Saturday 4 December 2010

बाबासाहेब आणि प्रबोधनकार

गावागावात दलितांवर हल्ले होतात, दलित सवर्ण दंगे होतात, तेव्हा दलितांचा तो संघर्ष पूर्वीसारखा ब्राम्हणांशी किंवा देशमुख मराठ्यांशी नसतो. तो असतो मधल्या जातीसमूहांशी. उदाहरणार्थ खैरलांजी. हे टाळण्यासाठी दलित आणि ओबीसींनी एकत्र यायला हवं. आज रिपब्लिकन आंदोलन आणि शिवसेना त्यांचं प्रतिनिधित्व करतेय. म्हणून शिवशक्ती भीमशक्ती एकत्र यायची गरज आहे. त्याचं राजकारण यशस्वी होईल किंवा नाही, माहित नाही. पण त्यातून महाराष्ट्रात जातीय सलोखाही येऊ शकेल. शिवाय काही बलिष्ठ जातींच्या माजाचा नंगानाच वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू आहे. त्याला वेसण बसू शकेन. कदाचित हे सारं केवळ विशफुल थिंकिंगही असू शकेल. आज नवशक्तित माझ्या आठवड्याच्या कॉलमात छापून आलेला हा लेख. 

परवा सहा डिसेंबर आहे. महापरिनिर्वाणदिन. आतापासूनच चैत्यभूमीवर भीमसैनिकांचे जत्थे हळूहळू जमा होऊ लागलेत. दरवर्षी इथली गर्दी वाढतेच आहे. पण ही फक्त गर्दी नाही. एक निश्चित विचारधारा असणारी आणि इतिहासाचा प्रवाह बदलण्याची जिगर असणारी एक मोठी ताकद आहे. जरा लक्षपूर्वक पाहिलं की त्यात राखेची पुटं चढलेला ज्वालामुखी दिसतो. दरवर्षी शिवाजी पार्कवर या आगीची धग अनुभवायला मिळते.

हो शिवाजी पार्कवरच. चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींचं दर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगा लावल्यानंतर खरा सोहळा असतो तो पार्कातच. लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. एक अखिल भारतीय साहित्य संमेलन सोडल्यास इतकी उलाढाल अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच होत नाही. ही फक्त खरेदीविक्री नसते तर विचारांची देवाणघेवाण होते. वरच्या पट्टीतल्या जलशांनी पार्कातलं रात्रीचं काळं आकाश गडद निळं होऊन जातं. नेत्यांची भाषणंही होतात. कार्यकर्त्यांच्या घामाने शिवाजी पार्काची जमीन पवित्र होते.

शिवाजी पार्काविषयी अशीच नितांत श्रद्धेची भावना आहे ती शिवसैनिकाची. ते त्याच्यासाठी पार्क नाही, शिवतीर्थ आहे. शिवसेनाप्रमुख हे त्याचा देव आहेत. आणि त्यांची कर्मभूमी म्हणून शिवाजी पार्क हे तीर्थक्षेत्र. गेली जवळपास पन्नास वर्षं बाळासाहेब शिवाजी पार्क दणाणून सोडत आहेत. दर दस-याला भीमसैनिक नागपुरातल्या दीक्षाभूमीत गोळा होतात तर शिवसैनिक इथे. शिवसैनिकासाठी ते विचारांचं सोनं असतो. तो त्याने भारून जातो. त्याच्याच जोरावर वर्षभर जगाला शिंगावर घेत राहतो.

एकच शिवाजी पार्क. पण दोन्ही ध्रुव इथे एकत्र येतात. एक सोहळा निळा. दुसरा भगवा. दोघे दोन टोकाच्या विचारधारांचे. साम्य तसं थेट काहीच नाही. पण कार्यकर्त्यांची मूस मात्र दोन्हीकडे सारखीच. दोन्हीकडचे कार्यकर्ते पुढचा मागचा फारसा विचार न करता रस्त्यावर उतरणारे, ठसन देणारे, समोरच्याला खडे खडे नडणारे, साधारणतः एकाच आर्थिक गटातले आणि कमालीची निष्ठा बाळगणारे. तरीही दोघांमधे जमीनअस्मानाचं अंतर. पण शिवाजी पार्क त्यांच्यासाठी क्षितिज बनतं. कारण दोघांचीही ती निष्ठाभूमी.

