Sunday, 26 December 2010

मॉडर्न महात्मा

ठाण्याच्या साहित्य संमेलनात पुन्हा एकदा त्यांचे किडे वळवळलेच. असे कुणाला नथुरामविषयी कढ आले की आपण गांधीजींविषयी बोलायला हवं. त्यांच्या शेपट्या वाकड्याच राहणार आहेत. ते सूर्यावर थुंकतच राहणार आहेत. आपण बापूंच्या मोठेपणाविषयी बोलू. परवाच्या गांधी जयंतीला नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला हा लेख. 

गांधी जयंती आली की आपल्या सगळ्यांना गांधीजींची आठवण होते. कारण बँक हॉलिडे आणि ड्राय डे. बाकी पाचशेची नोट वगळता तसे बापू आपल्याला आठवत नाहीत. फार तर ते कुठे सरकारी ऑफिसांतले फोटो नाहीतर काँग्रेसच्या प्रचारसभांमधे चुकून दिसतात. त्या वातारवणात सूट न होणारे. उगाच अंग चोरून भिंतीवर अडकलेले असतात ते. त्यामुळे तिथेही क्वचितच लक्षात येतात.


तरीही काही लोक आवर्जून गांधीजींची आठवण काढतात. फोर पीज् बिझनेस अँड मार्केटिंग नावाचं विशेषतः मार्केटिंगवर भर देणारं एक पाक्षिक आहे. यावेळच्या अंकात त्याच्या कव्हरवर गांधीजींच्या चेह-याचा आपल्याला परिचितसा आकार आहे. त्यात लिहिलंय द गुरू ऑफ मार्केटिंग गुरूज. आत दोन लेख आहेत मॅनेजमेंट गुरू अरिंदम चौधरी आणि ऍड गुरू अलेक पदमसींचा. पण बापू म्हटलं की आपल्याला काही तरी आऊटडेटेड डोळ्यासमोर येतं. प्रार्थना म्हणणारा, सत्य अहिंसा वगैरै शतकांपूर्वीपासूनच्या गोष्टी सांगणारा हा अर्धा नागडा फकीर कोणत्याही अँगलनं मॉडर्न वाटत नाही. तरीही आज हे मोस्ट मॉडर्न म्हणवून घेणारे मॅनेजमेंट गुरू गांधीजींची आठवण काढतात, हे आश्चर्यच आहे.

गांधीजी मार्केटिंगचे महात्मा होते, असं चौधरी लिहितात. गांधीजींचं एक अवतरण त्यांनी दिलंय, ग्राहक हा आपल्या कामातला अडथळा नसतो उलट तो कामाचा हेतूच असतो. धंदा करत असाल तर त्याला बाहेर ठेवता येत नाही. तो धंद्याचाच एक भाग असतो. तुम्ही त्याच्यावर उपकार करत नसता. उलट तोच तुम्हाला सेवा कऱण्याची संधी देऊन उपकार करत असतो.हे अवतरण मार्केटिंगचा बेसिक फंडा तर आहेच. पण स्वातंत्र्यलढ्यात हे तत्त्व गांधीजींनी कसं आचरणात आणलं याची त्यांनी चर्चा केलीय.

पदमसींचा लेख छोटाच आहे. पण थेट आहे. दांडीयात्रा हे आदर्श इवेंट मार्केटिंगचं आतापर्यंतच जगातलं उत्तम उदाहरण कसं आहे, याचं विवेचन त्यांनी केलंय. एक प्रतीकात्मक आणि भावनेला हात घालणारं हे आंदोलन एकाच वेळेस खेड्यांतल्या निरक्षरांपासून जगभरच्या मीडियाला आकर्षून घेत होतं. आज इवेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला धावाधाव करावी लागते. पण या इवेंटविषयी जाणून घेण्यासाठी लोक उतावीळ होते, असं पदमसी सांगतात. आज जाहिरातीच्या दुनियेत पदमसींचा मान खूप मोठा आहे. त्यामुळे ते सांगतात त्या चले जाव या घोषणेचं आणि डोळा फोडल्याचा बदला म्हणून डोळा फोडल्याने एक दिवस अख्खं जग आंधळं होईल, या एका दमदार ओळीचं.

