Tuesday 21 December 2010

सनातन संस्था, भगवा दहशतवाद वगैरे

सध्या भगव्या दहशतवादाची चर्चा सुरूय. घोटाळ्यांवरची चर्चा झाकण्यासाठी काँग्रेसने टाकलेला डाव यशस्वी झालाय. तरीही इथे थोडीशी भगव्या दहशतवादाची चर्चा करुयाच. कारण माझा एक जुना लेख. सनातन संस्थेच्या लोकांनी गेल्या वर्षी दिवाळीत गोवा मडगाव इथं बॉम्बस्फोट घडवले होते, तेव्हा लिहिलेला.

खरं तर हा आणखी जुना लेख आहे. सनातन संस्थेच्याच लोकांनी पहिल्यांदा गडकरी रंगायतन वगैरे ठिकाणी बॉम्ब फोडले होते, तेव्हा मटा ऑनलाईनसाठी लेख लिहिला होता, तुम्ही सनातन्यांच्या बाजूचे की संतांच्या तोच लेख पुन्हा थोडी भर घालून मटातल्या माझ्या विंडो सीट या कॉलमात बॉम्ब आपल्या आसपासचे म्हणून लिहिला होता. दुस-यांदा लिहिताना त्यात काही चांगली भर मात्र घालता आली नाही. पण दोन्हीदा चांगलं कौतुक झालं. सडकून टीकाही झाली. नेटवरच्या प्रतिक्रियाही खूप तिखट होत्या. सनातनवाल्यांनी कोर्टात खेचण्याची धमकीही दिली होती.

मटातल्या लेखाचा इण्ट्रो असा होता: एरव्ही बॉम्बस्फोट घडवणारे दूर अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेतले वगैरे असतात. पण गोव्यातले आणि त्याआधी ठाणे-नवी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारे आपल्यासारखेच मराठी आणि पांढरपेशे आहेत. हे धक्कादायक आणि काळजी वाटायला लावणारं आहे. त्यांचा मुखवटा आध्यात्मिक आहे. आणि तोही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेशी फटकून वागणारा आहे.

प्रबोधनकारांनी एक जोरदार संकल्पना मांडलीय, हिंदवी नीळकंठीझम. हिंदू धर्माने अनेक हलाहल पचवलेत. त्यामुळे इस्लाम असो की ख्रिश्चन धर्म हा सगळ्यांना पुरून उरलाय. तो या परीक्षांतून पास होत आज व्यापक बनलाय. अशी महादेव शंकराची हिंदू धर्माची तुलना त्यांनी केली होती. त्यामुळे आज इस्लाम खतरे में सारखी हिंदू खतरे में अशी बोंब मारणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा, अर्धवट ज्ञान आणि स्वार्थ आहे, असं डोळे झाकून समजावं.

सनातन संस्थेच्या लोकांशी माझं भांडण कशाला असेल? पण आपल्यासारख्याच या मुलांना बॉम्बस्फोट करावासा वाटणं हेच धक्का देणारं होतं. त्यामुळे यात खरंतर टीका नव्हती. हे असं का घडतंय याविषयीचं दुःख होतं. त्यामुळे राहुल गांधी सध्या जे काही बकवास बोल्तोय, त्याच्याशी याचा काहीही संबंध नाहीय. फक्त निमित्त. जुना लेख पुन्हा कटपेस्ट.

मलगोंडा सिद्धगोंडा पाटील. जत तालुक्यातल्या काराजनगी गावचा. अत्यंत गरीब. अपुरी दुष्काळी शेती. शिक्षणासाठी शिराळ्याला मामाकडे गेला. बारावीत असताना सनातन संस्थेच्या संपर्कात आला. आठ वर्षं सांगली-मिरजेत 'सनातन प्रभात' दैनिकाचा बातमीदार म्हणून काम केलं. पुढे गोव्यात सनातन संस्थेच्या आश्रमात होता. हा पाठवायचा त्या पैशांतून घर चालायचं. तो गोव्याला काय करतो,  हे गावी कुणालाही माहीत नव्हतं. कळलं ते टीव्ही आणि पेपरांमधूनच. ऐन दिवाळीत मडगावला चर्चजवळ झालेल्या स्कूटरमधल्या बॉम्बस्फोटात तो गेल्याचं कळलं.