याच क्षितिजाच्या साक्षीनं दोघांनी एकत्र यावं म्हणून अनेकदा प्रयत्न झाले. नव्या शिवसेनाभवनातल्या भिंतींवर मार्मिकची कवर फोटोफ्रेममधे लावलेली आहेत. त्यात शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा साठच्या दशकातच मार्मिकच्या कवरवर आलेली कुणीही पाहू शकतं. सुरुवातीच्या काळात नवशिक्षित नवबौद्ध तरुण बाळासाहेबांकडे आकर्षित झाला होताच. पण पुढे या धाग्यांमधली वीण सुटतच राहिली. वरळीच्या बीडीटी चाळीतल्या राड्यापासून मराठवाड्यातल्या नामांतर दंगलीपर्यंत. रिडल्समधेही तेच घडलं. तरीही युतीच्या काळात नामदेव ढसाळ त्यांच्या समष्टीसाठी सेनेकडे आले होते. पण या संघर्षाचं ओझं खांद्यावर नसलेल्या उद्धव ठाकरेंनी शिवशक्ती भीमशक्तीला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. आज तो अपयशी ठरला असचं म्हणावं लागेल.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक ऋणानुबंध खूप महत्त्वाचा आहे. इतिहासातलं असलं तरी ते आजही तितकंच अर्थपूर्ण असं नातं आहे. हे नातं आहे दोन दिग्गजांच्या, समतेच्या लढाईतल्या दोन सेनापतींमधलं प्रेमाचं नातं. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दोन प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. प्रबोधनकार आणि घटनाकार. दोघेही समकालीन. एकमेकांशी ते किमान तीसेक वर्षं तरी ते कायम संपर्कात असावेत. दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता. महात्मा जोतिबा फुलेंना दोघांनीही आपलं गुरू मानलं होतं. राजर्षी शाहू महाराज हे दोघांच्याही पाठिशी आदरपूर्वक आणि ठामपणे उभे होते. बाबासाहेबाना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते. प्रबोधनकार हे उच्चवर्णीय म्हणावं लागेल अशा सीकेपी जातीत जन्मलेले. त्यांनाही ब्राम्हणेतर असल्यामुळे अनेक अडथळे आले. पण त्याची तीव्रता बाबासाहेबांइतकी निश्चितच नव्हती. दोघेही जातिव्यवस्थेविरुद्ध अत्यंत धडाडीने लढले.

दोघेही ज्ञानयोगी. वाचनाचा दोघांनाही प्रचंड नाद. इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा दोघांचाही व्यासंग तेवढाच मोठा. दोघांनीही आपल्या व्यासंगाच्या आधारे ब्राम्हणी वर्चस्वाला त्यांनी हादरे दिलेच. आणि बहुजनांनाही न्यूनगंडातून उभं कऱण्याचं महत्त्वाचं काम केलं. फक्त समाजसुधारक म्हणूनच नाही तर पत्रकार, लेखक आणि वक्ते म्हणून दोघांचाही महाराष्ट्रभर दरारा होता. दोघांचीही लेखणी तिखट होती. रिडल्समधे बाबासाहेबांनी केलेली देवतांची टवाळी पंचवीस वर्षांपूर्वी वादाचा विषय बनली होती. पण प्रबोधनकारांनी देव आणि देवळांवर केलेले प्रहार त्याच्याही चार पावलं पुढे आहेत. प्रबोधनकारांनी आपल्या लिखाणात बाबासाहेबांविषयी अनेकदा अत्यंत आदरपूर्वक लिहिले आहेच. बाबासाहेबांनाही एक इतिहाससंशोधक म्हणून प्रबोधनकारांच्या लेखनाचे उतारे आपल्या साहित्यात वापरलेले आपल्याला सहज आढळून येतात.

