Monday, 13 December 2010

जाऊ दे गं, बरखा!


कालच्या रविवारी नवशक्तिच्या रविवार पुरवणीत माझा लेख छापून आला, मीडिया राडिया नावाचा. त्यासाठी दोन तीन दिवस नेटवर बसून बरंच वाचलं त्याविषयी. गरुडांची गिधाडं होताना बघतोय आपण, असं वाटलं. लेख फार चांगला नाही, बरा झालाय. वाचून बघा. जाने भी दो, बरखाचं भाषांतर केलंय जाऊ दे गं, बरखा म्हणून. 


जाने भी दो यारों नावाचा सिनेमा तुम्ही बघितलाच असेल. भारतीय सिनेमातला तो एक माईलस्टोनच. एका पेपरची संपादक असणारी भक्ती बर्वे दोन कॅमेरामनना आपल्या जाळ्यात अडकवते. एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाचा शोध त्यांच्याकडून लावून घेते आणि नंतर स्वतःच बिल्डर आणि राजकारण्यांना ब्लॅकमेल करते. त्यात दोघे कॅमेरामन मारले जातात. अशी ही ब्लॅक कॉमेडी.
आजकाल सिनेमा पाहण्यासाठी यू ट्यूबवर सर्च करण्याची पद्धत आहे. तसा आपण जाने भी दो यारों चा सर्च केला तर आपल्याला एक वेगळाच वीडिया हाती लागतो. त्याचं शीर्षक आहे, जाने भी दो, बरखा! एनडीटीवीच्या एक संपादक बरखा दत्त यांनी नीरा राडिया टेप प्रकरणात दिलेली स्पष्टिकरणं आणि जाने भी दो यारोंमधली काही दृश्य याचं त्यात अफलातून मिश्रण केलंय. सिनेमातले भक्ती बर्वेंचे डायलॉग आणि बरखा यांनी मांडलेली बाजू यातल कमालीचं साम्य बघून आपणही हादरून जातो.

दुसरा असाच एक वीडियो बरखागेट नावाचा. वॉटरगेट या अमेरिकेतल्या एका खळबळजनक भ्रष्टाचार प्रकरणावरून घेतलेलं हे नाव. आपल्याला न कळणा-या भाषेतला हा विडियो आहे. त्यात सिनेमातला हिटलर आपल्या अधिका-यांशी बैठक घेतोय, असं दृश्य आहे. ते दृश्य सुरू राहतं आणि खाली इंग्रजीत सबटायटल्स येतात. ही वाक्य मात्र सिनेमाच्या संवादांचं भाषांतर नसतं तर राडिया टेप प्रकरणातल्या मीडियाच्या सहभागाविषयी वेगळेच संवाद असतात. आपण पुन्हा हादरतो.

हे दोन्ही वीडियो बनवणा-यांची क्रिएटिविटी जबरदस्तच आहे. बरखा दत्तनाही त्याचं कौतूक करावं लागेल, इतकं त्यांचं मिश्रण सरस आहे. जाने भी दो यारों बघताना आपण जसं हसतो तसंच आपण इथेही खदाखदा हसत राहतो. त्याचवेळेस मनही खात राहतं. सालं, आपल्या आजुबाजूस हे चाललंय तरी काय? कारण आपण गरुडांची गिधाडं होताना पाहत असतो.

नवं तंत्रज्ञान बंद घरात नवा प्रकाश घेऊन येतं. आणि हे तंत्रज्ञान जर कम्युनिकेशन म्हणजे संवादाच्या क्षेत्रातलं असेल तर आपल्यासारख्या भव्य आकाराच्या देशात तर ते खूपच महत्त्वाचं असतं. दोन वेळ जेवणाची मारामार असणा-यांसाठीही यात आशा असते. पण आपल्याकडे घडलं उलटंच. कम्युनिकेशनमधलं नवं तंत्रज्ञान हे राजकारण्यांना आणि उद्योजकांना चरण्यासाठीची नवी कुरणंच बनली. टू जी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान नवी क्रांती आणण्याआधी देशातला सगळ्यात मोठा घोटाळा घेऊन आलं. हा घोटाळा करणारे मंत्री ए. राजा वादात सापडले. हे होत असतानाच नीरा राडिया यांच्याशी झालेल्या मोठमोठ्यांची झालेली संभाषणं समोर आली.