रमेश गडकरी. वय वर्ष पन्नास. तुमच्या आमच्यासारखा साधासरळ घरात रमणारा माणूस. शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचा डिप्लोमा. अंधेरीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं दुकान हे उत्पन्नाचं साधन. दुकान चांगलं चालत होतं. पण काही वर्षांपूर्वी ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यांची पत्नी,  दोन्ही मुली आणि जावई संस्थेचे सेवक बनले. हे कमी होतं म्हणून जवळपास आठ वर्षांपूर्वी आपलं दुकान विकलं. आलेले पैसे बँकेत ठेवले. घरदार सोडून चार वर्षांपूर्वी ते पत्नीसोबत सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात राहायला आले. तोपर्यंत बॉम्ब वगैरे गोष्टी त्यांनी बातम्यांतच वाचल्या होत्या. पण दीड वर्षांपूर्वी गडकरी रंगायतनला झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून ते आज गजाआड आहेत.

मलगोंडा पाटील, योगेश नाईक, सुरेश नाईक किंवा रमेश गडकरी, मंगेश कदम, संतोष आंग्रे, विक्रम भावे. ही नावं तुमच्या आमच्यासारखी. ही मराठमोळी माणसं बॉम्बस्फोट करतीलसं मनातही येत नाही. पहिली तीन नावं गेल्या आठवड्यात झालेल्या गोव्यातल्या बॉम्बस्फोटात गुंतलेली. आणि नंतरचे चार दीड वर्षांपूर्वी गडकरी रंगायतन, विष्णुदास भावे नाट्यगृह आणि पनवेलच्या एका थिएटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातले आरोपी. सगळे डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या सनानत संस्थेशी संबंधित.

हे बॉम्बस्फोट अगदीच छुटपूट. तरीही ते बॉम्बस्फोटच. म्हणून धक्कादायक. कारण आपल्या आजुबाजूचे, अगदी नात्यागोत्यातलेही अनेकजण सनातन संस्थेशी संबंधित असतात. सार्वजनिक गणपतीच्या मंडपांबाहेर पुस्तकं विकणारी,  आपल्या घरी कॅलेंडर विकायला येणारी,  सनातनच्या कार्यक्रमांना जाणारी,  बोलावणारी ही माणसं. सनातनवाले देवाधर्माचंच सांगतात. त्यात संतांच्या, ऋषींच्या गोष्टीही असतात. संस्कारांची चर्चा असते. आपण ज्यांना अध्यात्माचा भाग मानतो,  त्या सगळ्या गोष्टी त्यात असतात. तरीही ते विचार ऐकून काही जण बॉम्बस्फोट करण्याचा अमानुष विचार करतात. काहीतरी गोची आहे नक्की!

आमच्यातल्या दोन-चार जणांनी चूक केली तर संपूर्ण संस्था दोषी ठरत नाहीत. हिंदुत्ववादी म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र आहे,  असा दावा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. पण हे सगळे आरोपी गेली अनेक वर्षं सनातन संस्थेच्या प्रभावात आहेत,  हे तेही नाकारत नाही. संस्थेचं मुखपत्र 'सनातन प्रभात'  किंवा वेबसाइट चाळल्या की संस्थेचा हिंदुत्ववादी अजेंडा स्पष्ट होतो. देवदेवतांची विटंबना सुरू आहे,  हिंदूंची गळचेपी सुरू आहे,  सरकार हिंदूंवर अन्याय करतेय,  असा प्रचार यातून सुरू असतो. अन्य कोणत्याही कट्टर प्रचारासारखा हाही एकांगी आहे. एवढंच नाही,  तर दहशतवादी बना,  नक्षलवादी बना अशी भाषाही यात पूर्वी अधूनमधून होती. यामुळे दोन-चार लोकांच्या मनात का होईना, पण बॉम्बस्फोट करण्याचे विचार आले. म्हणून त्या विचारांवर चर्चा करण्याची वेळ आली आहे.