दोघांनी मिळून आपल्या दादरमधे एक खूप महत्त्वाची लढाई लढली होती, ती होती सार्वजनिक गणपती उत्सवाची. साल १९२६. टिळक ब्रिजच्या जवळ आणि दादर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजुला रिकाम्या मैदानात सार्वजनिक गणपतीचा मंडप होता. दलिताच्या हातून गणपतीची पूजा करायची असा निर्धार बाबासाहेबांच्या नेतृत्वात दादरच्या बहुजन तरुणांनी केला होता. त्यात प्रबोधनकारांचीही साथ होती. गणपतीच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी मंडपाला गराडा घातला. मंडळाचे पदाधिकारी टाळाटाळ करत होते. दुपारी बारा वाजता प्रबोधनकार गर्जले, तीन वाजेपर्यंत जर अस्पृश्याच्या हातून गणपतीची पूजा झाली नाही, तर गणपतीची मूर्ती फोडून टाकेन. त्यानंतर कुत्र्याचं शेपूट सरळ झालं. बाबासाहेबांचे एक कार्यकर्ते मडकेबुवा यांनी स्पर्श केलेलं गुलाबाचं फूल गणपतीवर वाहण्यात आलं. सध्या परळ चौकाला याच मडकेबुवांचं नाव देण्यात आलं आहे..

पण यानंतर तो गणेशोत्सव बंद पडला. त्याचा आळ प्रबोधनकारांवर आला. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सवाची सुरवात केली. जसे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्यांनी केली तसंच मराठी पद्धतीच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना करण्याचं श्रेय प्रबोधनकारांकडे जातं. बाबासाहेब या बंडखोरीत सोबत होतेच. विशेष म्हणजे हा उत्सव सुरु करण्याची भूमिका मांडणारं एक आवाहन तेव्हा बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतमधे छापून आलं होतं. त्यावर प्रबोधनकारांची सही होती.

दादरच्या शिवाजी मंदिरजवळच्या मिरांडाच्या चाळीत प्रबोधनकारांचं बस्तान होतं आणि जवळच्याच खांडके बिल्डिंगीत प्रबोधनची कचेरी. बाबासाहेबही दादरलाच राहत असतं. तेव्हा या दोघांच्यात नियमित संपर्क असे. या दोघांमघे पत्रांची ने आण करणारे प्रबोधनकारांचे मानसपुत्र रामभाऊ हरणे आजही हयात आहेत. नव्वद वर्षांचे असूनही ठणठणीत असणारे रामभाऊ आज वाद्र्याच्या एमआयजी कॉलनीत राहतात. बाबासाहेब आणि प्रबोधनकारांनी एकत्रित गाजवलेल्या बैठका आणि सभांची साक्ष ते आजही देतात.

खांडके बिल्डिंगमधेच प्रबोधनकारांनी स्वाध्यायाश्रमाची स्थापना केली. या संस्थेच्या तरुणांनी अनेक भाषणांचं आयोजन केलं. पुस्तकं छापली शिवाय हुंड्याच्या विरोधात रान उठवलं. पुढे प्रबोधनकारांना आजरपणामुळे दादर सोडावं लागलं आणि हे बहुजनवादाचे संस्कार झालेले कार्यकर्ते बाबासाहेबांबरोबर गेले. महाडच्या सत्याग्रहात बाबासाहेबांबरोबर अनेक सीकेपी कार्यकर्त्यांची नावे आढळतात. अगदी धनंजय कीरांच्या बाबासाहेबांच्या चरित्रापासून खैरमोडेंच्या आठवणीपर्यंत आणि जब्बार पटेलांच्या सिनेमापर्यंत या कार्यकर्त्यांची टिपणीस, चित्रे अशी आडनावं अनेकांना बुचकळ्यात पाडतात. त्यामागे प्रबोधनकारांनी केलेली ही मशागत आहे. प्रबोधनकार पुण्यात असतानाही त्यांनी ब्राम्हणेतर आंदोलनाला मोठी उभारी आणली होती. जेधे, जवळकर आणि टिळकबंधूंनी गायकवाड वाड्यातल्या गणपतीसमोर अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम ठेवला. गायकवाड वाड्यातच समता सैनिक संघाची स्थापना करून बाबासाहेब आणि अन्य दलित नेत्यांबरोबर सहभोजन घडवले. या सगळ्या योजना रचल्या गेल्या त्या प्रबोधनच्या कचेरीतच.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार शेलारमामाच्या आवेशात आघाडीवर होते. त्यादरम्यान चर्चगेटजवळच्या लव्ह कोर्ट बंगल्यात दोघांची शेवटची भेट झाली. तेव्हा बाबासाहेबांनी प्रबोधनकारांना सांगितले की जोवर सगळे विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत, तोवर काँग्रेस संयुक्त महाराष्ट्र देणार नाही. शिवाय शेड्युल कास्ट फेटरेशन जिब्राल्टरसारखा तुमच्यासोबत उभा राहिल, असं आश्वासनही दिलं. प्रबोधनकारांनी आंबेडकरांसोबत झालेली ही भेट मुलाखतस्वरूपात छापून आणली. त्यानंतर जादूची कांडी फिरली. सगळे मतभेद बाजुला सारून विरोधी पक्ष एकत्र झाले. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. या लढ्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली.