नीरा राडिया या कंपन्यांना प्रसिद्धी मिळवून देणारी एक कंपनी चालवतात. टाटा, मुकेश अंबानी त्यासाठी या कंपनीला प्रत्येकी तीस कोटी रुपये वर्षाला देतं. या नीराबाईंनी ए. राजा यांना दूरसंचार खात्याचे मंत्री बनवण्यासाठी जोरदार धडपड केली होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजपला जाळ्यात ओढलं तर कधी टाटा आणि अंबानींचा संवाद घडवून आणला. २००८ आणि २००९ या काळातली त्यांची जवळपास सहा हजार संभाषणं रेकॉर्ड केलेली आहेत. जवळपास नऊ हजार तासांची ही संभाषणं आहेत. त्यांनी राजकारणी आणि उद्योजकांच्या भ्रष्टाचाराची सवय असलेल्या भारतीयांना जोरका झटका और जोरोंसे दिलाय. कारण यात मातब्बर पत्रकारांची नावं जोडलेली आहेत. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, वीर संघवी, प्रभू चावला, एम. के. मणी या पत्रकारांचे आदर्श असलेल्यांचीच ही संभाषणं आहेत. आवज सगळे ओळखीचेच आहेत, पण बोलणा-यांची भाषा टीवीवर ऐकू येते त्याच्या बरोबर उलट आहे.

यात बरखा दत्त आणि वीर संघवी तर थेट राजांना मंत्री बनवण्यासाठी आघाडीवर असल्याचं स्पष्टच होतंय. विशेष म्हणजे वीर संघवी तर काँग्रेसचा उल्लेख तर आम्ही असा करत आहेत. लोकांशी सीधी बात करून लक्तरं काढणारे प्रभू चावला निकाल लागण्याआधीच हायकोर्टाचा एक निकाल मुकेश अंबानींना सांगण्यासाठी उतावीळ झालेले दिसतात. राजदीप यात आहेतच, पण त्यांनी एडिटर्स गिल्डचे अध्यक्ष म्हणून या सगळ्यावर पडदा टाकण्यासाठी चाललेली धडपड अधिक धक्कादायक आहे.
आज ही सारी मंडळी अनेक युक्तिवाद करत आहेत. पण त्यांना फारसा अर्थ नाही. एखाद्या पत्रकाराची राजकारण्याशी मैत्री असणं वेगळं, त्याला चार सल्ले देणं वेगळं आणि एखाद्यासाठी राजकीय पदांसाठी लॉबिंग करणं वेगळं. ही कोणत्याही दृष्टिकोनातून पत्रकारिता असू शकत नाही. अधिक स्षष्टपणे बोलायचं तर ही दलालीच आहे. या बड्या पत्रकारांनी सामाजिक हिताच्या भावनेतून हे पुण्यकर्म निश्चितच केलेलं नाही. याचा मोबदला कोणत्या न कोणत्या स्वरूपात मिळाला असेलच. मग ते काहीही असू शकतं, सन्मानांपासून परदेश प्रवासापर्यंत काहीही.

पत्रकारांवर आजही लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास मोडण्याचा अधिकार पत्रकारांनाही नाहीय. उलट पत्रकार हाच विश्वास विकून पत्रकार गब्बर होताना दिसत आहेत. अर्थात याला अनेक अपवादही आहेत. पत्रकारिता ही सामाजिक बांधिलकी की धंदा, ही चर्चा अनंतकाळ सुरू राहणार आहे. पण तो धंदा म्हणूनही चालवण्यासाठी सामाजिक बांधिलकीला कायम आघाडीवर ठेवणं भाग आहे. कोंबडीच कापली तर सोन्याची अंडी देणार तरी कोण, हा साधा विचार करायला हवाय.

हे सारं प्रकरण धक्कादायक असलं तरी मुख्य प्रवाहातल्या टीवी आणि वृत्तपत्रांनी हे मांडण्यात कुचराई केली, हे अधिक धक्कादायक आहे. खरंतर एका मोठ्या न्यूज चॅनलकडे या टेप्स तीन महिने पडून होत्या. त्यांनी हे प्रकरण दाखवलं नाहीच वर दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. ओपन आणि आऊटलूक या साप्ताहिकांनी धाडस दाखवलं नसतं, तर हे कदाचित फक्त गावगप्पा बनून  राहिलं असतं. एरवी राजकारण्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांची धुणी धुण्यात अग्रेसर असलेल्या माध्यमांना स्वतःवर असा झोत मात्र नकोसा होतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आणि निरोगी समाजासाठी स्वतःकडे विशेषाधिकार घेणा-या माध्यमांना कोणीतरी जाब विचारायला हवाच आहे. पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार तरी कोण ?

आज बुरखे टराटरा फाटत आहेत. सत्य समोर येणं केव्हाही चांगलं असतंच, भले ते कितीही धक्कादायक असलं तरी. आज मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी हे प्रकरण दाबलं तरी इंटरनेट या नव्या माध्यमानं आपली जबाबदारी मोठ्या हिकमतीने उचलली. नवे, छोटे पत्रकार आणि सर्वसामान्य ब्लॉगर मोठ्या प्रमाणात उसळून आले. विशेषतः हिंदीत यावर खूप त्वेषानं लिहिलं गेलं. सगळ्यांनी यात अडकलेल्यांची सर्व बाजूंनी कोंडी केली. इंटरनेट या माध्यमात सर्वाधिक गुंतवणूक करणा-या राजदीप सरदेसाईंनी हे माध्यम गंभीर नसल्याचा कांगावा सुरू केलाय. यातच भारतीय नेटिझन्सच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. तुम्ही कितीही मोठे असाल, आमचे आदर्श असाल, आम्ही तुम्हालाही सोडणार नाही, अशी तुतारी या नव्या माध्यमाने फुंकलीय.