हिंदुत्ववाद एक राजकीय-सामाजिक विचारधारा असल्याचं सगळ्यांनीच स्वीकारलंय. हिंदू धर्माच्या मूळ व्यापक बैठकीमुळे कागदावर तरी हिंदुत्ववाद राष्ट्रवादाइतका सर्वसमावेशक मांडता येतो. पण त्याला द्वेषाधारित कट्टरता जोडली जाते,  तेव्हा मात्र ते रसायन धोकादायक बनतं. तरीही राजकीय,  सामाजिक,  सांस्कृतिक स्वरूपात विविध संघटना आणि पक्ष कट्टर हिंदुत्व आपल्यासमोर मांडतात. आता त्यांचे चेहरे मुखवटे दोन्ही आपल्या ओळखीचे झालेत. पण सनातन हा अतिरेक आपल्याला अध्यात्माच्या खोक्यात भरून देतेय. हे घातक आहे आणि काळजी वाटायला लावणारंही.

कारण अध्यात्म,  देव,  संत वगैरे म्हटल्यावर आपण फारसं डोकं चालवत नाही. खरंतर बुद्धी आणि विचारांची सर्वात जास्त गरज तिथेच असते. सनातन संस्था सायंटिफिक स्पिरिच्युऍलिटीच्या गोष्टी करते. त्याचे प्रमुख जयंत आठवले हे मोठे डॉक्टर आणि विद्वान आहेत. संस्थेत त्यांना संत मानले जाते. त्यामुळे तर हे पॅकेजिंग अधिकच धोकादायक वाटू लागले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव हे जयंत आठवलेंचे एकेकाळचे मित्र. हिप्नॉटिझम या विषयामुळे ते अनेक वर्षं एकमेकांना चांगले परिचित होते. समितीच्या मासिकात तीनेक वर्षांपूर्वी मानवांनी सनातन संस्थेवर एक सविस्तर लेख लिहिलाय. 'सनातन संस्थेत हिप्नॉटिझमद्वारे ब्रेन वॉशिंग केले जाते. त्यामुळे यातून उद्या यातून नव्या अतिरेक्यांचा कारखाना सुरू झाला तर आश्चर्य वाटायला नको', आज हा त्यातला इशारा खरा झालेला आपण पाहतोय. म्हणून या सगळ्यावर विचार करायला हवा. आणि तसं असेल,  तर संतांचा वारसा सांगणा-या महाराष्ट्राने त्याचा विरोध करायला नको का?

ज्ञानेश्वरांपासून साईबाबांपर्यंत सहिष्णुता हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचं वैशिष्ट्य. कोणत्याही हेकेखोर गोष्टींना इथे जागा नाही. एखाद्या नाटकातल्या विडंबनामुळे किंवा नरकासुराच्या मिरवणुकीने हिंदू धर्म लहान होत नाही. ज्या टीकेला विरोध म्हणून बॉम्बस्फोट केले गेले,  त्याच्या कित्येकपट मोठी टीका हिंदू धर्माने पचवलीय. त्यातून तावून सुलाखून तो अधिक तेजस्वी झालाय. त्यामुळे कुणाला हिंदूंचं तालिबानीकरण करायचं असेल किंवा त्यांच्यात अल्पसंख्यक मानसिकता रुजवायची असेल, तर तो त्यांचा स्वार्थी अजेंडाच मानायला हवा. वर अध्यात्माची झूल पांघरून हे उद्योग कशाला हवेत?