हे सगळे संदर्भ महत्त्वाचे आहेतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा संदर्भ आहे, तो तेवीस सालातल्या निवडणुकांचा. तेव्हा प्रबोधनकार साता-यात होते. तिथे निवडणुकीला उभ्या असणा-या मराठा उमेदवारांनी ब्राम्हणेतर आंदोलनाची पार्श्वभूमी असतानाही मराठा जातीच्या नावाने मतं मागायला सुरुवात केली. अशावेळेस तिथल्या अस्पृश्यांना ब्राह्मणेतरी आंदोलनामुळे मराठा उमेदवारांच्या मागे जाणं भाग होतं. बहुजनवादाच्या नावाने दलितांना वापरून घेणं आणि बलवान जातींचाच फायदा होणं, प्रबोधनकारांना पटत नव्हतं. वातावरण तापलेलं असतानाच प्रबोधनचा अंक बाजारात आला. त्याच्या लीड आर्टिकलचं शीर्षक होतं, अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावध राहा!

अस्पृश्य पुढा-यांशी त्यांच्या बैठका झाल्या. त्यात त्यांनी मांडलेली भूमिका अशी होती, तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान तुमच्या हाडारक्तांमासाचा पुढारी लाभला असताना, तु्म्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल का? आंबेडकरच तुमचं कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूचे पोहणारे.आजही बेरजेच्या राजकारणाच्या नावाने दलित मतांना आणि नेत्यांना वापरण्यात येतंय. पण आज अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावधान असा इशारा देणारा कुणीही नाही. आणि विश्वासाने ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवावा, असा दलित नेताही उरलेला नाही.

बाबासाहेबांचा वारसा सांगणारे कार्यकर्ते आज अस्वस्थ आहेत. आणि ठाकरे आडनावाचा वारसा असणारे शिवसैनिकही असेच अस्वस्थ आहेत. आज राज्यातले हे दोन्ही मोठे ताकदवान समाजगट अस्वस्थतेच्या कड्यावर उभे आहेत. वाटा संपल्यात की काय असं त्यांना वाटतंय. अशावेळेस बाबासाहेब आणि प्रबोधनकारांचा स्नेहबंध खूप काही सांगून जाणारा आहे.

शिवाजी पार्कची पवित्र माती कदाचित काही नव्या वाटा दाखवू शकेलही! सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर जायला हवं. 


तुम्ही Follow वर क्लिक केलं. तर आपण नियमित संपर्कात राहू शकू. प्लीज.

3 comments:

  1. सचिन, उत्कृष्ट लेख...!...शब्दांच्या वापराबाबत मात्र जागरुकता हवीच. मी 'टवाळी' या शब्दाबद्दल बोलतोय हे लक्षात आले असेलच. दुसरी गोष्ट, 'टिळक बंधू' अशा ढोबळ उल्लेखाऐवजी श्रीधरपंतांचा स्पष्ट उल्लेख होणे आवश्यक वाटले.

    ReplyDelete
  2. खूपच छान माहिती आणि विचार आपण या लेखातून मांडले आहेत दोघाही महापुरष यांच्या विचारांची सांगड घातली आहे

    ReplyDelete