सुदैवानं हे खूपच आश्वासक आहे.

लेखातला बॉक्स

आमच्या पत्रकारितेचे आदर्श’!

बरखा दत्त

एनडीटीवी इंग्रजीच्या ग्रुप एडिटर. पण त्यांचा दबदबा त्यांच्या चॅनलपेक्षाही मोठा. कारगीलच्या युद्धाचं समरांगणावर जाऊन केलेलं रिपोर्टिंग असो की त्सुनामीची वेदना मांडणं असो, बरखाचं वेगळेपण नेहमी पुढे आलं. टॉक शो आणि हिंदुस्थान टाईम्समधला कॉलममधे त्या आग ओतत राहिल्या. त्यामुळे देशाने त्यांना पद्मश्रीने गौरवले. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना नव्या पत्रकारांनी आदर्श मानलं. पण आज नीरा राडियांच्या टेपमुळे सगळे मुखवटे गळाल्यासारखं झालंय. हे देशातलं सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण बरखागेट नावानं ओळखलं जातंय

वीर संघवी

वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी बॉम्बे नावाचं मॅगझिन सुरू करून त्याचा संपादक बनायचा पराक्रम वीर संघवींनी केला होता. तेव्हापासून ते सतत संपादक आहेत. साप्ताहिक संडे मधली त्यांची कारकीर्द विशेष गाजली. पण हिंदुस्थान टाईम्सचे संपादक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे कॉलम, पुस्तकं आणि टीवीवरील मुलाखतींचे कार्यक्रम यावर चर्चा करणं हा स्टेटस सिंबल बनला. पण आज राडिया प्रकरणामुळे हिंदुस्तान टाईम्सने त्यांचे कॉलम बंद केलाय आणि डिमोशनही केलंय.

प्रभू चावला

पाकिस्तानातून दिल्लीत विस्थापित म्हणून आलेले प्रभू चावला तसे मूळचे प्रोफेसर. पण पत्रकार बनल्यावर १४ वर्षं इंडिया टुडे या साप्ताहिकाचे संपादक होते. आज तकवर त्यांची सीधी बात गाजत राहिली. त्यांना पद्मभूषणही मिळालंय. हे सगळं असतानाही ते मुकेश अंबानींना कोर्टाचा होऊ घातलेला निकाल सांगण्यासाठी निरोप्या बनावं लागलं, हे राडिया टेपमधून स्पष्ट झालंय.

एम के वेणू

बिझनेस पत्रकारितेतलं हे एक खूप मोठं नाव. सध्या फायनान्शियल एक्प्रेसचे मॅनेजिंग एडिटर आहेत. इकॉनॉमिक टाइम्ससारख्या सर्वात मोठ्या पिंक पेपरचं संपादकपदही त्यांनी भूषवलंय. राडियाशी झालेल्या संभाषणाच्या तीन टेप्स सध्या उघड झाल्यात. या संभाषणातला बिझनेस अनेक प्रश्न उभे करतो.

राजदीप सरदेसाई

निर्भीड पत्रकारिता आणि  पद्मश्री राजदीप सरदेसाई हे दोन शब्द गेले दोन दशक तरी समानार्थी बनलेत. बाळासाहेब ठाकरे असोत की नरेंद्र मोदी, राजदीप त्यांच्याशी दोन हात करायला कधी घाबरले नाहीत. शिवाय एका मराठी पत्रकाराने मीडिया हाऊस उभं केल्यामुळे त्याबद्दल महाराष्ट्रात आदरही आहे. त्याच्या टॉक शो आणि लिखाणातली कळकळ आणि खोली कायम लक्षवेधक ठरलीय. राडियाशी झालेल्या त्यांच्या संभाषणाची टेप प्रसिद्ध झालीय. त्यात इतरांएवढं आक्षेपार्ह काही नसलं तरी त्यातून अनेक संशय निश्चितच निर्माण होऊ शकतात. पण ही संभाषणं छापणा-या साप्ताहिकांवर आणि ब्लॉगर्सवर पत्रकारितेतल्या नीतीमूल्यांची साक्ष देत केलेली टीका वादग्रस्त ठरली.

याशिवाय


इंडिया टुडेचे शंकर अय्यर, इकॉनॉमिक टाइम्सचे जी गणपती सुब्रमण्यम आणि रश्मी, ईटी नाऊचे आर. श्रीधरन, न्यूज एक्सचे जहांगीर पोचा या पत्रकारांशी राडियाची झालेली संभाषणं आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक आक्षेपार्ह आहेत. 

1 comment:

  1. beautiful boss. manapasun lihilelya lekach manapasun abhinandan...

    ReplyDelete