फक्त पदमसी आणि चौधरी हे काही अपवाद नाहीत. जग ज्याला खूप मान देतं, असा आधुनिक भारतातला एकमेव ब्रँड हा बापू हाच आहे. जगभरातल्या कुणाही विचारवंताला, नेत्याला गांधीजींना टाळून पुढे जाता येत नाही. आपण भारतीयांनी कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं, तरीही बापू काही केल्या छोटे होत नाहीत. आपण वारंवार त्यांचा पराभव करतो. पण तरीही ते जगभरातल्या विजयी वीरांना आपल्याकडे ओढून घेतात. ओबामांचं उदाहरण पुरेसं आहे. शिवाय अमेरिकेतलंच दुसरं उदाहरण मॅनेजमेंट गुरू स्टीवन कोवेचं. अमेरिकेतलं हे आजघडीचं एक सगळ्यात खणखणीत वाजणारं नाणं. द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपल हे त्यांचं बेस्टसेलरचं बाप ठरलेलं पुस्तक. सर्वसामान्य अमेरिकन कोवे सांगतात तसा विचार करतात, असं म्हटलं जातं. त्या कोवेंवर गांधीवादाचा प्रभाव ठायीठायी दिसतो.

प्रिंसिपल सेंटर्ड लीडरशीप हे कोवेंचं पुस्तक तर गांधीविचारांवर लिहिलंय जणू. त्यात एक प्रकरण गांधीजींनी सांगितलेल्या सात पापांवर आहे. कामाशिवाय वित्त, विवेकाशिवाय सुख, चारित्र्याशिवाय ज्ञान, नीतीशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय धर्म आणि तत्त्वांशिवाय राजकारण ही सात महापापं गांधीजींनी सांगितली आहेत. आपण रोज पावलापावलावर ही पापं करत राहतो. ही पापं करणा-यांनाच मोठं मानत राहतो. पण कोवे या आधारानेच आपले विचार मांडतात. अनेकांना नव्याने जगण्याची प्रेरणा देतात.

हे फक्त आजच घडतंय असं नाही. गांधी भारतात येण्याअगोदर आफ्रिकेत होते, तेव्हाच जगाने त्यांना महात्मा मानलं होतं. तरीही अधिक चांगलं जगण्यासाठी, माणसा माणसाला जागं करण्यासाठी हा महात्मा धडपडत होता. टाईम मॅगझिनच्या मॅन ऑफ द इयरच्या किताबाचं आजही आपल्याला कौतूक आहे. गांधींजींनी सविनय कायदेभंगांची चळवळ हाती घेतली, तेव्हा म्हणजे १९३० साली त्यांना टाइमने मॅन ऑफ द इयर मानलं होतं. आज आपण त्यांच्या ज्या समकालीनांना मोठं मानतो, ते मोठे होतेच, पण हे महापुरुष जगाच्या खिजगणतीतही नव्हते. एकटे गांधीजीच नाहीत मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, दलाई लामा, नेल्सन मंडेला आणि आँग अन स्यू की या गांधीवादी नेत्यांनाही हा किताब मिळालाय. गांधीजींनंतर स्वातंत्र्याच्या अनेक लढाया गांधींच्या मार्गाने जगभर लढल्या गेल्या. त्यातल्या अनेक यशस्वी झाल्या. दलाई लामा किंवा आँग अन स्यू की आज रुढार्थाने यशस्वी नसतीलही. पण त्यांची गांधींवरची निष्ठा अद्याप तसूभरही ढळलेली नाही. हीच गांधीवादाची ताकद आहे.

आज आपण पर्सनॅलिटी डेवलपमेंटच्या आणि सॉफ्ट स्किल मॅनेजमेंटच्या गप्पा रोज ऐकतो. पण गांधीजींनी हजारोंची पर्सनॅलिटी डेवलप केली आणि लाखो कार्यकर्त्यांना सॉफ्ट स्क्लिल्स शिकवली. त्यांनी माणसं घडवली. त्यांनी माणसं बदलवली. लाखो भारतीयांना जगण्याचा मार्ग दाखवला. महाराष्ट्रातलीच दोन उदाहरणं. एक काळकर्ते शि. म. अर्थात शिवरामपंत परांजपेंचं. टिळकांचे हे पट्टशिष्य. पण जहाल लिहिण्यात त्यांच्याही दोन पावलं पुढे. स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच त्यांचे वडीलबंधू बाबाराव सावरकरांना टिळकांपेक्षाही जवळचे वाटायचे ते शिवरामपंतच. स्वातंत्र्यवीरांनी त्यांना गुरुस्थानी मानलं. पण गांधींचा प्रभाव इतका होता की शिवरामपंत कट्टर गांधीवादी झाले. पगडीच्या जागी गांधी टोपी आली आणि जरीकाठी उपरण्याऐवजी खादी. असं गारुड फक्त गांधीच करू जाणं. दुसरं उदाहरण तुकडोजी महाराजांचं. हा अवलिया अगदी तरुणपणी रानावनांत विमनस्क स्थितीत फिरायचा. विदर्भात कुणाला गांधी माहीतही नसताना ते जंगलातल्या काट्याकुट्यांचा चरखा बनवायचा प्रयत्न करत होते. लोकांनी विचारलं काय हे. उत्तर आलं, हा चरखाच उद्याची क्रांती घडवणार आहे. गांधीजी आले. रानावनांतला तुकड्या लोकांमधले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बनले. गांधी माझं गोत्र, असं सांगत त्यांनी क्रांती घडवली.

