Wednesday 8 December 2010

हगायचं नि जगायचं?

सालं तू मटाला बाटवलं होतंस, कालच माझा मित्र श्रीरंग गायकवाड म्हणाला. संदर्भ होता माझ्या शी!’ या लेखाचं. श्रीरंगच्याच गावच्या प्रगती बाणखेलेनं मुंबई टाइम्समधे मनातलं हा कॉलम सुरू केला होता. त्यात आम्ही मटातलीच माणसं काहीतरी नॉस्टॅल्जिक ललित लिहायचो. त्यातला हा दुसराच लेख होता. शी!

जागेत बसवण्यासाठी तो छोटा लिहिला होता. पण अजून बरंच आहे. लेख लिहिलेल्याला अडीचेक वर्षं उलटून गेलेत. त्यानंतर मी बरंच लिहिलं. पण अजूनही या एकाच लेखामुळे मला ओळखणारे काहीजण आहेत. बोरिवलीचे एकजण तर मी दिसलो की हसायलाच लागतात. मी लिहिलेला पहिला आणि शेवटचा चांगला लेख, असंही काहीजणांचं म्हणणं आहे. तुम्ही तुमचंही मत बनवायला हरकत नाही. नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलेला हा लेख.

कार्ल मार्क्सने जगातल्या माणसांची दोन प्रकारांत वाटणी केलीय , हॅव्ज आणि हॅव नॉटस्. आहे रे आणि नाही रे .
मला विचाराल तर जगात दोन प्रकारची माणसं आहेत . घरात संडासअसणारी आणि घरात संडास नसणारी .

ही भंकस नाही. खोटं वाटतं तर आमचा बंड्या सांगेल. चांगली नोकरी, पटलेली छोकरी असूनही त्याचं लग्न होत नव्हतं. कारण घरात संडास नव्हते .मुंबईच्या चाळी, झोपडपट्टयांमधे असे लाखो बंड्या आहेत, ज्यांची लग्न केवळ घरात संडास नाही म्हणून रखडलीत. त्यामुळे मग केवळ संडासासाठी आईबाबा,  मित्र,  नाका, जवळचं ऑफिस अशी सगळी मूळं सोडून दूर विरार किंवा बदलापूरला राहायला जायचं. नाहीतर वय उलटून गेलं तरी वाट बघायची. ही समस्या नाही का ?

प्रेम करायला जागा नाही. अभ्यासाला जागा नाही आणि संडास करायला जागा नाही. या मुंबईतल्या सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण त्याला कुणी समस्या मानत नाही. कारण त्यासाठी कुणी मोर्चे काढत नाही. उपोषणं करत नाही आणि लेखही लिहत नाही .

पण काही वर्षात राजकारण्यांना या विषयात अचानक रस वाटू लागलाय .त्यांना देशभरातली सगळी गावं हागंदारीमुक्त करायचीत. त्यांना वाटतं घरोघरी संडास बांधले म्हणून हागंदारी बंद होईल. पण गावात शेजारणींशी जिवाभावाच्या गप्पा मारायला दुसरी ' नो मॅन्स लँड ' असते कुठे ?

योजनेचं सोडा, पण त्याच्या नावाने मोठी क्रांती घडवलीय. पांढरपेशा बद्धकोष्ठित शासकीय मराठीत हा अस्सल मातीतला शब्द पोहोचणं, ही साधीसुधी गोष्ट नाही. नाहीतर अशाच केंद सरकारच्या निर्मलग्राम योजनेचं नाव बघा. एकदम फाल्तू. योजना संडासाविषयी आहे की देवळाविषयी, कळणार कसं

निर्मलग्रामवाल्यांना अशोक नायगावकरांची ' संपत गायकवाडही कविता वाचायला द्यायला हवी ,

विक्रोळीच्या संपत गायकवाडला मी म्हटले,
तू रूळावर काय शी करायला बसतोस ?

संपत म्हणाला
साहेब, शी काय म्हणता
सरळ हागायला बसतो म्हणाना !
म्हणजे किती मराठी वाटतं ,
पोट कसं साफ झाल्यासारखं वाटतं

कवितेत कवी संपत आणि त्याच्या घरच्यांना सरकारकडून सुलभ शौचालयाचा वार्षिक पास मोफत मिळवून देतो , कवितेचा शेवट आहे ...

