेले असतो. 

आता 'काऊ' म्हटल्यावर मुलं गाय दाखवतात ते सोडा. पण कधीकाळी मराठी आया एक घास चिऊचा तर दुसरा काऊचा म्हणूनच मुलांना भरवायच्या. 'चिऊताई चिऊताई दार उघड' म्हणणारा कावळा नंतर कृतघ्नपणाच करतो. 'एक कोल्हा बहु भुकेला' कोल्हाही कावळ्याला मूर्ख बनवून त्याच्या चोचीतलं हाड मिळवतो. सगळीकडे कावळा भेटतो तो निगेटिव्ह शेडमध्येच. एक कावळ्यांच्या शाळेचा अपवाद. आचार्य अत्रेंनी शाळेत अक्षरओळख करून देण्यासाठी हे अक्षरमालेचं छानछोटं पुस्तक लिहिलं होतं. तो माणूस होताच मुलखावेगळा वेगळा विचार करणारा. अगदी जुन्या संस्कृत साहित्यातही चारदोन सुभाषितांशिवाय कावळा भेटत नाही फारसा. त्यामुळे संस्कृतपेक्षाही सोवळ्याआवळ्यात अडकलेल्या मराठी साहित्यात कावळा कुठून येणार? अगदी विद्रोही वगैरेंनाही तो आपला वाटला नाही. अपवाद एक दया पवारांच्या 'बलुतं'चं कव्हर आणि शफाअत खानांचं 'मुंबईचे कावळे' हे नाटक. ते राजकीय सटायर होतं. त्याचा कावळ्यांशी थेट संबंध नव्हताच. त्याचं हिंदीतही भाषांतर झालं होतं. हिंदी सिनेमात कावळा भेटला तो विठ्ठलभाई पटेल नावाच्या एका अपरिचित माणसाने लिहिलेल्या 'झूठ बोले कौआ काटे'या 'बॉबी'मधल्या अजरामर गाण्याने. हृषिकेश मुखजीर्नी याच नावाचा एक सिनेमाही काढला होता. दोन चार वर्षांआधीच 'काला कौआ काट खाएगा सच बोल' हे ढिन्चॅक गाणंही हीट झालं होतं. 

बाकी कावळ्याशी नातं असणारा एक लांबलचक केसांचा गायक आहे. दक्षिण मुंबईतच कुठेतरी राहणारा. हाजीअली दर्ग्याजवळ भेटायचा. तो कावळ्याचा आवाज काढायचा. आणि त्याचं काव काव ऐकून कावळे जमायचे. तो पुढे चाललाय आणि मागून शंभरेक कावळे चालताहेत, असं ते दृश्य असायचं. एक कावळा तर नेहमी त्याच्या सोबत असायचा. उमेश कुमावत यांनी झी न्यूजवर यावर केलेल्या अप्रतिम बातमीमुळे त्याला गाण्याच्या चांगल्या संधीही मिळाल्या. 

यापेक्षाही एक भन्नाट कावळावेडा फोर्टात हायकोर्ट आणि युनिव्हसिर्टीच्या जवळ भेटतो. कंदिलसमोरच्या फूटपाथवर एक बटाटेवडेवाले आहेत. मलकापूरचे दिलीप सुरोडकर. अकरा वर्षांचे होते तेव्हा मुंबईत आले. तेव्हा कुणी ओळखीचं माणूस तर सोडा, कुत्रंही नव्हतं. फक्त कावळे होते. पक्ष्यांची आवड लहानपणापासूनच. पस्तीसेक वर्षांपूर्वी बटाटेवड्याचा धंदा सुरू केला. तेव्हापासून सकाळी तळलेली पहिली टोपभर भजी ते कावळ्यांना देतात. सुरुवातीला दहाबारा कावळे यायचे. आता शेकड्याने तरी असतातच. सकाळी सहा वाजता कावळ्यांच्या पंगतीत भजी खाणारे आणि स्वत:च्या हाताने कावळ्यांना खिलवणारे सुरोडकर हे दृष्य बघण्यासारखं असतं. 

त्यांची भजी थंड झाली की ती कावळ्यांकडे जाते. सुरोडकरांचं कावळ्यांशी वेगळंच नातं आहे. ते दिवंगत भावाच्या बाराव्या तेराव्यासाठी गावी गेले होते. विदर्भातल्या भयाण उन्हात दुपारी माणसं बाहेर पडत नाहीत, तर कावळे कुठून येणार? असं सगळे म्हणत होते. पण अचानक कुठूनतरी शंभरेक कावळे आले. ते वाहत्या अश्रूंसह सगळ्यांना सांगू लागले, माझे कावळे मुंबईहून आलेत. हे सांगताना आजही त्यांचे डोळे पाणावतात. ते म्हणतात, पोलिस असो की, गुंड, कुणीही त्रास दिला की कावळे त्यांचं परस्पर काय ते बघून घेतात. मोठमोठ्या गाड्या घेऊन सेठिये, वकिल शंभर दोनशे रूपयांची भजी विकत घेऊन कावळ्यांना घालत असतात. तसे मुंबईत अनेक फरसाणाच्या दुकानांतून कबुतरांना खायला घालतात, तसं कावळ्यांना भावनगरी गाठिया द्यायची पध्दत आहे. पण इथली वेगळीच धम्माल असते. सुरोडकर सांगतात, सगळ्यांच्या हातचं कावळे खात नाहीत. ज्यांचं मन साफ त्यांचीच भजी ते खातात. 

याच खऱ्याखोट्या विश्वासावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत नाहीतर गिरगावच्या सोनापुरात कावळा ओरिएण्टेड इकॉनॉमी उभी राहिलीय. कधी शेकडो कावळे फिरत असताना चार चार तास ते पिंडाला शिवत नाहीत. यात काही तथ्य असेल किंवा कावळ्यांची त्यांच्या धंद्यातील ती ट्रिकही असेल. 'श्याना कव्वा' हे अस्सल मुंबईकर विशेषण तयार झालंय, ते उगाच नाही. 

2 comments:

  1. वास्तुशास्त्र हा विनोदी विषय नसून ते एक प्राचीन शास्त्र आहे. कृपया एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसताना मजा उडवू नये.

    ReplyDelete
  2. Mast ahe....shana kavva, kavalyanbaddal mala khup vegali mahiti milali. Thank you.

    ReplyDelete