निदान वारकरी विचारांवर पोसलेल्या महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेशी हे फटकून वागणारं आहे. महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा 'खळांची व्यंकटी सांडो' सांगते,  'दुर्जनांचा नाश' नाही. धर्माला मर्यादा असतात,  म्हणून त्यापुढे जाऊन संतांनी भक्तीचा हात पकडला. देऊळ आणि मशिदीच्या पलीकडे जाऊन सत्याची कास धरली. म्हणूनच तर शिवाजी महाराजांनी केळशीच्या याकुतबाबांना गुरू मानलं. शेख महंमदांना वारकरी परंपरेत महत्त्वाचं स्थान मिळालं. संतश्रेष्ठ नामदेव शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात पोहोचले. तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघाल्यावर अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिल्या विसाव्यासाठी वर्षानुवर्षे थांबते. आजही आर्चबिशप फेलिक्स मच्याडो आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो संतसाहित्यावर पीएचडी करतात. आणि म्हणूनच कित्येक सुफी संतांना,  पारशी असूनही मेहेर बाबांना,  जैन असूनही ओशो रजनीशना,  बौद्धांच्या विपश्यनेला आणि शीख असूनही निरंकारी बाबांना महाराष्ट्रात लाखो अनुयायी मिळाले.

त्यामुळे अतिरेकी हिंदुत्वाला आणि त्यासोबत येणा-या अन्य धर्माच्या द्वेषाला महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेत जागा नाही,  हे एकदा स्पष्ट व्हायला हवे. अध्यात्म प्रेम शिकवतं,  ते बॉम्ब फोडायला कसं काय शिकवू शकेल?  हा प्रश्न म्हणूनच माऊलीच्या वारीत तनाने किंवा मनाने गेलेल्या प्रत्येकाने विचारायला हवा.


तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

4 comments:

  1. वा सचिनजी , फार सडेतोड लिहिलंत .
    धर्मासाठी करू
    असे बॉम्बस्फोट
    घेऊ रक्तघोट
    जातीसाठी ...
    मरणारे मरो
    जावोत खड्ड्यात
    भक्तीच्या अड्ड्यात
    धुंद आम्ही ....

    ReplyDelete
  2. "अध्यात्म, देव, संत वगैरे म्हटल्यावर आपण फारसं डोकं चालवत नाही. खरंतर बुद्धी आणि विचारांची सर्वात जास्त गरज तिथेच असते"

    ...वारकरी तरी खरोखरच बुद्धी चालवताहेत आणि विचार करताहेत, असे तुला दिसते का सचिन ?

    ReplyDelete
  3. Sachin, Sanatan Sansthe vishayi lihinya purvi sansthecha nit aabhyas kar !!! Vaachiv batmyanvar aadharit lekh lihine murkh panache asate !!! Murkha Evadhe kalat naahi !! Tuzya aai baapane evadhe dekhil shikvale naahi kay tula !! Edpatya murkha nalayaka !!!

    ReplyDelete
  4. महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा 'खळांची व्यंकटी सांडो' सांगते, 'दुर्जनांचा नाश' नाही. धर्माला मर्यादा असतात, म्हणून त्यापुढे जाऊन संतांनी भक्तीचा हात पकडला. देऊळ आणि मशिदीच्या पलीकडे जाऊन सत्याची कास धरली. म्हणूनच तर शिवाजी महाराजांनी केळशीच्या याकुतबाबांना गुरू मानलं. शेख महंमदांना वारकरी परंपरेत महत्त्वाचं स्थान मिळालं. संतश्रेष्ठ नामदेव शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात पोहोचले. तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघाल्यावर अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिल्या विसाव्यासाठी वर्षानुवर्षे थांबते. आजही आर्चबिशप फेलिक्स मच्याडो आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो संतसाहित्यावर पीएचडी करतात. आणि म्हणूनच कित्येक सुफी संतांना, पारशी असूनही मेहेर बाबांना, जैन असूनही ओशो रजनीशना, बौद्धांच्या विपश्यनेला आणि शीख असूनही निरंकारी बाबांना महाराष्ट्रात लाखो अनुयायी मिळाले. हे अतिशय बोलकं आहे.

    ReplyDelete