जेम्स लेनच्या प्रकरणात शिवसेना आमच्याबरोबर येऊन हा मुद्दा जोरात उचलेल असं वाटलं होतं, मराठा संघटनांच्या राजकारणात आघाडीवर असलेले एक मोठे नेते एकदा सांगत होते. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे ते मोकळेपणानं बोलत होते. राष्ट्रवादीपेक्षा सेनेला हा मुद्दा फायद्याचा होता. आता आम्ही त्यांना संपवणार. वगैरे बरंच काही बोलले.
असं असलं तरी शिवसेनेने दादोजी कोंडदेव प्रकरणात पुतळा न पाडण्याची भूमिका घेतली. यावेळच्या दसरा मेळाव्यात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी ही भूमिका मांडली होती. मीडियात कुणीच त्याची दखल घेतली नाही. दसरा मेळाव्यानंतर मी नवशक्तित लेख लिहिला होता, दसरा, दादोजी आणि शिवसेनाप्रमुख. शिवसेनेची याविषयीची भूमिका फायद्याची ठरेल की नुकसानीची हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा मुद्दा आता लवकर संपण्याची शक्यता नाही. तो धुमसत ठेवला जाणार. महाराष्ट्रात पुन्हा जात हा सगळ्यात मोठा अजेंडा बनणार.