जगाला तुमचा निरोप काय, असं एका पत्रकाराने विचारल्यावर एकदा गांधीजींनी उत्तर दिल होतं, जगाला सांगा गांधी इंग्रजी विसरलाय. गांधीजी काही इंग्रजीच्या विरोधात नव्हते. पण हे प्रतीकात्मक होतं. जग काय म्हणतंय त्यापेक्षा प्रत्येक भारतीय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, हे त्यांना त्यातून सूचवायचं होतं. ते फक्त तसं म्हणाले नाहीत. तर सत्याचे प्रयोग पासून जे काही लिहिलं ते गुजरातीतच. बोलले ते हिंदीतच. पण दुर्दैवाने त्यांचा वारसा चालवणारे जगाकडे तोंड करून उभे राहिले. नेहरू इंग्रजीत फक्त लिहितच नाहीत, तर विचारही करत. बापू सांगत प्रोडक्शन बाय मास. नेहरू मास प्रोडक्शनची गोष्ट सांगत होते. बापू पूर्वेकडे पाहत होते तर नेहरू पश्चिमेकडे. पण तरीही त्यांच्यात एक प्रेमाचा झरा अखंड वाहत होता. पुढे नेहरूंच्या वारशांनी गांधींचा वारसा तर सोडलाच. पण नेहरूंमधल्या गांधीवादालाही तिलांजली दिली. पण नेतेच कशाला सर्वसामान्य भारतीयही गांधीजींपासून दूर धावत होता. त्याला आधुनिक व्हायचं होतं. तो आयआयटी, अणुशक्ती, भाक्रा नांगल फक्त यालाच भारताचं वैभव मानत होता. अशावेळेस जुन्यापुराण्या गोष्टी सांगणारा बापू त्यालाही आऊटडेटेड वाटत होता. पण या आधुनिक बनण्याच्या नादात आपण अधिक आऊटडेटेड बनत गेलो. कारण आपण आपली ओळख विसरून गेलो होतो.

गांधीजींविषयी आपली आठवण आहे. १५ ऑगस्ट १९४७ यायला काही आठवडे बाकी होते. नेहरू आणि सरदार पटेल नवी दिल्लीत स्वातंत्र्याची तयारी करत होते. गांधीजी कोलकात्यात हिंदू मुस्लिमांमधील दंगे शांत करण्यात गुंतले होते. नेहरू पटेलांचं पत्र घेऊन एक दूत मध्यरात्री गांधीजींपर्यंत पोहोचला. खूप महत्त्वाचं पत्र आहे, दूत म्हणाला. भुकेला दिसतोयस, जेवलायस का, गांधीजींनी विचारलं. त्याचं जेवण आलं. त्याला पोटभर खाऊ घालूनच गांधीजींनी पत्र उघडलं. स्वातंत्र्याच्या सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रपित्याला दिलेलं ते निमंत्रण होतं. इथे कोलकात्यात अंधार पसरलाय, अशावेळेस रोषणाईतल्या नवी दिल्लीत जाणं हा मूर्खपणा नाही का, गांधीजींची पहिली प्रतिक्रिया होती ती. दुस-या दिवशी तो दूत गांधीजींचा निरोप घ्यायला आला. गांधीजी एका झाडाखाली उभे होते. तेवढ्यात एक पान झाडावरून पडलं. गांधीजींनी ते उचललं. दोन्ही हातांनी अलगद दुताच्या हातात ठेवत सांगितलं, ना माझ्याकडे सत्ता आहे ना संपत्ती. नेहरू आणि पटेलांना सांग हीच हे वाळलेलं पान हीच माझी पहिल्या स्वातंत्र्यदिनाची भेट. हा खास गांधींचा विनोद होता. तो दूत ढसाढसा रडू लागला. देवाला अशी सुकलेली भेट मान्य नसावी. म्हणून त्याने त्यात हा ओलावा आणलाय. तुझ्या आसवांसोबतच नेहरू पटेलांना ही भेट दे आठवणीने, गांधी हसत हसत म्हणाले.

सागाना, कोण होतं आधुनिक?

No comments:

Post a Comment