आणि झोपताना
संपत मनात म्हणतो ,
च्यायला !
सरकारने
जगायची नाही ,
हागायची तर सोय केली !

पण यापेक्षा अफलातून यमक बाळासाहेब ठाकरे जुळवायचे , ९९च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात युती सरकारने केलेल्या कामाविषयी सांगताना ते हजारो संडास बांधल्याचा आवर्जून उल्लेख करायचे. वर त्यांचं यमक असायचं, ये शरद पवार ये बघायला नाय तर हगायला तरी ये. सगळी सभा जोरदार हसायची. बाळासाहेबांनीच आग्रहाने आणलेल्या एसआरए योजनेमुळे मुंबईसारख्या शहरातही ओपन एअर संडासाची गावठी मजा संपत चाललीय. मुंबईची एक लोकसंस्कृती मरत चाललीय .

मी लहानपणी जिथे जायचो,  त्यातल्या एका मैदानावर एसआरएचा ट्रान्झिस्ट कॅम्प आलाय,  दुसऱ्या मैदानात टॉवर आहे आणि तिस-यावर आता नगरसेविकेचा स्पोर्टस् क्लब आहे. तसा नाला आहे अजून पण झाडंझुडपं तोडल्यानं आडोसा संपलाय. लहानपणी अभ्यास करायला कंटाळा आला की शीच्या नावाने मैदानात जाता यायचं. पावसात इलॅस्टिकची हाफचड्डी डोक्याला लावली की डोकं भिजायचं नाही. थंडीत रात्री शेकोटीभोवती गोलगप्पा रंगायच्या आणि उन्हाळा म्हणजे जमिनीच्या भेगा भरायचे दिवस.

कॉलेजात जायला लागल्यावर अशावेळी प्रतिभेला बहर यायचा . तेव्हा उदारीकरणाला सुरवात होत होती. राहुल रॉयला बघून कोणालाही वाटायचं आपणही हिरो बनू शकतो . लालूला बघून वाटायचं आपणही नेता बनू शकतो आणि चंगोच्या चारोळ्या वाचताना वाटायचं, आपणही कविता करू शकतो. ही क्रांतीच होती. अशीच एकदा मैदानात बसल्याबसल्या मला चारोळी स्फुरली होती ...

मैदानात बसून चांदण्यात हगताना
टमरेलात चंदाचे प्रतिबिंब पाहताना
मी फक्त तुझाच विचार करत होतो
आणि तुझ्याच नावाने कुथत होतो

नाहीतरी आमचा दत्ताभाऊ म्हणतो, ' व्होल वावर इज अवर'  हीच मराठीसंस्कृती आहे,  संडास नाही. कारण उभ्या महाराष्ट्रातल्या बलुतेदारांत आणि गावकुसाबाहेरही कुठेच संडास साफ करणारी मूळची मराठी जात नाहीय. जे आलेत ते पेशवाईच्या काळात गुजरात राजस्थानातून आलेले. त्यामुळे आता जर कदाचित शिवसेनेचं राज्य आलं तर त्यांना मराठी संस्कृती जपण्यासाठी हागंदारीमुक्तीचा कार्यक्रम राबवता येणार नाही .

म्युन्सिपाल्टीचे संडास,  सुलभ शौचालय आहे, तरी रेल्वेरूळावरचा खो खोथांबलाय का? रोज सकाळी लोकलमधून रूळांवर बसलेल्यांना बंदुकीने रबराच्या गोळ्या माराव्यात , असं माझा एक गुजराती मित्र तळमळीने सांगतो .

पण ते काय खुशीने तिथे बसतात  सोबतचा नितीन सोनावणेंनी काढलेला हा अफलातून फोटो बघा. रूळांवरचा प्रातविर्धी आटोपून येणाऱ्या महंमद तांबोळी नावाच्या मजुराचा हा फोटो. फोटो काढला त्याच्या आठवडाभरापूर्वीच त्याचा भाऊ त्याच ठिकाणी ट्रेनखाली मेला होता.

( हा फोटो http://www.nitinphotos.com/frameset.htm या लिंकवर पाहता येईल.पण आठवणीने पॉप अप ब्लॉक्स काढा. प्रोफाइलमधे  'डेथ ट्रॅप्स... नॉट ट्रॅक्स ' या सेक्शनमधे हा तिसरा फोटो आहे.) 

तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

No comments:

Post a Comment